गणपती : एक चिंतन - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 4 September, 2022 - 11:07

माझ्या वडिलांचे एक पितृतुल्य ज्येष्ठ चुलतभाऊ संस्कृतचे प्रकांड पंडित होते. लहानपणी कधीतरी त्यांच्याकडे काही कार्याच्या निमित्ताने राहिले असताना त्यांच्या मेजावर गणपतीचं काहीसं अपरिचित शैलीतलं चित्र असलेला एक जाडजूड आणि जीर्ण ग्रंथ दिसला होता. पुस्तक दिसलं की चाळल्याशिवाय तेव्हाही चैन पडत नसे. काका जरा तापट होते, त्यामुळे घाबरत घाबरतच त्यात डोकावले होते.
आता काही केल्या त्या ग्रंथाचं नावगाव आठवत नाही, पण गणपती ही मूलतः अनार्यांची देवता असून त्याला असलेली लाल रंगाची आवड ही त्याच्यापुढे दिल्या जाणार्‍या (नर?)बळींच्या रक्ताशी निगडीत आहे अशी माहिती त्यात दिसल्याचं आठवतं.
इतकं ज्ञान पदरात पडतंय तोवर कोणाचीतरी चाहूल लागल्याने घाईघाईत पुस्तक मिटून ठेवून तिथून पोबारा केला होता.
या 'माहिती'चं गांभीर्य कळण्याइतकं वय नव्हतं ते, पण ही नोंद डोक्यात राहिली खरी.

तोवर गणपतीच्या कथा इतर देवदेवतांच्या कथांप्रमाणेच मिथककथा म्हणून वाचल्या होत्या. त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो हे कळत होतं, तरीही इतकी अचाट बिनशेंड्याबुडख्याची उगमकथा इतर कुठल्याच देवाची वाचल्याचं आठवत नाही. पार्वतीने अंगरागापासून (अगदी मळ नको म्हणूया, पण सीरियसली, किती दिवसांची अंघोळ राहिली होती तिची म्हणते मी!) हे मूल घडवणं काय, शंकराने बायकोच्या न्हाणीघरात जाऊ दिलं नाही म्हणून एवढ्याश्या मुलाचा शिरच्छेद करणं काय (टॉक अबाउट अ‍ॅन्गर इश्यूज!), मग हे इतके पावरफुल दैवी आईवडील असून त्याला हत्तीचं शिर चिकटवणं काय, कशाचा कशाला काही पत्ताच नाही! आय मीन अख्खा मुलगा ज्या पार्वतीने घडवला, तिला एक शिर रीक्रिएट करणं शक्य नव्हतं? शंकराला तेच शिर रीसायकल करायचं सुचलं नाही? आणि मग ओव्हरकॉम्पेन्सेशन म्हणून त्याला गणांचा अधिपती केलं म्हणे! हे नेपोटिझम नाही तर काय!
मग म्हणायचं चार हात चौपट कार्य करायला (याच्या भावाला सहा डोकी, आणि आईच्या एका व्हर्जनला आठ हात! त्यामानाने हा बराच नॉर्मल म्हणायचा!), मोठं पोट चुका अ‍ॅक्सेप्ट करायला, काय नि काय! इसापच्या बोधकथांमधले प्राणीसुद्धा यापेक्षा लॉजिकल वागतात! शिवाय या कथेतून नेमका बोधतरी काय घ्यायचा?!

गणपतीचं रूप माझ्य डोळ्यांना अत्यंत साजिरं दिसतं, आणि त्याचा घरगुती आणि सार्वजनिक सणसोहळा हा माझ्या सांस्कृतिक जडणघडणीतला एक अविभाज्य भाग आहे. ते अर्थातच कन्डिशनिंग. पण मुखाने 'एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमही' (एकदंताला मी/आम्ही बुद्धीने समजून घेतो, वक्रतुंडाचे ध्यान करतो) म्हणायचं, त्यातल्या 'विद्महे'चं काय?

नंतर कधीतरी निसर्गपूजक पेगन लोकांचे देव/सणवार ख्रिश्चॅनिटीने कसे आणि का 'आपलेसे' करून / बळकावून घेतले याबद्दलची चर्चा वाचनात आली आणि या आता शेंदूर, गुलाल, रक्तांबर, गंधाक्षता, लाडूमोदकअन्ने इत्यादींखाली दड(व)लेल्या अनार्य देवतेच्या आठवणीला उजाळा मिळाला. नेटवर शोधाशोध केली तेव्हा खाली दिलेले दुवे व यांसारखे अन्य लेख सापडले. ते मुळातूनच वाचावेत असं सुचवेन. तसंच कोणाला यांविषयीची अधिक माहिती, संदर्भग्रंथ इत्यादी ठाऊक असतील तर कृपया शेअर करा, मला वाचायला आवडेल.

