घसरलेल्या स्ट्रॅपची गोष्ट

Submitted by Barcelona on 2 October, 2022 - 10:38
Madame X Original painting.

“कसं काय हे चित्र ‘सलोन’ मध्ये निवडलं गेलं?!”

एकाही जाणकाराच्या तोंडून ह्या चित्राबद्दल चांगलं काही निघेना. पॅरिसच्या ‘सलोन’ प्रदर्शनात दरवर्षी हजारो चित्रे येत आणि समितीच्या कठोर परीक्षणानंतर फार थोडी चित्रे प्रदर्शनात दाखवली जात. ‘सलोन’ मध्ये आपले चित्र निवडले जावे म्हणून प्रत्येक चित्रकार धडपडत असे. मग इतक्या स्पर्धेत ‘असंल’ चित्र आलंच कसं?? ट्रॅश!!

इतकं काय वावगं होत त्या चित्रात?

चित्रातील सुंदरीच्या केसात चंद्रकोर होती - डायना देवतेचं प्रतीक. शिकारीच्या शोधात डायना आणि तशीच मान उंचावून सावज शोधणारी ही. उच्चवर्गीय स्त्रियांनी लॅव्हेंडर पावडर लावणे समाजमान्य होते पण म्हणून असं पोर्ट्रेटसाठी अशी रंगरंगोटी, छे, काहीतरीच! काळ्या ड्रेसच्या गळ्याची खोली बघणाऱ्याच्या नजरेला आत अंतर्वस्त्र असावं की नसावं याची उचापत करायला भाग पाडणारी. ज्या टेबलाला रेलून ती उभी त्याच्या पायावर जलकन्या कोरल्या होत्या… जलकन्या ज्या मनुष्याला भुलवून समुद्रात खेचून नेत. सगळंच उच्छृंखल ..

पण सगळ्यात कहर - तिच्या ड्रेसचे खड्यांचे स्ट्रॅप्स. डाव्या खांद्यावरचा पट्टा जागेवर होता पण उजव्या खांद्यावरचा पट्टा जरा घसरलाच नि वाकीच्या जागी जाऊन तो अलगद विसावला. १८८४ साली सलोनला ‘न्यूड’ पेंटींग्सचे ही वावडं नव्हते. मग हे इतकं वादग्रस्त का ठरलं? हिला निरखून पाहिलं तर तिच्या डाव्या अनामिकेत अंगठी होती म्हणजे विवाहीत… आणि तरी असं मोकळं-ढाकळ चित्र .. खळबळ उडाली तर दोष कुणाचा.

ते चित्र काढलं होतं जॉन सिंगर सार्जंटने आणि मॉडेल होती मॅडम व्हर्जिनी एमिली एव्हीग्नो गॅतरो. सगळे तिला एमिलीच म्हणायचे.

एमिली मूळची अमेरिकन पण वडील वारल्यावर लहानग्या एमिलीसह आई पॅरिसला गेली. एमिली मोठी होऊ लागली तशी पॅरिसमध्ये तिच्याबद्दल चर्चा होऊ लागली. नितळ कांती, नाजूक कंबर यांची मोहीनी कमी म्हणून का काय एमिली केस आणि भुवया मेंदीने रंगवत असे. तिच्या ह्या स्टायलिश वावरामुळे तिला तत्कालीन संकेतांनुसार “प्रोफेशनल ब्यूटी” म्हणून गौरवले जायचे.

पीअर गॅतरो बँकर होता आणि त्याचा निर्यातीचा (शिपींग) व्यवसायही होता. वयाने मोठा असला तरी एमिलीसारख्या रूपसुंदरीला त्या काळात हे अनुरूप स्थळ होते. एमिली आणि पीअरचे लग्न झाल्यावर तिचा उच्चभ्रू समाजात वावर वाढला. टॅब्लॉईडस की माने तो ती पतीशी एकनिष्ठ नव्हती. पण अशा बातम्यांमुळे तिच्या सौंदार्याच्या चर्चा आणि तिच्याविषयीचे कुतूहल अधिकच वाढले.

फोटोग्राफीचा शोध लागला होता पण तरी फार प्रचलित नव्हती. धनाढ्य मंडळी कलाकारांना बोलवून व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) काढायचे कंत्राट देत असत. एमिलीचे पोर्ट्रेट काढायला मिळावे म्हणून नवोदित कलाकार धडपड करत. काहीजण तिचा छुपा पाठलाग करत मात्र जॉनने वेगळीच शक्कल लढवली. पॅरिसमधील धनाढ्य स्त्रियांची उत्तम चित्रे काढल्यामुळे जॉनचे पॅरिसमध्ये नाव होते. जॉनने नुकतेच डॉक्टर पॉझीचे पोट्रेट काढले होते, जे अतिशय प्रेक्षणीय ठरले होते. जॉनने डॉक्टर पॉझी मार्फत एमिलीला चित्रासाठी गळ घातली. एरवी अशा चित्रांचे कंत्राट ठरत असले तरी इथे मात्र चित्र तयार झाल्यावर विकत घ्यायचे असा काही बोली व्यवहार ठरला.

सामान्यपणे चित्रकार आपल्या मॉडेलची आधी विविध स्केचेस तयार करत व नंतर जे उत्तम वाटेल तशा पोझमध्ये मोठे पोर्ट्रेट तयार करत. एमिलीला नेहमी कधी पार्टीला, कधी बागेत फिरायला लोकांची आमंत्रणे असत. शिवाय तिची मुलगीही लहानच होती. त्यामुळे चित्रात हवी तशी प्रगती होत नव्हती आणि जॉनची अस्वस्थता वाढू लागली. हिचं चित्र कुठल्या पोझ मध्ये काढावं? त्यात पीअर आणि एमिली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ब्रिटनीला जाणार होते. एमिलीने त्याला ब्रिटनीला चित्र पूर्ण करू म्हणून ब्रिटनीला यायचं सुचवले.

ब्रिटनीत मात्र एमिलीला जरा मोकळा वेळ होता. एक दिवस अशीच ती दिवसाच आपला काळा इव्हनिंग ड्रेस घालून इकडे-तिकडे करत होती आणि अचानक टेबलाला रेलून जॉनशी बोलू लागली. तशी जॉनला हवी ती पोझ सापडली. त्याने त्या पोझ मध्ये तिचे अजून काही स्केचेस केले आणि पोर्ट्रेटचे काम सुरु झाले.

सलोनच्या नियमानुसार आदल्या वर्षी ज्या चित्रकारांना नावाजले गेले असेल त्यांना पुन्हा समितीच्या परिक्षणाला सामोरे जावे लागत नसे. जॉनच्या ‘पोर्ट्रेत दे इफांतें’ चित्राला बक्षीस मिळालं असल्याने त्याला हवे ते चित्र देता येणार होते. जॉनने लक्ष वेधले जाईल असे साडेसात फुटी उंच कॅनव्हास घेतले व त्यावर काळ्या ड्रेस मधली एमिली रंगवली. तिच्या ड्रेसचा घसरलेला स्ट्रॅप त्याने तसाच रंगवला आणि चित्राला नाव दिले “पोर्ट्रेट ऑफ मॅडम **”

पण जॉन उत्तम कलाकार होता! साधर्म्यामुळे चित्र प्रदर्शनात जाताच मॅडम ** कोण हे अख्ख्या पॅरिसला ठाऊक झालं. काळाच्यामानाने चित्र उथळ होतं त्यामुळे टॅब्लॉईडसच्या वावड्याना जणू पुष्टीच मिळाली. The burden of modesty is always on women. त्यामुळे मरण बरे म्हणावे इतकी निंदा एमिलीच्या वाटयाला आली.

नामवंत कलाकारांनी जॉनवर टीकास्त्र डागले. ती कशीही असली तरी उच्चवर्गीय महिला होती. तिचे असे भडक, उथळ, कॅरीकेचर वाटावे असे चित्र काढणे हे जॉन सारख्या कलाकाराला अशोभनीय होते. दोघांच्या वाटयाला जनक्षोभाखेरीज काहीच आले नाही. एमिलीची आई जॉनला भेटली आणि चित्र काढून टाकावे किंवा पुन्हा रंगवावे म्हणून तिने थोडेफार प्रयत्न केले. पण...

जॉनने सलोन प्रदर्शन संपेपर्यंत चित्र तसेच ठेवले!

झाल्या प्रकरणानंतर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी एमिलीला एक-दोन वर्ष जणू अज्ञातवासच पत्करावा लागला. नंतर इतर नामांकित चित्रकारांकडून अजून दोन-तीन चित्रे तयार करून घेतली. ती सुद्धा थोडीफार गाजली पण एकूणात तिला लोकांच्या बोलण्याचा फार सामना करावा लागला. पुढे त्यावेळच्या रितीनुसार चाळीशीत तिचे सोशल लाईफ कमीच झाले आणि वयाच्या ५६ व्या वर्षी म्हणजे प्रकरणाच्या जवळपास तीस वर्षाने ती वारली.

