सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना

Submitted by मार्गी on 7 November, 2022 - 08:05

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना

✪ कृतज्ञता!
✪ निसर्ग तीर्थयात्रा
✪ तयारी व नियोजन
✪ भारत विकास संगम आणि इतर अनेक संस्था
✪ वेंगुर्ला राईड- सागरा प्राण तळमळला!
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!
✪ निसर्गाने प्रत्येकाला क्षमता दिली आहे
✪ कुडाळ आणि कराची!

सर्वांना नमस्कार. मानसिक आरोग्य जागरूकतेसंदर्भात संवाद हा विषय घेऊन महाराष्ट्रातल्या कुडाळवरून गोवा- बेळगांव- बागलकोट- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर असा साधारण १४५० किलोमीटरचा १८ दिवसांचा सायकल प्रवास नुकताच केला. वाटेमध्ये खूप सुंदर अनुभव मिळाले. अनेक ठिकाणी स्थानिक संस्था- गट- लोक ह्यांसोबत भेटी झाल्या. शाळा- कॉलेजेसचे विद्यार्थी भेटले आणि त्यांच्यासमोर सकारात्मक आणि आनंददायक अशी गोष्ट ठेवता आली. एका अर्थाने हा सगळाच प्रवास अतिशय अविश्वसनीय होता. स्वप्नवत होता. हिरो रॅडीकल एसएलआर सिंगल गेअर सायकलीने कमालीची साथ दिली. इतक्या अंतरामध्ये सायकलीला काहीही म्हणजे काहीही झालं नाही. आणि वाटेतला निसर्ग- लोक- छोटी गावं- आदिवासी भाग- हे सगळं बघणं म्हणजे इन्क्रेडीबल इंडिया अनुभवणं होतं! सायकलवर मी एकटा असलो तरी अगदी रस्त्यावरही आणि वाटेतल्या गावांमध्ये कधीच एकटा नव्हतो. अनेक लोक अनेक प्रकारे सोबत करत होते आणि मदतही करत होते. ह्या सायकल प्रवासात अगदी सायकलचे तांत्रिक घटक समजावून सांगणे, संस्थांशी जोडून देणे, रूटबद्दल सांगणे अशा प्रकारे व इतर अनेक प्रकारे ज्या सर्वांनी अशी मदत केली, त्या सर्वांबद्दल आणि निसर्ग व जीवनाबद्दलही कृतज्ञता व्यक्त करून ह्या अनुभव कथनाला आता सुरुवात करत आहे.


.

नागपूरमध्ये अगदी ठरलेल्या दिवशी सायकल प्रवास पूर्ण करताना मनामध्ये जो भाव होता, तोच भाव हे लिहीताना मनात येतोय- कृतज्ञता! माझं नशीब किंवा माझी पुण्याई खूप चांगली असावी ज्यामुळे मला इतका जबरदस्त अनुभव मिळाला. कोकणातले चढ- उताराचे रस्ते- गोवा- बेळगांवमधला चोरला घाट- पुढे अनेक ठिकाणचा विलोभनीय निसर्ग- नंतरचं जंगल आणि अजस्र नद्या- अशा सर्व ठिकाणी सायकलवर फिरणं म्हणजे एक निसर्ग तीर्थयात्राच होती. निसर्गातील खूप मोठी प्रसन्नता आणि शांती मला ह्यामध्ये अक्षरश: लुटता आली. चोरला घाटाप्रमाणेच मी निसर्गामधला खजिना अक्षरश: चोरला. सायकलिंग पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी ह्याबद्दल बोललो आणि अनुभव शेअर केले. त्यामध्येसुद्धा अनुभव सांगण्याबरोबर ह्या निसर्ग तीर्थयात्रेतला आनंद वाटून घेण्याचा भाग होता. आणि आत्ताही मी सविस्तर लिहून ह्या निसर्ग तीर्थयात्रेतला जास्तीत जास्त आनंद आपल्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे.


.

.

