ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

Submitted by निमिष_सोनार on 11 September, 2022 - 02:39

ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल. आतापर्यंत भारतात सुपरहिरो असलेले अनेक चित्रपट येऊन गेले जसे भावेश जोशी, क्रिश, रा वन, फ्लाईंग जट्ट वगैरे. मुकेश खन्नापण आता शक्तिमानला भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.

तर परीक्षण सुरु करण्याआधी मी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे पूर्वग्रह बाजूला सारून (जसे आलिया भट्ट कोणत्यातरी एका मुलाखतीत काय म्हणाली होती, ती कोणाची मुलगी आहे, तिचे वडील स्वभावाने कसे आहेत, आणि अमका कलाकार काय म्हणाला होता आणि तमक्या कलाकाराने अमक्या वर्षांपूर्वी काय केले होते, या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे) तसेच सध्या प्रत्येक चित्रपटांत घुसलेले राजकारण हे सगळे बाजूला ठेऊन मी हा रिव्ह्यू केला आहे. एक सामान्य सिनेमा प्रेक्षक आणि रसिक या एकमेव नात्याने मी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याच नात्याने या चित्रपटाचे परीक्षण करत आहे आणि जे लोक फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा बघायला जातात त्यांच्याचसाठी हा रिव्ह्यू आहे! प्रत्येक चित्रपटाचे राजकारणच करायचे असे मनाशी ठरवून तो जर पाहिला गेला तर त्यात काही ना काही असे ओढून ताणून सापडतेच ज्याचा राजकारणाशी संबंध जोडता येईल.

हां, मात्र जेव्हा चित्रपटाची कथाच मुळात एखाद्या घडून गेलेल्या राजकीय घटनेवर आधारित असते ती गोष्टच वेगळी असते. तेव्हा तर चित्रपटात राजकारण कथेद्वारे आधीच घुसलेले असते. (उदाहरणार्थ धर्मवीर). तेव्हा राजकारण करत बसायला चांगला वाव असतो. त्यावेळेस चित्रपटाचे पूर्णपणे राजकारण झालेले असते.

सध्या बॉलीवूडवर टीका होते आहे की, बॉलीवूड फक्त रिमेक बनवत आहे (दो बारा, विक्रम वेधा, कट्टपुत्तली, मुळशी पॅटर्नचा रिमेक "अंतिम" वगैरे). परंतु, जेव्हा ओरिजनल बनवले जाते तेव्हासुद्धा टीकाच होते हे समजण्यापलीकडचे आहे. हॉलीवूडच्या "अवेंजर्स" सीरीजमधल्या सगळ्या चित्रपटात, विज्ञानाच्या नावाखाली अनेक अशक्य (अक्षरशः जादू वाटणाऱ्या) गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या आपण सहजपणे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणून खपवून घेतो. आणि इथे भारतात जेव्हा ओरिजिनल काहीतरी कोणीतरी बनवायला जातं तेव्हा त्यात भारतीय प्रेक्षक सतराशे साठ चुका काढतो. हे बरोबर नाही. हॉलिवूड मारव्हल अवेंजर्सचे सगळेच 27/28 चित्रपट भारतीय लोक बघतात (त्यातील काही तर अगदीच सुमार आहेत), परंतु भारतात एखादा चांगला नवीन ओरिजिनल प्रयोग सुरू झाला, त्यावर मात्र विनाकारण टीका करतो.

तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात जागतिक दर्जाचे हॉलिवुडच्या तोडीचे VFX (स्पेशल इफेक्ट्स) आहेत. याची कथा पूर्ण ओरिजिनल आहे. काहीजण लगेच याची तुलना हॉलिवुड अवेंजर्सशी करायला लागले, त्यांचे कन्सेप्ट कॉपी केले असे म्हणायला लागले आहेत पण तसे नाही आहे. खरे पाहिले तर ते लोक पण आपल्या (आणि ग्रीक, रोमन गॉड) पौराणिक कथांवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असतात. जसे हनुमानाची गदा आणि थॉरचा हातोडा, आपला उडणारा हनुमान आणि त्यांचा उडणारा सुपरमॅन, लहान आणि मोठा आकार धारण करू शकणारा हनुमान आणि याचीच कॉपी असलेला राग आल्यावर आकार मोठा होणारा हल्क अशी अनेक उदाहरणे देता येतील.

