थँक्स मॅडम.....!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आठवड्यामागचा शनिवार अगदी मस्तच उगवला!! शुक्रवारी रात्री राणीच्या देशातल्या हापिसमधून कोणी कोणताही सर्वर मोडला म्हणून फोन केला नाही, की हे सॉफ्टवेअर मोडलय, ते सॉफ्टवेअर चालत नाही म्हणून तक्रार केली नाही... सुखेनैव झोप झाली आणि दुपारी सगळे मायबोलीकर एकत्र भेटलो. खाणे, गप्पा यांत वेळ कसा निघून गेला काही कळलंदेखील नाही. मजा आली!

दोन - तीन तासांनी सगळ्यांनी आपापल्या घरी निघायचं ठरवल, तसं, मी आणि अजून एक मायबोलीकरीण, इतरांचा निरोप घेऊन, शॉपिंगसाठी सज्ज झालो!! दुसर्‍या दिवशी बॉसच्या लग्नाचं रिसेप्शन होतं आणि सगळी टीम जाऊन बॉसला अन त्याच्या झालेल्या बॉसला चेहरा दाखवून येणार होती अन मलाही सज्जड दम दिला होता की, बये ये तिथं!! बर नाही दिसत नाहीतर!! पुढच अप्रैजल हाच करणार आहे, माहिताय ना??? अरेच्या....!!! म्हणून काय झालं?? एकतर रविवारी संध्याकाळी कुठेतरी हजारो कोसांवरच्या ठिकाणी असले उच्छाव मांडायचे अन सगळ्यांनी त्याला जमायचं!! तर, मग आता ह्या उच्छावाला जायचं असल्याने, जरा शॉपिंग करणं क्रमप्राप्त होतं... इथे आल्यापासून ऑफ़िसला लागतील असे साधे रोजच्या वापरातलेच कपडे आहेत माझ्यापाशी, समारंभात घालता येतील अश्या कपड्यांची गरज होती, आणि शॉपिंगसारखं सुख कोणतं??

तर, मस्त शॉपिंग करून आम्ही रमत गमत निघालो. रस्ते वेगळे होताना एकमेकींना बाय केलं, शॉपिंगला मज्जा आली असं एकमेकींना सागून निरोप घेतला, अन घरी परतताना लक्षात आलं, की एक छोटीशी खरेदी राहिलीच!! एका मिनिटासाठी वाटलं जाऊदेत, खूप दमायला झालं होतं, पायही दुखत होते खूप... पण मग तेही पटेना मनाला. थोडक्यासाठी कंटाळा कशाला करायचा?? (हेच जर अभ्यासाची पुस्तकं वाचताना वाटलं असतं तर एखादी पी. एच. डी. तरी पडली असती हातात गेला बाजार!! हेहेहेहे!! असो.)

तर, पावलं वळलीच दुकानाकडे. दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी. मला हवी असलेली खरेदी मी अक्षरश: आटोपली!! आणि नशीबाने ती आटोपलेली खरेदीही मनासारखी झाली, म्हणून बरच वाटलं. सगळा दिवस आत्तापर्यंत छानच गेला होता. असा दिवस क्वचित पदरात पडतो माझ्या!!

खुशीत दुकानाच्या दरवाज्यापाशी आले आणि मी दरवाजा उघडणार इतक्यात तिथेच दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या एका गृहस्थांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला. मघाशी खरेदी करताना मी एकदा दोनदा ओझरतं पहिलं होतं त्यांना. तिथे दुकानातच काहीतरी खरेदी करायला आले असणार अशी नोंद माझ्या मनात ओझरती झाली होती, किंवा त्यांच कोणी, म्हणज़े पत्नी, मुलगी, किंवा तत्सम कोणी खरेदी करत असाव, आणि ते खरेदी संपायची वाट पाहत असावेत असा आपला माझा ग्रह झाला होता, आणि मनातल्या मनात ते या खरेदी प्रकरणाला कंटाळले असावेत, म्हणूनच असे कंटाळून एका बाजुला उभे असावेत असही वाटून हसू पण आलं होतं!! माझा बाबा नेहमीच माझ्या बरोबर किंवा आईबरोबर कुठेही बाहेर खरेदीला यायचं नेहमीच टाळत आलाय!! गृहस्थ तसे मध्यमवर्गीय वाटत होते, सभ्य, सुशिक्षित वाटत होते.

