मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -६

Submitted by Sujata Siddha on 27 January, 2023 - 07:03

https://www.maayboli.com/node/82907 -५

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -६

त्या दिवशी सकाळी नेहेमीप्रमाणे मी ऑफिसला निघाले होते तितक्यात ताईचा फोन आला, तिचा रडवेला आवाज काहीतरी चुकीचं घडलंय हे सांगत होताच , तिने सांगितलं की काल रात्री आई-वाहिनीची घरात खूप भांडणं झाली आणि सकाळी कुणी उठायच्या आधीच आई घरातून निघून गेलीये , बाबा आणि प्रसाद शोधायला बाहेर पडलेत ,पण अजून तरी सापडली नाहीये “ हे ऐकून मी मट्कन सोफ्यावर बसून घेतलं , आई अशी कशी निघून गेली ? , कुठे गेली असेल ? जीवाचं काही बरं वाईट तर नाही ना करून घेणार ? नाना प्रकारच्या भीतीने माझं मन पोखरत गेलं , शाळेच्या व्हॅन च्या प्रतीक्षेत बसलेली निशी सोफ्यावरून उठून माझ्या जवळ येऊन मला बिलगून बसली , तितक्यात देवपूजा करून हॉल मध्ये असलेल्या तुळशीला पाणी घालायला मानस तिथे आला , “काय झालं ? “ त्याने विचारलं ,”तु अजून निघाली नाहीस ? “ त्यावर मी त्याला रडत रडत सांगायला गेले , “मानस अरे आई रागाने घर सोडून गेली आहे ,कुठे गेली असेल ?काही बरं वाईट करून घेतलं तर ? हे ऐकल्याबरोबर दचकून त्याने माझ्या तोंडावर हात दाबत म्हटलं “अगं हळू बोल , केवढी मोठ्याने बोलतेस ? घरात आई आणि वहिनी ऐकतील तर काय म्हणतील , कसं वाटतं ते ? बाहेर चल तुला ऑफिसला सोडताना गाडीवर बोलू ” त्या अवस्थेतही मला प्रचंड राग आला ,आई -वहिनींनी ऐकलं म्हणून काय झालं ? एक जिवंत माणूस बेपत्ता होतं त्याचं तुला काही वाटत नाही आणि त्या दोघीना ऐकून काय वाटेल हे तुला पडलंय ? ऑफिसला काय चल ? , म्हणजे ही बातमी ऐकूनही मी ऑफिसला जायचं ?.आईला शोधायला जाऊ वैगेरे असं काहीतरी म्हणावं त्याने ही माझी अपेक्षा होती , पण त्याच्या ते डोक्यातही आलं नाही , आमच्या दोघांचं त्यावरून चांगलंच जुंपलं , त्याचं काही चुकलंय असं त्याला वाटतच नव्हतं , गाडीवर मी त्याच्याशी खूप कडाकडा भांडले , रडले , रागारागाने गाडीवरून उतरले , तो ही सरळ निघून गेला , पाच एक मिनिटं मी तशीच सुन्न होऊन तो गेला त्या दिशेने बघत उभी राहिले ,मग वाटलं सरळ आई कडे घरी जावं, तिकडे काय झालं असेल ? खालूनच एस.टी. डी . बूथ वरून मी ऑफिसला फोन केला , फोन वर जाई होती , तिला कळवलं की आज मी ऑफिसला येत नाही . यावर ती मला म्हणाली , “उल्का कुठे आहेस ? सगळं ठीक आहे ना ?अशी अचानक सुट्टी ? “ यावर काही तरी मोघम उत्तर देऊन मी फोन ठेऊन दिला आणि निघाले तितक्यात त्याच बुथवर रिव्हर्स कॉल आला ,दुकानदाराने मला हाक मारली ,”ओ मॅडम तुमचा फोन आहे “ मी परत वळले , तर फोनवर जाई होती , ती वर बोलवत होती ,एक अर्जंट काम आहे म्हणाली . वर जायचं जीवावर आलेलं कधी एकदा आईकडे जाते असं झालेलं , पण तरीही तशीच मी वर गेले ,जाई म्हणाली “फक्त पाच मिनिटं थांब“,आईच्या काळजीने माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि कितीही प्रयत्न केला तरी मला ते लपवता येत नव्हतं ,त्यातच हिने मला कशाला बोलावलं हे कळत नव्हतं , मी तिला काही म्हणणार ईतक्यात घाईघाईने यु.