पण काय झाले की, त्यांच्या कथा कल्पनांना पडद्यावर मूर्त रूप देण्यासाठी जे VFX तंत्रज्ञान लागते ते त्यांच्याकडे आधी आले आणि आपल्याकडे फार उशिरा आले. (क्रिश1 ने परदेशी तंत्रज्ञ वापरले होते मात्र क्रिश3 आणि रा वन ला शाहरुखच्या भारतीय कंपनीने स्पेशल इफेक्ट दिले होते. रा वन मधला मुंबई लोकल ट्रेनचा थरारक सिन ज्यात CST स्टेशन इमारत ढासळतांना दाखवली आहे तसेच क्रिश3 मध्ये शेवटी मुंबईतील इमारती कोसळत असताना स्ट्रॉलरमधल्या लहान बाळाला क्रिश कसे वाचवतो ते आठवा!)

ब्रम्हास्रला ऑस्कर विजेत्या टीम ने VFX दिले आहेत. यातही असाच एक लहान मुलाचा थरारक सिन आहे जो इंटरव्हल नंतर लगेच येतो त्या पण त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही कारण चित्रपटातील अनेक पैकी एक रहस्य उलगडले जाईल जे चित्रपट बघायला जाण्याआधी माहिती असणे योग्य नाही. (जसे गुप्त मध्ये काजोल खुनी आहे हे आधीच माहीत पडले तर चित्रपट बघण्यात अर्थ रहात नाही)

ब्रह्मास्त्रची स्टोरी अयान मुखर्जीने लिहिली आहे. चित्रपटात एकूण नऊ अस्त्रांचा यांचा उल्लेख आहे. सर्व अस्त्रांची प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मास्त्र. प्राचीन काळापासून ब्रह्मास्त्रचे रक्षण करणारी एक टीम आहे ज्यांना ब्रह्मांश म्हणतात. चित्रपटाची कथा सध्याच्या काळात घडते.

सध्या त्या ब्रह्मास्त्रचे तीन तुकडे झाले आहेत. ते तुकडे का झालेत याची एक मोठी कथा आहे ती इथे सांगत नाही. त्या कथेचा संबंध रणवीर कपूरच्या म्हणजे शिवाच्या आईवडिलांशी आहे, ती कथा अमिताभ (ब्रह्मांशचा गुरु) आपल्याला थोडक्यात सांगतो परंतु या चित्रपटाच्या पुढच्या भागात कदाचित शिवाच्या आई वडिलांची पूर्ण कथा सांगण्यात येईल. रणबिर कपूर स्वतः सुद्धा एक अस्त्र आहे अग्निअस्त्र. मात्र त्याची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी त्याच्या जीवनात आलिया भट यावी लागते. ब्रह्मास्त्रचे दोन तुकडे दोन जणांकडे सुरक्षित आहेत. एक तुकडा मुंबईत राहणाऱ्या सायंटिस्ट मोहन भार्गव (शाहरुख खान) यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच मोहन यांचेकडून जुनून नावाची एक विलन आपल्या दोन साथीदारांसह (जोश आणि रफ्तार) तो तुकडा चोरते आणि इतर दोन तुकडे कुठे आहेत तसेच ब्रह्मांश टीम चा आश्रम कुठे आहे याबद्दल मोहन यांना बंदी बनवून विचारते. ते पूर्ण माहिती सांगत नाहीत आणि इमारतीचे टेरेसवरून उडी मारतात. दुसरा तुकडा असतो नागार्जुन म्हणजे एक आर्टिस्ट जे वाराणसीत राहत असतात त्यांच्याकडे! तिसरा तुकडा कुणाकडे असतो हे सुज्ञ वाचक येथे ओळखू शकतात पण तो ज्याच्याकडे असतो त्याला ते माहिती नसते, त्याला ते कसे माहिती पडते आणि तो तुकडा कशाच्या स्वरूपात असतो ते बघणे खूप मनोरंजक आहे.

