एक क्षण अभिमानाचा - ऋन्मेऽऽष - धागा क्रमांक १

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 August, 2025 - 20:35

एका निवांत रात्री बेडरूममध्ये तंगड्या पसरून मायबोली वर धागा काढत असताना अचानक घरातली लाईट गेली आणि अंधारात गुडूप झालेल्या हॉलमधून मुलाचा किंचाळण्याचा आवाज आला... पप्पाऽऽ पप्पाऽऽ.. ज्या आवाजाचा सूर अगदी काका मला वाचवाऽऽ ईतकाच ऐतिहासिक लागला होता.

या पुरुषप्रधान संस्कृतीत जिथे मुले जेव्हा दचकतात, घाबरतात, त्यांना काही लागते, तेव्हा तोंडातून सर्वप्रथम जिथे आईऽऽ आईऽऽ किंवा आईऽ ग्गं निघते तिथे आपली मुले वडिलांचे नामस्मरण करतात यालाच अभिमानाचा क्षण घोषित करावे का या विचारात असतानाच फोनवर सैयाराची रिंगटोन वाजू लागली आणि त्यावरचे नाव बघून गडद अंधारात सुखद धक्का बसला. माझा चेहरा लख्ख खुलला.

कारण कॉलेजच्या मित्राचा कॉल होता. माझ्यासाठी नुसते कॉलेज म्हटले की ते व्हीजेटीआय'च आणि ते सुद्धा डिप्लोमाच. तशी आयुष्यात किर्ती, व्हीजेटीआय, एसपी, वालचंद आणि पुन्हा व्हीजेटीआय अशी पाच कॉलेजेस झाली. पण व्हीजेटीआय डिप्लोमाच्या वेळी जी कॉलेज लाईफ जगलो त्याची सर कश्याला नाही. तेव्हा केलेले किडे वेगळेच होते. मित्रांचा तो ग्रूप वेगळाच होता. आणि आता त्यातीलच एका मित्राचा फोन आला होता.

पण तो न उचलता मुलांसोबत जोडला गेलेला आपला अभिमान कायम राहावा म्हणून आधी हॉलमध्ये अंधारात अडकलेल्या मुलाची सुटका केली. त्याला त्याच्या हक्काची मेणबत्ती लाऊन दिली आणि मग मित्राकडे वळलो. एव्हाना फोनवर चार मिसकॉल जमा झाले होते. म्हणजे मॅटर तितकाच गंभीर होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण गेले कित्येक वर्षे त्याच्याशी व्हॉटसपवर सुद्धा बोलणे झाले नव्हते. अचानक ईतकी एमर्जन्सी काय असावी??? या विचारात असतानाच त्याचा पाचव्यांदा आलेला कॉल उचलला आणि...

"फोन उचल ना भें#चोद..!! काय हल#वत होतास का..??" - समोरून आवाज आला.

कॉलेज सुटून कित्येक वर्षे झाली आहेत. जवळपास तितकीच वर्षे त्याला शेवटचे भेटून किंवा फोनवर बोलून झाली आहेत. पण त्याने आमच्यातील नात्यावर घंटा फरक पडला नाहीये हे त्याच्या पहिल्याच वाक्याला जाणवले.

"अरे मी ईथे अमुकतमुक बार मध्ये प्यायला बसलो आहे. समोर एक काका दिसत आहेत. सेम तुझ्या वडिलांसारखे... फोन करून विचार ना ते कुठे आहेत?"

अरे देवा..!
मी म्हणालो, कश्याला उगाच?
तर तो म्हणे, "अरे बस काय.. एकटेच बसले आहेत. मी एका मित्रासोबत आहे. आम्ही कंपनी देऊ त्यांना.."

पुढे मी वडिलांना फोन करून ते तिथेच आहेत हे कन्फर्म करणे, तसे मित्राला सांगणे, मग त्याने जाऊन माझ्या वडिलांना भेटणे, पुढे जवळपास दोन ते अडीच तास त्यांची मेहफिल रंगणे हे सारे झाले. दोघे बार बंद करूनच निघाले. उशीर झाला होता म्हणून त्यानेच आपल्या गाडीने वडिलांना घरापर्यंत सोडले आणि त्यानंतर मला हे कळवायला फोन सुद्धा केला.