डी . समोरून येताना दिसले , ते बहुधा लिफ्ट ची वाट न बघता ,तसेच जिन्याने आले असावेत ,केस ओले त्यातून पाणी निथळत होतं , स्वतः: केबिनमध्ये शिरता शिरता त्यांनी मला आत बोलावलं , आणि एकदम खूप आस्थेने आणि कळकळीने विचारलं , मॅडम काय झालं ? घरी सगळं ठीक आहे ना ? पटकन सांगा ,पहाटेची बॅच संपवून मी अंघोळीला गेलो आणि जाई चा फोन आला की उल्का आज ऑफिसला येणार नाही , आवाजही रडवेला होता ,तिला सिस्टीम वर फोन नंबर दिसल्यावर कळलं की तुम्ही ऑफिसच्या जवळूनच बोलता आहात म्हणून मग मी तिला म्हटलं की त्याना लगेच वर बोलाव , मी नुसत्या भराभर बादल्या डोक्यावर ओतून आलोय ,बोला ना काय झालं ? मी काही मदत करू शकतो का ? “ त्यांच्या या वाक्यासरशी ,ईतका वेळ दाबून धरलेलं रडू कोसळलं,मग मी त्यांना आईचं सांगून टाकलं , त्यांनी ते खूप काळजीपूर्वक ऐकून घेतलं , “केव्हा बाहेर पडल्या आहेत त्या ? “ मी म्हटलं माहिती नाही सगळे उठायच्या आधीच गेली ती, म्हणून मला तिकडे जायचं आहे , मी निघू का प्लीज ? “
“ हो हो लगेच निघा , तुम्ही एकट्या जाऊ नका ,आपला मिनीनाथ येईल तुमच्याबरोबर घरापर्यंत आणि मी आणि मंदार बाहेर शोधायला जातो त्यांना ,त्यांना घरी परत घेऊनच येऊ , तुम्ही अजिबात काळजी करू नका ,आत्ता या क्षणापासून तुमचं टेन्शन तुम्ही माझ्या डोक्यावर दिलंत आता तुम्ही काळजी करायची नाही. “ लगेच मंदार ला घेऊन ते एकटेच निघाले , आईचं वर्णन विचारून घेतलं , माझ्याकडून फोटो हि घेतला , पोलीस कम्प्लेंट दिली का ते विचारून घेतलं आणि गेले देखील . मी ही माहेरी गेले , दुपारी आई सापडली , सारसबागेत गणपतीच्या देवळात बसली होती . घरी आणल्यावर आईला आम्ही सर्वानी मिळून समजावलं , मुळात ती अशी आततायी पाऊल उचलणारी नव्हतीच , काही का असेना माझी आई सुखरूप होती याचंच बरं वाटलं , संध्याकाळी घरी आले तरी मानस घुश्शात होता , त्याने मला एका शब्दानेही काही विचारलं नाही ,निदान माणुसकी म्हणून तरी विचारायला हवं होतं त्याने असं मला खूप वाटून गेलं , मी हि काही बोलले नाही . पुढचे काही दिवस आमच्यात अबोला राहिला , पण या प्रसंगाने माझा यु डी . वरचा विश्वास वाढीला लागला . इंप्रेस तर मी आधीच झाले होते त्यांच्या पर्सनॅलिटी वर , त्यांच्या बुद्धिमत्तेवर , पण या घटनेने मला ‘He is my best buddy ‘हा विश्वास मिळाला आणि मी त्यांच्याशी मोकळेपणाने वागू लागले . खरं तर मध्ये काही दिवसांपूर्वी एकदा ‘सुपर्णा ‘ची आणि माझी बातम्यांच्या वेळी गाठ पडली होती त्यावेळी तिने यु डी बद्दल काही विचित्र गोष्टी मला सांगितल्या होत्या जसं की , ‘माझा नवरा एक नंबरचा फ्लर्ट आहे , त्याने आतापर्यन्त खूप लफडी केली आहेत , सुंदर स्त्री दिसली की तो वेडा होतो , आणि बरोब्बर जाळ्यात पकडतो ,त्यामुळे तु सावध रहा , जाई त्याच्यासाठी घरातून पळून आलेली आहे आणि ते दोघे आता तसेच एकत्र राहतात , ‘ई .ई. .