पुराणातली वानगी पुराणातच राहू द्यायची असते म्हणतात, पण सोयीनुसार आपण नाही नाही त्या वानग्या आणि त्यांवरून वादविवाद उकरून काढतोच! मग निखळ ज्ञानसंपादनासाठी आता बुद्धीची देवता म्हणून स्वीकारलेल्या दैवताचा हा शोध का घेऊ नये?

संदर्भ :
http://insearchofganpati.blogspot.com/2016/10/blog-post.html
https://maharashtratimes.com/editorial/samwad/ganesh-utsav/articleshow/4...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<ज्ञानसंपादनासाठी आता बुद्धीची देवता म्हणून स्वीकारलेल्या दैवताचा हा शोध का घेऊ नये?>>
हे ज्ञानसंपादन, बुद्धीची देवता हे सगळे आता जुने झाले हो.
कॉन्स्पिरसी हा प्रकार काही नवा नाही, फार पूर्वीपासून तो चालू आहे. त्यातल्याच कुणि काही लिहीले नि ते चारशे वर्षाचे जुने असेल तर लगेच
त्याचा संदर्भ देऊन लिहायचे. असला रिसर्च करून काहीतरी वेडेवाकडे बोलायचे म्हणजे मग कुणितरी पेपरवाले, मिडिया वाले तुम्हाला प्रसिद्धि देतात - मग पैसे.
हा खरा उपयोग आहे आपल्या सर्व देवतांचा.

मंगला सामंत यांचा आ ख्खा लेखाला संदर्भ हवेत असे वाटले.
काही facts असतीलही, पण reference शिवाय hocus pocus वाटले

नानबा, वृत्तपत्रांत नैमित्तिक लेखन करणार्‍यांना शब्दमर्यादेमुळे अनेकदा संदर्भ देणं टाळावं लागतं असं एका (अशा प्रकारचं लेखन करणार्‍या) स्नेह्यांकडून ऐकलं होतं, कदाचित इथे तेच कारण असू शकेल.
'मंगला सामंत' नाव गूगल केलं तेव्हा हे एक ई-बुक सापडलं. मी घेते आहे.

लेखात म्हटल्यानुसार वाचकांनी आपल्याकडची माहिती/संदर्भ जरूर शेअर करा.

माहिती रोचक आहे. शंकराचे दोन्ही पाल्य, त्यांच्या जन्माच्या कथा विचित्रच आहेत. शिवाय उत्तरेत गणपती म्यारीड आणि कार्तिकेय ब्याचलर, तर दक्षिणेत गणपती ब्याचलर आणि कार्तिकेय (मुरुगन) म्यारिड अशी मजा मजा आहे. नेपोटिझम मुद्द्याला +१. कारण वेदकाळात गणांचा अधिपती रुद्र होता (जो नंतर शंकर झाला). गणानाम् त्वाम् गणपतीम् हवामहे - हा श्लोक आपल्या गणपती बाप्पाबद्दल नाही, असं मत अनेक संशोधकांनी मांडलं आहे.

टिमविच्या डॉ अंबरीश खरे यांचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. https://youtu.be/wiq6xHQiAEM

फक्त आर्य - अनार्य अशी मांडणी आता मागे पडू लागली आहे. या मांडणीत अन्यायकारक आणि अन्यायग्रस्त अशी जी ठळक विभागणी होते, तेवढं काही ते कृष्णधवल नाही. शिवाय त्या सिद्धांतातले बरेच दावे आता खोडले गेले आहेत. परंतु अशा अनेक मातीतून उगवलेल्या देवता बहुमान्य विचारधारेत आपल्याशा केल्या गेल्या आणि देवकुटुंबाचा भागही झाल्या एवढं मात्र नक्की म्हणू शकतो.

धन्यवाद, हपा. Happy
व्हिडिओ पाहिला - लेखात दिलेल्या पहिल्या दुव्यातील माहिती यातील माहितीशी मिळतीजुळती दिसते आहे.

'मंगला सामंत'
त्यापेक्षा मंगला गोडबोले यांचे पुस्तक वाचा - त्यात गणपतीबद्दल काही नाही, पण एकूण विनोदी आहे.