शाहरुखच्या घरी घडलेले सगळे रणवीरला आपोआप स्वप्नात दिसत राहते. जुनून (मौनी रॉय) आणि तिची दोन साथीदार वाराणसीत नागार्जुनच्या मागे लागतात त्यांना वाचवण्यासाठी रणवीर आणि आलिया भट वाराणसी पोहोचतात. मोहन यांच्याकडे वानर अस्त्र असते तर नागार्जुन याच्याकडे नंदी अस्त्र असते. या चित्रपटात हे अस्त्र जेव्हा जागृत होतात तेव्हा ते फक्त मूळ व्यक्तीच्या पाठीमागे अंधुक स्वरूपात दिसत राहतात मूळ व्यक्ती त्या अस्त्राच्या रूपात ट्रान्सफॉर्म होत नाही. हा एक युनिक कन्सेप्ट आहे आणि ओरिजनल आहे. बरेच जण म्हणतात की हा नुसता लेझर शो आहे परंतु ते खरे नाही. चित्रपट आणि त्यामागचा कन्सेप्ट पूर्णपणे नीट समजून न घेता अनेक लोक या चित्रपटावर टीका करत सुटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांचे कलेक्शन बघता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. असो.

जेव्हा जेव्हा ते अस्त्र जागृत होतात तेव्हा पडद्यावर भव्य दिव्य स्पेशल इफेक्ट आपले डोळे दिपवून टाकतात. तसेच हिमाचल प्रदेशातील पहाडी रस्त्यांवर कारचा थरारक पाठलाग असलेला जो सिन आहे तो तर हॉलीवुडच्याही कुठल्या चित्रपटाला लाजवेल असा आहे. तसेच वाराणसीतील शिव मंदिरातील जूनून टीम आणि रणबीर आलिया नागार्जुन यांच्यातील भव्य दिव्य फाईट सीन, बाप रे!

हे तर फक्त इंटरवल पर्यंत झाले. चित्रपट मोठा आहे. जवळपास तीन तासांचा!!

सेकंड हाफ मध्ये ब्रह्मांशचे रक्षक असलेली टीम जिथे राहते तो आश्रम दाखवला गेलेला आहे. त्याबद्दल वापरलेली कल्पनाशक्ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. सेकंड हाफ मध्ये अमिताभची एन्ट्री होते. त्यानंतर ही बरीच कथा बाकी आहे आणि खूप गोष्टी घडतात. खूप नवी रहस्ये कळतात. चित्रपटाच्या शेवटी तर भरपूर अग्नी म्हणजे आगीने भरलेले VFX आहेत. नंतर अनेक अस्त्रांची ओळख होते जसे धनुष नाग अस्त्र, बर्फ अस्त्र, पवन अस्त्र, जल अस्त्र, प्रभा अस्त्र (प्रकाश असलेले अस्त्र) आहेत. अर्थात या सगळ्याच अस्त्रांचे धारक आणि त्यांचे उपयोग या पहिल्या चित्रपटात दाखवलेले नाहीत ते कदाचित पुढच्या दोन चित्रपटांमध्ये नीट दिसून येतील.

रणवीर कपूर आणि आलिया भटचे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्टने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते. थ्रीडी मध्ये तर आणखी तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते. या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूपच छान आहे. कार पाठलाग सिनच्या वेळेस असलेले बॅकग्राऊंड म्युझिक आणखी थ्रिलिंग एलिमेंट ऍड करते.