तर, जेह्वा मला दरवाज्यापाशी येताना पाहून त्यांनी दरवाजा उघडला, तेह्वाही मला काहीच लक्षात आलं नाही!! दरवाज्यापाशीच ते उभे आहेत अन एक त्यांचा चांगुलपणा म्हणून त्यांनी दरवाजा उघडून धरलाय असच वाटल मला!! शप्पत!! मी त्यांना धन्यवाद म्हणायला जाणार इतक्यात ते गृहस्थच म्हणाले, "थँक्स मॅडम, प्लीज कम अगेन.... "

......... म्हणजे?? मी दोन मिनिटं उडालेच!! आणि त्याहूनही मला मनाला लागला, म्हणजे त्यांच्या बोलण्याचा टोन... इतका थकलेला, हरलेला आवाज मी कधीच ऐकला नव्हता. तत्क्षणी भलतच अपराधी वाटायला लागल! प्रथम म्हणजे, डोअरपर्सन म्हणून कोणीतरी आपल्याहून वयाने मोठी अशी व्यक्ती उभी असणं आणि तिने आपल्यासाठी दरवाजा जाता येता उघडून धरणं अजून तरी माझ्या पचनी पडत नाही, बरं आत शिरताना, माझा मीच दरवाजा उघडून आत शिरले होते, त्यामुळे ते मला आधीच लक्षात आलं नव्हतं........ आणि आता माझ्या वडिलांच्या वयाचे हे गृहस्थ माझ्यासाठी दरवाजा उघडून उभे होते...!! अगदी कससंच झालं!! आत्तापर्यंत चढलेली शॉपिंगची धुंदी उतरली क्षणार्धात!!

त्यांच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल्यावर जरा हललंच आतमधे कुठे काहीतरी... ओढलेला, थकलेला चेहरा, पडलेले खांदे, चेहर्‍यावरचा खिन्न, विषण्ण आणि थकून हरल्याने येतो तसा एक अलिप्त, निर्विकार पण हार पत्करल्याचा भाव, आणि तो वैषम्याने भरलेला आवाज..... काय दु:ख असेल या काकांना, अस वाटल्यावाचून राहिलं नाही.

मनात प्रश्न उभे रहायला लागले एकामागोमाग....

या वयात हे असं दिवसभर उभं राहणं यांना जमत असेल का?? थकून जात असतील का? हो, नक्कीच!! काय कारण असेल बरं? वाईट परिस्थिती ओढवली असेल का घरी?? म्हणून मिळेल ती नोकरी पत्करावी लागली असेल का? या वयात योग्य अशी नोकरी मिळाली नसेल का? आयुष्यभर जबाबदारीने, नेकीने वागूनही आयुष्याचं विरत जाणंच सतत पाहणं तर नशीबात आलं असेल, ती अगतिकता, कुठेतरी मनानं पत्करलेली हार आवाजातून व्यक्त होत असेल का? कोणी पाहणारं नसेल का यांना अन यांच्या सहधर्मचारिणीला? का असूनही नसल्यात जमा झालं असेल?..... तेवढ्यात घरी गेल्यावर आई आणि बाबाशी फोनवर बोलायचं नक्की करुन टाकलं. तसही शनिवार, रविवार आणि आठवड्यातही माझे सतत फोन होतातच त्यांना, पण अजून एकदा....

का असं असेल? ऐन उमेदीत आयुष्य उधळलं असेल? जेह्वा, शक्य होतं तेह्वा बेदरकार वागून झालं असेल, अन शेवटी रिकाम्याच राहिलेल्या ओंजळीचा आता पश्चाताप होत असेल? पैलतीराची वाट चालताना आता आपणच आपली वाट कठीण बनवली आहे हे उमगून आणि आता वेळेचं घड्याळ मागे फिरवून आपली चूक दुरुस्त करु शकत नाही, हे लक्षात आल्याच वैफल्य असेल? अंगात रग असताना घरच्या, आपल्या लोकांना, हितचिंतकांना, मित्रांना कस्पटासमान वागवलं असेल आणि तेह्वा उमटवलेले ओरखडे इतके खोल असतील की आता ते पुसणं, अशक्य झालं असेल??

किंवा असं काहीच नसेल, बाकी सगळं ठीकच असेल अन फक्त तो दिवस खराब गेला असेल त्यांना? म्हणून मनातल्या मनात चिडचिडून वैतागल्या मूडमधे असतील त्याच दिवशी फक्त?

उगाच नुसते अर्थहीन प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न आणि त्यापायीची वांझोटी खिन्नता....

दुसरा दिवस ठरल्यासारखा पार पडला, रिसेप्शनला पोचल्यावर मी खरेदी केली हे खूप चांगलं झालं ह्याचीही खात्री पटली, पण त्या दुकानातून बाहेर पडताना जी अस्वस्थता आली होती, ती मात्र मनातून जायला तयार नव्हती. उगाच अपराधी वाटत राहिलं.....

आता या सार्‍याला एक आठवडा उलटून गेलाय. अपराधीपणाची जाणीव बोथट होत चाललीच आहे शेवटी - त्याबद्दलही लाज वाटते मधूनच - पण अजूनही त्या गृहस्थांच्या शब्दांचा टोन आठवतो. आठवायचा अवकाश, की, अस्वस्थता एखाद्या लाटेसारखी परतून अंगावर येतेच!

कधीतरी परत त्या दुकानात शिरायचं धाडस करेन....

विषय: 
प्रकार: 

लग्गेच वाचल मी...बाकि तुझ निरीक्षण छानच बर्का!!!!!!!!!