मी स्वत: मद्यपानापासून चार हात दूर राहणारा आणि अजून चार लोकांना दूर राहा असे सांगणारा असून, त्या दोघांची एका बारमध्ये भेट घडवून देणे हे तात्विकद्रुष्ट्या कितीही गंडलेले असले तरी त्याला ईलाज नव्हता.

त्याच्या पुढच्याच विकेंडला जेव्हा माहेरी गेलो तेव्हा वडिलांच्या तोंडून त्याच्याबद्दल बरेच काही समजले. त्याने स्वतःच्या कामधंद्याबद्दल आणि त्यात मिळालेल्या यशाबद्दल त्यांना बरेच काही सांगितले होते. ज्याचे त्यांना फार कौतुक वाटत होते. आणि या सगळ्यात जास्त कौतुक त्यांना याचे वाटले जेव्हा तो मित्र म्हणाला की माझा डिप्लोमा तुमच्या ऋन्मेषमुळे कम्प्लीट झाला. तो आमचा अभ्यास घ्यायचा. त्याच्यामुळे आम्ही ईंजिनीअर झालो... आणि कुठेतरी ते खरेही होते. त्यामुळे तो हे मनापासून आणि प्रामाणिकपणे म्हणाला असावा याचा मलाही विश्वास होता.

बारावीत मी माझ्या शैक्षणिक कारकिर्दीची काशी केल्यानंतर व्हिजेटीआय डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतले. जिथे बहुतांश वर्गमित्र थेट दहावीतून आले होते. त्यात जे मराठी मिडियमचे होते त्यांच्याशी तीच क्रूर चेष्टा होत होती जी माझ्याशी अकरावीत झाली होती. अकस्मात झालेल्या ईंग्लिशच्या आक्रमणाने भांबावून जात धारातीर्थी पडलो होतो.

पण मी बारावीनंतर अभ्यासात सिरीयस व्हायचा वसा घेतला असल्याने डिप्लोमाला पहिल्याच सेमीस्टरला थेट टॉपर्सच्या पंक्तीत जाऊन बसलो. तर सोबतचे दहावी करून आलेले मराठी मिडियम मित्र पहिल्या सेमीस्टरला केटी घेऊन मागे पडले.

थ्री ईडियट्स चित्रपटात दाखवल्याप्रमाणे 'जब दोस्त फर्स्ट आता है तो और बुरा लगता है' असे त्यांचे झाले की नाही कल्पना नाही. पण आपंण टॉप केले आणि मित्र नापास झाला तर तो आनंद आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकत नाही हे मात्र मला समजले.

अश्यातच कॉलेजमध्ये रुळलो असल्याने एक नवीन शोध लागला. कॉलेजमध्ये काही क्लासरूम्स स्टडीरूम म्हणून वापरल्या जातात. जिथे आपण पुर्ण रात्र थांबून अभ्यास करू शकतो. त्या शनिवार रविवारची तमा न बाळगता वर्षाचे ३६५ दिवस चोवीस तास खुल्या असतात.

मला दहावी-बारावी माझगावच्या डोंगरावर ग्रूपस्टडी करायचा अनुभव होता. कधी सिरीयसली केली नाही ती गोष्ट वेगळी, पण किमान हि कन्सेप्ट ठाऊक होती. मराठी मिडीयमच्या मुलांचे पहिल्या वर्षीचे प्रॉब्लेम अनुभवाने माहीत होते. ज्या ज्या विषयात गणित येते ते मला चांगले जमत होते आणि चांगले शिकवता येत होते. आणि मुळातच मला एखाद्याला शिकवायची फार आवड असल्याने मीच मित्रांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली.

वर्गातील ईतर सर्व टॉपर म्हणून गणल्या जाणार्‍या मुलांचे वेगळे ग्रूप होते तर आम्हा टवाळखोर मुलांचा एक भला मोठा ग्रूप होता ज्यात मोजून दोन तीन टाळकी हुशार गणली जायची. आणि त्यातही मीच दर शनिवार रविवारी तसेच सुट्ट्यांच्या काळात घरदार सोडून चोवीस तास कॉलेजमध्येच पडीक असायचो. घर कॉलेजपासून अर्ध्या तासावर होते जिथे फक्त आंघोळ करायला आणि कपडे बदलायला जायचो.