या चित्रपटातील शेवटी आपल्याला पुढील भागाची कथा काय असेल याचा अंदाज दिग्दर्शक देतो. एकूणच एक भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट बघायलाच हवा. आणि कोणताही पूर्वग्रहदूषित चष्मा न लावता थ्रीडी वाला चष्मा लावून हा चित्रपट बघायला हवा.

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेन व्हिलन मेला असणे आणि जिवंत असणे ह्या मध्ये कुठेतरी आहे- हे पण व्हॉल्डी सारखे नाहीका ?

स्टार वॉर्स मधले सुद्धा एक साम्य आहे, पण ते सांगत नाही, स्पॉयलर होईल.

स्पार्कसाठी लायटर हे सुद्धा X2 मधून उचलले आहे.

भारतात उत्तम दर्जा असणारे लेखक,उत्तम दर्जा असणारे कलाकार,निर्देशक,संगीतकार आता अस्तित्वात नाहीत.
त्या मुळे ह्याच सिनेमा लं नाव ठेवण्यास अर्थ नाही.
किती तरी दशक उत्तम कलाकृती निर्माण च झाली नाही.
किती व्यवसाय केला आणि सिनेमाचा दर्जा ह्याचा काही संबंध नाही.
कोपच्यात प्रेयसी बरोबर अंधारात बसायला मिळते म्हणून सिनेमा बघणारे छप्री खूप आहेत.
वाशिले बाजी,आणि घराणे शाही ह्या मुळे भारतीय सिने सृष्टी ची पूर्ण वाट लागली आहे.

Pushpa मध्ये तरी काय होते.काही नाही तरी त्याने व्यायसाय केला.दर्जेदार सिनेमा आता बनत च नाही

>> ७-८ वर्शाची मुले एंजॉय करु शकतील का ??? चित्रपट पाहिलेल्यांनी सांगा हे. की बांऊसर जाईल त्याना ???
ह्याच वयोगटातील प्रेक्षक एन्जोय करू शकतील. सन्वाद याच वयोगटातील लेखकांनी लिहिले आहेत.

भारतात उत्तम दर्जा असणारे लेखक,उत्तम दर्जा असणारे कलाकार,निर्देशक,संगीतकार आता अस्तित्वात नाहीत.
त्या मुळे ह्याच सिनेमा लं नाव ठेवण्यास अर्थ नाही.
किती तरी दशक उत्तम कलाकृती निर्माण च झाली नाही.
किती व्यवसाय केला आणि सिनेमाचा दर्जा ह्याचा काही संबंध नाही.

>>>>काहीही. दरवर्षी कितीतरी उत्तमोत्तम सिनेमे येतात.

मूळ लेख वाचून थेटरात बघायचा ठरवला तर प्रतिसादांनी मोडता घातला. जाऊ दे. शोले सारखा शोले अनेको वर्षांनी पाहिला तर ब्रम्हास्त्राची काय बिशाद!

सगळे रिव्हू व कॉमेंट वाचून फुकट पहायला मिळाला तरच हा चित्रपट पाहिन असे ठरवले आहे. >>>>
फूकट मिळाला तरी पाहू नका सर असे सुचवेन. सुरूवातीलाच आलीया ना ईतर विस फूट अधिक ऊंची वरून अशी ऊडी मारतात जसं स्विनींग पूल मध्ये मारत असावेत. एकाचंही तंगडं लंगडं होत नाही. कैच्याकै. शाहरूख खान इतके महाभयानक पांचट विनोद मारतो की सांगता सोय नाही. ऊगाच वेळ वाढवायचा म्हणून काहीही फालतू बडबड करत असतो. अमीताभ समोर शेकोटी सुध्दा विएफेक्स ची असते. नाॅर्नल खरी खूरी शेकोटी त्यापेक्षा छान दिसली असती. मी २८० चे तिकीट काढून गेलो, मूर्खपना झाला थेटरात मी धरून २० ते पंचवीस पेक्षा जास्त लोक नव्हते. सर्वात शेवटी ३१० च्या रांगेत जाऊन बसलो. २१० चं काढलं असतं तरी काही फरक पडला नसता.

