२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.
गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.
यापुढे अधिक बळी जाऊ नयेत, म्हणून गाडगीळ पतीपत्नी सरकारदरबारी खेटे घालत राहिले.
२००६ साली त्यांनी भारतातलं पहिलं एव्हिएशन सिम्यूलेटर खडकवासल्याजवळ सुरू केलं. त्या काळी या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च आला. हा बहुतेक सगळा खर्च गाडगीळ कुटुंबानं केला. अभिजीत यांचे बंधू केदार यांनी पंचवीस लाख रुपये दिले.
पण आत्ता मुद्दा हा नाही.
कॅप्टन अनिल भारतीय वायुसेनेत वीस वर्षं कार्यरत होते. त्यांनी बांगलादेशाच्या युद्धात भाग घेतला होता.
काही दिवसांपूर्वी पहलगाम इथे अतिरेक्यांनी केलेल्या नृशंस हत्याकांडानंतर देशभर पाकिस्तानाशी युद्ध करावं, ही मागणी जोर धरू लागली. मुसलमानांवर आर्थिक बहिष्काराची भाषा तर हल्ल्यानंतर पाचेक मिनिटांत सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं. तुमच्यापैकी अनेकांनी ते आतापावेतो इतरत्र वाचलंही असेल.
कविता यांनी सांगितल्यानुसार केदार यांनी ते इंग्रजीत लिहिलं. त्या पत्राचा अनुवाद भक्ती बिसुरे यांनी केला आहे.
हे पत्र मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करायला परवानगी दिल्याबद्दल भक्ती बिसुरे यांचे मन:पूर्वक आभार.
***
माझ्या प्रिय भारतीय बंधुभगिनींना,
सप्रेम नमस्कार!
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ! अभिजित आज असता तर ५१ वर्षांचा झाला असता… पण माझ्यासाठी मात्र तो २७ वर्षांचाच आहे अजूनही.
कुठल्याही आईसाठी तिचं मूल कितीही मोठं झालं तरी ते कायम लहानच असतं म्हणून नाही… पण अभिजित २७ वर्षांचा असताना घडलेल्या घटनेने जणू काळ गोठला आणि सगळं जिथल्या तिथे थांबलं.
२००१ मध्ये सप्टेंबरच्या त्या रात्री अभिजितने त्याच्या ‘मिग -21’ मधून टेकऑफ केलं. त्यानंतर अवघ्या ३३ सेकंदांमध्ये सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिजितचं ‘मिग-21’ क्रॅश झालं. काही म्हणजे काही हाती लागलं नाही. फक्त रिकामं भकास आकाश आणि जीवघेणी शांतता तेवढी मागे राहिली…
त्या तसल्या जीवघेण्या शांततेचं ओझं अनेक वर्षं मनावर आहे, म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांशी बोलायचं ठरवलंय.
एखाद्या हिंसक प्रसंगानंतर येणारी शांतता मोठी भीषण असते. भूतकाळातली सुखदुःखं, श्वास, जगणं हे सगळं नाहीसं झाल्यामुळे निर्माण झालेली ती एक पोकळी असते. ही पोकळी उरावर घेऊन जगण्याच्या यातनांची कल्पनाच न केलेली बरी…
ती तसली भीषण पोकळी आता मला परत जाणवू लागली आहे… आणि त्यातच युद्ध हवं म्हणणाऱ्या आवाजांचे सूरही टिपेला पोहोचले आहेत.
मी १२ वर्षांची होते तेव्हा १९६२चं युद्ध झालं. आमच्या जगण्यातलं सगळं निरागसपण त्या युद्धानं हिरावून घेतलं.
आपली तरणीताठी मुलं गमावलेल्या, मोडून पडलेल्या आयांना बघत मी लहानाची मोठी झाले. नुकतंच लग्न झालेल्या आणि नवरा युद्धात कामी आल्यावर सर्वस्व गमावलेल्या कितीतरी तरुण मुली पाहिल्या आहेत मी. पुढे माझंच लग्न हवाईदलातल्या एका धडाडीच्या अधिकाऱ्याशी झालं. त्यानंतरची किती तरी युद्धं आम्ही दोघांनी एकत्र पाहिली.
१९७१चा तो कडाक्याचा हिवाळा मी फक्त हेडलाईन्समधून बघितलेला नाही, तर प्रत्यक्ष अनुभवलाय. माझा नवरा तेव्हा जोरहाटवरुन सतत मोहिमांवर जात असे. कधी युद्धभूमीवर लढणाऱ्यांसाठी राशन पोहोचवायचं म्हणून, तर कधी पूर्व पाकिस्तानातून जखमी किंवा मृत सैनिकांना परत आणायचं म्हणून त्याच्या अविश्रांत फेऱ्या सुरु असत. जीव धोक्यात घालणाऱ्या मोहिमांसाठी तो टेकऑफ करायचा तेव्हा मागे एकाकी धावपट्टीवर उभी राहून कित्येकदा मी त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केलीये. युद्धासारखी वाटणारी शांतता आणि शांतता ढवळून टाकणारी युद्ध हे सगळं मी जवळून पाहिलंय.
ज्यांनी कधी ना कधी युद्धावर गेलेल्या कुणाच्या तरी वाटेकडे डोळे लावून बसणं काय असतं हे अनुभवलंय, त्यांनाच युद्ध हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नाही याची जाणीव असते, याची मला पुरेपूर कल्पना आहे.
युद्ध म्हणजे विनाश. युद्ध म्हणजे नांदत्या कुटुंबांचे लचके तोडणं. युद्ध हा त्याग आहे, आणि त्या त्यागाची अपेक्षाही सहसा अशाच लोकांकडून केली जाते, ज्यांच्याकडे मुळातच फार काही नसतंच…
युद्धात बहुतेकवेळा सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, नोकरदारांची आणि शिक्षकांची मुलंच कामी येतात. श्रीमंतांची मुलं तिथपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. त्यामुळेच कर्त्यासवरत्या मुलाच्या बदल्यात मिळणारा तिरंगाही सर्वसामान्य आयांच्याच वाट्याला येतो.