.

.

नागपूरमध्ये विशेष मुलांना भेटल्यानंतर मानसिक आरोग्य ह्या विषयाबद्दल संवाद करण्याची गरज जाणवली होती. त्यामुळे ह्या प्रवासाचा शेवट नागपूरला करायचं‌ ठरवलं. आणि महाराष्ट्राचं दुसरं टोक ते गोवा- कर्नाटक- तेलंगणा- गडचिरोली भाग ह्यासाठी निवडला की, मानसिक आरोग्याच्या दिशेने जाताना आपल्याला अपरिचित प्रदेशामध्ये जावं लागतं. कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं. आपल्याला माहित नसलेल्या गोष्टींचा परिचय करून घ्यावा लागतो. त्याचं एक प्रतीक म्हणून हा थोडा अपरिचित भाग निवडला. आणि चांदा ते बांदाच्या उलट बांदा ते चांदा असा रूट ठरवला. योगायोगाने त्या सुमारास श्री. विलास देशपांडे काकांशी आणि अशोकजी टांकसाळेंशी भेट झाली, मनातली प्राथमिक कल्पना त्यांना सांगितली. दोघांनाही ती आवडली. आणि ते बोलले की, गोवा- कर्नाटक- तेलंगणामध्ये ह्या प्रवासामध्ये भारत विकास संगमचं नेटवर्क, संस्था व कार्यकर्ते मदत करतील. कारण हा नुसता सायकल प्रवास नव्हता तर त्यामध्ये जिथे जिथे शक्य होतील, तिथे त्या ठिकाणच्या संस्था- ग्रूप- शाळा- कॉलेजेससोबत भेट घ्यायची होती. आणि अशा भेटी किती रिलेव्हंट होत्या हे नंतर दिसलंच. लहान मुलांच्या प्रतिक्रिया बघताना त्यांना चांगलं असं एक्स्पोजर देता आल्याचं समाधान मिळालं.

त्यानुसार मग ह्या रूटवरच्या संस्था- कार्यकर्ते- मित्र- नातेवाईक अशा लोकांचा शोध सुरू केला. सायकलिंग करताना मी लॅपटॉप सोबत ठेवून माझं कामही करणार होतो. त्यामुळे रोज सकाळी ६.३० ते ११.०० किंवा फार तर १२.०० पर्यंत पूर्ण होईल असे ८५- ९० किलोमीटरचेच टप्पे ठरवले. दुपारी थोडा आराम व माझं लॅपटॉपवरचं व्यावसायिक काम आणि त्यानंतर संध्याकाळी भेटी- संवाद असा विचार होता. आणि दिवस निवडताना पावसाळा संपतानाचे निवडावे लागले. कारण पावसाळा संपल्यानंतर मला आकाश दर्शनाचे सेशन्स सुरू करायचे होते. त्यामुळे पावसाळा संपतानाचीच विंडो हाताशी होती. त्यामुळे २४ सप्टेंबरला महाराष्ट्रात कुडाळला सुरुवात आणि ११ ऑक्टोबरच्या सुमारास नागपूरला समारोप असं नियोजन केलं. थोडाफार पाऊस लागणार हे माहिती होतंच. पण दुसरी विंडो नव्हती. जुलैच्या सुरुवातीला ही कल्पना मनात आली आणि हळु हळु एक एक तयारी करत गेलो.