एका वेळेचा जेवणाचा डबा घरून आणायचो, तर एका वेळेचे जेवण हॉस्टेलच्या मेसवर व्हायचे. हॉस्टेलच्याच मैदानावर क्रिकेट खेळायचो. तिथल्याच टीव्हीरूममध्ये मॅच बघायचो. कधी वयाला अनुसरून मुली बघाव्याश्या वाटल्या तर फाईव्ह गार्डनला चक्कर मारायचो. कधी हॉस्टेलवर झोपायचो, तर कधी कॉलेज स्टडीरूममध्येच चादर अंथरायचो. थोडक्यात प्रत्येकाला त्यांच्या सोयीनुसार आणि सवडीनुसार मी उपलब्ध असायचो.

सर्रास मोबाईल वापराचा तो काळ नव्हता. त्यामुळे कुठली भेट प्लान करून नाही व्हायची. नाईक कुठे आहे चौकशी केली की मी सापडून जायचो. कधी दोघा चौघांना एकत्र घेऊन शिकवायचो, तर कधी प्रत्येकाला वेगळे शिकायचे असल्यास क्लेम लागायचे. एक्झामच्या आदल्या रात्री सारा ग्रूप एकत्र कॉलेजला पडीक असायचा. रात्री चहा प्यायला एकत्र जायचो तिथेही एखाद जण पुस्तक घेऊन आलेला असायचा. मला काहीतरी डाऊट विचारत राहायचा.

अगदी त्या 'सुपर थर्टी' पिक्चर मधील हृतिक रोशनसारखा ऑरा होता माझा. मी तितका ब्रिलियंट होतो अश्यातला भाग नाही. पण सोबतच्या मुलांपेक्षा हुशार होतो आणि त्यांना शिकवावे कसे याची हातोटी होती.

म्हटले तर मी त्यांचे भले करत होतो, पण प्रत्यक्षात त्यांच्यामुळे माझेच जास्त भले होत होते. बारावीला घसरलेली गाडी पुन्हा कधी रुळावर येईल असे वाटले नव्हते आणि आली तरी पुढची चारेक वर्षे नियंत्रणात राहील याची खात्री नव्हती. डिप्लोमाच्या चार वर्षात मी ते सारे केले जे करायच्या नादात आपण आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची वाट लावतो. पण तरीही ती लागली नाही कारण माझ्यावर चार जणांना शिकवायची जबाबदारी होती. आणि त्यासाठी मला आधी ते शिकावे लागायचे.

ईंजिनीअरींगला ४० टक्के पासिंग असते, माझी कधी ४० टक्के अटेंडन्स सुद्धा नसायची. पण मला मित्रच नोटस आणून द्यायचे आणि म्हणायचे हे तू वाच, समजून घे, आणि मग आम्हाला समजव. त्यामुळे मी वेगळा असा अभ्यास कधी केल्याचे आठवत नाही. एकच कन्सेप्ट चार लोकांना शिकवून ते माझे क्लीअरच नाही तर पाठ सुद्धा होऊन जायचे.

पेपर संपला की परीक्षागृहात माझ्या बेंचभोवती सगळ्यांचा घोळका जमून आपण अभ्यास केलेल्यातले काय आले आणि काय नाही याची चर्चा व्हायची. रिझल्ट लागला आणि मनासारखे मार्क्स आले की पहिली टाळी, पहिली मिठी मला मारली जायची. त्यावेळी यात काही विशेष वाटले नव्हते. ईटस पार्ट ऑफ कॉलेज अ‍ॅण्ड फ्रेंडशिप लाईफ असे सारे प्रकरण होते.

पण कधीतरी एकदा कॉलेज संपल्यावर अजून चार वर्षांनी वाशीला एका मॉलमध्ये एक मित्र मला भेटला. म्हटले तर तो आमच्या ग्रूपचा नव्हता. आमच्या ग्रूपचा मूळ पिंड बॅकबेंचर्स टपोरी होता तर तो मुलगा सिन्सिअर कॅटेगरी होता. दहावीला त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते, पण ईथे मात्र पहिल्या सेमीस्टरला दोन केट्या होत्या. हुशार होता पण कदाचित अभ्यास करायची दिशा चुकत होती आणि आपण शाळेतील हुशार विद्यार्थी असून आपल्याशी हे काय होतेय या विचारांनी फ्रस्ट्रेशन मोडमध्ये पोहोचला होता. किंबहुना त्याच्याशी बोलताना हे पहिल्याच भेटीत जाणवले होते. वर्गातली काही मुले यावरून त्याला चिडवायची आणि हा चिडायचा असे सारे प्रकरण होते.