संपुर्ण सिनेमात ईतके महाभयानक पांचट विनोद आहेत की संपुर्ण सिनेमागृहात एकही व्यक्ती हसली नाही. अगदी लहान मूलंही नाहीत. फक्त आलियाच काय ती भारी दिसत होती. लग्नावंतर तेज आलेय चेहर्यावर तीच्या.

खरंय या जगात आई कुठं काय करते आणि अनुपमा आवडीने बघणारेही लोकं आहेत
आणि लाल सिंग तसेच ठग्स ऑफ हिंदुस्थान आणि झिरो बघणारेही

लोकांना काय आवडू शकतं हे सांगणे अवघड आहे

तसा व्यवसाय तोट्यात जाणे अवघड च आहे.
150 कोटी मधील पाच दहा टक्के लोकांनी बघितला सिनेमा तरी फायदा होता.
पण नवीन production हाऊस का तयार होत नाहीत हा प्रश्न आहेच
भांडवल हा पॉइंट नक्कीच नाही.
लॉबी नवीन माणसाला येवू देत नसणार हीच शक्यता जास्त आहे

तसा व्यवसाय तोट्यात जाणे अवघड च आहे.
150 कोटी मधील पाच दहा टक्के लोकांनी बघितला सिनेमा तरी फायदा होता.
पण नवीन production हाऊस का तयार होत नाहीत हा प्रश्न आहेच
भांडवल हा पॉइंट नक्कीच नाही.
लॉबी नवीन माणसाला येवू देत नसणार हीच शक्यता जास्त आहे>>>>
सिनेमे तोट्यात जातात. जर तूफ्फान चालले नाहीतर तर (बाहुबली सारखे), स्टार्स ची मार्केट वॅल्यू कमी होते. कंगना रानावत ने भाजपच्या नादी लागून अनेक जाहीराती घालवून घेतल्या. तीचा मागे आलेला धाकड सिनेमा ८०-९० कोटीत बनला होता पण कमावले फक्त ४ कोटी. सिनेमा तूफ्फान चालला नाही तरी फक्त लावलेला पैसा वसूल झाला तरी परवडतो कारण सिनेमा बनवण्यात गुंतलेल्या कंपन्या
स्वतच्याच असतात, रिकाम्या बसलेल्या लोकांचे पगारपाणी वगैरेचे पैसेही निघतात. (ऊदा. बाजीराव मस्तानी १८० कोटी बजेट १८० कोटी कमाई), तसेच काळा पैसा पांढरा होणे हे सिनेमा आडूनही होतच असावे. शिवाय स्टारकिड्स लाॅंच करायला त्या स्टार्स च्या बापाने पडद्याआडून पैसे लावलेलेच असतात. डूबले तरी निर्मात्याला फरक पडत नाही सिनेमा चाललाच तर नफा व स्टारकीड लाॅंच योजना ही सफल होते.
रणबिर कपूरचा समशेरा तूफ्फान आपटला. ब्रम्हास्त्रही प्रत्यक्षात आपटलेलाच आहे पण बाॅयकाॅट वाल्यांचं मनोबल खच्ची करायला खोटे आकडे फेकून मारले जाताहेत. बाहुबली २ ने जगभरात तूफ्फान कमावल्यानंतर अचानक चिन मध्ये आमीर खान चा दंगल ८०० - ९०० कोटी कमावत असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. ह्यामागे दक्षीणेतील सिनेजगताला बीट करायचं होतं. आता ब्रम्हास्त्राच्या खोट्या आकड्यांआडून बाॅयकाॅट वाल्यांना बिट केलं जातंय.

