संकेत (कथा)

Submitted by sobati on 23 January, 2023 - 04:35

II श्री II

संकेत

पुर्वाने पुन्हा आपल्या आवडत्या लेखकाचं पुस्तक डोळ्यासमोर धरलं, त्यातल्या लेखात ती गुंगून गेली होती. त्यातलं एक वाक्य... “खरंच असे संकेत आपल्याला मिळतच असतील, पण रोजच्या धकाधकीत ते आपल्याला कळत नसतील हेच खरं, एखादी ज्योत, एखादा प्रकाश आपलं अस्तित्व भासवून देत आपल्या आजुबाजुला वावरतो पण... “

किचनमध्ये काहीतरी पडल्याचा मोठ्ठा आवाज झाला म्हणुन पुर्वाची तंद्री मोडली आणि ती आईला हाका मारत किचनकडे गेली. किचनमध्ये आई जमिनीवर पडलेली होती, आईला असं बेशुद्ध झालेलं पुर्वाने पहिल्यांदाच बघितलं होतं, त्याने तिला धक्का बसला पण लगेच स्वतःला सावरून तिने शेजाऱ्या पाजाऱ्याना हाका मारायला सुरुवात केली. लगेचच लोक गोळा झाले आणि राघवने खाली जाऊन गाडी काढली, तोपर्यंत बाकीच्या लोकांनी स्ट्रेचर बनवून पुर्वाच्या आईला खाली आणलं, हे सगळं इतकं भयानक होत की पुर्वाला भुतकाळातल्या एका घटनेची आठवण झाली आणि त्याने तिचं मन कासावीस होत होतं, पण आता इथे तिला जवाबदारीने वागावं लागणार होतं, म्हणुन ते सगळे विचार मागे सारून ती आई बरोबर हॉस्पिटलमधे जायला निघाली.
जाताना तिलाच स्वतःचं आश्चर्य वाटलं की तिने एवढं धाडस कसं काय दाखवलं आणि ते सुद्धा पापणी ओली न होऊ देता. सहाजिकच होतं, ती एका शुरवीर भारतीय सैनिकाची मुलगी होती, त्यामुळे ती स्वभावतः कितीही हळवी असली तरी प्रसंग पडल्यास ती रणरागिणीचं रुप घेऊ शकते.
थोड्याच वेळात गाडी मिल्ट्री हॉस्पिटलमधे शिरली, आईला रीतसर admit करून झाल्यावर काही टेस्ट्स करण्यासाठी तिला पॅथॉलॉजि लॅबमधे नेलं आणि पुर्वाला बाहेर थांबावं लागलं. तिथे एका खुर्चीवर ती बसली, कारण तिथुन लॅबचा दरवाजा नीट दिसत होता, पण तिकडे एका खिडकीतून एक कवडसा तिच्या डोळ्यावर पडला, त्याने तिचे डोळे दिपले म्हणुन तिने जागा बदलली आणि ती समोरच्या बाकावर जाऊन बसली. तिच्या समोर एका जवानाचे सॅल्यूट करतानाचे रेखाचित्र होते. ते बघुन तिचं मन पंधरा वर्ष मागे गेलं.
तेव्हा ती शाळेत होती. आज शाळेतून येऊन पुर्वाताईंनी भराभर गृहपाठ करून घेतला, आईला भांडी आवरायला मदत सुद्धा केली वर म्हणाली 'आई अजुन काही मदत करू का तुला?' तर आईने विचारलं "का गं पुर्वा, आज खेळायला नाही का जायचं तुला ?" तर गोंडस हसुन हॉलमधे पळाली. आईला बरोब्बर कळलं होतं पुर्वाच्या मनात काय चाललंय ते, आज बाबांचा फोन येणार म्हणुन पुर्वाचं कशातच मन लागत नव्हतं. आतुरतेने ती बाबांच्या फोनची वाट बघत होती. आणि एकदाचा फोन वाजला, तिकडून बाबांनी फक्त "हॅलो पुर्वा" एवढंच म्हटलं आणि पुर्वाने सुरुवात केली,"बाबा मला निबंध स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालंय, विषय काय होता माहिताय ? विषय होता 'माझे बाबा'. मुख्याध्यापिका बाईंनी आईला शाळेत बोलावून घेतलं आणि सगळ्या टिचर्स समोर मला शाब्बासकी देऊन बक्षीस दिलं. तू हवा होतास रे तिथे. हो... मला माहीत आहे, कि तुला सुट्टी मिळाली असती तर तू नक्कीच आला असतास. तुला माहिताय शाळेच्या गॅदरिंग मधे माला प्रशस्तिपत्रक मिळणार आहे, याच निबंधासाठी. तेव्हा मात्र तू नक्की ये हं !!! आणि तेव्हा मी माझा निबंध व्यासपीठावरून वाचुन दाखवणाराय. तुला माझा निबंध तेव्हाच ऐकायला मिळेल. आत्ता ऐकवला ना तर तू येणारच नाहीस."
छोटीशी पुर्वा आता मोठी होत होती. आईने तिला बाबांचे आणि आईचे प्रेम दिले. तिला सांभाळताना आईची होणारी ओढाताण आता पुर्वाला समजत होती. तिने आईला अनेकदा विचारलं "आई मी नोकरी करून शिक्षण पुर्ण करू का ?" तेव्हा प्रत्येकवेळी आईने तिला "आधी शिक्षण पुर्ण कर" हेच सांगितलं. तिने शिकुन खुप मोठ्ठ व्हावं ही तिच्या बाबांची इच्छा.
काहीतरी चमकलं म्हणुन पुर्वाने डोळे उघडले, तर तो कवडसा खिडकीतून त्या सैनिकाच्या फोटोवर पडला होता आणि त्याचे reflection पुर्वाच्या चेहेऱ्यावर येत होते. म्हणुन मग पुर्वाने पुन्हा जागा बदलली आणि ती बाजुच्या खुर्चीवर बसली. त्याचवेळी समोरून जग्गा काका येताना दिसत होता. जग्गा काका हा पुर्वाच्या बाबांचा बालमित्र. जग्गा काकाची आणि पुर्वाची चांगली गट्टी होती. जग्गा काका लॅबच्या दिशेने येत होता. त्याच्या चेहेऱ्यावर गंभीर भाव होते जे पुर्वाने लगेच ओळखले आणि भीतीयुक्त नजरेने तिने जग्गा काकाला 'काय झालं' म्हणुन विचारलं. जग्गा काका तीच्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाला “तुझ्या आईचे रिपोर्ट्स आलेत. लगेच operate करावं लागेल असं डॉक्टर म्हणतायत, पण operation success होण्याचे chances खुप कमी आहेत. आपल्याला निर्णय घ्यायला सांगितलंय.” क्षणाचाही विलंब न करता पुर्वा निर्धाराने म्हणाली "काका operation करायचं" जग्गा काकाने तिच्या कडे नजर वळवली तेव्हा तिने पुन्हा तेच सांगितलं, म्हणाली "मला खात्री आहे, सगळं नक्कीच ठीक होईल, तेव्हा operation करायचंच". जग्गा काकाने तिला विचारलं "तू कॉलेजमधून आल्यावर काही खाल्लं आहेस का ? कारण आता संध्याकाळ होत आलीये आणि डॉक्टर म्हणतायत उद्या सकाळी operation करावं लागेल" तसं ती म्हणाली “त्याची काळजी नको करूस काका, आता मी रात्रीच जेवण करिन, आणि हो मी आज रात्री इथेच राहते आईच्या बरोबर" त्यावर "अगं पण तू एकटी कशी..." जग्गा काकाचं वाक्य मधेच तोडत पुर्वा म्हणाली "काका... अरे final year ला आहे मी आता, I will manage, don't worry" यावर फक्त "ठीक आहे" म्हणत जग्गा काका उठला आणि hospital च्या काही formalities पुर्ण करायला निघुन गेला. ती रात्र पुर्वाने जागुनच काढली. सारखे बाबांचे विचार येत होते. त्या खुर्चीवर बसल्या बसल्या तिने एक-दोन डुलक्या घेतल्या तेवढ्याच.
बाबा आणि पुर्वा कितीतरी वेळ फोनवर बोलत राहायचे, म्हणजे पुर्वा बोलायची आणि बाबा ऐकत राहायचे... बाबाना सारखं सारखं फोन करायला जमत नसे, पण असा एक फोन त्यांना काही महिने पुरत असे.

