ध्यास

Submitted by अज्ञात on 6 January, 2010 - 22:26

पेटूनि ध्यास माझा; रवि-चंद्र होत आहे
जळतो अखंड एक; झुरतो दुजा दिगंत
पाण्यास ओढ त्यांची; वाफेत मेघ वाहे
काठांस वेदनेच्या; छेदून लाट पाहे

सारे सदाहि निष्प्रभ अस्वस्थ जीव आहे
क्षितिजास अंत नाही चाले प्रवास अंध
कळले अजून नाही कोणा कशास खंत
फिरते खुळ्या सुखाच्या पाठी चरक अनंत

मी कोण यात आहे ? एकांत हा रवंथ
उलटून रात्र जाई दिवसास वेग संथ
उमलून वाट येते पायातळी कुठून
जन्मास जन्म अगणित शोधावयास संत

..............अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञात,
एक वर्षानंतर आज योग आला मा बो वर यायचा. पल्ली यांचा २००९ जाने मधला शुभचिंतनाचा संदेश वाचला आणि लक्षात आलं वर्षभर आपण मा बो वर आलो नाही. मी लिहीत नसल्याने तुमच्यासारखा उत्साह नसतो. शिवाय तुमच्या एक दोन कवितांवर चाललेल्या हल्ल्यांना बघून मी नकळत मधे पडलो खरा पण जरा निवळण्याची चिन्हे दिसल्यावर बाजूला झालो.

आज थोडेच पण बोलके प्रतिसाद बघून तुमच्या कविता कळणारी आणि त्यांचं मनापासून कौतुक करणारी मंडळी बघून आनंद वाटला. मला जे जे म्हणावसं वाटलं ते आधीच सर्वांनी म्हणून टाकल्याने हे अवांतर लिहावं लागतंय. ह्यातही समाधान हे आहे की, सर्वांना जे थोडं थोडं वाटलं ते मला एकट्याला संपूर्ण वाटलं. माझं कौतुक पुरे. खरं श्रेय लिखाणाचं आहे.

अजूनही आपलं लिखाण आधीसारखं अगम्य आणि गहन-गूढ आहे की कांही बदललंय ? प्रत्येकाची आपापली उपजत शैली असते तीच सहज असते. तिच्यात संस्कारानुरूप निसर्गतः बदल झाले तर ते योग्य असतात नाही तर लिखाणात कृत्रिमपणा येतो असं माझ्या पहाण्यात आहे. अवघड आणि वेगळं लिहायचं म्हणून शब्दकोषांचे संदर्भ घेऊन कवितेचं स्फुरण आणून लिहिणारे कवी पाहिलेत मी. तुम्ही तसे नाही आहात. जे लिहिताय ते आज कदाचित लोकांना अवघड वाटू शकेल पण तेच अखेरपर्यंत टिकेल कारण तो, तुमच्या म्हणण्यानुसार मूळ स्त्रोतातील निर्मळ प्रवाह आहे.

खूपच बोललोय. पटलं नाही तर मनावर घेऊ नका.

लिखाणास नव्या वर्षाच्या शुभेच्छा.