युद्धाची खरी किंमत नेहमी बायकांनाच मोजावी लागते. ती किंमत काय असते? आपली तरुण मुलं गमावल्यावर त्यांच्या मागे कुढत जगत राहणं, नवरा गमावल्यावर आपलं दुःख बाजूला ठेवून एकटीने मुलांना वाढवणं, युद्धात भाऊ गेल्यानंतर उरलेलं आयुष्य भावाची उणीव घेऊन सैरभर जगत राहणं…
परवा पहलगाममध्ये जे झालं त्यानंतर देशात उफाळून आलेला संताप मला दिसतो आहे. मला तो कळतोही आहे. पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सूडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा. मोठमोठ्या व्यासपीठांवर, न्यूज चॅनल्सच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत ‘युद्ध हाच उपाय’ म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये, नसते. वेळ आलीच तर तुमचीआमची मुलं, विद्यार्थी, शेजारी, प्रियजन - पर्यायाने तुम्हीआम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो. आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे… युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरुन यायला कितीतरी वर्ष जावी लागतात. कितीतरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो!
अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ, त्याची भीषणता, गांभीर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहिती नाही. पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आततायी देश आहे. ‘नो फर्स्ट यूझ’ हे धोरण त्या देशाला मान्य नाही. अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय (आणि पाकिस्तानीही!) नागरिक मरतील. आपल्या जमिनी आणि नद्या तहहयात विषारी होतील. साडेतीन कोटी लोक आयुष्यभर ‘मरण आलं असतं तर बरं’ अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरे पडणार नाहीत.
तुम्हाला माहितीये, ८० कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात. तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. भारतीय सैन्यदलांच्या धाडसाबद्दल दुमत नाही, पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि १२,००० अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. आपल्या हवाईदलाला ४२ स्क्वाड्रन्सची गरज आहे, पण आपल्याकडे आहेत कशाबशा ३१, त्यातलीही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत. नौदलाकडे १५ पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सुमारे ७० पाणबुड्यांचा ताफा आहे… उद्या खरंच युद्ध सुरु झालं तर आपण कसेबसे दोन आठवडे लढू शकू, याची कल्पना आहे आपल्याला?
सैनिकांचे बूट, जॅकेट्स, रेडिओ, रायफल्स, टेंट्स, औषधं… आणि माफ करा, मला हा शब्द लिहिणंही जड जातंय, पण अगदी शवपेट्यांसाठीही आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? आणि आपण युद्धाचे मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलाय, हे दिसतंय का कुणाला? अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल, भाषणं देईल, महागडा शस्त्रसाठा देईल, पण त्यांची मुलंबाळं आपल्याला देणार नाही, हे लक्षात असुदे ‘युद्ध हवं’ म्हणणाऱ्या सगळ्यांच्याच.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या, असं मी अजिबात म्हणत नाही. पहलगामचा बदला घ्यायला हवाच. या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळायलाच हवा. आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा. संरक्षण अधिक काटेकोर हवं. अपयश समोर यायला हवं आणि त्याची दुरुस्तीही व्हायला हवी. वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंतीही व्हायलाच हवी.
पण सुडाच्या वारुवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवतां नये. त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नये. ते होऊ नये म्हणून, या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या रक्षणार्थ मी माझा मुलगा दिला आणि तो मला परत मिळाला नाही. एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला हे आवाहन आहे. भारताला आत्ता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं, अशी माझी अपेक्षा आहे. क्रोधाचे ढग गडद होतात तेव्हा आरडाओरडा करणं म्हणजे ताकद नव्हे, तर स्थिर राहाणं ही ताकद आहे हे, तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं, असं मला वाटतं. मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही, हे तुम्ही जमवायला हवं. ‘स्टेट्समनशिप’ चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे. या परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही, तर सहानुभूतीने नेतृत्व कराल, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या सैन्यदलांमधल्या माणसांची मोजदाद करताना ती फक्त एक माणसांची संख्या नाही तेवढ्या कुटुंबांची, स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे, हे विसरु नका. या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही हे सगळं कसं जमवणार, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे पहातायेत, हे लक्षात असू द्या. खरा नेता कसा असतो, कसा असायला हवा, हे त्यांना दाखवून द्या, प्लीज!
आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते.
बंधूभगिनींनो, तुम्ही म्हणताय तसं, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मूठभर स्थानिक काश्मिरींकडून मदत मिळते, आसरा दिला जातो, हे खरंच.
पण काश्मीरकडे पाठ फिरवणं, हा त्यावरचा उपाय नाही. उलट हीच वेळ आहे त्या मूठभर काश्मिरींकडे दुर्लक्ष करुन मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मिरींसाठी आपला हात पुढे करण्याची. दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो. इतरांपासून तुटलेले, दुरावलेले, एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना गाठून त्यांचे कान भरणं, त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं. काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करुन, तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता, तर त्यांना बळ देत असता, हे लक्षात असूदे. एरवी ज्या तरुण मुलांनी शेती केली असती, लहानमोठा नोकरीधंदा केला असता, ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले, अस्वस्थ, रिकामे बसणार आहेत. त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे.
काश्मीरबद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल, तो भारताचा अविभाज्य भाग आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मिरी लोकांना परकं करुन चालणार नाही. तुम्हाला काश्मीरची जमीन हवी, निसर्ग हवा, पण तिथली माणसं नकोत हे कसं काय जमेल?
अर्थातच, काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं. त्यांना न्याय मिळायला हवा. भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात. लोकसंख्येचा समतोल साधायला हवा. पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या साथीने व्हायला हवं, त्यांना डावलून नाही! कारण सर्वसामान्य काश्मिरी लोक तुमच्याबरोबर असतील तर दहशतवादी काहीच करु शकणार नाहीत. कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मिरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते, हा इतिहास आहे. १९४७ला घुसखोरी झाली तेव्हा, नंतर कारगिल घडलं तेव्हाही काश्मिरी मेंढपाळ, गुज्जर, बकरवालांनीच त्याबद्दल सैन्यदलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?
अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे, त्यांना खाऊपिऊ घालणारे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मिरी होते हे आपण विसरुन चालणार नाही. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा आदर करायला हवा. आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल, पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, संपूर्ण काश्मीर आपलं असावं-ते आपल्याला परत मिळावं असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे. त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही.
काश्मीरला जा. तिथल्या लोकांच्यात मिसळा. त्यांची हॉटेल्स, बागा, बाजार हे तुमच्या अस्तित्वाने भरून टाका. त्यांची सफरचंदं, त्यांचे जर्दाळू, केशर, गालिचे, शाली विकत घ्या. तिथे व्यवसाय सुरु करा. दुकानं उघडा. तिथे रेल्वे स्टेशन्स, विमानतळ येऊ देत. धरणं, पूल उभे राहूदेत. त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातला पैसा हे माध्यम होऊ द्या!
ही योजना राबवताना कुणाचे जीव जाणार नाहीत. विनाशही होणार नाही. युद्धापेक्षा हे बरंच नाही का?
काश्मीर हे भारताचं अविभाज्य, तेजस्वी अंग व्हावं पण ते तेज विश्वासाचं हवं… रणधुमाळीच्या आगीचं नाही. त्यासाठी आधी काश्मिरी लोक आपला अविभाज्य भाग असायला हवेत मात्र…
काश्मीरच्या गोष्टीचा उत्तरार्ध तिरस्काराने नाही, तर प्रेमाने लिहिला जाऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची ही वेळ आहे. हे घडलं तर पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरलाही फरक दिसेल, जाणवेल आणि तिथले लोक स्वतःच पाकिस्तानचं वर्चस्व नाकारतील!
बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू… पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीरही परत मिळेल. हे सगळं फक्त काश्मीर आणि काश्मिरींना आपलंसं केल्यामुळे साध्य होईल.
काश्मिरी लोकांनी आम्हाला वाचवलं, त्यांच्यामुळेच आम्ही आहोत हे पहलगाममधला दहशतवादी हल्ला अनुभवलेले पर्यटक आपल्याला जीव तोडून सांगतायेत.. सर्वसामान्य काश्मिरी माणूस कष्टाळू आहे. कुटुंबवत्सल आहे. त्यांनाही वाटतं आपल्या मुलाबाळांनी शिकूनसवरुन, सर्वसामान्य भारतीयांसारखं शांत स्थिर आयुष्य जगावं…
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार पाहिलेली, अनुभवलेली, त्यातून स्वतःचं सर्वस्व गमावलेली माणसं मानवतेवर विश्वास ठेवू शकतात तर आपणही तो ठेवायला हवा.
लक्षात ठेवा, युद्ध सुरू करणं सोपं, पण ते संपवणं अशक्य असतं. तिरस्काराची आग शत्रुला भस्मसात करेलच, पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे मोकळं सोडणार आहे? फक्त सैन्यदलं ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत, न संपणारी स्वप्न, दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. त्यांचा विसर पडू देऊ नका.
निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा. धैर्य निवडा. बुद्धीमत्ता निवडा. भारतमातेला निवडा.
माझ्या बोलण्याचा विचार करा.
दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी,
अभिजितची आई
आणि अनेक ‘मिग-21’ पायलट्सची माँ!
————
मूळ इंग्रजी पत्र - कविता गाडगीळ
अनुवाद - भक्ती बिसुरे.
■ ताबडतोब युद्ध करा हे इथे
■ ताबडतोब युद्ध करा हे इथे कोणीही म्हणत नाहीये
■ युद्ध कराच असेही कोणी म्हणत नाहीये
■ युद्धाने सर्वांचेच नुकसान होते हे चार वेळा लिहून झाले आहे
■ युद्धाने नुकसान होते हे मोदी, शहा, राजनाथ, डोवाल यांना कळत नसेल का हेही लिहून झाले आहे
तरीही अजून असे चित्र उभे करण्यात येत आहे की कविता गाडगीळ यांनी काहीतरी प्रचंड नवीन मानवतावादी मुद्दा मांडला असून तो पूर्णतः अमान्य करण्यात येत आहे व युद्धच व्हावे असे प्रतिसाद काहीजण जणू काही देत आहेत.
येथील एका सदस्यांच्या नात्यातील एक जण ठार झाले आहेत . त्यावर एखादे वाक्य लिहून लोक पुढे जात आहेत. त्यातच चित्र असे उभे करण्यात येत आहे की प्राची यांच्या भावना मुद्दाम व क्रूरपणे दुखावण्यात येत आहेत. वास्तविक हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा आहे आणि ही चर्चा किंवा कविता गाडगीळ यांच्या मतांच्या विरोधात मांडलेली मते येथील कोणाला दुखावणारी ठरू शकतील हे माहीत सुद्धा नसलेल्या सदस्यांना खलनायक ठरवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
अफाट आहे हे सगळे!
>>सरकारने ठरवलेल्या धोरणाचा
>>सरकारने ठरवलेल्या धोरणाचा विरोध करणे त्यासाठी जनमत जागृत करणे हा इतर कुठल्याही नागरिकाप्रमाणे त्यांचा हक्क आहे. त्याला 'हिडन अजेंडा' म्हणण्याची अपेक्षा तुमच्या कडून नव्हती राज. <<
लेट्मी डेल्व डीपर..
मी वर लिहिल्या प्रमाणे "गुड सोल्जर्स डोंट आस्क क्वेश्चन्स", हि शिस्त काहि प्रमाणात सैनिकि कुटुंबातहि आवर्जुन पाळली जाते. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातुन लिहित आहे. सैनिकि कुटुंबांतलं कल्चर, एक विशिष्ट प्रकारचं इंट्रिंसिक डिसिप्लिन खूप जवळुन अनुभवलेलं आहे. सैनिकाला युद्धाची हाव नसते, पण जेंव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस युद्ध करु नका असं भावनिक आवाहन सैनिकां कडुन किंवा त्यांच्या कुटुंबियाकडुन केलं जाणं हे माझ्या मते सैनिंकांच, किंबहुना देशाच्या मिलिटरी अॅपराटसचं मोराल डाउन करण्यासारखं आहे..