सायकल मोहीमा अनेक वेळेस केल्यामुळे आणि फिटनेस ब-यापैकी असल्यामुळे तशी तयारी वेगळी करावी लागली नाही. फक्त ह्यावेळी सिंगल गेअर सायकलवर ही मोहीम करायची ठरवलं होतं. कारण गेअरची सायकल बघितली तर लोकांचं- विशेषत: ग्रामीण भागातल्या लोकांचं सगळं लक्ष तिकडेच जातं. आणि आज जे तरुण अनेक वेळेस कारणं देत बसतात, एक्स्क्युजेस देतात की, आमच्याकडे हे नाही, ते नाही, त्यांना मला हे उदाहरण समोर ठेवायचं होतं. अगदी साधी- ओळखीची सायकल म्हणूनच निवडली होती. मी जे करतोय, ते सगळे जण करू शकता, तुम्हीही करू शकता हे मला त्यांना सांगायचं होतं. त्यानुसार हिरो कंपनीची एसएलआर सायकल शोधली. अशा सायकलीवर राईडस केलेल्या सायकलिस्टशी बोललो. त्यांचे अनुभव ऐकले व त्यांची मतं ऐकली. त्याबरोबर आतला आवाजही ऐकला आणि पुढेही अशी सायकल उपयोगी पडेल हे लक्षात आल्यावर ती विकत घेतली. कारण पावसाळ्यात मेरीडा सायकलीचे चिखलाने हाल होतात. शिवाय अदूला डबल सीटही नेता येत नाही. सिंगल गेअर सायकलीला पक्क मडगार्ड असल्यामुळे आणि कॅरीअर कॅपिसिटी जास्त असल्यामुळे तो फायदा मिळाला.

ह्या सायकलीला छोट्या अंतरासाठी बनवलंय, तिच्यावर इतका मोठा प्रवास करताना तिचे पार्टस तपासून घ्यावे लागतील, बदलावेही लागतील असं काही सायकलिस्टसचं म्हणणं होतं. म्हणून ते सर्व तपासून घेतलं. पंक्चर काढण्याची वेळ तर येणारच होती, त्यामुळे त्यासाठीही ट्रायल घेतली. पंक्चर येत होतंच, फक्त ह्या सायकलीच्या मॉडेलसंदर्भात ते परत करून बघितलं. मेरीडा सायकलीवर अनेक सोलो मोहीमा केल्यामुळे बेसिक येत होतंच. असो.


.

.

जेव्हा सिंगल गेअर सायकलीवर प्रॅक्टीस राईडस सुरू केल्या, तेव्हा खूप अनपेक्षित अनुभव आला. ही सायकलही गेअरच्या सायकलीसारखीच पळतेय आणि छोटे चढ व छोटे घाटही चढू शकतेय हे कळालं! It is more about cycling and the cyclist, than the cycle, हेही जाणवलं. ह्या रूटवर कोकणातले छोटे चढ होते आणि घाट असा फक्त गोवा- बेळगांवमधला चोरला होता, बाकी तुलनेने सपाट रस्ता होता. त्यामुळे तेवढा भाग वगळला तर गेअरच्या सायकलीची अशी गरज नव्हतीच. प्रॅक्टीस राईडमध्येच कळालं की, ही सायकलही सुसाट आहे आणि सुंदर आहे! त्याशिवाय अदूसोबत डबल सीट राईडसचा आनंद घेता आला. एकदा तर चक्क १५ किलोमीटर डबल सीट राईड झाली. तिलाही सायकल खूप आवडली. क्लासला सायकलवर जाणं, कधी शाळेमध्ये सायकलीने सोडणं असंही सुरू झालं! त्याशिवाय भर चिखलातही चिखलाची आंघोळ न होता सायकलिंग करण्याचाही आनंद मिळाला! पावसाळ्यातल्या त्या काही राईडस झाल्या, त्या खूपच भन्नाट होत्या.