आमचा ग्रूप एकत्र अभ्यास करतो हे समजल्याने तो आम्हाला जॉईन झाला आणि त्याला अचानक अभ्यास कसा करावा याची गुरुकिल्ली सापडावी असे झाले. दुसर्‍या सेमीस्टरला तो ऑल क्लीअर झाला आणि तिसर्‍यापासून जवळपास माझ्या ईतकेच गुण मिळवून टॉपरमध्ये गणला जाऊ लागला. त्याला चिडवणार्‍या मुलांना तोंडावर पाडू लागला. ईतरवेळी आमच्या ग्रूपचा हिस्सा नसला तरी परीक्षेच्या वेळी आमच्यासोबत अभ्यास करणे त्याने शेवटपर्यंत सोडले नाही.

कॉलेजमध्ये असतानाही तो माझ्याबद्दल कौतुकाने चांगलेचुंगलेच म्हणायचा, पण तेव्हा त्यात काही विशेष वाटले नव्हते. पण त्या दिवशी मॉलमध्ये भेटला. सोबत मैत्रीण होती. गर्लफ्रेंड होती की कलीग, काही कल्पना नाही. पण तिला माझी ओळख करून देताना त्याला अगदी भरून आल्यासारखे झाले होते. माझे आयुष्य पालटून टाकणारा असे काहीसे विशेषण माझ्यासाठी वापरले की मला स्वताचा अभिमान वगैरे वाटण्याऐवजी संकोचायला झाले. कारण मी माझ्या आयुष्याला पुरेसे सेट करून आता फार काही महत्वाकांक्षा न बाळगता निवांत जगायचे या मोडमध्ये पोहोचलो होतो. अश्यावेळी समोरून कोणी आपल्याबद्दल ईतके भरभरून आणि आदरपुर्वक बोलताना पाहून आपण खरेच कोणाचे आयुष्य बदलावे किंवा त्यावर प्रभाव टाकावे या पात्रतेचे आहोत का असा प्रश्न पडला. अर्थात, त्या प्रश्नाचे उत्तर न शोधता आनंदानेच भरून पावलो.

एक तो दिवस आणि एक हा दिवस जेव्हा एका मित्राने असेच काहीसे माझ्या वडिलांना सांगितले.

आपल्या मुलाने आयुष्यात जे काही केले त्यावर ते पुर्ण समाधानी असतील की नाही याची मला कल्पना नाही. पण कदाचित माझ्या मित्राचे असे बोलणे त्यांच्यासाठी सुद्धा एक अभिमानाचा क्षण ठरला असेल. आणि आईवडिलांना आपला अभिमान वाटावा यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण आपल्यासाठीही नसावा Happy

--------------------------------------------------------

तळटीप - धागा क्रमांक १ लिहिला आहे याचा अर्थ धागा क्रमांक २, ३, ४... येतीलच याची खात्री नाही.
फक्त ती तरतूद करून ठेवली आहे.
कारण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला की आयुष्य जसे सुखी आणि समाधानी होते.
तसेच छोट्या छोट्या गोष्टीत अभिमान मानला की आयुष्यात अहंकाराला थारा राहत नाही.
असे मला आपले वाटते Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
थांबू नका सर. आता येऊ द्या २, ३, ४...

कारण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानला की आयुष्य जसे सुखी आणि समाधानी होते.
तसेच छोट्या छोट्या गोष्टीत अभिमान मानला की आयुष्यात अहंकाराला थारा राहत नाही. >>

Happy

छान किस्सा!

शाळेतली एक मैत्रीण होती, तिला शिकवायला भारी आवडे आणि जमे. तिने (जरी वेगळ्या कॉलेज मध्ये असलो तरी) एकदा bode plot बसून शिकवलेला अजूनही काही एक दोनदा शिकवलेलं.. ते आठवलं.