खरं आहे तुझं.
काही वर्षांपुर्वी मा. अबुवरुन परतताना एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. रात्रीचे ११ वाजले असतिल. हॉटेल जवळ्जवळ बंदच होत होते. सगळे वेटर जेवायला गेले होते आणि फक्त एक आजोबाच होते. तेवढ्या उशिराही त्यानी हसतमुखाने जेवायला वाढले आम्हांला. तेही तिथे वेटरच होते. कुक जेवत होता म्हणुन रोटीही त्यांनीच बनवली. अगदी लाज लाज वाटली जेवताना. पण त्यांनी खुप प्रेमाने जेवायला वाढले अगदी घरच्यासारखे.. परत परत विचारुन काय हवे-नको ते.... जेवलो पोटभर पण डोळेही भरुन आले निघताना..:(

छानच लिहिलयस ग! पण मुख्य दाद तुझ्या सवेंदनाशील वॄत्तीला. बा़कीच्यांच्या हे लक्ष्यातही आल नसत.
अशीच रहा ग कायम empathetic!
अंजली.

खर आहे...
मलाही नाही पटत... नाही बर वाट्त

१५ वर्षाखालील मुले व ५५/६० नंतरचे लोक पाहीले की वाईट वाटत. कधीकधी. वॉलमार्ट / टारगेट, मायरला तर बर्याचदा जख्ख म्हातारे (८० च्या पास) दरवाज्यातच कार्ट, पुस्तीका वैगरे द्यायला उभे राहतात. पहिले पहिले ऑड वाटायच आता मी देखील त्यांना टाळुन पुढे जातो.

खुप वाईट वाटलं ग हे वाचुन. पाणी आल डोळ्यात.
-प्रिन्सेस...

आयपॉड घेतला वाटतं ... ... छान. हे दुकान कोणतं...
एवढा विचार करू नको.

प्राची, .... Sad
अंजू, धन्यवाद. केदार, संग्या, अखि, प्रिंसेस, तुम्हां सार्‍यांचे आभार वाचून प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल.
अम्मी, नाही घेतलाय अजून आयपॉड.

छान लिहिलयंस ग!!
अंजलीला अनुमोदक!!

आय.टी.,
ब-याच दिवसांनी तू काहीतरी लिहीलस,
पण एकदम आतमध्ये कुठेतरी स्पर्श करुन गेलं सगळं,
छान !!

रमणी, संदीप धन्यवाद

आयटे आज मुहुर्त मिळाला बघ वाचायला Happy छान लिहलयस.
संवेदनाशील लिहतेस खरं अशीच लिहत रहा. पण जास्त विचार नको करु शेवटी असही आयुष्य असतं Happy

असं मुद्दाम ठरवून नाही गं विचार करत नीलूताय, पण असच आलं गं तेह्वा डोक्यात अन मग काही केल्या पुसलंच जाईना.... Sad हो गं, असही असत आयुष्य, अन कधी कधी याहूनही कठीण असत....

छान लिहिल आहे... मी आजच सभासद झाले आहे, पण २/३ लेख वाचुन अस वाट्ले की भारताबाहेर रहाणार्यन् साठी ही साईट आहे का??

योगिनी, प्राजक्ता धन्यवाद.
प्राजक्ता, मायबोलीचे सभासद सगळया जगभरात आहेत. भारतातही आणि भारताबाहेरही... Happy तुझेही स्वागत आहे मायबोलीवर.

आयटे, छानंच लिहीलं आहेस गं. अंजुतशी सहमत, तुझ्या संवेदनशील मनाला सलाम.
मलाही खूप वाईट वाटलं वाचून. आणि अखि, म्हणाल्याप्रमाणे, ही एक तशी पाहीली तर छोटीशी गोष्टं तू नेमकेपणाने मांडली आहेस. मला ही वयाने खूप लहान किंवा खूप वयस्कर लोक काम करताना दिसले की पोटात कालवतं. Sad
आमच्या कोल्हापूरच्या घराच्या शेजारी विडीचा कारखाना होता, त्यां विड्यांची बंडलं दुकानदारांना / टपरीवाल्यांना पोहोचवणारा हमाल पण खूप म्हातारा होता आणि त्याला ते विड्यांचे बॉक्सेस कारखान्यातून स्वतःच्या खांद्यावरून हातगाडीवर टाकावे लागत, आणि पुढे ठरलेल्या दुकानदाराना वाटण्यासाठी न्यावे लागत. पण त्यातही खूप कष्ट असतीलच. शिवाय हे काम दिवसभर करायचे म्हणजे मला आत्ता कल्पना ही करवत नाही. Sad आणि मोबदला ही कमीच असेल. Sad तेव्हा लहान होते, पण तुझा लेख वाचल्यावर एकदम आठवलं Sad

आयटे.. हलवुन टाकलस ग.. शब्दच सुचत नाहियेत.......

आयटे , नेहमी हसत असणारी व्यक्ती आंतुन खुप हळवी असते ... अश्या लेखनातुन ते अस बाहेर डोकावत .

दक्षिणा , आमच कोल्हापूर ... वाचून काय मस्त वाटतय...
आयटी खूप आवडेश...