नवीन सायकलीवर १५- २० किमी, नंतर ४० आणि मग ६० आणि पुढे अगदी १०० किलोमीटर राईडही करून बघितली. सायकल खूपच मस्त वाटतेय. मध्यम श्रेणीचे घाटही चढता येत आहेत. ६० किलोमीटर राईडला पुणे- मुठा- पुणे असं गेलो होतो. तिथे मुठा घाट- दोन्ही वेळेस आणि नंतर ५% चढ असलेला पिरंगुटनंतरचा घाटही सायकल चढू शकली. त्यानंतर पुणे- घोटावडे- शिळिंब- पवनानगर- सोमाटणे- पुणे अशी १०३ किमीची राईड केली. तिकोना किल्ल्याची एक परिक्रमा झाली ती. त्यामध्येही अगदी तीव्र १०% चढ सोडून बाकी सगळे चढ पेडलिंग करताना पार करता आले. ह्या निमित्ताने खूप वेगळ्या भागामध्येही फिरता आलं. काय ते नजारे! पाऊस, धुकं, घाटवाटा! अहाहा! नंतर धायरी- पानशेत- वेल्हे- पाबे घाट- धायरी हासुद्धा नितांत सुंदर रस्ता ह्या सायकलीवर फिरलो. जवळ जवळ ऑफ रोड असूनही सायकलीला काहीही झालं नाही, तिचे टायर्स मजबूत आहेत हे कळालं. सायकल घेतल्यानंतर निघेपर्यंतच्या दोन महिन्यांमध्ये मिळून सुमारे ९५० किलोमीटरच्या राईडस केल्या. एका अर्थाने हे चुकीचं होतं! कारण टायर्स जितके नवीन, तितकी पंक्चर होण्याची शक्यता कमी असते. आधीच टायर्स झिजवायचे नसतात! पण ते लक्षात येईपर्यंत होऊनही गेलं होतं. काही राईडस पूर्ण सामानासहसुद्धा केल्या.


.

.

.

.

२२ सप्टेंबरला पुण्यावरून निघालो. २४ सप्टेंबरला कुडाळवरून सुरुवात करायचं ठरवलं. कुडाळमधले बाबांचे मित्र वैद्य सुविनय दामलेंनी आनंदाने त्यांच्याकडे बोलावलं. ह्या सगळ्या तयारीमध्ये "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" चा अनुभव येत होता सतत! एक कल्पना मनात आल्यावर त्यावर एक एक पाऊल उचललं की, पुढे रस्ता मिळत गेला. सायकल बसने नेताना ट्रॅवल्सवाले खूप पैसे घेत होते. पण सावंतवाडीच्या सहज ट्रस्टच्या मीनाक्षी मॅडमनी केळकर ट्रॅवल्ससोबत जोडून दिलं. सामाजिक उपक्रमासाठी हे करतोय हे लक्षात आल्यावर सायकल फुकटात त्यांनी नेऊ दिली. सायकलिंगमध्ये लोकांना जोडण्याची जादू असते, ह्याची ही फक्त पहिली प्रचिती होती! आणि बोलल्याने होत आहे रे, आधी बोललेची पाहिजे, हेही नव्याने शिकता आलं! निघण्याआधी फार काही अस्वस्थता वाटली नाही. अनेक प्रदेशांमध्ये अनेक अंतराच्या सोलो मोहीमा केल्यामुळे एक रूटीनचाच भाव जाणवत होता. त्याबरोबर हे काही अवघड आहे असंही‌ वाटत नव्हतं. कारण देश- विदेशातील अनेक एथलीटस- अगदी भारतातली मुलगीसुद्धा पूर्ण भारतभरात सलग रनिंग करू शकते, हे माहिती होतं. प्रत्येकाचीच ही क्षमता आहे, त्यामुळे मी काही वेगळं वगैरे करणार आहे असा विषयच नव्हता.