आधि लगिन कोंढाण्याचं.. अशी जाज्वल्य परंपरा आहे आपली. अजुन पुढे काय लिहिणार, तुम्हि सुज्ञ आहांतच...
जी गोष्ट येथे अजिबात गंभीरपणे
जी गोष्ट येथे अजिबात गंभीरपणे घेतली जात नाही ती ही की बहुसंख्य भारतीयांचे मत कविता गाडगीळ यांच्या मताच्या विरुद्ध आहे. संतप्त भावना आहेत. ते गाडगीळांचे पत्र whats app वर आधीच फिरले होते, इथे नंतर आले. ओवेसी पाकिस्तानी नेत्यांची अब्रू काढत आहे. एक दोन महत्वाचे मुस्लिम देश भारताला पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पळून गेले आहेत. 'व्यापाराला चालना मिळावी' हा उद्देश घेऊन गेलेले नसले तरी उत्तम निसर्गासाठी गेलेले निरपराध नागरिक मेले आहेत. धर्म विचारून विचारून मारले गेले आहेत.
आणि इथे काय चालले आहे?
गाडगीळांच्या विचारांना अनुमोदन देणे!
ते अनुमोदन देणाऱ्यांसाठी प्रतिसाद रूपाने धावून येणे!
स्वतः रस्त्यावर उतरत नसूनही गाडगीळांना विरोध करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे अश्या अर्थाचे ताशेरे मारणे!
इथले काही प्रतिसाद सोमीवर दिले गेले तर काय पातळीचे प्रतिसाद येतील हे सांगवतसुद्धा नाही
अफाट आहे हे सगळे!>>>
>>अफाट आहे हे सगळे!>>
चालायचेच. पोस्ट आणि चर्चा वाचली. आताची वेळ बुद्धाची नसुन युद्धाची आहे हे ज्यांच्या लक्षात येत नसेल त्यांचे अल्लाताला रक्षण करेल. कलमा, अजान, आयते वगैरे त्यांनी तोंडपाठ करुन ठेवली असतीलच. कोणी 'नारा ए तखबिर' म्हणाल्यावर जोरात 'अल्ला हु अकबर' अशा आरोळ्या ठोकण्याचा त्यांचा सरावही करुन झाला असेल. छत्रपती शिवरायांना आपले दैवत मानणारे, कोणी 'जय भवानी' म्हंटले की 'जय शिवाजी' म्हणणारे तुमच्या माझ्या, आपल्या सारखे लोक आता आउटडेटेड झालो आहोत. तेव्हा शांतताप्रेमींसाठीच्या या धाग्यावर आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा सेनादलांना विजयी भवं अशा शुभेच्छा देउन थांबलेलेच बरे म्हणतो.
हर हर महादेव!
<ताबडतोब युद्ध करा हे इथे
<ताबडतोब युद्ध करा हे इथे कोणीही म्हणत नाहीये
■ युद्ध कराच असेही कोणी म्हणत नाहीये >
< बहुसंख्य भारतीयांचे मत कविता गाडगीळ यांच्या मताच्या विरुद्ध आहे.> ( भारत सरकारने सर्वेक्षण केल्याचं कळलं नाही.)
( दोन प्रतिसादांच्या वेळेत २६ मिनिटांचे अंतर आहे. )
<. आताची वेळ बुद्धाची नसुन युद्धाची आहे हे ज्यांच्या लक्षात येत नसेल>
चालायचंच.
<इथले काही प्रतिसाद सोमीवर दिले गेले तर काय पातळीचे प्रतिसाद येतील हे सांगवतसुद्धा नाही>
हो. ज्यांनी आपला जिवलग गमावला अशा स्त्रियांना नेटभगव्यांकडून काय दर्जाचे प्रतिसाद आले, त्याचा एक मासला इथे दिला आहे. इथले लोक सोशल मीडियावर लिहीत नसतील, त्यांना असे प्रतिसाद येत नसतील आणि त्याला ते घाबरत असतील असं वाटतं का? इथेही असे प्रतिसाद इतकी वर्षे झेलतो आहे.
>>> हे माहीत सुद्धा नसलेल्या
>>> हे माहीत सुद्धा नसलेल्या सदस्यांना खलनायक ठरवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
कोणी कोणाला खलनायक ठरवत नाहीये इथे* - मतमतांतरे मांडतो आहोत आपण सगळे. ठरवून प्रयत्नपूर्वक वगैरे हीरो किंवा व्हिलन बनवावं इतकं इथलं कोणीही महत्त्वाचं नाहीये या परिस्थितीसमोर.
*शेंडे वगळता - त्यांनी हे मत 'घाबरट' आहे असं लिहिल्यावरून मी त्यांना व्हिलन म्हटलं आहे. ज्या बाईने अशा पद्धतीने मुलगा गमावला, त्यावर रडतभेकत न बसता ठोस कार्य केलं, तिला घाबरट म्हणायला जीभ टाळ्याला लावणारा आयडी माझ्यालेखी व्हिलनच आहे.
चार दहशतवादी निवडून
चार दहशतवादी निवडून गैरमुस्लिम नागरिकांची हत्या करून सरकारला युद्धास प्रवृत्त करत असेल तर सरकारसाठी ती नामुष्कीची गोष्ट असेल. दहशतवाद्यांनी भारतातील मुस्लिमांना अलगद बाजूला काढून सरकार कोणासाठी आहे हे दाखवून दिले. युद्ध करून एकवेळ पाकिस्तानला हरवता येईल परंतु येथील मुस्लिम दुरावले जातील. सुरक्षेतील एक चूक सरकारला बरीच महागात पडणार असे दिसतेय.
किती कीस पाडायचा तो !
किती कीस पाडायचा तो !