बाबा पुर्वाला फोनच्या मध्यमातुनच भेटायचे. तशी पुर्वा हुशार होतीच आणि संवेदनशीलही होती, तिला बाबांच्या मनातलं बरोब्बर कळायचं. अगदी पहिल्या "हॅलो" मधे ती समजुन जायची की बाबांच्या मनात काय चाललंय. त्यांना आईविषयी वाटणारी काळजी, आईची होणारी ओढाताण याविषयी बाबा नेहेमीच चिंतेत असायचे, पण मग पुर्वाच बाबांना धीर द्यायची, म्हणायची, "बाबा, अरे तू आईची काळजी करूच नकोस, तुम्ही दोघे लढवय्ये आहात, फरक एवढाच आहे कि, तू तिथे लढतोयस आणि आई इथे, आणि दोन्ही लढायांमधे आपणच विजयी होणार आहोत हे मात्र नक्की. ही त्याच विजयाची नांदी सुरु आहे असं समज..." बाबा त्या चिमुकल्या बाळाकडून असे विचार ऐकुन मनोमन हसायचे आणि त्यांचं टेन्शन कुठच्या कुठे पळुन जायचं. त्यात पुढे पुर्वाचं चालूच,"तुला माहिताय बाबा मी जग्गी काकुकडुन गुलाबजाम करायला शिकलेय, या वेळी येशील ना तेव्हा त्याच गुलाबजामने तुझं स्वागत करणारेय मी… बरं बाबा नाही करणार गुलाबजाम, पण तू ये रे, खरंच, समोर उभं राहून मला माझ्या बाबाला एक कडक सॅल्यूट करायचाय..." तर बाबा म्हणाले, "पुर्वा… मी येणार हे नक्की, तू गुलाबजाम तयारच ठेव. पण मी कसा आणि कधी येईन हे आत्ताच नाही सांगता येणार बेटा."