२३ च्या पहाटे बसमधून अंधारातून गगन बावडा घाट बघितला! ह्या घाटात मी कार चालवलीय, कोणे एके काळी अशी माझ्या स्मृतीने आठवण दिली. असाच चोरला घाट मला नंतर लागेल. कुडाळमध्ये पहाटे ५.३० ला पोहचलो तेव्हा धो धो पाऊस आहे. सप्टेंबरचा शेवट आल्यामुळे पाऊस तसा कमी असणार. पण कोंकणात असेपर्यंत मध्ये मध्ये पावसाचे असे तीव्र स्पेल्स लागणारच. सकाळी वैद्य दामलेंकडे थोड्या गप्पा व आराम झाल्यावर वॉर्म अप राईडसाठी म्हणून समुद्र दिसेल तिथपर्यंत जायला निघलो. वेंगुर्ला रोडवर दूरवर समुद्राची निळी पट्टी बघून परत येईन असा विचार करून निघालो. कारण पुढे गोव्यातही अगदी बिचोलीवरूनच बेळगांवच्या दिशेने जाणार असल्यामुळे "त्याची" भेट राहिली असती. काय जबरदस्त वातावरण आहे! नुकताच पडून गेलेला पाऊस, कोंकण आणि शांतता! समुद्राची वाट बघत बघत कधी वेंगुर्लाच्या जवळ आलो कळालं नाही. आणि शेवटी वेंगुर्लामध्ये आतमध्ये येऊन थेट रस्त्याच्या जवळ आल्यावरच तो दिसला! काय त्याची गाज, गर्जना आणि त्याचा अथांगपणा! अहा हा! डोळ्यांमध्ये साठवले ते क्षण. इतकं विराट रूप बघून आपोआपच नतमस्तक व्हायला झालं, दोन मिनिट ध्यान लागल्यासारखं झालं. सागराला भेटेपर्यंत प्राण तळमळत होता आणि भेटल्यानंतरही तळमळलाच! कारण रात्रीचा बसचा प्रवास, झोप नाही. आणि नाश्ता न करता २२ किमी राईड. वेंगुर्ल्यात नाश्ता करून लगेच निघालो. मध्ये मध्ये मस्त पाऊस लागत होता. कोंकण! फार सुंदर अशी ही ४५ किमी राईड झाली.


.

.

संध्याकाळी वैद्य दामलेंनी कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत भेट ठेवली होती. कुडाळमधले सायकलिस्टस श्री. गजानन कांदळगांवकर हेही इथे भेटले. काही सायकलिस्टस रोटरीचे सदस्य असल्यामुळे हा कार्यक्रम रोटरी क्लबने ठेवला. शाळेमध्ये मुलांसोबत थोडा वेळ गप्पा मारता आल्या. सिंधूदुर्ग जिल्ह्यातले पाच किल्ले सांगा असं म्हंटल्यावर फार मुलं सांगू शकली नाहीत. मानसिक फिटनेससाठी कठीण विषयाचा अभ्यास करून भिती दूर करायची व शारीरिक फिटनेससाठी आवडीच्या व्यायामातलं टारगेट ठेवा, असं त्यांना सुचवलं. कुडाळमधल्या सायकलिस्टसनीसुद्धा त्यांच्या उपक्रमांबद्दल सांगितलं. छोटेखानी असा कार्यक्रम शाळेत झाला. इथले माजी प्राचार्य वरिष्ठ तरुण आहेत- अजूनही फिट आहेत. गंमत म्हणजे ह्या शाळेची स्थापना १९२९ मध्ये कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे कराचीत झाली होती! फाळणी व स्वातंत्र्यानंतर ही संस्था मुंबईत बांद्र्याला व कुडाळला आली.

२३ सप्टेंबरचा दिवस कुडाळमध्ये गेला. रात्रभराच्या प्रवासानंतर वॉर्म अप राईडच्या नादात जरा जास्तच मोठी राईड केल्यामुळे किंचित थकल्यासारखं वाटत होतं. पण काय मस्त राईड झाली होती ती! आणि नंतर सायकलिस्टस व शाळेतली भेटही मस्त झाली. रात्रीपर्यंत फ्रेश वाटलं. वैद्य दामलेंच्या पाळलेल्या मांजरी आणि त्यांच्या आयुर्वेदाबद्दलच्या टिप्स विशेष भावल्या. उद्यापासून राईड सुरू होईल! उद्या वाटेत बांद्याच्या शाळेत भेट आणि नंतर बिचोलीमध्ये मुक्काम असेल.

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७० किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! माझा ब्लॉग: http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/cycling-in-4-states-on-singl... ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

Group content visibility: 
Use group defaults