मंगेशकर धाग्यावर जिचा जीव गेला त्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल बोललं कि लगेचच अमूक तमूक द्वेषाचं भजन सुरू झालं. कसंही करून ते कुटुंबच कसं दोषी आणि हॉस्पिटलला दोष देणारे कसे नराधम अशा थाटात बोलणारे आता इथे वेगळा पवित्रा घेऊन बसलेत. तिकडे जीव गेला तरी क्रूरपणे त्या कुटुंबाला दोष देणारे आता जीव गेलेल्यांच्या बाजूने आहेत हे तरी बरं आहे.
पण आता जे बळी गेलेत त्यांच्या आडून जे जे आपल्या मतासारखे नाहीत त्यांना झोडपायचे तर आहेच पण एका धर्माच्या लोकांना सरळ सरळ गुन्हेगार, देशद्रोही ठरवले जातेय. याला त्या धर्माचा द्वेष म्हणायचं नाही, मंगेशकर हॉस्पिटलच्या वेळेला ते कार्ड खेळायचं. हा दुटप्पी पणा नाही बोलायचा इथे म्हणताना शेवटी न राहवून लिहीलाच.
ते फेसबुक, ट्वीटर , व्हॉट्स अॅप याला आग लागो. आपण मायबोलीबद्दल कितीही तक्रारी असतील तरी इथे एकमेकांना बर्यापैकी (आभासी) ओळखतोच ना ? त्यातल्या त्यात इथे संयत मतं व्यक्त होतात. दोन्हीकडून. आणि दोन्हीकडून चुकाही होतात. तर आपण इथल्या मेंबर्स कडून अपेक्षा ठेवू शकतो. नाही का ?
जे प्रचारक असतील आणि परतायच्या पलिकडे गेलेले असतील त्यांचा अपवाद करून बाकिच्यांनी अशा धाग्यावर अधून मधून ब्रेक घ्यावा आणि आपण काय बोलतोय याचा आढावा घ्यावा. बर्याच जणांना मतं बदलता येतील.
युद्ध करायचं कि नाही हे बाजूला ठेवा सध्या.
आपले पवित्रे कसे बदलतात हे त्रयस्थ म्हणून बघायला पाहीजे. अगदी माझ्यासहीत सर्वांनी. आपल्याला इतर लोक जज्ज करतात. असे पवित्रे बदलत राहीले तर आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? इतकी काय कुणाची तरी चाकरी करायची ?
रानभुली,
रानभुली,
माझे प्रतिसाद मूलतः चुकीचे वाटत असले तर दिलगिरी व्यक्त करतो.
नेमक्या कोणाला उद्देशून आपला प्रतिसाद आहे हे न कळल्याने व 'कदाचित अपल्याबद्दल असेल' असे वाटल्याने हे लिहिले
(मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल मी प्रतिसाद दिला नव्हता. एक तर नेमकी माहिती नव्हती व मंगेशकर रुग्णालयाच्या भूमिकेच्या बाजूने मी कधी नव्हतोच. त्या भूमिकेच्या विरुद्ध असावे की नसावे हे 'येणाऱ्या उलटसुलट बातम्यांमुळे' ठरवता येत नव्हते)
(स्पष्टीकरण कंसात दिले कारण तुमचा प्रतिसाद कोणाला उद्देशून आहे याबद्दल खात्री नव्हती)
बेफिकीरजी, हे माझ्यासहीत
बेफिकीरजी, हे माझ्यासहीत सर्वांना आहे.
तुम्हाला तसे वाटले हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.
वाचलेल्या सर्व
वाचलेल्या सर्व प्रतिसादांमध्ये लोकांच्या खूप तीव्र आणि प्रामाणिक भावना दिसतात, अशा प्रसंगी त्या कुणी नाकारुही शकत नाही आणि त्यावर कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या समर्थनाचे लेबलही लावणे या घडीला चुकीचे ठरते. पण माझ्या निरीक्षणानुसार इथले प्रतिसादकर्ते एखाद्या प्रसंगाविषयी प्रामाणिक भावना असणे, आणि केवळ प्रामाणिक भावनेच्या अधीन राहून काढलेले कोणतेही निष्कर्ष हे संयुक्तिकच असतात असा ठाम समज असणे यात गल्लत करताना दिसत आहेत. आपल्या प्रामाणिक भावनांना इतरांनी सहवेदनेने/सहअनुभूतीने पाहावे ही अपेक्षा असणे आणि आपण त्या भावनेच्या भरात काढलेल्या कोणत्याही निष्कर्षाला इतरांनी दर्शवलेली सहमती हाच आपल्या प्रामाणिक भावनांना इतरांनी सहअनुभूती दाखवण्याचा एकमेव मार्ग असू शकतो असा समज असणे, यात गल्लत करताना दिसत आहेत.
फक्त सोमीवरील सामाजिक प्रकरणांच्या चर्चेतच नाही तर वैयक्तिक आयुष्यात देखील अशाप्रकारे तीव्र भावनांच्या (राग, आनंद, भीती) अधीन असताना/ राहून काढलेले निष्कर्ष हे वरकरणी बरोबर ( गंड सुखावणाऱ्या अनुभूतीमुळे justifiable वाटणारे) वाटत असले तरी बहुतांशी चुकीचेच असतात.( हवे असल्यास कुणीही आपल्या आयुष्यातील अशा निष्कर्षांचे पुनरावलोकन करून पाहावे )
अद्वैत मेहता यांनी घेतलेली
अद्वैत मेहता यांनी घेतलेली कविता गाडगीळ यांची मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=Ghhyg7f5p6s
परफेक्ट आणि परखड पोस्ट
परफेक्ट आणि परखड पोस्ट shendenaxatra.
युद्ध नको म्हणून गळा काढणाऱ्या वीरमाता बघायला जिजाऊआईसाहेब नाहीत हे त्यांचे नशीब.
'युद्धस्य कथा: रम्या:' असे
'युद्धस्य कथा: रम्या:' असे म्हणतात याचा एक अर्थ माझ्यामते असाही आहे की युद्धाच्या कथाच रम्य असतात, प्रत्यक्षात war is hell.