हर एक दोस्त जरुरी होता है Happy

आवडलं.
तुमचं लिखाण नेहमीच आवडतं. सरळ सोपं आणि प्रामाणिक वाटतं.

मित्रांना अभ्यासात मदत करून त्यांना पास करण्याची जबाबदारी घेणं हा गुण मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. माझ्या मुलाच्या इंजिनियरिंग च्या वेळी अनुभवत होते. जो मित्र अभ्यासात जरा कमी पडायचा त्याला इतर मित्र मिळून एक एक लेसन समजावून द्यायचे.

छान लिहिलंय.
हाच भाग वाढला तरी चालेल ,लिहा. Happy

वडिलांना मुलांचं कौतुक असणं खरच अभिमानाचा क्षण असतो मुलांसाठी, तितकाच इमोशनल .
तुमच्या आयुष्यात असेच अनेक अभिमानाचे क्षण येवोत ही बाप्पा चरणी प्रार्थना.

खरे आहे सिमरन आपल्या आई-वडिलांना आपला अभिमान वाटणे यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण नाही मुलांसाठी Happy

धन्यवाद सर्वांचे.

@ शर्मिला, हो.. तो सुद्धा एक ब्रो कोडच आहे Happy

एक उदाहरण,
मी डिग्रीला असताना शेवटच्या सेमीस्टरला जेव्हा सात आणि आठ दोन्ही सेमिस्टर चे पेपर एकत्र देत होतो, आणि शेवटच्या पेपरला इतका आजारी पडलो होतो की पूर्ण बेडवर आडवा झालो होतो. पुस्तक वाचायला गेले तरी डोके गरगरायला लागायचे. तेव्हा मला वाचून दाखवायला दोन मित्र माझ्या घरी आले होते. शेवटचा पेपर सातव्या सेमिस्टरचा असल्याने त्यांना द्यायचा नव्हता. त्यांची परीक्षा संपली होती. मला मदत करायला आले होते.

मुली अध्येमध्ये पण क्वचित असायच्या आमच्यात. याचे कारण म्हणजे मुळात सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मुली कमी. त्यात मुलींना अंधार पडला की थांबायला परवानगी नाही. त्यात आमच्या ग्रुपची पहिल्या वर्षाची टपोरी इमेज जी बदलायला दोन-चार सेमिस्टर जावे लागले Happy

ग्रुप स्टडी हा एकूणच व्यापक विषय आहे. त्याचे वेगळे किस्से रंगतील. गणपती नंतर कधीतरी त्याचा वेगळा धागा काढुया Happy

मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो >> कमी जास्त माहित नाही. पण विषय निघाला म्हणून नोंदवून ठेवतो.
इंजिनिअरिंगला दोन मैत्रिणी अशा होत्या. 'कसं समजत नाही? समजलंच पाहिजे' म्हणून खनपटीला बसून शिकवूनच टाकणार्‍या. लायब्ररी, जिन्यांच्या पायर्‍या, जायचे यायचे रस्ते (कॉरिडोर), मोकळे वर्ग, ड्रॉईंग रुम, कुणाच्या घरी, परिक्षेच्या आधी कुठेही. या दोघी डिप्लोमा करुन आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना मायक्रोप्रोसेसर आणि एकुणच इलेक्टॉनिक्स आमच्यापेक्षा जास्त यायचं. आम्ही त्यांना गणित शिकवायचो. Happy डिप्लोमावाल्यांना गणित का येत नाही याची गंमत वाटायची तेव्हा. ऋन्मेष भेटला न्हवता. Happy

छान कुठलाही अभिनिवेश न बाळगता केलेले लेखन असते तुझे. यावेळेसही आवडले!

असे अनेक अभिमानाचे क्षण वारंवार येवोत हीच गणेशाचरणी प्रार्थना!

ग्रुप स्टडी हा एकूणच व्यापक विषय आहे. त्याचे वेगळे किस्से रंगतील. गणपती नंतर कधीतरी त्याचा वेगळा धागा काढुया Happy >> धागे में पोटेंशियल तो है Proud

मंजूताई आणि निकु धन्यवाद..
आणि हो ग्रुप स्टडीचा धागा तर मी काढेनच. त्याला कारणच तसे आहे जे त्या धाग्यातच सांगेन..

