मद्यपानाचे वैद्यकीय निदान

Submitted by कुमार१ on 23 May, 2024 - 06:05
screenshot

माननीय प्रशासक,
सदर विषय संवेदनशील झालेला असल्याने हा लेख अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावा असे वाटते. म्हणून तो ललित विभागात लिहीला आहे. आपण त्यास अनुमती द्यावी ही विनंती.
अग्रिम धन्यवाद !
***************************************************************************************************************************************
मद्यपान - एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !!
समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.

शांतपणे मद्यपानाचा आस्वाद आणि आनंद घेऊन एखाद्याने कुठलीही कौटुंबिक अथवा सार्वजनिक समस्या निर्माण केली नाही तर अन्य समाज व कायदा यांना त्यात लक्ष घालण्याची गरज नसते. परंतु बेफाम मद्यपान करून सार्वजनिक गोंधळ घालणे, रस्त्यावर वाहन चालवणे किंवा अन्य आक्षेपार्ह कृत्य करणे अर्थातच बेकायदेशीर आणि समाजविघातक आहे. मद्यधुंद अवस्थेत स्वयंचलित वाहन चालवल्याने रस्त्यावरील अपघात होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. अशा कितीतरी प्रसंगांत संबंधित वाहनचालक निष्पाप पादचाऱ्यांच्या किंवा अन्य वाहनचालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत. अशा घटना वारंवार घडताना दिसतात. नुकत्याच घडलेल्या अशा एका गंभीर घटनेने संपूर्ण राज्यभर जनक्षोभाची लाट उसळलेली आहे.

हा विषय अर्थातच व्यापक असून त्याला वैद्यकीय, न्यायिक आणि सामाजिक पैलू आहेत. वैद्यकीय दृष्टीने पाहता सर्वात महत्त्वाचा प्राथमिक प्रश्न हा असतो की,
एखाद्या बेधुंद संशयित व्यक्तीने खरोखरीच मद्यपान केलेले आहे काय?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी डॉक्टर संबंधित माणसाची तीन टप्प्यांमध्ये तपासणी करतात :
1. संबंधिताची मद्यपानाची कबुली
2. शारीरिक तपासणी आणि
3. प्रयोगशाळा चाचण्या

आता हे मुद्दे विस्ताराने पाहू.
१. मद्यपानाची कबुली : जेव्हा संशयित मद्यपी डॉक्टरांकडे आणला जातो तेव्हा सर्वप्रथम डॉक्टर त्याला ‘बोलते’ करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्याकडून कबुलीजवाब घ्यायचा प्रयत्न अर्थातच केला जातो. समजा, त्याने जबाब देण्यास नकार दिला किंवा तो अर्धबेशुद्ध अवस्थेत असेल, तर त्याच्या बरोबरीच्या माणसांकडून माहिती मिळवली जाते. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे, प्रतीचे (देशी/ विदेशी/हातभट्टी, इ.) आणि किती मद्यपान केले आहे हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

2. शारीरिक तपासणी : मद्यप्याच्या जवळ जाताच त्याच्या श्वासाला मद्याचा वास येतो आहे का ते प्रथम पाहिले जाते. त्यानंतर त्याच्या एकंदरीत अवस्थेनुसार डॉक्टर त्याची शुद्धीची पातळी, सामान्य प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि एकंदरीत देहबोलीचे निरीक्षण करतात.
आतापर्यंतच्या विचारपूस आणि निरीक्षणातून बऱ्याचदा बराचसा अंदाज येतो. अर्थात मद्यपीच्या हातून जर फौजदारी गुन्हा घडला असेल तर मद्यपानाचे निदान पुराव्यासह सिद्ध होणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने प्रयोगशाळा चाचण्यांना महत्त्व आहे. अशा रासायनिक चाचण्यांची माहिती, उपयुक्तता आणि मर्यादा यांचा आढावा आता घेतो.
प्रत्यक्ष चाचण्यांकडे वळण्यापूर्वी ethyl अल्कोहोलच्या शरीरातील चयापचय आणि उत्सर्जनासंबंधी काही मूलभूत माहिती घेऊ.