सकाळ झाली तशी operation theatre मधे operation ची तयारी सुरू झाली. सर्जरी करणारे डॉक्टर्स operation theatre मधे जात असतानाच पुर्वाने त्यांना अडवलं आणि सांगितलं "डॉक्टर माझी आई आहे ती" डॉक्टरांनी एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाले "बेटा, आपण फक्त प्रयत्न करू शकतो" आणि ते आत निघुन गेले. काही वेळाने operation सुरु झालं. थोड्या वेळाने तिकडची लगबग वाढली. नर्सेस सारख्या operation theatre मधुन धावत धावत बाहेर यायच्या आणि लगबगीने आत निघुन जायच्या. एकुणच सगळं वातावरण गुढ अशा भीतीने भारल्यासारखं झालं होतं. पुर्वाला पुन्हा तीच खुर्ची मिळाली होती, आणि काही क्षणातच तिच्या डोळ्यावर तो कवडसा पुन्हा चमकला म्हणुन तीने पुन्हा जागा बदलली. इतक्यात डॉक्टर ओपेरेशन थिएटरच्या बाहेर आले आणि जग्गा काकाला बोलावून म्हणाले “critical condition आहे, काहीही होऊ शकतं, तेव्हा तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर बोलावून घ्या.” एवढं बोलुन ते पुन्हा लगबगीने आत निघुन गेले.
पुर्वाला मात्र भुतकाळातल्या त्या घटनेची पुन्हा आठवण झाली...
आज शाळा लवकर सुटली म्हणुन स्वारी खुशीत होती, घरी गेल्या बरोब्बर नवा व्यापार काढुन तो पुसून लख्ख करून ठेवायचा हे तिने मनात आधीच पक्कं केलं होतं. ही सगळी तयारी का, तर आज चिमुकल्या पुर्वाचे बाबा तब्बल २ वर्षांनंतर घरी येणार होते. ‘आता तर त्यांना मुळीच परत जाऊ द्यायचं नाही’ हे पुर्वाने अगदी नक्की ठरवलं होतं, आणि म्हणुन यावेळी नव्या व्यापारात ती मुद्दाम हरणार होती, कारण जोपर्यंत ती जिंकत नाही तोपर्यंत बाबा तिथुन हलणार नाही हे तिला पक्कं माहीत होतं. ती घरी आली तेव्हा बाबांना भेटायला बरेच लोकं आले होते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती तडक आईला जाऊन बिलगली, मात्र आईचा चेहेरा बघुन तिला धक्काच बसला. आईचे केस विस्कटलेले होते आणि कपाळावरचं कुंकू पुसलेलं होतं, हे सगळं काय चाललंय हे तिला समजतंच नव्हतं. इतक्यात जग्गा काका आला आणि तिला बाहेर घेऊन गेला, तिने जग्गा काकाला हळुच विचारलं "काका, काय झालं?" जग्गा काका स्वतःचे अश्रु कसे बसे आवरत म्हणाला "तुझा बाबा गेला गं… आपल्याला कायमचा सोडुन गेला" आणि तो ढसा ढसा रडायला लागला. पुर्वाला खरंतर याचा खरा अर्थ समजला नव्हता, तशी ती खुप लहान होती, पण जग्गा काकाला असं रडताना बघुन तिलाही रडु कोसळलं. घराकडे निघालेल्या सैनिकांच्या वाहनांवर बॉम्ब हल्ला झाला, त्यात जे भारतीय जवान शहिद झाले त्यात एक होते “कॅप्टन संजीव पाटणकर” म्हणजेच पुर्वाचे बाबा.
जवळ जवळ तासाभराने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं operation यशस्वी झालं. हुश्श… सगळ्यांच्या मनावरचा ताण एकदम कमी झाला. डॉक्टरांनी जग्गा काका आणि पुर्वाला त्यांच्या cabin मधे बोलावून घेतलं आणि म्हणाले, "पुर्वाच्या आईंना काही दिवस इथे hospital मधेच ठेवावं लागेल, म्हणजे ३-४ दिवस. त्यानंतर आम्ही त्यांना discharge देऊ, पण घरी त्यांना आठवडा भर पुर्ण विश्रांती घ्यावीच लागेल. तशी सोय होणार नसेल, तर आम्ही त्यांना इथे military hospital मधेच ठेऊन घेऊ" यावर जग्गा