अमितव हो,
डिप्लोमामध्ये तेच विषय झाले असल्याने त्याचा डिग्रीला आम्हाला फायदा होतोच.

गणिताबाबत मला वाटते बारावीच्या मुलानी त्या विषयाला जास्त महत्त्व दिले असते. कारण पीसीएम गुण काउंट केले जातात.
दुसरे म्हणजे ज्यांचे गणित कच्चे असते ते पीसीबी वाटेने सटकलेले असतात. त्यामुळे तुलनेत चांगले गणित असलेलेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गोळा होतात.

डिप्लोमा बाबत तसे होत नाही. एकतर गणिताला वेगळे असे विशेष महत्त्व नसते. आणि शेवटच्या वर्षाला तर तो विषयच नसतो. त्यामुळे डिप्लोमा करून डिग्रीला जाणारे गणित हा विषय क्रॅक करून पुढे आलेत अशातला भाग नसतो. आधीच्या सेमीस्टरमध्ये गणितात उडालेले सुद्धा नंतरच्या सेमिस्टर मधले विषय त्यांचे चांगले असल्याने चांगला स्कोर करून इंजिनिअरिंगमध्ये चांगले कॉलेज मिळवतात. आणि तिथे पुन्हा गणितात डुबक्या खातात Happy

आईवडिलांना आपला अभिमान वाटावा यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण आपल्यासाठीही नसावा >>+१

डिप्लोमावाल्यांचे गणित हा प्रॉब्लेम बघितल्याचे आठवत नाहि कारण आमच्या वेळी गणीत विषय म्हणून फक्त पहिल्या वर्षी होते नि डिप्लोमावाले थेट सेकंड यीअरला आम्हाला जॉईन होत. तेही टॉपर्स असत त्यामूळे नंतर लागणारे अप्लाईड मॅथ्स मॅनेज करू शकत.

कधी वयाला अनुसरून मुली बघाव्याश्या वाटल्या तर फाईव्ह गार्डनला चक्कर मारायचो. >> मुली बघायला जायचास हे नक्की का रे ? फाईव्ह गार्डन वेगळ्या कारणांआसाठी फेमस होते. Lol

छान ऋन्मेष.

असाच काहिसा अभिमान माझ्या वडिलांना झालेला आठवतो. तसे मी त्यांच्या कुठल्याच अपेक्षा पुर्‍या (खरे तर माझ्याच अपेक्षा) केल्या नाहित. असो.
बाबा आणि मी विमानतळावर गडबडीत होतो चेक-इन करताना.
इतक्यात माझे नाव कोणीतरी पुकारले. कस्काय?
मी गोंधळात पडले की कोण हि व्यक्ती. मग त्यानेच आठवून दिले. तुम्ही नाहि का आम्हाला अबक शिकवत ?
मला काहिच आठवत न्हवता चेहरा पण त्याने बाबांकडे बघत विचारले, तुम्ही वडिल ना?
ह्यांच्यामुळे मी शिकलो आणि आज अमेरीकेत नोकरी लागली. खुप छान शिकवतात.
माझ्यापेक्षा बाबाच ज्यास्त खुष की त्यांनी तो किस्सा बर्‍याच वेळा इतर नातेवाईकांना सांगितला.

झंपी, वाह.. आपला किस्सा जवळपास सारखाच Happy

असामी, फाईव्ह गार्डन Proud
आणि हो, पण त्यासाठी हॉस्टेलचे उपाशीतापाशी सिंगल मित्र जायचे. मला त्यात इंटरेस्ट नव्हता. पण एक ग्रुप आहे तर त्यांच्यासोबत म्हणून माझीही चक्कर व्हायची.