अल्कोहोलचा शरीरप्रवास
अल्कोहोल पचनसंस्थेत गेल्यानंतर लहान आतड्याच्या सुरुवातीच्याच भागातून त्याचे वेगाने शोषण होते. सुमारे 30 ते 90 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. (अल्कोहोलच्या रक्तपातळीचा उच्चबिंदू मद्यपान पूर्ण संपल्यानंतर सुमारे 30 मिनिटांपासून तीन तासांपर्यंत असू शकतो. मद्यपान रिकाम्या पोटी केले असता तो लवकर येतो हे उघड आहे आणि मद्यपानाच्या आणि अन्न खाण्याच्या प्रमाणानुसार तो उशिराने येतो). अल्कोहोल रक्तप्रवाहात गेल्यानंतर पुढील चयापचयासाठी यकृतात ( 90%) पोहोचते. तिथे काही एंझाइम यंत्रणांच्या मदतीने त्याचे acetaldehyde >> acetic acid मध्ये रुपांतर आणि अंतिमतः कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यात रूपांतर होते. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये या चयापचयाची गती काहीशी अधिक राहते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या रक्त-अल्कोहोलपातळीचा उच्चबिंदू अधिक असतो; स्त्रियांमधील मेदाचे प्रमाण जास्त असल्याचा हा परिणाम.

अल्कोहोलचे उत्सर्जन मूलतः लघवीतूनच होते. त्याच्या जोडीने ते श्वास, घाम आणि शौचामार्फतही थोड्या प्रमाणात होते. श्वासातून बाहेर पडणाऱ्या आणि रक्तात असणाऱ्या अल्कोहोल प्रमाणाचे गुणोत्तर सरासरी 2100 असते (म्हणजे 1 mL रक्तामध्ये जेवढे अल्कोहोल असते तेवढेच अल्कोहोल 2100 mL श्वासात असते). तर लघवीतील आणि रक्तातील अल्कोहोलचे गुणोत्तर 1.4 असते. मद्यपानानंतर एक तासाने लघवीतील अल्कोहोलचे प्रमाण उच्च बिंदूवर असते.

प्रयोगशाळा चाचण्या
विविध प्रकारच्या चाळण्या उपलब्ध असून त्यासाठी श्वास, रक्त, लघवी आणि थुंकीचे नमुने उपयुक्त असतात.

श्वास चाचणी
यासाठी दोन प्रकारची उपकरणे असतात. त्यापैकी सर्वात सुटसुटीत म्हणजे हातात मावणारा श्वासमापक. हा चाळणी चाचणीसाठी वापरला जातो. रस्त्यावर बेफाम वाहनचालकांची पोलिसांच्याद्वारे तपासणी केली जाते तेव्हा याचा उपयोग केला जातो. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे संशयित व्यक्ती त्या उपकरणाच्या वरील भागातून तोंडाने जोरात श्वास सोडते. या पद्धतीने श्वासाचे दोन नमुने तपासले जातात. त्यानंतर उपकरणाच्या स्क्रीनवर अल्कोहोलचे अंदाजे प्रमाण एक मिनिटभरात ++/+ /- या स्वरूपात दर्शवले जाते. दोन नमुन्यांच्या रीडिंगमध्ये जर 15 टक्क्याहून अधिक फरक आला तर एरर दर्शवली जाते आणि चाचणी विश्वासार्ह नसते
alco  br1.jpg

शास्त्रशुद्ध श्वासमापक चाचणी अशी असते :
1. सभोवतालच्या हवेची मोजणी ब्लँक चेक म्हणून करतात.
2. त्यानंतर प्रमाणित अल्कोहोल (35 μg/100 mL air) यंत्रावर तपासले जाते. अशा प्रकारे उपकरण प्रमाणित होते. (35 μg/100 mL air : हे प्रमाण देशानुसार बदलेल).

3. त्यानंतर संशयीताचा पहिला श्वास मोजला जातो
4. त्यानंतर पुन्हा एकदा भोवतालच्या हवेचे मापन होते

5. त्यानंतर दुसरा श्वास मोजला जातो
6. सर्वात शेवटी पुन्हा एकदा हवा आणि प्रमाणित अल्कोहोल मोजले जाते.

ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला पोलीस स्थानकात नेऊन तिथे पुढची वरच्या दर्जाची चाचणी केली जाते, जी न्यायालयीन पुराव्यासाठी अधिकृत असते.
या चाचणीमध्ये खालील चित्रात दाखवल्यानुसार संबंधित व्यक्ती तोंडात धरलेल्या पाईपद्वारा श्वसन करत राहते.

alc br 2.jpg
संबंधित उपकरण fuel अथवा इन्फ्रारेड सेलच्या तत्वावर काम करते. व्यक्तीने सोडलेल्या श्वासाचे सलग पृथक्करण केल्यानंतर अल्कोहोलच्या प्रमाणाचा आलेख सुमारे 10 मिनिटांत मिळतो.
alc 3.jpg

या चाचण्या करण्यास अतिशय सोप्या असल्या तरी त्यांच्या निष्कर्षाबाबत बऱ्याच मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील :
1. वेळमर्यादा : एखाद्या व्यक्तीने चाचणी करण्यापूर्वी काही मोजक्या तासांपूर्वीच मद्यपान केलेले असल्यास चाचणी वैध ठरते.

2. तोंडातील इतर घटक : मद्यपानानंतर जर काही सुगंधी रसायनांनी गुळण्या केल्या किंवा श्वास दुर्गंधीनाशकाचा वापर केला अथवा अल्कोहोलयुक्त औषध घेतले असल्यास त्याचा निष्कर्षावर परिणाम होतो.

3. उपकरणीय घटक : संबंधित उपकरणाचे प्रमाणीकरण आणि नित्यनेमाने देखभाल करणे आवश्यक असते. तसेच उपकरणाची बॅटरी आणि sensor यांचेही काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अल्कोहोलच्या एका विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंतच या चाचणीने शोध घेता येतो. तसेच ही चाचणी करणाऱ्या तंत्रज्ञाचे कौशल्यही विचारात घ्यावे लागते.

4. वातावरणीय घटक : बाह्य तापमान, आर्द्रता, तसेच त्या व्यक्तीची श्वसन पद्धत ( मुद्दामून श्वास रोखून धरणे किंवा बळेबळे दीर्घश्वसन करणे) यांचाही निष्कर्षावर परिणाम होतो.

5. आरोग्य घटक : अल्कोहोलच्या चयापचय-गतीतील व्यक्तीभिन्नता, शरीराचे तापमान, फुफ्फुसक्षमता आणि श्वसनाचा व्हॉल्युम हे घटकही निष्कर्षावर परिणाम करतात. तसेच त्या व्यक्तीला जठराम्लतेचा (reflux) अथवा तीव्र मधुमेहाचा त्रास असल्यास त्याचाही विपरीत परिणाम होतो. अनियंत्रित मधुमेहामध्ये श्वसनातून ऍसिटोन बाहेर टाकले जाते.

6. कायदेशीर आव्हान : या चाचणीची अचूकता, विश्वासार्हता आणि शास्त्रशुद्ध नोंदणी यांवर न्यायालयात बचाव पक्षाकडून हरकतीचे मुद्दे येऊ शकतात, नव्हे, येतातच !

रक्तचाचणी
ही प्रत्यक्ष मद्यपानानंतर शक्य तितक्या लवकर करतात. साधारणपणे एक पेग ‘हार्ड’ मदयपानानंतर एक तासाच्या आत रक्त घेणे आवश्यक (a detection window of approximately 1 h per drink consumed). यासाठी व्यक्तीच्या शिरेतून रक्त काढले जाते. ते काढण्यापूर्वी एक महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते. ज्या जागी इंजेक्शनची सुई टोचतात तिथे जंतुनाशक म्हणून कुठल्याही अल्कोहोलयुक्त द्रावणाचा वापर करायचा नसतो. (काही अन्य पर्याय वापरतात). रक्त काढून झाल्यावर तो नमुना व्यवस्थित सीलबंद करतात. आता तो प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर 4 तासांच्या आत त्याची तपासणी करणे आवश्यक असते.
या चाचणीतून आपल्याला रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके समजते. त्यामुळे ही चाचणी वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय प्रकरणांत प्रमाण-चाचणी म्हणून प्रस्थापित झालेली आहे. या चाचणीचा निष्कर्ष आणि संबंधित व्यक्तीची एकंदरीत अवस्था व निर्णयक्षमता यांची व्यवस्थित सांगड घालता येते.
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ही अत्यंत महत्त्वाची चाचणी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केली जाते आणि तिथे ती अत्याधुनिक गॅस क्रोमॅटोग्राफी किंवा त्याहून आधुनिक GC-MS या पद्धतीने केली जाते. या उपकरणांचे प्रमाणीकरण आणि देखभाल अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. तसेच ती हाताळायला उत्कृष्ट प्रशिक्षित तंत्रज्ञ नेमले जातात.

लघवीची चाचणी
लघवीमध्ये उतरणारे अल्कोहोल हे विविध रूपांमध्ये असते - चयापचय न झालेले अल्कोहोल आणि चयापचयादरम्यान निर्माण झालेली अल्कोहोल-संयुगे. लघवीतील प्रत्यक्ष अल्कोहोलची मोजणी तांत्रिकदृष्ट्या विश्वासार्ह नसते आणि कटकटीची असते. तसेच ते उशिराने उत्सर्जित होत असल्यामुळे त्याची रक्तातील अल्कोहोल पातळीशी सांगड घालणे कठीण जाते. त्यामुळे त्याच्या काही संयुगांवर आधारित चाचण्या केल्या जातात.
अल्कोहोलच्या चयापचयातून ethyl glucuronide (EtG) या नावाचे एक संयुग तयार होते आणि ते लघवीत उत्सर्जित होते. जर एखाद्याने बेसुमार मद्यपान केलेले असेल तर लघवीतील हा घटक त्या घटनेनंतर 5 दिवसांपर्यंत शोधता येतो. कमी प्रमाणात मद्यपान केले असल्यासही या चाचणीतून ते उघड होते. या चाचणीचा उपयोग अधिकतर रुग्णांच्या बाबतीत केला जातो. मात्र गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये या चाचणीचा पुरावा म्हणून विचार अद्याप बाल्यावस्थेत आहे.

( रच्याकने,
EtG हे संयुग संबंधित व्यक्तीच्या केसांमध्येही जाऊन बसते आणि ते चाचणीने शोधता येते. मद्यपानाच्या कित्येक महिन्यांनानंतर देखील हा दीर्घकाळ टिकणारा पुरावा ठरतो आणि त्यात खोटेपणा करणे अवघड असते).

महत्त्वाची टीप :
१. वर उल्लेख केलेल्या आणि अन्य काही चाचण्यांची अल्कोहोल शोधण्याची आणि मोजण्याची संवेदनक्षमता भिन्न असते. कुठलीही चाचणी 100% उत्कृष्ट (ideal) म्हणता येत नाही. या चाचण्यांचे निष्कर्ष व्यक्तीच्या वय, लिंग, वजन, मद्यपानाची सवय, वारंवारिता आणि अवलंबित्व या घटकांवर अवलंबून असतात. तसेच त्या व्यक्तीच्या दीर्घकालीन आजारांचा आणि औषधोपचारांचाही या निष्कर्षांवर प्रभाव पडतो. मद्यपिच्या डॉक्टरांनी केलेल्या शारीरिक तपासणीला पूरक मदत म्हणूनच चाचण्यांचा विचार केला जातो.

२. या चाचण्यांमधून अल्कोहोलचे निदर्शनास आलेले प्रमाण आणि रस्त्यावर वाहन चालवण्याच्या अल्कोहोल-प्रमाणमर्यादेच्या कायद्यांमध्ये देशांनुसार भिन्नता आहे. तसेच खाजगी आणि सार्वजनिक वाहनचालकांसाठी काही देशांमध्ये वेगळे नियम असून सार्वजनिक वाहनचालकांना कामादरम्यान मद्यपनाची अजिबात परवानगी नाही, तर खाजगी वाहनचालकांना अल्कोहोलच्या अल्पमर्यादेपर्यंत परवानगी आहे. ते सर्व तांत्रिक तपशील या लेखाच्या कक्षेबाहेर आहेत.
****************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1124861/#:~:text=As%20the%2....
२.
https://watermark.silverchair.com/labmed30-0530.pdf?token=AQECAHi208BE49...

३. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
. . . . . . . .
चित्रसौजन्य : BMJ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. माहिती पूर्ण प्रतिसाद.

