अंमली! - भाग ६

Submitted by अज्ञातवासी on 25 January, 2023 - 14:27

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/82904

"मीरा, कृष्णाच्या प्रेमात रंगून गेलेली. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तिला फक्त कृष्ण दिसायचा. तिने कायम कृष्णालाच आपला पती मानलं. आता कुणी म्हणेल, ही तर तिने तिच्या पतीशी प्रतारणा केली, पाप केलं, पण हे विशुद्ध प्रेम होतं."
बुवा प्रवचन करत होते. दूर मंडपात टोकाला कुणीतरी बसलेलं होतं.
"कैसे हो बेटा, बडे दिन बाद?"
"हो, रविवारी मेसला सुट्टी असते, इथे फुकट जेवण मिळतं."
"वाह, व्यवहार असा हवा, शुद्ध. सरळ. पण काय वाटतं, मीराने प्रेम केलं की पाप?"
"माहिती नाही. तुम्ही सांगा."
"तिने प्रेमासाठी पाप केलं." ती व्यक्ती खळखळून हसली.
तोही हसला.
"जीवनात पाप पुण्य असं काही नसतं बेटा. सगळे असतात नियतीचे खेळ. आपण फक्त कर्म करतो, बाकी सगळं केशवाच्या हातात. म्हणून म्हणतात, श्रीकृष्णार्पणमस्तु!"
मानस शांतपणे त्याच्याकडे बघत राहिला.
"आख्यायिका ही आहे, की भोजराज, म्हणजे मीराबाईचा नवरा. त्याने कृष्णाचा इतका द्वेष केला, की प्रत्येक क्षणात तो कृष्णाला आठवत होता."
"मग?"
"कृष्णाने त्याला स्वतः मध्ये सामावून घेतलं. कारण मीराबाईचं कृष्णावर फक्त प्रेम होतं, पण भोजराजाच्या प्रत्येक श्वासात कृष्ण होता."
मानस फक्त शांतपणे त्याच्याकडे बघत राहिला.
"तू फक्त कर्म कर, तुझं सगळं कर्म कृष्ण स्वतःमध्ये सामावून घेईल."
ती व्यक्ती दिसेनासी झाली.
हा भास, भ्रम की सत्य याचा विचार मानसला आतातरी करायचा नव्हता.
*****
समोर हळूहळू थंड होत जाणारं द्रावण!
काचेमधून तो नीट न्याहाळत होता.
जमिनीखाली बनवलेली एक सुसज्ज लॅब. एखाद्या प्रयोगशाळेला मागे टाकेल अशी.
आणि सुडोएफेड्रीनचा ड्रम!
तीन दिवस झाले, तो इथेच होता. ही लॅब म्हणजे त्याच्यासाठी आता घर बनलं होतं.
जगायचं इथेच...
आणि मरायचं इथेच...
बऱ्याच वेळाने त्याने फिल्टरेशन चालू केलं.
...आणि हळूहळू ते क्रिस्टल समोर दिसू लागले.
फर्स्ट बॅच!
'अँग्री यंग मॅन!!!'
त्याने वजन केलं!
आईशपथ!!!
एक किलो... आणि नव्यान्नव पूर्णांक नव्यान्नव टक्के शुद्ध!
सुशीलला सुद्धा कधीही हा आकडा गाठता आला नव्हता.
कारण एकच होतं.
ते सुडोएफेड्रीन नव्हतं.
...ते विशुद्ध एफेड्रीन होतं!!!
तो कमीत कमी पाच कोटींचा माल बनवून बसला होता.
तोही तीन दिवसात...
त्याच्या हातात खजिना लागलेला होता.
...आणि दुबई काय करू शकते, याचा प्रत्ययही त्याला आलेला होता...
******
वसंता गौडा एका टेबलाच्या समोर बसलेला होता.
त्याच्या समोरच मानस बसलेला होता.
"शेट्टी!" त्याने आवाज दिला.
"जी अण्णा!"
"एक ग्राम कोकेन आण."
"काय अण्णा?"
"एक ग्राम कोकेन आण..."
"शेट्टीने खिशातून एक पुडी काढली."
"ओढ,"
"अण्णा काहीही काय सांगता?"
"अरे नशेडी, मला येडा बनवू नको. ओढ!"
शेट्टीने निमूट खिशातून एक जुनी हजाराची नोट काढली. त्याची पुंगळी करून त्यात कोकेन भरलं, आणि नाकावाटे पूर्ण ओढून घेतलं.
थोडावेळ तो शिंकला.
"बघा अण्णा, काहीही झालं नाही. मी घेतच नाही तर!"
"पण हजाराची जुनी नोट बाळगणं इल्लिगल आहे ना?" मानस आश्चर्याने म्हणाला.
"सिरियसली? अरे तू एक किलो मेथ बनवलंय... आणि तुला अजूनही हजाराची नोट इल्लिगल आहे याची चिंता आहे?"