असामी, @ गणित
मी खरे तर व्हिजेटीआयला तिसऱ्या वर्षी आलो. त्यामुळे मुंबई युनिव्हर्सिटीचे गणित माहित नाही. डिप्लोमा नंतर डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळते ते मला वालचंदला मिळाले होते. आमच्यावेळी ते ऍडमिशन रेकॉर्डब्रेक उशीरा झाले होते. इतका की मधल्या काळात मी एसपी कॉलेजला पार्ट टाइम डिग्री सुद्धा सुरू केली होती.
मुलांचे वर्ष वाया जाते की काय असे वाटताना झाले एकदाचे पण पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास करायला आम्हा डिप्लोमावाल्यांकडे फार कमी वेळ शिल्लक होता. इतर विषयाचे जमण्यासारखे होते पण गणितासाठी (एम थ्री साठी) सर्वांनीच एक स्पेशल क्लास लावला होता जो खास आमच्या लेट बॅचसाठी होता. एकूण एक जणांनी लावला होता फक्त मी आणि माझ्या रूम पार्टनरने लावला नव्हता. त्याला म्हणालो काढू आपण मी शिकवतो तुला. निघाला त्याचाही. फार कठीण होते असे आता मलाही वाटत नाही. कदाचित लेट ऍडमिशनमुळे असेल पण त्या एम थ्री ची सर्वांमध्ये दहशत तर होती हे नक्की. आणि काही जण त्यातच उडाले होते.

मस्त लिहिलंयस ऋन्मेष!
ग्रुप स्टडी आम्हीही करायचो. त्यामुळे मी थोडंफार रिलेट करू शकले तुझ्या अनुभवाशी. मी फारसं शिकवलं नाही कधी मैत्रिणींना. पण काही काही कन्सेप्ट्स समजावून दिल्या आहेत . पण एकदा मी असं ऐकलं होतं की दोन तीन मैत्रिणी लायब्ररीत एकत्र अभ्यास करत बसल्या होत्या आणि एक कन्सेप्ट त्यांना प्रयत्न करूनही समजत नव्हती. तेव्हा म्हणे त्यातली एकजण उत्स्फूर्तपणे म्हणाली, 'आत्ता इथे विशाखा हवी होती!' हे ऐकून मला मायक्रो/नॅनो प्रमाणात अभिमान की कायसा वाटला असं म्हणायला हरकत नाही. Wink

@वावे,
लिहून टाक, अभिमानाचे क्षण.

वावे, हो, कोणी अडचणीत असताना आपली आठवण काढली हे समजल्यावर मन सुखावतेच Happy

<< लिहून टाक, अभिमानाचे क्षण >> +७८६ असे छोटे छोटे अभिमानाचे क्षण प्रत्येकाने लिहिले तर ते कित्येक जणांना रिलेट होतील आणि त्यांना आपले आठवतील.

अभिमान वाटाव्यात अश्या अजून दोनतीन गोष्टी माझ्याही डोक्यात घोळत आहेत. वीकेंडला वेळ मिळेल तसे त्यापैकी एकावर दुसरा भाग लिहायचा विचार आहे Happy

छान कुठलाही अभिनिवेश न बाळगता केलेले लेखन असते तुझे. यावेळेसही आवडले! +१११११

असे अनेक अभिमानाचे क्षण वारंवार येवोत हीच गणेशाचरणी प्रार्थना!

धन्यवाद निल्सन Happy

छान कुठलाही अभिनिवेश न बाळगता केलेले लेखन
>>>>>
इतरवेळचे माहीत नाही पण गणपतीत असते, बहुधा तोच सुबुद्धी देतो Happy

मस्तच लिहिलंय ऋ. एकदम प्रांजळ व प्रसन्न. Happy
हे वाचून बऱ्याच आठवणी जाग्या होऊन "राकु मोड" मधे गेले होते पण परत आले. Happy
तुझ्या सेल्फ अवेअरनेसचे कौतुक वाटते. स्वतःला ओळखणं खूप कठीण आहे.

तुझ्या सेल्फ अवेअरनेसचे कौतुक वाटते. स्वतःला ओळखणं खूप कठीण आहे.
>>>>>

हो, खूप कठीण असते, पण खूप गरजेचे असते. एका रिलेशनमध्ये ठेच खाल्यावर हि अक्कल आली आहे. त्यावर पुन्हा कधीतरी एखाद्या गणपती उत्सवात...

इतक्या छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

धन्यवाद भरत Happy

दहा तासात नवीन प्रतिसाद आला नाही तर आधीच्या प्रतिसादाला धन्यवाद द्यावे लागते. नाहीतर धागा दहाव्या पानावर जातो Happy

Pages