काही काही पोस्टी वाचताना सुद्धा निदान होते...

गाडी चालवत होतो, पण मद्यप्राशन केले नव्हते असा आरोपी मिहीर शहाचा दावा>> मधे एवढा काळ गेल्यावर त्या मद्यपानाच्या मुद्द्यावर उहापोहा करुन वेळ का घालवत आहेत कळले नाही. मद्यपान केलेले नसले तरीही जो गुन्हा घडलाय तेवढा केस उभी करायला पुरेसा आहे की!

कोविड महासाथीमुळे अनेक रुग्णालयांमध्ये sanitizersचा बराच साठा केला गेला. अशा बाटल्या रुग्णालयात विविध कक्षांमध्ये ठेवलेल्या असतात. त्याचा मद्यव्यसनी लोकांकडून झालेला गैरप्रकार नुकताच काही ठिकाणी उजेडात आला.

मद्यपानाचे जबरदस्त व्यसन असलेल्या काही जणांनी रुग्णालयातून अशा बऱ्याच बाटल्या चोरल्या. या द्रावणांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण सुमारे 80 टक्के होते. तसेच त्यात इथेनॉल बरोबरच अन्य काही प्रकृतीला घातक असलेली रसायने देखील होती. त्याच्या सेवनातून काहींना त्रास होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले.

सुरुवातीस त्यांनी असे काही प्याल्याची माहिती दडवून ठेवली होती. परंतु डॉक्टरांना काही संशय आल्याने त्यांनी त्यांच्या रक्ताची अल्कोहोल चाचणी केली आणि मग खोदून विचारल्यानंतर खरे सत्य बाहेर आले.
आता या बाटल्या देखील बंदोबस्तात ठेवणे आले !

पुणे पोलिसांनी अग्रवाल मुलाविरुद्धचा अंतिम तपास अहवाल बाल-न्यायालयाला सादर केला आहे. त्याच्याविरुद्ध तीन प्रकारचे गुन्हे नोंदवलेत :
पुरावा नष्ट करणे, फसवणूक आणि गुन्हेगारी कट

दरम्यान त्याने दिल्लीच्या एका शिक्षणसंस्थेत पुढील शिक्षणासाठी अर्ज केला होता तिथे त्याला प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्याविरुद्ध त्याचे वकील दाद मागत आहेत.

https://www.punekarnews.in/pune-delhi-institute-rejects-admission-for-so...

दिवाळीच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून एसटी महामंडळाने सर्व चालक व वाहकांची कामावर आल्यावर मद्यपान श्वासमापकातर्फे तपासणी सुरु केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व आगारांतील चार हजार चालक-वाहकांची अशी तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन चालकांनी मद्यपान केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

(बातमी: छापील मटा 27 ऑक्टोबर)

योग्य केले. आपले व्यसन आपली जबाबदारी. त्याने इतरांच्या जीवावर बेतणार असेल तर तो गुन्हाच आहे.
तरी कुटुंबीयांना भोगावे लागतेच. या केसमध्ये देखील पहिला विचार मनात त्यांचाच आला.

त्यापैकी दोन चालकांनी मद्यपान केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे...
योग्य निर्णय
थुंके, फुंके आणि झिंगे यांना कोणत्याही प्रकारे माफी नसावी.

त्यापैकी दोन चालकांनी मद्यपान केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे...
योग्य निर्णय
थुंके, फुंके आणि झिंगे यांना कोणत्याही प्रकारे माफी नसावी.

+१
आणि . . .
अशी तपासणीची पद्धत कायमस्वरूपी असावी.

अजून एक अग्रवालपुत्र आणि इनोव्हा गाडीचा अपघात : पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

https://www.loksatta.com/desh-videsh/as-horrific-accident-that-killed-6-...

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, अपघातापूर्वी या तरुण विद्यार्थ्यांनी पार्टीत मद्य रिचवल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडीओही समोर आणला आहे. ज्यामध्ये तरुण संगीताच्या तालावर मद्य घेत असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ अपघातापूर्वीचा आहे की, त्याआधीचा आहे? याबाबतची खात्री पटलेली नाही. मात्र सदर व्हिडीओ समोर आल्यानंतर मद्याच्या अमलाखाली अपघात झाला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबद्दलची सत्यता समोर येऊ शकते.