युद्धाबाबत असलेल्या रोमँंटिक शिवकालीन कल्पना दूर केलेल्या बर्या. आपले घोडेस्वार पाक वर हल्ला करतील, मग पाक शरण येऊन काही किल्ले व चौथाई व सरदेशमुखीचे हक्क देतील. ई ई ( 'प्रत्येकाला वाटते की शिवाजी जन्मावा पण आपल्या घरी नव्हे शेजारच्या घरी' हेही असेच एक टाळीचे वाक्य)
पेहेलगाम घटनेतील पाकचा सहभाग सिद्ध झाल्यावर पूर्ण तयारीनिशी व एन्ड गोल्स नक्की करून मगच पाक शी युद्ध करावे असे कुणाला वाटत असेल ते घाबरट नव्हेत. गळा काढणे वगैरे शब्दप्रयोग न केलेले बरे.
लोकसभेवर हल्ला झाला तेव्हा मेलेले अतिरेकी पाकिस्तानी होते असे सांगून (चेहेरे पाकिस्तानी होते असे आडवाणी म्हणाले होते) सीमेवर मोठ्या प्रमाणात मोबिलायझेशन झाले. सुरुंग पेरतानाच अनेक जवान ठार झाले. नंतर वातावरण निवळले. इकडे अफझल गुरु ने एका पोलिस अधिकार्याचे नाव घेतले होते, त्याची साधी चौकशी करावी असे कुणाला वाटले नाही. सगळ्यांनाच कधी एकदा अफझल ला फाशी देऊ असे झाले होते. त्यानंतर वीसेक वर्षानी आणखी काही अतिरेक्यांना घेऊन येताना तो अधिकारी सापडला व फारसा गाजावाजा न करता त्याला बडतर्फ केले गेले.
सुशांत च्या आत्महत्येनंतर रियाची निंदानालस्ती करून अनेक तथाकथित पत्रकारांनी आपल्या घराला सोन्याची कौले लावली. त्यातलाच एका पत्रकाराने भारताने पाकिस्तानचे गाझा करावे असे मत व्यक्त केले. पाकिस्तान म्हणजे गाझा नव्हे, त्यांच्याकडेही अण्वस्त्रे आहेत, त्यांचे एअर फोर्स भारतापेक्षा काकणभर जास्तच सरस आहे. त्यांचे DG ISPR सुद्धा सरसच आहेत.
मलाही नाही वाटत कविता गाडगीळ यांचा घाऊकमधे युद्धालाच विरोध आहे. तसे असते तर त्यांनी मुलाला सैन्यात जाऊच दिले नसते, पुण्यात एखाद्या आय टी कंपनीत नोकरी करून संसार करायचा सल्ला दिला असता. ज्या माऊलीने आपला लेक देशासाठी दिला, त्याच्या नंतर जंग जंग पछाडून सिम्युलेटर मिळवून दिला तिच्याबद्दल गळा काढणे वगैरे शब्द खरेच निषेधार्ह आहेत.
मला नाही वाटत कविता गाडगीळ
मला नाही वाटत कविता गाडगीळ यांचा घाऊकमधे युद्धालाच विरोध आहे. मी या पत्राचा लावलेला अर्थ - भावनेच्या भरात नी जर्क रिअॅक्शन म्हणून जनतेकडून युद्धाचा आग्रह नको. तसे तर भरती झालेल्या प्रत्येकालाच माहित असते की कधीही ऑर्डर येइल. त्यात बॉर्डरवर ड्यूटी म्हणजे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असे असतेच. मात्र भ्याड हल्ल्यामुळे जो जनक्षोभ आहे त्याला उद्देशुन युद्धाचा आग्रह करु नका असे त्यांचे सांगणे आहे. आपले सैन्य असेच शांत बसणार का असा प्रश्न विचारला जातो तेव्हा कळत नकळत आपण आपल्याच सैन्याला कुठेतरी सपोर्ट नाकारत असतो. एका भ्याड हल्ला यशस्वी होतो तेव्हा बॅक ग्राउंडला असे १०० हल्ले सरकारी यंत्रणेने अयशस्वी केलेले असतात हे विसरतो.
बाकी >>बंदुकीची एक गोळीही न झाडता आपण काश्मीर राखू…>> वगैरे स्वप्नाळू आदर्शवाद झाला.
युद्धातून बाहेर पडणे किती कठीण असते ते कर्जाचे ओझे असलेल्या अमेरीकेला विचारा. मोजता येणारी प्रत्यक्ष हानी आहेच आणि जोडीला मन मोडल्याने आयुष्यातून उठलेले सर्विस मेंबर्स आणि त्यांचे कुटुंबीय वेगळेच. आमचे मित्र वेटरन्स आहेत. जॉईन झाले तेव्हा पुढे काय वाढून ठेवले आहे ते माहित होतेच तरी आत्ता जे भोगत आहेत ते क्लेश- ते डेमॉन्स त्याचे काय हा प्रश्न आहेच.
केवळ क्षोभापोटी युद्धाचा आग्रह धरताना आज ड्राफ्ट लावला तर तो चुकवायला धडपडू का याचा प्रत्येकानेच प्रामाणिकपणे विचार करावा.
अवांतर - माझे जवळचे नातेवाईक सैन्यात होते १९७१ च्या युद्धात. काही आत्ताही आहेत त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध डिक्लेअर नसले तरी युद्धाचा प्रसंग कसा असतो त्याचा जवळून अनुभव आहे.
विकु, तुम्ही लावलेला
विकु, तुम्ही लावलेला सुभाषिताचा अर्थ बरोबर आहे इतकंच सांगायला इथे आलो. दुरून डोंगर साजरे या अर्थाचे ते सुभाषित आहे.
दूरस्थाः पर्वताः रम्याः वेश्याः च मुखमण्डने |.
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः ||
आज त्यांची मुलाखत ही ऐकली..
आज त्यांची मुलाखत ही ऐकली..
स्वतः AC मध्ये बसून टीव्ही बघताना आरामात युद्ध होऊन जाऊ द्या वगैरे जोर करणाऱ्या लोकांवर , मीडियावर त्यांचा जास्त आक्षेप आहे.