"क्षणार्धात मानसला डोळ्यावरची झापड उडाल्यासारखं झालं."
काय करतोय आपण. पाच दिवसापूर्वी मी एक साधा बेरोजगार माणूस होतो.
आता ड्रग माफिया झालोय!
'श्रीकृष्णार्पणमस्तु!'
त्याला शब्द आठवले.
आणि तो शांत झाला...
...ही शांतता प्रचंड भयाण होती...
एक मोठं वादळ येणार होतं...
"शेट्टी, आता हे ओढ." गौडाने थोडासा मेथ त्याच्याकडे सरकवलं.
शेट्टीने आत्मविश्वासाने त्याची पावडर केली आणि ओढली...
मानस त्याच्याकडे बघत राहिला.
शेट्टीमध्ये काहीही फरक पडला नाही...
मानस आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिला...
"हॅट... साधी पावडर आहे ही. काहीही बनवतोय हा.. अण्णा, तुम्ही कुणावरसुद्धा विश्वास ठेवतात. येड बनवलं याने तुम्हाला. बघा मला, काहीही फरक नाही."
"अण्णा, हे खरंच शुद्ध मेथ आहे." मानस अविश्वासाने म्हणाला.
"अण्णा, उडवा याला. काही उपयोग नाही याचा. आपला अड्डा उलट त्याला माहिती पडला."
"शेट्टी गप्प... खुर्चीवर बस.. शांत."
"नाही अण्णा, याचा हिशेब इथेच व्हायला हवा."
"अण्णा... तुम्ही..." मानस काहीतरी म्हणत होता.
...आणि धाड्कन कुणी डोक्यात घाव घालावेत, असा शेट्टी डोकं गच्च आवळून खाली पडला.
"अण्णा, वाचवा." त्याने डोकं आवळून धरलं.
"जया, त्याला लिंबू, विनेगर आणि सोडा पाजत राहा, फ्रिजमध्ये आहे." अण्णाने आदेश दिला.
मानस अजूनही बुचकळ्यात होता.
"तमा, हे शुद्ध मेथ... प्युअर... याची किंमत खूप जास्त. एक किलो माल आहे, आपण दहा कोटी तरी नक्की बनवू. यात काय काय मिसळायचं ते तू ठरव."
"जी अण्णा."
"पुढची बॅच कधी निघेल?"
"आजच बनवायला घेतो."
"नाही, एक बॅच बनवून झाली, तर पंधरा दिवसाचा ब्रेक. सप्लाय वाढला, तर डिमांड कमी होईल. डिमांडही असायला हवी, आणि सप्लायही रहायला हवा."
"...मग मधले पंधरा दिवस मी?"
"हा पैसा कसा खर्च करायचा, याचा विचार कर. तीन कोटींचा मालक आहेस तू."
मानस त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला.
"हो, मला सगळा खर्च जाऊन सहा कोटी निव्वळ नफा राहील. तीन कोटी तुझे."
"नाही अण्णा, दोन कोटी. एक कोटी माझ्यावरच्या विश्वासाची किंमत, जी आधीच ठरलेली होती."
अण्णा हसला.
"विश्वास फार मोठी गोष्ट आहे, त्याची किंमत नाही करता येतं मानस. तीन कोटी... अण्णाची जुबान..."
मानस भारावून गेला होता.
...आणि कालपर्यंत सव्वीस रुपये खिशात असलेला मानस आज कोट्यधीश झाला होता.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आता सुष्ट आणि दुष्ट असा सामना वाटू लागलाय.
साधारण एका वयाचे दोन जिगरबाज तरूण, एक कुबेरपुत्र तर दुसरा कफल्लक, एक योग्य- अयोग्याची जाणीव ठेवून वागणारा तर दुसरा विपरीत टोक गाठणारा.
मानसच्या पात्रामुळे मोक्ष अजूनच धवल वाटू लागलाय.

@केशवकूल - धन्यवाद!
@धनवन्ती - नेहमीप्रमाणे एवढंच म्हणेन, बघुयात पुढे काय होतं ते.

एक सुचवणी (पतघे नातसोदे)
सुशीलकुमारचा उल्लेख आल्यावर तो नक्की कोण हे काही आठवेना म्हणून पुन्हा मागे मागे जाऊन एक एक भाग वाचून आलो. तर जी पात्रे एकदाच एंट्री करतायेत पण नंतर उल्लेखमात्र राहतायेत त्याना पुढील भागात लिहिताना - 'सुशीलला सुद्धा कधीही हा आकडा गाठता आला नव्हता.' असे न लिहिता -
** सुशीलला सुद्धा कधीही हा आकडा गाठता आला नव्हता. ** असे लिहिता आले तर कदाचित वाचकांसाठी अधिक बरे होईल. (पतघे नातसोदे)