दिसे गर्द राई

Submitted by द्वैत on 7 September, 2022 - 14:04

दिसे गर्द राई दरीतून खाली
उतरती पुढे पांढरेसे झरे
निळ्याशार पाण्यावरी हालणारी
नदीच्या किनारी उभी गोपुरे

जरा शांतता बांधता ऊन ओले
नभाशी भिडे पाखरांचा थवा
कुणी दूरचा साद घाली कधीचा
तशी वाजते भोवताली हवा

जशी सांध्यछाया पडे, धूपवारा
मला खेचतो जाणिवांच्या पुढे
तिथे सूर्य अस्तास रेंगाळताना
इथे वाट पायातली धडपडे

निजे रात्र आता दिव्यांच्या कडेला
नभी तारकांचा पिसारा फुले
पहाटे पहाटे खुळे स्वप्न माझे
निळ्या मोरपंखावरी झिळमिळे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! अतिशय सुंदर चित्रदर्शी कविता ! बा. भ . बोरकरांची आठवण झाली !
कुणी दूरचा साद घाली कधीचा
तशी वाजते भोवताली हवा>> हे फार आवडलं.

सुंदर कविता..
वृत्तामुळे आणि काही कडव्यांमुळे पृथ्वीचे प्रेमगीत आठवली.