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.
Happy

सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
तसंच हा उपक्रम आयोजित करून व्यक्त होण्याला संधी आणि दिशा दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार.>>> टेंप्लेटची आयड्या छान आहे Proud

सॉरी पण हा अ‍ॅप्रोच काही पटला नाही. म्हणजे मला कधीच पटत नाही. देव ही मुळातच एक संकल्पना आहे. ती काल्पनिकच असणार. त्याच्या कथाही तश्याच असणार. काहीतरी अमानवीय कथा रचल्याशिवाय दैवत्व कसे येणार हे लॉजिक आहे. तर त्याला व्यवहारातले लॉजिक का लावायचे?

आणि मग देवाचे मूळ काय होते याचा शोध तरी का घ्यायचा? जसे विश्वाची निर्मिती कशी झाली, सजीवांची उत्क्रांती कशी झाली याचा शोध घेतल्यासारखे..
हे म्हणजे असे वाटले की पाऊस पाडणारा कोणे वरूण देव नाही तर हायड्रॉलिजकल सायकल मुळे पाऊस पडतो हे मान्यही करायचे आणि मग हा वरुण देव नक्की कोण आहे बरे याचाही शोध घ्यायचा.

कुतूहल म्हणून ऋन्मेष. लोककथा, आख्यायिका तयार कशा होत गेल्या असतील याचा शोध घेणं हे मनोरंजक असू शकतं. त्यातून एरवी आपल्याला कळले नसते असे काही इतर संदर्भ उलगडू शकतात.

याचा शोध घेणं हे मनोरंजक असू शकतं
>>>>
त्यातील लॉजिकची खिल्ली उडवणे हे मनोरंजन का...
आणि मग आणखी नव्याने कथा शोधायच्या आणखी काही लॉजिकची चीरफाड करायला मिळतेय का..
कारण मुळातच गणपती म्हणून चार हात आणि हत्तीचे शीर असलेल्या देवाबाबत तुम्हाला लॉजिकल कथा मिळणारच नाहीत.
मला चुकीचा अर्थ लागला असेल तर क्षमस्व. पण तरी वाचताक्षणी हे असे वाटले.

>>>>>आणि मग देवाचे मूळ काय होते याचा शोध तरी का घ्यायचा? जसे विश्वाची निर्मिती कशी झाली, सजीवांची उत्क्रांती कशी झाली याचा शोध घेतल्यासारखे..
हे म्हणजे असे वाटले की पाऊस पाडणारा कोणे वरूण देव नाही तर हायड्रॉलिजकल सायकल मुळे पाऊस पडतो हे मान्यही करायचे आणि मग हा वरुण देव नक्की कोण आहे बरे याचाही शोध घ्यायचा.

कळले नाही. मानवाला मूलभूत कुतूहल असते किंबहुना, माणसाच्या प्रगतीचे गमक या कुतूहल वृत्तीमध्ये दडलेले आहे. तेव्हा 'प्रश्न विचारणे' नैसर्गिकच आहे. शिवाय आपला धर्म रिजिड नाही. तो बदलतो, अधिकाधिक समृद्ध होतो. मग प्रश्न, का नाही विचारायचे?

> कुतूहल म्हणून ऋन्मेष. लोककथा, आख्यायिका तयार कशा होत गेल्या असतील याचा शोध घेणं हे मनोरंजक असू शकतं.

+१, सत्यनारायण कथा कुठून आली, संतोषी माता या काल्पनिक देवीचा कसा उगम झाला हे सर्व वाचणे उद्बोधक आहे.
शिर्डी साईबाबा या देवतेची उत्क्रांती आपण रियल टाईम मध्ये पहात आहोत.

ऋन्मेष, इथे खिल्ली उडवणे हा उद्देश नसावा. लॉजिक वाटत नसले तरी त्यामागे काय लॉजिक आहे हे जाणून घेणे हा एक उद्देश असू शकेल. यातून माहीत नसलेला इतिहास समजतो. देवता ही संकल्पना आपण समजतो तशी नसून त्यात बदल होत गेलेत हे ही समजतं. पण ह्यावरून सश्रद्ध लोकांची खिल्ली उडवायचं काही कारण नाहीये. विज्ञानात जसं गुरुत्वाकर्षण ही संकल्पना बदलत बदलत गेली. आता आइन्स्टाईनची संकल्पना समजून घेणे ह्यात आपण न्यूटनची खिल्ली उडवत नाही. वेगवेगळ्या काळात त्याबद्दल काय समजूत होती हे समजून घेतो. आता श्रद्धा हा जरा वेगळा प्रांत आहे, हे मान्य करूनही ती कालपरत्वे कशी बदलत जाते हे पाहणे तितकेच रोचक आहे.

मी देवांच्या मूळाचा शोध घेण्याबाबत आक्षेप घेतलाच नाहीये. ते मनोरंजक असेल वा त्यातून काही नवीन माहिती मिळत असेल, तेव्हाच्या समाजजीवनाबद्दल कळत असेल तर ते चांगलेच आहे. मग तुमची देवावर श्रद्धा असो वा नसो, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही त्याचा वेगळ्या उद्दीष्ट्याने अभ्यास करू शकताच.

