कोबीची भाजी

Submitted by तृप्ती आवटी on 28 December, 2009 - 12:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम आकाराचा कोबी, १ वाटी ताजे वाटाणे किंवा भिजवलेली हरभरा डाळ किंवा एक मध्यम बटाट्याच्या काचर्‍या, ७-८ हिरव्या मिरच्या, ७-८ कडिपत्याची पानं, मीठ, फोडणीसाठी- १ डाव तेल, मोहरी, हळद. वरुन पेरायला भरपूर कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

कोबी एकसारखा, बारीक चिरुन घ्यावा. मिरच्या मिरची कटरमधुन काढाव्यात अथवा बारीक चिरुन घ्याव्यात. तेलात मोहरीची फोडणी चांगली तडतडली की कडिपत्ता आणि मिरच्या घालाव्यात. लगेचच कोबी आणि वाटाणे/ह डाळ/बटाटे घालावेत. भाजी चांगली हलवुन घ्यावी. मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालावी. झाकण न घालता मंद आचेवर भाजी शिजवावी. खाली लागु नये म्हणुन अधुन मधुन हलवत रहावी. फार सपक शिजवु नये, थोडा करकरीत राहु द्यावा कोबी. भाजी शिजली की उरलेली कोथिंबीर वरुन घालावी.

वाढणी/प्रमाण: 
चार मोठे
अधिक टिपा: 

_वाटाणे आणि बटाटे दोन्ही घातले तर छानच लागते भाजी.
_याआधी आलेल्या कोबीच्या भाजीच्या कृती इथे आहेत.

माहितीचा स्रोत: 
आरती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंड्रेला! तु ह्.डाळ आधी भिजवुन ठेवते का? काहीवेळा डाळ शिजत नाही आणी कोबी शिजुन जातो.
सासरी ही भाजी मुग्-डाळ घालुन करतात.मला बटाटा,मटार घालुन आवडते.

हो, ह डाळ चांगली भिजली पाहिजे. मी बरेचदा ऑफिसला येतानाच पाण्यात टाकुन ठेवते.

आमच्याकडेही अगदी ह्याच पद्धतीने करतात. पाणी अजिबात घालत नाही मी शिजवताना. गरज पडलीच तर अगदी एक-दोन चमचे. वाफेवरच शिजवते.
वरुन कोथिंबिरीबरोबर खवलेलं ओलं खोबरं घालूनही छान लागते.

काही भागात कोबी अर्धाच शिजवतात. विदर्भात कोबी पुर्ण शिजवल्या जातो.

मी एकदा पानाकोबी आणि फुलगोभी एकत्र करुन भाजी केली होती Happy

तेल सुद्धा फक्त फोडणीपुरतं आणि मिरच्या तडतडण्यापुरतं एक चमचाच घालायचं, मीठ-साखरेच्या वाफेवर मस्त होते भाजी..आणि कोथिंबीर, ओलं खोबरं हवंच. Happy

मला कोथिंबीर + नारळ हे नुसतं खायला सुद्धा आवडतं पण कोबीच्या भाजीवर मात्र अजिबात आवडत नाही Happy

आमच्याकडे घरी तुरीच्या शेंगांची आमटी होते नेहमी. तुरिचे दाणे घालुन कोबी कधी खाल्ली नाही, आईला सांगते Happy

आमच्याकडे ओले खोबरे, मिरची वाटून ते वाटण भाजीला लावतात. तेव्हा बटाटा नाही घालत. यम्मी!
मस्त पाकृ. तोपासु!

कोबीची मसूर घालून रस्सा भाजी पण छान होते. थोडा गरम मसाला व कांदा खोबरे भाजून घालायचे व लसूण फोडणीत टाकायची. मस्त होते.

माझी पण हिच पद्धत आहे. पाणी अज्जिबात घालत नाही मी... कोबीच्या भाजीत आल नाही टाकल कधी. आता बघेन एकदा टाकुन.