खरंतर आपल्याला बाकीचे देश जसं चायना तुर्कस्तान बांगलादेश किंवा अजूनही देश काय करतात, पाकिस्तानच्या आत मध्ये काय घडामोडी चालू आहेत वगैरे वगैरे बाबींची अजिबात माहिती नसताना , युद्ध करावे का नाही की अजून कोणता मार्ग अवलंबता येईल हे मुद्दे आणि प्रश्न जाणकार मंडळींवर, लष्करी प्रमुख यांच्यावर सोडून द्यावेत. त्यांना आपल्यापेक्षा निश्चितच जास्त कळतं.
काश्मीरमध्ये सुरू झालेले टुरिझम किंवा नॉर्मल अजनाजीवन विस्कळीत करणे दहशत निर्माण करणे हाच यामागे या हल्ल्या मागील हेतू होता.
तेव्हा कश्मीरला पूर्वीसारखे वेगळे न पाडता त्यांना मेन स्ट्रीम मध्ये सामावून घेत घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहू देत.. हे जे वरती श्रीमती गाडगीळ यांनी म्हटले तसंच अजून एका विश्लेषकांनीही हेच मत मानले होते.
Submitted by पर्णीका on 28 April, 2025 - 06:59 >>>> मुद्यांशी सहमत.
NCW
NCW
@NCWIndia
·
13h
जम्मू-कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले में देश के अनेक नागरिकों की हत्या कर दी गई थी। इस हमले में अन्य लोगों के साथ लेफ्टिनेंट विनय नरवाल जी से उनका धर्म पूछकर उन्हें गोली मार दी गई थी। इस आतंकी हमले से पूरा देश आहत व क्रोधित है।
लेफ्टिनेंट विनय नरवाल जी की मृत्यु के पश्चात उनकी पत्नी सुश्री हिमांशी नरवाल जी को उनके एक बयान के संदर्भ में सोशल मीडिया पर जिस प्रकार से निशाना बनाया जा रहा है, वह अत्यंत निंदनीय एवं दुर्भाग्यपूर्ण है। किसी महिला की वैचारिक अभिव्यक्ति या निजी जीवन को आधार बनाकर उसे ट्रोल करना किसी भी रूप में स्वीकार्य नहीं है।
किसी भी प्रकार की सहमति या असहमति को सदैव शालीनता और संवैधानिक मर्यादाओं के भीतर व्यक्त किया जाना चाहिए। राष्ट्रीय महिला आयोग प्रत्येक महिला की गरिमा और सम्मान की रक्षा के लिए प्रतिबद्ध है।
काही राइट विंगर्सची मजल हिमांशीच या दहशतवादी हल्ल्याची मास्टर माइंड आहे, इतकं लिहिण्यापर्यंत गेली. बाकी नेहमीच्याच लिंगपिसाट कमेंट्स.
स्वतः दहशतवाद्यांशी लढलेले,
स्वतः दहशतवाद्यांशी लढलेले, सैन्यातील कामगिरीसाठी पुरस्कार मिळालेले निवृत्त ब्रिगेडियर दीप भगत पहलगाम हल्ल्याबद्दल काय म्हणतात?
वर यु ट्यूब ची लिंक आहे.
ज्यांना वाचायचंय त्यांच्यासाठी
पहलगाम हल्यांत अगदी जवळच्या
पहलगाम हल्यांत अगदी जवळच्या व्यक्तीं गमावलेल्या दोन महिलांच्या प्रतिक्रिया लक्ष वेधणार्या आहेत. ते या घटनेचे साक्षीदार आहेत म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया मला महत्वाच्या वाटतात.
(अ) आसावरी जगदाळे यांच्या वडिलांना तसेच काकांना दहशतवाद्यांनी मारले आहे. संपूर्ण मुलाखत आवश्य बघा.
https://youtu.be/VUdCms60Fsk?si=oDeGSsjReRnFiUWR&t=454
(ब) नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांची प्रतिक्रिया. अवघ्या सात दिवस आधीच लग्न झालेले विनय आणि हिमांशी नवविवाहित दांपत्य होते.
" I don't want any hatred towards anybody... people going against muslims and kashmiris - We do not want this.
We want peace and only peace.
Of course, we want justice. We want justice, people that have done with him should be punished. "
https://www.instagram.com/reel/DJG8pS6ywAn/
<<भावनेच्या भरात नी जर्क रिअ
<<भावनेच्या भरात नी जर्क रिअॅक्शन म्हणून जनतेकडून युद्धाचा आग्रह नको.>>
अनुमोदन.
तसेहि एका कविता गाडगीळ यांच्या म्हणण्यावर युद्ध हवे की नको हे ठरत नाही.
भारतात जे मंत्रि, लष्करप्रमुख बसले आहेत त्यांना पाकीस्तानबद्दल जास्त माहिती आहे.
प्रश्न सध्या असा आहे की हे संपूर्णपणे मोडकळीला आलेले राष्ट्र, कोपर्यात सापदलेला उंदीर जसा प्राणांची पर्वा न करता शेवटचा हल्ला करतो, तसे काही पाकीस्तान्यांनी भारतावर अणुबाँब सोडण्याची शक्यता आहे का याचा अभ्यास करावा लागतो. जास्त माहिती मिळवावी लागते.
मायबोलीवर तावातावाने आपले मुद्दे मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करणे जास्त जबाबदारीचे काम आहे. ते लष्करी अधिकार्यांवर सोडा. ते करतील त्यावर विश्वास ठेवा.
माहीतरी इथे मायबोलीवर लिहिण्यापलीकडे आपण काय करू शकतो?
कविता गाडगीळ यांच्या
कविता गाडगीळ यांच्या म्हणण्यावर युद्ध हवे की नको हे ठरत नाही.
भारतात जे मंत्रि, लष्करप्रमुख बसले आहेत >> हल्ल्यात आपला पती गमावलेल्या चार दिवसाची विवाहिता असलेल्या मुलीचे चित्र न विचारता जिलबी आर्ट बनवून व्हायरल केले, त्याच मुलीने युद्ध नको असे मत व्यक्त केल्यावर आधी शहीदपत्नी झाली म्हणजे सर्व कळते का असे प्रश्न विचारले गेले.