फक्त हे करताना देवांच्या ज्या प्रचलित कथा आहेत त्यांच्यामागे काय लॉजिक असावे, वा ते कश्याचे प्रतीक तर नाही ना, त्यात काय रुपक दडलेय, याचाही आधी त्याच दृष्टीकोनाने विचार करायला हवा ना. त्यांच्यात लॉजिक नाही म्हणून त्यांना हसणे आणि मग वेगळे काय सापडतेय का शोधणे यात मला विरोधाभास जाणवला ईतकेच. आणि हो, माझा त्या कथांना हसण्यावरही आक्षेप नाहीयेच. मला त्या अ‍ॅप्रोचमध्ये विरोधाभास वाटला म्हणून तो पटला नाही असेच वर लिहीलेय.

उदाहरणार्थ, एवढ्या मोठ्या गणपतीचे वाहन ऊंदीर, कसे शक्य आहे? काहीच्या काही, मरून नाही का जाणार तो? आणि म्हणे गणपती त्यावरून पडल्यावर चंद्र हसला...

पण आपल्याकडे प्रत्येक देवालाच एक वाहन दिले आहे. यामागे काहीतरी विचार असेल. गणपतीला ऊंदीर देण्यामागेही काही विचार असेल.
ऊंदराला ते महत्व का दिले गेले? जेव्हा ज्यांनी हे दिले तेव्हा त्यांना ऊंदीर हा ईतका महत्वाचा का वाटला असावा? जसे शेतकर्‍याचे मित्र म्हणून बैल, नाग आपल्याकडे सणांना पूजले जातात तसे काही असावे का?
किंवा ईतक्या महाकाय शरीराच्या देवाला ईतका चिमुरडा जीवच का वाहन म्हणून दिले. यातून काही सांगायचे आहे का ईसापनीतीच्या ऊंदराने सिंहाचे जाळे कुरतडलेल्या गोष्टीसारखे..

>>> सॉरी पण हा अ‍ॅप्रोच काही पटला नाही. म्हणजे मला कधीच पटत नाही.
आणि तुम्हाला ते न पटवून घ्यायचा अगदी पूर्ण अधिकार आहेच की, त्यात सॉरी काय! Happy

>>> देव ही मुळातच एक संकल्पना आहे. ती काल्पनिकच असणार.
मग कथातरी का रचावी लागत असेल? "ही कल्पना घ्या, हा देव/देवी आहे हे अ‍ॅक्सेप्ट करा आणि करा पूजा!" असं होत नाही ना? का होत नाही? कारण त्या हत्तीच्या शिराचं काहीतरी - अचाटसुद्धा - जस्टिफिकेशन, अगदी भाविकांनाही हवं असतं.

आपण सुपरहीरोजच्या कथा वाचतो, चित्रपट पाहातो. स्पायडर चावला आणि साध्यासरळ मुलात सुपरपॉवर्स आल्या, तो संकटात सापडलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून जायला लागला. हे मनोरंजन असतं, काहीशी आपल्याही आयुष्यात असं कोणीतरी येऊन सहज गुंता सोडवून जावं अशी फॅन्टसी असते. तशी ही एक सुपरहीरोची गोष्ट समजा. मग हा सुपरहीरो 'देव' कसा झाला? तुम्ही स्पायडरमॅनची पूजा, आरती, नैवेद्य, असं काही करता का? का करत नाही? तो प्रवास कसा झाला असेल? का झाला असेल? स्पायडरमॅनची गोष्ट पटत नाही म्हटलं तर आपल्याला वाईट वाटत नाही, पण गणपतीची कथा पटत नाही म्हटलं की वाटतं, का?

ह्याच 'देव' कल्पनेला आधी बळींचं रक्तमांस का 'आवडायचं' आणि आता ते सोडून वरणभात-मोदक का आवडायला लागले?
म्हणजे त्याचा भक्तगण बदलला, बरोबर? सगळे भारतीय काही शाकाहारी झालेले नाहीत, मग त्यांच्या कल्पनेतला देव कसा बदलला?

अशी ही सगळी प्रश्नमालिका आहे. असे प्रश्न पडताच कामा नयेत असं शक्य नाही, नाही का?

स्वाती, तुम्ही आताच्या पोस्टमध्ये जे प्रश्न लिहिले आहेत ते पडण्यावर आक्षेपच नाही. किंबहुना तसा विचार असावाच असेच मी आताच्या वरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे Happy

Pages