निसर्गसुंदर सुप्रभात

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 December, 2022 - 00:16

मी रोज सकाळी समाज माध्यमावर
सगळ्या मित्रांना सुप्रभात म्हणतो
काही लोक म्हणतात कशाला रोज तेच
मला आवडतं तसं म्हणायला
सकाळी सुप्रभात म्हटलं की मी
जिवंत आहे एवढंतरी कळतं जगाला
तसे आपण जगलो काय मेलो काय
राम कृष्णही आले आणि गेले
पण कधीतरी एखादा सहचर, संदेश
नाही दिसला तर काळजीनं विचारतो
बरा आहेस ना बाबा?
मनाला बरं वाटतं
सुप्रभात म्हणण्याचं गमक समजतं
मी ही इतरांचा सुप्रभात संदेश नाही दिसला
दोन चार दिवस तर चिंतीत होतो
एकदा असंच मित्राचा संदेश येणे बंद झाले
अन चारपाच दिवसात तो गेला हे समजलं
मग वाटलं संदेशा ऐवजी बोलायला हवं होतं
त्याच्या क्षीण आवाजाला मनात कोरायला हवं होतं
मग मला आलेला त्याचा शेवटचा संदेश शोधतो
तो मनाच्या सिलबंद पाकीटात सुरक्षित जपतो
सुप्रभात म्हणताना मी छान निसर्गचित्र पाठवतो
खरं तर निसर्गच माणसांशी निखळ बोलतो
निर्मळ झरा माझ्या मनाचा आरसा होतो
हिरवाई माझं तजेलदार मन असतं
निळं विस्तिर्ण आकाश माझा भवताल
त्यात असंख्य पाखरं भरारतात माझ्या नात्यातली
ती पाखरांची चिव चिव माझं जीवन संगीत
तो फुलांचा गंध आयुष्याचा मधुमास
असंच काहीसं रोज भेटतो लोकांनां
सुप्रभात संदेशातून
लोकांचे उपदेशपर संदेश…हाय रे कर्मा
नाही आवडत मला उठसूठ शब्दजंजाळ उभारायला
कारण प्रत्येक माणूस शहाणा असतो
असच मी मानतो
मला आवडतं निसर्गासारखं काहीतरी
शब्दांपलीकडचं बोलायला .

© दत्तात्रय साळुंके
१५-१२-२०२२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. मला हे गुड मॉर्निंग मेसेजेस आवडतात पण ते प्रिय व्यक्तींकडून - आत्या, बाबा, भावजय, नणंद , काही मैत्रिणी ( वर्णिता, किल्ली ऐकताय ना Wink )...
.
परिचितांचे, उगाच तोंडदेखल किंवा दिसला मेसेज केला फॉर्वर्ड असले आवडत नाहीत.

कुमार सर धन्यवाद

सामो खुप धन्यवाद
जवळच्या नातेवाईकां व्यतिरिक्त माझ्या सहवासात आलेले काही लोक खरंच विचारतात बरा आहेस ना ! एक बालमित्र तर फोनच करतो....माझ्या दुस-या एका मित्राची अजून एक जिवघेणी आठवण आहे. मी असाच त्याला फोन केला सहज बोलायला तेव्हा फोन त्यांच्या मुलाने घेतला . तो कर्करोगाने गेला होता. त्याने करृरोग झाल्याचे मला सांगितले नव्हते. मला अजून मन खातं मी फोन लवकर का नाही केला .

मी ही इतरांचा सुप्रभात संदेश नाही दिसला
दोन चार दिवस तर चिंतीत होतो>>> अगदी मनातले लिहिलेयं..

कविता पटली.

दत्तात्रय साळुंके
सकाळचे सहा वाजून चार मिनिटे झाली आहेत.
सुप्रभात!

केशवराव सकाळचे ११.१४
आत्ताच प्रतिसाद पाहिला.... सुप्रभात!
धन्यवाद...