पाऊस येण्या आधी

Submitted by अनिरुद्ध अग्निहोत्री on 14 April, 2023 - 18:53

पाऊस येण्या आधी
मन भरून यावे सारे
मग नभात घुसमटलेले
ते झरून जावे तारे

थेंबात मुरावे त्याच्या
माझ्या शब्दांचे शिंतोडे
कोण कुणाला भिजवे
हे धुक्यास पडले कोडे

क्षणभर लखलखणारी
एक वीज अशी स्मरावी
ज्या जखमा लिंपून भरल्या
एक चिर तिथेच पडावी

वाऱ्या परी माझ्या अंगी
सळसळते उधाण यावे
या तगमगणाऱ्या डोहाचे
सारे मग बांध फुटावे

अतृप्त वनात जेव्हा
पाऊस असा कोसळतो
तो निनाद रिमझीमणारा
निःशब्द करून ओसरतो

तो देतो त्याच्या धारा
मी त्याला द्यावे शहारे
पाऊस येण्या आधी
मन भरून यावे सारे

- अनिरुध्द

Group content visibility: 
Public - accessible to all site users