मद्यपानाचे 'ऑडिट'
मद्यपानाचे व्यसन आरोग्यविघातक आहे. लोकांचे व्यसनाचे प्रमाण कमी करणे किंवा ते सोडवण्यासाठी एक उपयुक्त प्रश्न-चाचणी विकसित केलेली आहे. तिचे नाव AUDIT (Alcohol Use Disorders Identification Test) आहे :
https://auditscreen.org/

वरील प्रश्नावली घरबसल्या सोडवून आपले व्यसनप्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याचा अंदाज येतो. त्यानुसार डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता येते.

भारतात वाहन चालकांनी केलेल्या विविध गुन्ह्यांसाठीची शिक्षा आणि दंड आता बऱ्यापैकी वाढवण्यात आलेले आहेत.
मद्यपान करून वाहन चालवले असता खालील प्रमाणे शिक्षा असेल :
पहिला गुन्हा : रुपये 10,000 दंड आणि/ किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास
दुसऱ्यांदा केलेला हाच गुन्हा : 15,000 रुपये आणि / किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास

https://www.lokmat.com/photos/national/now-you-cant-afford-to-break-traf...

ते सगळं ठीक आहे, पण या नियमांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली तर तितक्या प्रमाणात तुरुंग वाढवले आहेत का?

ग्राहकाने विमा घेताना स्वतःच्या मद्यपानाच्या सवयीची माहिती लपवली असेल तर विमा कंपनीला तो दावा फेटाळण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या पीठाने दिला आहे.

संबंधित ग्राहकाने ती माहिती दडवली होती आणि पॉलिसी खरेदी केल्यानंतर एक वर्षाने त्याला तीव्र पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर महिन्याच्या त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीने ‘एलआयसी’कडे विमा दाखल केला होता.

(बातमी : छापील मटा 1 एप्रिल 2025)

पोर्श कार अपघात प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सध्या सुरू आहे.
अपघातानंतर कारचालक मुलगा व त्याच्या दोन्ही मित्रांच्या रक्ताचे नमुने ससूनप्रमाणेच औंध जिल्हा रुग्णालयातही बदलण्याचा प्रयत्न झाला आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी सादर केली आहे.

बेकायदा बनवलेल्या मद्यात Methanolची भेसळ असल्याने ते तब्येतीला अत्यंत घातक असते. त्याची चर्चा वर झालेलीच आहे.

अजूनही अशा विषारी मद्याचे सेवन भारत, रशिया व जपानसह सुमारे 28 देशांमध्ये होत असलेले आढळते. गतवर्षी लाओसमध्ये सहा ब्रिटिश पर्यटकांचा अशा मद्यसेवनातून मृत्यू झाला होता.

म्हणून युकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे भेसळयुक्त मद्य विकणाऱ्या 28 देशांची यादी पर्यटकांसाठी जाहीर केलेली असून त्यांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे :
https://www.bbc.com/news/articles/c14p3gd4p7po

शास्त्रशुद्ध श्वासमापक चाचणी>>>>या संदर्भात एक रंजक आणि नेहमी स्मरणात रहावी अशी बातमी वाचनात आली होती, अचानक आज आठवली माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांनी वाचली असेल. एकदा नक्की नजरेखालून घाला. Happy

https://www.hindustantimes.com/india-news/kerala-drivers-fail-breath-test-despite-not-drinking-courtesy-jackfruit-101753275082717.html

+१
खरंय ! AI च्या माहितीनुसार अति पिकलेले केळे आणि आंबासुद्धा अशा प्रकारे पॉझिटिव्ह चाचणी देऊ शकतात.
एकंदरीत अति आंबलेल्या पदार्थांपासून असे होऊ शकते असे दिसते.

म्हणूनच शेवटी रक्तातील अल्कोहोल मोजणी महत्त्वाची !

पुन्हा एक दुर्दैवी घटना पुण्याच्या कल्याणीनगर मध्येच . .

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या 49 वर्षाच्या एका गृहस्थाने मद्यपान करून कार चालवल्यामुळे एका रखवालदाराचा मृत्यू
https://indianexpress.com/article/cities/pune/pune-drunk-it-professional...

Pages