(जर आपला नवरा फ्लर्ट आहे आहे माहिती होतं तर हिने मला त्याच्या ऑफिसमध्ये काम करायची ऑफर का आणली असेल , असा प्रश्न तेव्हा माझ्या मनाला पडू नये का? पण नाही पडला असो … ) या मुळे जरी मी अंतर राखून वागत होते तरी आईबद्दलच्या त्या घटनेनंतर मी नकळत पणे त्यांच्या प्रेमात पडले . कदाचित आधीपासूनच त्यांच्या वेगळेपणाची भूल मला पडलीच होती त्याला या घटनेने वाट मिळाली . आपल्या हृदयाच्या सर्वांत जवळचं ,आपलं सर्वात स्पेशल माणूस असंच असतं ना ? आपली काळजी घेणारं , ज्याच्या संपर्कात येऊन आपलं व्यक्तिमत्व अजून दहापट खुलेल असं ? जो बरोबर असताना ईतर कोणत्याही नात्यांची आपल्याला गरज पडणार नाही असं , जो बरोबर असताना वेळ कसा फुलपाखरासारखा भर्रकन उडून जाईल असं वाटणारं ? मग मी यु डी च्या प्रेमात पडले तर काय चुकलं माझं ? मी त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करून लागले , अगदी स्वतः:ला मीरा समजून , आणि मला अगदी मरेपर्यंत असं मूक , अबोल प्रेम करायचं होतं त्यांच्यावर . पण आपल्याला जे वाटतं तसंच घडत असतं तर नियती या नावाचा शब्दच अस्तित्वात आला नसता नाही का ?
त्या प्रसंगा नंतरची गोष्ट , त्या दिवशी आम्हा सर्व ऑफिस टीम ला युडी एका निसर्गरम्य रिसॉर्ट वर लंच करता घेऊन गेले ,, दुपारचं ऊन असूनही , आजूबाजूला गर्द हिरवा गारवा होता. जेवण यायला जरा अवकाश होता तोवर सगळे गाण्याच्या भेंड्या खेळत होतो , आज सगळ्यांनी यु डी ना त्यांचं खास गाणं गाण्याचा खूप आग्रह केला , गमंत म्हणजे आत्तापर्यंत यु डी गातात हे मला माहिती नव्हतं . ते चांगले ‘कानसेन ‘ आहेत हेच ठाऊक होतं , त्यातून त्याचं खास असं काही गाणं असेल हे ही माझ्या गावी नव्हतं. ते नाही नाही म्हणत होते , यु डी ला असा कधी भावही खाताना मी पाहिलं नव्हतं , त्यांचं हे हि रूप मला नवीन होतं . मी म्हटलं , “म्हणा की सर , मला ऐकायचंय तुमचं गाणं “ . “ यावर ते म्हणाले ,”तुम्ही आग्रह केलाय म्हणून म्हणतो पण हे गाणं मी खास प्रसंगी खास व्यक्तीसाठीच म्हणतो कारण ते म्हटल्यानंतर मी माझा उरतच नाही “. “मी उत्सुकतेने सरसावून बसले आणि यु डी नी गाणं सुरू केलं , “दूर रेहेकर ना करो बात, करीब आ जाओ SSSSSS “ छानच आहे कि यांचा आवाज आणि आर्तता किती आहे आवाजात, खरंच खूप व्याकुळ झाले आहेत प्रेयसीला भेटायला असं वाटत होतं , ती व्याकुळता माझ्या मनाच्या आत गाभ्यापर्यंत खोल खोल झिरपत गेली , गाणं संपलं आणि टाळ्यांच्या आवाजाने मी भानावर आले , रिसॉर्ट ला आलेले लोक , वेटर ईतकेच काय रिसॉर्ट चे मालकही आमच्या ईथे येऊन गाणं ऐकत उभे होते , लोकांच्या गर्दीत कौतुकाचा वर्षाव झेलणाऱ्या यु डी .चा मला खूप अभिमान वाटला . ती भारवलेली संध्याकाळ संपूच नये असं वाटत होतं , मी घरी आले ती एका वेगळ्याच धुंदीत , निशी ला आणि माऊ ला घेऊन मानस फिरायला गेला होता . वाहिनी त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या आणि सासूबाई देवळात , घरात कोणीच नव्हतं , असतं, तरी मी आज कोणाशी बोलण्याच्या मूड मध्ये नव्हते . कपडे बदलून मी बेडवर पडले , कानात’ यु डी ‘चे सूर घोळत होते , या क्षणी मी आई , पत्नी , सून या कोणत्याच नात्याने बांधलेली नव्हते , ना कोणाची मुलगी होते , ना बहीण , फक्त आणि फक्त यु डी च्या विचारांत हरवलेली एक प्रेमिका होते . मानस अजूनही बोलत नसल्यामुळे रात्री हॉलमध्येच झोपला . रात्रभर तळमळत राहिले ,असाच कधीतरी डोळा लागला .

Group content visibility: 
Public - accessible to all site users