काका म्हणाला "काही काळजी करू नका डॉक्टर साहेब, अगदी उद्या जरी तुम्ही वहिनीला discharge दिलात तरी आमची पुर्वा तिची खुप चांगली काळजी घेईल" यावर पुर्वाने फक्त मान डोलावली आणि तिने डॉक्टरांना विचारलं, “uncle मघाशी तुम्ही घाई घाईत बाहेर आलात आणि म्हणालात...” तिचं बोलणं मधेच तोडत डॉक्टर म्हणाले,"हो... खरं तर तेच सांगायला मी तुम्हा दोघांना बोलावलंय… एक क्षण असा होता की परिस्थिती अगदी आमच्या हाता बाहेर गेली होती. मी तुझ्या काकाशी बोलुन आत गेलो तेव्हा तुझ्या आईचे हृदय १३८ सेकंद बंद झालं होतं. आम्ही सगळे डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत होतो पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी त्यांना मृत घोषित करावं असं ठरवुन आम्ही तयारीला लागलो तोच एक "बीप" ऐकू आला आणि कार्डिओग्राम पुन्हा रीडिंग्स देऊ लागला. त्यांच्या हार्ट बिट्स पुन्हा सुरू झाल्या एवढंच नाही तर त्या हार्ट बिट्स अगदी नॉर्मल होत्या, पुर्ण सर्जरी होईपर्यंत त्यांच्या हार्ट बिट्स आणि ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. त्यांचं हृदय जेव्हा बंद पडलं तेव्हा आमच्या मेडिकल पद्धतीने manually आम्ही तपासणी केली, आणि कुठल्याच मशीनमध्ये काहीच फॉल्ट नाही याची खात्री करून मगच आम्ही सर्जरी conduct करायचा निर्णय घेतला होता. This is miraculous..."
एवढा वेळ शांत बसलेलया पुर्वाला कळलंच नाही कधी अश्रु ओघळू लागले ते. तीने विचारलं "मी आता आईला भेटु शकते का ?" तेव्हा डॉक्टर म्हणाले, "त्या अजुन ऍनस्थेशियाच्या अंमलाखाली आहेत, साधारण तासाभरात त्यांना शुद्ध येईल त्यानंतर तू त्यांना भेट.” यावर फक्त "Thanks a lot doctor" म्हणुन जग्गा काका आणि पुर्वा डॉक्टरांच्या केबिन मधुन बाहेर आले. जग्गा काका म्हणाला "मी एक phone करून येतो, तोपर्यंत तू जरा आराम कर" पुर्वाने मानेनेच होकार दिला आणि ती जाऊन त्याच खुर्चीवर बसली. आता मात्र तो कवडसा तिच्या डोळ्यावर चमकत नव्हता. याचं खरं तर पुर्वाला आश्चर्य वाटलं, म्हणुन ज्या खिडकीतुन तो प्रकाशाचा कवडसा यायचा त्या खिडकीपाशी जाऊन तिने त्या खिडकीची काच सरकवली आणि पाहते तर समोर दुसऱ्या इमारतिची भिंत, म्हणजे तिथुन दिवसाच्या कुठल्याही वेळी प्रकाश किरण येण्याची शक्यताच नव्हती, मग तो कवडसा कसा काय माझ्या डोळ्यावर यायचा. याच विचारात ती पुन्हा त्याच खुर्चीवर बसली, तोच पुन्हा तिचे डोळे दिपले, म्हणुन डोळे किलकिले करून तिने पाहिलं तर एक ज्योत किंवा ज्योत सदृश आकृती त्याच खिडकीतून बाहेर जात होती, पण ती आकृती क्षणभर खिडकीपाशी थांबली… हे बघुन क्षणाचाही विलंब न करता पुर्वा तडक उभी राहिली आणि तिने त्या ज्योतीला सैनिकी पद्धतीने सॅल्यूट केला, त्याबरोबर ती ज्योत एकदा लुकलुकली आणि अदृश्य झाली, आता मात्र पुर्वाच्या डोळ्यातून अभिमानाचे आनंदाश्रु ओघळू लागले. तेवढ्यात तिथे जग्गा काका आला आणि त्याने पुर्वाला विचारलं "काय झालं पुर्वा?" यावर पुर्वा म्हणाली. "काका, काही संकेत आपल्याला ओळखता येत नाहीत हेच खरंय"

लेखक
आनंद रामकृष्ण विश्वामित्रे, डोंबिवली

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान