टर्किश अदाना कबाब

Submitted by maitreyee on 17 September, 2022 - 14:15
Tarkish kabab
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खीमा/ ग्राऊंड चिकन १ पाउंड. - खीमा स्पेशली आणला जातो असे नाही, मी तरी नॉर्मल ब्रेस्ट मीट फूड प्रोसेसर किंवा चॉपर मधून ग्राइंड करून घेते.
लसूण १२-१३ पाकळ्या, आले २ इन्च, कांदा १ , स्वीट रेड पेपर्स / लाल आणि हिरवी सिमला मिरची प्रत्येकी १, हिरव्या मिरच्या ४-५ किंवा/ आणि रेड चिली फ्लेक्स १ ते दीड चमचा,
मसाला - काळी मिरी पावडर + धणे जिरे पावडर, आवडीचा गरम मसाला, टिक्का मसला वगैरे
फ्लेवरिंग साठी आवडीचे अर्ब्स - कोथिंबीर, किंवा पार्सली किंवा कोवळी शेपूची पानं , पुदिना वगैरे आवडीनुसार

क्रमवार पाककृती: 

टर्किश अदाना कबाब हे साधारण आपल्याकडे सीख/ शीग कबाब असतात त्याच्या जवळपास जातात. चव आणि टेक्स्चर मात्र मला तरी वेगळे वाटते. अदाना कबाब हे नाव टर्की मधील अदाना या शहरावरून आले आहे. ( नक्की उच्चार अदाना आहे की अडाना की आणखी काही ते माहित नाही) हे कबाब एकदम ज्यूसी, लुसलुशीत आणि चविष्ट लागतात. स्टार्टर किंवा मेन कोर्स म्हणूनही खाता येतात.
यात लँब, बीफ, चिकन असे कोणतेही मीट वापरतात पण मी चिकन वापरलेय.
रेसिपी सोपी आहे तशी, आणि वर्सटाइल आहे, कारण एक मीट सोडल्यास बाकी एखादा घटक पदार्थ नसेल तर दुसरे बरेच पर्याय आहेत बदल करायला. प्रथम फूड प्रोसेसर मधे लसूण , आले, मिरच्या, बारीक करून घेणे. (मिक्सर नव्हे) इथे पेस्ट न करता जरा जाडसर भरड मिश्रण अपेक्षित आहे. मिरची , आले लसणाचे बारीक तुकडे खाताना मस्त स्वाद आणतात. तसेच हेही लक्षात असावे की आले लसणाचे प्रमाण जरा जास्तच सढळ असू द्यावे. हे मिश्रण बाजूस ठेवून कांदा आणि लाल -हिरव्या रंगीत मिर्च्याही फूड प्रोसेसर मधे बारीक चॉप करून घ्या. रंगीत मिर्च्यांमुळे कबाबांना फार मस्त स्वाद येतो. या मिश्रणाला पाणी सुटते त्यामुळे वेगळे ठेवून काही मिनिटांनी नीट दाबून जाळी / गाळण्याने पाणी बाजूला काढून घ्या. मिश्रण ओले , पातळ झाले तर कबाब नीट होणार नाहीत.
खीमा / ग्राउंड मीट मध्ये आले -लसुण मिश्रण, कादे , रंगीत मिरच्यांचे मिश्रण घाला. आता वरून मसाला, फ्रेश अर्ब्ज आणि मीठ घालायचे. यात बरेच पर्याय आहेत, नेट वरच्या रेसिपीज मोस्टली पार्सली , मिरी, जिरा पावडर, सुमॅ़क, रेड चिली फ्लेक्स असे सांगतात. काही ठिकाणी झतार मसाला, शेपूची पाने असेही दिसले. आपण आपल्या आवडीप्रमाणे , चवीनुसार गरम मसाला + धणे जिरे पावडर + लाल तिखट+ आमचूर पावडर असेही वापरू शकतो. मी पहिल्यांदा केले तेव्हा पार्सली, मिरी, जिरे पावडर आणि चिली फ्लेक्स वापरले होते. दुसर्‍यांदा केले तेव्हा घरातल्यांच्या फर्माइशीनुसार कोथिंबीर, धणे जिरे पावडर, गरम मसाला घातला.
हे सर्व मिश्रण हाताने नीट कालवून घ्या. यात अजून कोणताही बाइंडिंग एजन्ट घालत नाहीत (इतर कबाब रेसिपीज मधे बेसन, तत्सम पिठ, ब्रेडक्र्म्स किंवा अंडे वगैरे घालतात तसे इथे काहीही नाही ) आणि त्यामुळेच या कबाब चे टेक्स्चर लुसलुशीत होते. आकार देता येण्यासाठी मिश्रण थोडा वेळ फ्रीज मधे ठेवा, म्हणजे ते जरासे घट्ट होते आणि नीट आकार देता येतो.
अर्ध्या तासाने मिश्रण बाहेर काढून घ्यावे. हाताला तेल लावून मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून ते चपट्या स्क्यूअर वर मधोमध खुपसून सर्व बाजूने हलक्या हाताने दाबत लांबट करत जायचे. तुमच्याकडे चपटी स्क्यूअर नसेल किंवा स्क्यूअर चा आकार तव्याच्या मानाने हवा तेवढा नसेल तर ३-४ लाकडी बार्बेक्यू स्टिक्स एकत्र करून त्यावर अ‍ॅल्युमिनियम फॉइल घट्ट गुंडाळून डीआय वाय स्क्यूअर सहज बनवता येते.
skewer.jpg
अंगठ्याने हळू दाबून दोन्ही बाजूने कबाब चा चपटा आकार करून घ्यावा. स्क्यूअर ला चारी बाजूने एकसारख्या जाडीचा थर आला पाहिजे. हे वाचायला ट्रीकी वाटले तरी करायला अजिबात अवघड नाही. हे कबाब आता जाड तव्यावर किंवा कोळश्याच्या ग्रिल मधे सर्व बाजूने शिजेपर्यन्त किंचित तेल शिंपडून मध्यम आचेवर भाजून घ्या.मी दोन्ही वेळा घरात जाड नॉन स्टिक चा गॅस टॉप ग्रिडल आहे त्यावर भाजले.
skewer2.jpg
त्याला तेल अगदी कमी लागते. कोळ्श्याच्या ग्रिल वर फ्लेवर अजून छान येईल. एका वेळी मी ४-५ स्टिक्स या तव्यावर ठेवल्या आणि सर्व बाजूने नीट भाजल्या. या तव्याला अजिबात चिकटत नाहीत. चिकन शिजत जाते तसे आपोआप सुटून येतात कबाब .एक घाणा साधारण ५-६ मिनिटात होतो . पेपर टॉवेल किंवा फोर्क वापरून ने अलगद स्टिक वरून सरकवून कबाब काढून घ्यायचा.
खाण्याची पद्धत - नुसते, पुदिना , कोथिंबीर चटणी, काकडी टोमॅटो सोबत खा किंवा टर्किश पद्धतीच्या लवाश ब्रेड मधे( साधारण पातळ नान सारखा) उभा चिरलेला कांदा, काकडीचे काप, कोथिंबीर, चाट मसालाइ. सोबत कबाब गुंडाळून गरम गरम खा. किंवा मग साधा जिरा राइस आणि रायता सोबत घेऊन खा.
kabab1.jpg

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात साधारण १०- १२ स्टिक्स - ४ लोकांना भरपूर झाले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

Wow! हे खूप आवडतात. इतकं लुसलुशीत चिकन कसं होतं कायम प्रश्न पडे. मस्त दिसताहेत!
हे नेहमी केशर घातलेल्या बासमती भात + कांदा, काकडी, टोमॅटो असच खाल्लं आहे.
वरचा फोटो बघून हे गीरो सारखे ग्रीक च्युई पीटा मध्ये गुंडाळून तझिकी (त्यात शेपू असतोच) बरोबर पण छान लागतील वाटलं. बरोबर पिवळा भात, ग्रीक सलाड आणि तळलेल्या चपट्या बटाटा वेजेस.

भाहारीही!
खूप आवडतात हे, आता करून पाहायचा धीर करेन. Happy

मस्तच! हा प्रकार फार आवडतो मात्र आताशा खाऊगिरीसाठी मुद्दाम शहरात जाणे फारसे होत नाही, तेव्हा नक्की करणार.

किती यम्मी दिसत आहेत हे कबाब! एकदा मायक्रो मधे ग्रील ऑप्शन वर केले होते पण खूप कोरडेच लागत होते. अशी ग्रील पॅन आणुन त्यावर करून बघायला हवेत!

हो ओवन मधे ड्राय होतील असे वाटते. गॅस टॉप तव्यावर हा सगळ्यात सोपा ऑप्शन वाटला मला. कोळश्याच्या ग्रिल वर पण चांगले होतील असे वाटते.
अमित- बरोबर, सॅफ्रॉन राइस चांगला लागेल जिरा राइस पेक्षा.
थॅन्क्स सगळ्यांना.

कोळश्याच्या ग्रिल वर पण चांगले होतील असे वाटते. >> हो त्यावर भन्नाट होतात ब्राऊनिंग झाले कि. पण तू म्हणालीस तरी घारतल्या घरात करायचे असतील तर हा प्रकार अधिक सोपा पडतो.

अमित- हो , १) चपटी स्क्यूअर वापरायची. २) कांद्यातलं पाणी पिळून काढायाचे आणि ३) मिक्स्चर तयर केल्यावर जरा वेळ ( अर्धा /१ तास)साध्या फ्रीझ मधे ठेवायचं. इतके केले की अगदी सहज शेप देता येतो स्क्यूअर वर. काहीच अवघड नाही.