जॉनचे करियर ह्या प्रकरणाने जणू संपलेच. गॅतरो कुटुंबाने चित्र विकत घेण्यास नकार दिलाच आणि वर पॅरिस मध्ये कुणी त्याला पोर्ट्रेटचे कंत्राट देईनासे झाले. पैसे घेऊन जर ह्याने असे चित्र रंगवले तर… शेवटी पॅरिस सोडणे भाग पडले. जॉन लंडनला स्थायिक झाला. वर्षा-दोनवर्षानंतर लोक हे प्रकरण विसरायला लागले आणि लंडनला त्याचा व्यवसाय भरभराटीस आला.

लंडनला येण्यापूर्वी मात्र त्याने चित्रात घसरलेला स्ट्रॅप पुन्हा रंगवून खांद्यावर नेला. झाल्या प्रकाराने धडा घेऊन त्याने परत कधीच असे धाडसी चित्र रंगवले नाही. हे सुधारीत मॅडम एक्स पेंटींग त्याने आपल्या स्टुडीओत मोठ्या दिमाखात ठेवले होते. ‘हे माझे सर्वात सुंदर चित्र आहे’ असे तो बोलूनही दाखवत असे. मात्र एमिली जिवंत असेपर्यंत त्याने ते चित्र आपल्या स्टुडियोबाहेर जाऊ दिले नाही.

RepaintedMadameX.png

एमिली वारल्यावर जॉनने हे चित्र युरोपभर अनेक जागी प्रदर्शनात ठेवले. पुढे चित्र जेव्हा सॅन फ्रान्सिकोत आले तेव्हा न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम बरोबर व्यवहार करून जॉनने ह्या पेंटींगला एक कायमचे घर दिले. आजही हे चित्र तिथे बघता येते. त्या काळात एक हजार पौंड म्हणजे आजच्या भाषेत साधारण एखाद्या टेस्ला मॉडेल एक्स इतक्या किमतीला विकलं गेलं.

जितकी जॉनला कलाकार म्हणून स्वतःच्या हक्काची जाणीव होती तितकीच त्याला तिच्या घरच्यांना सोसावे लागू नये म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव होती. त्याने चित्र विकताना अट घातली की चित्राचे नाव “मॅडम एक्स”च राहू द्यावे. म्युझियमने ते मान्य केले. जमाना सोशल मिडीयाचा नव्हता त्यामुळे या चित्रमागची गोष्ट अमेरिकेत बराच काळ अचर्चित राहीली.

पुढे स्थळ, काळ, माणसं, आणि त्यांच्या जाणिवा बदलत गेल्या तशा “ट्रॅश”च्या व्याख्याही बदलत गेल्या. “स्ट्रॅप तर घसरला, त्यात काय एवढं मोठं!” इतपत खुल्या विचाराचे जनमानस होऊ लागले तशी म्युझियम मध्ये, आर्ट हिस्ट्रीच्या वर्गात ह्या चित्राबद्दल अधिक चर्चा होऊ लागली. आता ‘अमेरिकन मोनालिसा’ म्हणून ह्या चित्राला क्वचित गौरवले ही जाते, तर काहींना आजही हे चित्र आवडत नाही.

एमिलीच्या काळ्या ड्रेसला फारसे नावाजले गेले नाही तरी कालांतराने खड्यांचे पट्टे असलेला काळा ड्रेस मात्र फॅशन जगतात लोकप्रिय झाला. अगदी सध्याच्या काळातही मोठे फॅशन डिझायनर्स त्याच काळ्या ड्रेसच्या आवृत्त्या डिझाईन करताना आढळतात आणि नायिका रेड कार्पेटवर तो मिरवताना दिसतात.

या घटनेला जवळपास दिडशे वर्ष होतील… असं वाटेल काळ किती बदलला… पण…

लवकरच दिवाळी ते नाताळ हॉलिडे सीझन सुरु होईल. पुन्हा कला-नाट्य इ विविध कार्यक्रमांसाठी कलाकारांची लगबग सुरु होईल. घसरलेला स्ट्रॅप जणू मेटॅफर ठरेल. सुंदर पण तरी त्याज्य, सुरेख पण इतरांना न पटलेलं, समाजाला ‘घसरलेलं’ वाटेल असं काहीही - कधी नटीची वेशभूषा, कधी एखादे पुस्तक, कधी एखाद्या नाटकाचा आशय, कधी एखाद्या कार्यक्रमाचे नाव - ‘घसरलेलं’ सारं पुन्हा एकदा चर्चेस येईल…

मेरे दोस्तो, तुम करो फैसला, खता किसकी है, किसको दे हम सजा.. Happy

संदर्भ:

चित्रे साभारः फॉर लव्ह अँड आर्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Vaave+1

सर्वांना धन्यवाद!
राम तेरी गंगा एमिली हो गयी >> Happy मला जरा जुने 'मेरे दोस्तो' आठवले पण राम तेरी जास्त चपखल आहे कदाचित.