कॅामींनी चिकवा च्या धाग्यावर जो रिप्लाय दिलाय तो शब्दन्शब्द पटला .. आलिया मध्येही कोणती तरी शक्ती आहे म्हणून ती रनबीरला मदत करायला आली आहे असा काहीतरी शेवटी ट्विस्ट हवा होता. मग जरा स्टोरी सेंसिबल वाटली असती..पण तरीही मला पिच्चर आवडला.. नंदीचे ॲक्शन सीन्स खूप मस्त घेतले आहेत.. पुढच्या भाता दिपिका आणि रणवीर असावेत.. तीथे ह्या पिच्चरमधे झालेल्या चूका टाळता येतील

<<भ्रमास्त्र तोडा असे वाचुन घाबरलो आणि धागा उघडला. आता हुश्श् झाले
Submitted by भ्रमर on 14 September, 2022 - 15:43
>>
भ्रमास्त्र तोडा असेच लिहिलंय की.
तुम्ही भ्रमरास्त्र तोडा असे वाचले का आधी?

मला बॉयकॉटशी काही देणेघेणे नाही पण ट्रेलर बघुन चित्रपट बघावासा वाटायला हवा. मला अजिबात वाटला नाहे.>>> +१००
त्यातही हा सिनेमा प्रचन्ड ओव्हरहाइप आहे आणी रणबिर आलिया सुद्धा.
रणबिर आणि आलिया दोघही चान्गले कलाकार आहेत यात शन्का नाही पण
आलियाला प्रचण्ड मर्यादा आहेत , टिनी टायनी असल्याने कुठलेही रोल तिला सुट होत नाहीत, तिच्या सौदर्याच जे काय कौतुक करण्यात येत त्याच्या ती एक टक्का पण नाही आहे.
रणबिरच काम चान्गल आहे पण सगळिकडेच नाही त्यातही तो कायम कम्फर्ट झोन मधेच वावरत असतो त्यामुळे सगळी कडे तो त्याच्या भुमिकेसाठी लक्षातच राहत नाही.रणबिर म्हणूनच वाटत राहतो.
रणविर सिन्ग त्याचवेळेस आला पण त्याच्या भुमिकाची रेन्ज बघितली की करणचे सतत रणबिर कसा बेस्ट अ‍ॅक्टर आहे हे सगल्ञाकडून वदवुन घेण्याचे प्रयत्न हास्यास्पद वाटायला लागतात.
त्याने प्रेक्षकाना हे अतिव कौतुक करुन मखरात ठेवलेले कलाकार डोऴ्यासमोरही नकोत वाटायला लागले तर काहिच नवल नाहि.
एखाद्या कलाकारचा प्रमाणाबाहेर उदो उदो केल्यावर त्याचि कशी माती होते हे तर आपण इच्छा नसतानाही माबोवर रोजच वाचतोच

काय नाय ओ स्टोरीमध्ये दम.. शेवटच्या भागात आलियाच मेन व्हीलन किंवा त्याची हस्तक असते असे निघेल. मग हिरो छप्पन्न सश्यांची व्याकुळता डोळ्यात आणून तिच्या कडे पहात मरायचा प्रयत्न करेल. मग तिचे मन बदलेल व ती हिरोला मरणाच्या दारातून परत आणेल. मग सगळीकडे आनंदी आनंद होईल. लोकं डोळ्यात पाणी आणून लवस्टोरीचे कवतूक करतील...

एखाद्या कलाकारचा प्रमाणाबाहेर उदो उदो केल्यावर त्याचि कशी माती होते हे तर आपण इच्छा नसतानाही माबोवर रोजच वाचतोच >>>>
खिक्क. रोजच कुठून ना कूठून माथी मारला जातो.

काय कौतुक करण्यात येत त्याच्या ती एक टक्का पण नाही आहे. >>>
असहमत. आलियाचं सौंदर्य वादातीत आहे.

फिल्टर,विविध इफेक्ट ,प्रकाश योजना अनेक प्रकार ची चाळणी करून दिसणारे चेहरे दिसतात तितके रिअल मध्ये सुंदर नसतात.
Fb वर खूप बरबाद झाले फिल्टर मुळे.

Pages