नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
‘मिराशीचे शेत’ असे एका अभंगात
‘मिराशीचे शेत’ असे एका अभंगात वाचले.
त्याचा काय अर्थ?
मिराशीचं म्हणजे वंशपरंपरेने
मिराशीचं म्हणजे वंशपरंपरेने मिळालेलं.
>>> मिरासीचे म्हूण सेत | नाही देत पीक उगे || - तुकोबा
वंशपरंपरेने मिळालं म्हणून शेत आपोआप पिकत नाही, त्या त्या पिढीला घाम गाळावाच लागतो.
मिरासी आणि मिराशी एकच का?
मिरासी आणि मिराशी एकच का?
तसे असेल तर ‘मिरासदार’ म्हणजे पीढीजात श्रीमंत ?
होय, मिरासी आणि मिराशी एकच
होय, मिरासी आणि मिराशी एकच
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%...
वरती लेखकांच्या टोपणनावावरून
वरती लेखकांच्या टोपणनावावरून चर्चा झाली आहे.
त्या संदर्भात एका लेखकांचा मी घेतलेला अनुभव भन्नाट आहे.
इथे तो सविस्तर लिहिणे अप्रस्तुत ठरेल, म्हणून तो ‘प्रतिभावंतांच्या तऱ्हा' (पान २ ) या धाग्यावर लिहीत आहे (https://www.maayboli.com/node/80951)
गोमेद हे टोपण नाव कुणाचे ते
गोमेद हे टोपण नाव कुणाचे ते मला आजपर्यंत कळलेले नाही. फार सुंदर, विनोदी लिहीत. पुढे कदाचित ते खऱ्या नावाने लिहू लागले असावेत.
'शृंग ' या मुळापासून झालेल्या
'शृंग ' या मुळापासून झालेल्या तीन शब्दांचा अर्थबदल रंजक आहे:
* शृंग = १ जनावराचें शिंग. २ पर्वताचें शिखर.
* शृंगाटक =चौक.
* शृंगापत्ति = (न्यायशास्त्र) दोन वैकल्पिक गोष्टींपैकीं कोणतीचही स्वीकार केला असतां अनिष्ट घडून येण्याची परिस्थिती.
मी ‘पर्वत शृंग’ असे वाचले आहे
मी ‘पर्वतशृंग’ असे वाचले आहे, पर्वताचे सर्वोच्च शिखर या अर्थाने !
मग चतु:श्रुंगी ही चार शिखरं
मग चतु:श्रुंगी ही चार शिखरं असणारी की चार शिंगं?
>>> शृंगापत्ति = (न्यायशास्त्र) दोन वैकल्पिक गोष्टींपैकीं कोणतीचही स्वीकार केला असतां अनिष्ट घडून येण्याची परिस्थिती
म्हणजे 'इकडे आड तिकडे विहीर'सारखं का? मस्त शब्द आहे!
*इकडे आड तिकडे विहीर'सारखं का
*इकडे आड तिकडे विहीर'सारखं का?
>> होय.
कोशात त्यासाठी असाही एक अर्थ दिला आहे:
इकडे नई, तिकडे वई
यात
नई = नदी
वई = कुंपण ?
असे असावे असे वाटते.
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A...
शश शृंग सशाचे शिंग. एक
शश शृंग सशाचे शिंग. एक दुर्मीळ वस्तू या अर्थाने.
(गल्ली चुकलं )
‘मराठी भाषेविषयी धागा १०००
‘मराठी भाषेविषयी धागा १००० पार !
शश शृंग च, दुर्मीळ.
कुमार, तुमचे धागा सतत ‘तेवत ठेवण्याचे’ कसब आहेच पण इथे श्रेय भाषाप्रेमींचेही !
आतापर्यंत चर्चेत
आतापर्यंत चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व बंधू भगिनींना धन्यवाद !!!
नुकतीच या धाग्याला सलग २ वर्षे पूर्ण झाली.
आपल्या सर्वांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांमुळे सर्वांनाच एकमेकांपासून काही शिकायला मिळाले. मजा आली. इथली पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने धाग्याचे टोपडे बदलून जरा कात टाकावी म्हणतो. म्हणून भाग २ काढत आहे :
https://www.maayboli.com/node/83225
यापुढील सर्व चर्चा तिकडे व्हावी ही विनंती.
नव्या धाग्यावर स्वागत !
Pages