खूप रोचक माहिती.ड्रेस सुंदर आहेच.
न्यूड पेंटिंग चालत असलेल्या काळात खरं तर घसरलेल्या strap चा इतका बाऊ व्हायची गरज नव्हती.

मस्त! नेहमीप्रमाणे वेगळी आणि रोचक गोष्ट!...
+१.

वाचता वाचता बऱ्याचवेळा ते चित्र पाहिले.घसरलेला strap जास्त नैसर्गिक वाटतो.कालाय तस्मै नमः!

वेगळी, माहीत नसलेली गोष्ट.
समाजनियम आणि कधी कशाचा बाउ होईल सांगता येत नाही. उच्चभ्रू वर्गातील आणि विवाहित ह्या 2 गोष्टींना जास्त महत्त्व दिले असणार टीकाकारांनी

नेहमीसारखाच वेगळा विषय आणि छान लेखन !!

न्यूड पेंटिंग चालत असलेल्या काळात खरं तर घसरलेल्या strap चा इतका बाऊ व्हायची गरज नव्हती. >>>+१

नवीन काहीतरी महिती देणारा छान लेख. "हे इतकं वादग्रस्त का ठरलं?... निरखून पाहिलं तर तिच्या डाव्या अनामिकेत अंगठी होती म्हणजे विवाहीत… आणि तरी असं मोकळं-ढाकळ चित्र" ओह्ह! किती अतिविचार करत होते ना तेंव्हाचे लोक. ती इवलूशी अंगठी तिथे नसती तर कदाचित या चित्राचा इतिहास वेगळा असता.

>> राम तेरी गंगा एमिली हो गयी
वाह! अगदी मार्मिक Happy Happy

योगायोगाने साधारणपणे त्याच काळात आपल्याकडे राजा रविवर्म्याने सुद्धा अगदी अशीच चित्रे काढली होती व ती सुद्धा वादग्रस्त ठरली होती. कलाकार, कलाकृती आणि वादग्रस्तता हा सिलसिला शेकडो वर्षांपासून सुरु आहे म्हणायचा!

असो! नाविन्यपूर्ण काहीतरी सांगितलेत याबद्दल धन्यवाद.

जितकी जॉनला कलाकार म्हणून स्वतःच्या हक्काची जाणीव होती तितकीच त्याला तिच्या घरच्यांना सोसावे लागू नये म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव होती. >>>> हे फार आवडले.
मला उच्छृंखल व वाटता सेन्शुअल वाटले. कलेच्या आविष्कारात मादकता(sexual) व शृंगार(sensual) या दोहोंमधे 'शृंगार'ही अभिव्यक्ती अधिक कठीण, सटल तरीही अंडररेटेड असते असे मला तरी वाटते. खरंतर कौतुक व्हायला हवं होतं. ते जलकन्या, अनामिकेतली अंगठी व घसरलेला स्ट्रॅप हे सगळं कॅल्क्युलेटेड नसून जॉनने पकडलेला एक पर्फेक्ट क्षण असावा असं वाटलं. कलेच्या बाबतीत सगळे चूक-बरोबर हे कालसापेक्ष असते म्हणून दोघांवरही अन्याय झाला. हे फक्त चित्रापुरतं नव्हतंच !!
लेख आवडला, केट ब्लँचेटची लिंकही वाचली. डॉ पॉझी त्याकाळातला रणवीर सिंह वाटला.

----------
देवकी तै, झकासराव आणि अतुल यांना मम !
>> राम तेरी गंगा एमिली हो गयी
वाह! अगदी मार्मिक >>>+१

अनामिकेतली अंगठी व घसरलेला स्ट्रॅप हे सगळं कॅल्क्युलेटेड नसून जॉनने पकडलेला एक पर्फेक्ट क्षण..... अगदी अगदी झाले ग अस्मिता!..... अर्थात अंगठी वगैरे दिसली नाही,पण बाकी एकदम पटले.

सर्व प्रतिसादकांचे आभार! हा सारांश अगदी पटला - "कलाकार, कलाकृती आणि वादग्रस्तता हा सिलसिला शेकडो वर्षांपासून सुरु आहे म्हणायचा!"