लष्कराला समजते हे युद्धाची भाषा करणाऱ्यांना समजते तर ते हा उपदेश स्वतःला का करत नाहीत? फक्त युद्ध नको म्हणणाऱ्या शहीदांच्या आईला, विधवेला का सांगतात? सगळेच्या सगळे आपण लष्कराचे मालक आहोत या थाटात का बोलत आहेत?
त्या मुलीला ज्या नीच पातळीवर ट्रोल केले गेले आहे त्याची सर्वांना कल्पना असेल. कुणाला निषेध करावा असे वाटत नाही. एकाने तर शहीद कुणाला म्हणायचे असा प्रश्न विचारला होता.
युद्ध कुणाच्याच मताने होत नाही आणि थांबत नाही हे शेंबड्या पोरालाही कळते. मग ते बोलून का दाखवायचे? ते ही स्वतः आर्मीत न जाता शहीदांच्या कुटुंबांना. सुनावले जातेय.
युक्रेन आणि रशिया युद्धात या दोन देशांचा काय फायदा झाला? रशिया तर महासत्ता आहे ना?
मग कुणाला वाटले कि अन्य उपाय अजमावेत तर ते ही बोलायचे नाही?
सिव्हिलियन व्यक्तीने बोलले कि "तिकडे सैनिक सीमेवर..." हे भजन करून त्याला तू अपराधी आहेस असे अप्रत्यक्ष रितीने सुनवायचे.
आणि शहीद पत्नीने तेच बोलले कि तिच्या कॅरेक्टर बद्दल, पायगुणाबद्दल हिडीस मतं मांडायची.
जसे काही हे सगळे स्वतः सीमेवर बंदूक घेऊन उभे राहिले आहेत.
<< शहीद पत्नीने तेच बोलले कि
<< शहीद पत्नीने तेच बोलले कि तिच्या कॅरेक्टर बद्दल, पायगुणाबद्दल हिडीस मतं मांडायची. >>
------ वीरमाता किंवा वीरपत्नी किंवा वीरकन्या असो, यांना काही फरक पडत नाही. या महिलांच्या वक्तव्यामुळे द्वेषी विचार ( hate narrative ) पुढे रेटण्यास मदत होत नाही. बस.
शिवानी नरवालने युद्ध नको असे
शिवानी नरवालने युद्ध नको असे म्हटल्याचे वाचले , ऐकले नाही. मुस्लिम आणि काश्मिरी लोकांबद्दल द्वेष नको असे म्हटले.
“We don’t want people going against Muslims or Kashmiris,” she said. “We want peace and only peace. Of course, we want justice, but the government must take precise steps against specifically those who did us wrong.
हे म्हणजे काही लोकांना तुम्ही श्वास घेऊ नका, असे सांगण्यासारखे झाले.
शिवानी नरवालला ज्या हिडीस
शिवानी नरवालला ज्या हिडीस पद्धतीने ट्रॉल केले गेले ते पाहून हिंदुत्वाची नवी व्याख्या समजली. इथले बरेच शहाणे जे कविता गाडगीळांवर तुटून पडले होते ते आता वाळूत तोंड खुपसून बसले आहेत अशी शंका यायला वाव आहे
शिवानी नारवालचं कौतुक
शिवानी नारवालचं कौतुक करणाऱ्या ललिता रामदास यांनाही शिवीगाळ झाली. ललिता रामदास यांचे वडील भारताचे पहिले नौदल प्रमुख आणि पती तेरावे नौदल प्रमुख होते.
मोदीनी शिवानीचे कौतुक केले तर
मोदीनी शिवानीचे कौतुक केले तर त्यानाही पाकिस्तानात पाठवतील हे भक्तान्डु !
>>> ज्या हिडीस पद्धतीने ट्रॉल
>>> ज्या हिडीस पद्धतीने ट्रॉल केले गेले ते पाहून हिंदुत्वाची नवी व्याख्या समजली.
'आमचा धर्म सहिष्णु आहे' अशी सुरुवात करून पुढे जे बोललं/लिहिलं जातं ते अनाकलनीय आहे! काय बोलावं समजत नाही खरंच!
शिवानी आणि तिचे मृत पती यांचे
शिवानी आणि तिचे मृत पती यांचे फोटो वापरून चिथावणीखोर संदेश बातमी आल्याच्या पंधरा मिनिटांत तयार झाले होते. अगदी हल्ली प्रचलित असलेल्या गिबिली ट्रेंडमध्येसुद्धा फोटो आले. तासाभरात काश्मीर आणि मुस्लिम यांच्यावर बहिष्काराची भाषा सुरू झाली. इथेच दहशतवादी जिंकले. चिथावणीखोर मजकूर लिहू नका, असं सांगितल्यावर लोकांना त्यापेक्षा हत्याकांडाचा स्पष्ट निषेध हवा होता, आणि असे संदेश हे लोकांच्या शोक आणि क्षोभ यांच्या स्वाभाविक प्रतिक्रिया वाटत होत्या.
मुस्लिमांवर बहिष्काराची भाषा दहा वर्षं जुनी आहे. मुस्लिमांच्या व्यवसायांच्या याद्या पूर्वीपासून तयार आहेत. हे हत्याकांड केवळ एक निमित्त आहे.
शिवानी आणि तिचे पती यांच्या फोटोंच्या गैरवापर करणारे लोक केवळ मृताच्या टाळूवरील लोणी खातात. त्यांना देश म्हणजे केवळ जमीन वाटते. त्यांना आत्ता फक्त आपल्या धर्माचे लोक इथे राहायला हवे आहेत. त्यानंतर फक्त आपल्या जातीचे लोक हवे असतील.
मुस्लिमांच्या व्यवसायांच्या
मुस्लिमांच्या व्यवसायांच्या याद्या पूर्वीपासून तयार आहेत >> त्यांच्या आस्थापनांच्या याद्या देखिल तयार आहेतच.
Pages