सुप्त मन..... एक प्रेरणेचा झरा......

Submitted by kalpana_053 on 30 March, 2008 - 20:50

ज्ञानदा विद्या मंदिर..... एक नांवाप्रमाणेच ज्ञानाचे दान करणारी शाळा.... शाळेची घंटा झाली..... मुले राष्ट्रगीतासाठी अत्यंत शिस्तीमध्ये लाईन करून उभी राहीली. राष्ट्रगीत झाल्यावर शाळेतील एका विद्यार्थ्याचे वडिल अचानक देवाघरी गेल्याने त्यांना सर्वांनी मुकपणाने दोन मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहिली...... जणू त्या श्रध्दांजलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मूक रुदनच चालू होते..... सर्वच मुले आपापल्या वर्गात गेली.... अन् विद्याच्या लक्षात आले.... आजही मंजू बरे नसल्यामुळे शाळेत येऊ शकणार नाही....... सातवीच्या वर्गामध्ये लागोपाठ असणा-या तिच्या दोन पिरियडसाठी तिला जावं लागणार होतं...... मागेही ती या वर्गामध्ये ब-याचदा गेली होती. या वर्गातील मुले जरा जास्तच हुषार आहेत असं तिला ब-याचदा जाणवलं होतं. आज या मुलांची हसत खेळत पण बौध्दिक करमणूक काय करायची? हा तिच्या मनांत विचार चालू होता. सारख्या गोष्टी.... वेगळा अभ्यास घेवून तिलाही कंटाळा आला होता. आज आपण कांही बोलून मुलांनी ऍकण्यापेक्षा या मुलांशी आपण गप्पा मारायच्या..... मुलांनाच बोलतं करायचं तिनं ठरवलं...... विद्या वर्गात येताच मुलांच्याही लक्षात आलं की आज मंजू टिचर आलेल्या दिसत नाहीत. आपण वर्गावर आल्याचा आनंद मुलांच्या चेह-यावर पाहून विद्याला मनातून समाधान वाटलं. मुलांना शांत करून ती त्यांची हजेरी घेऊन मुलांच्या ओळींमधून फिरू लागली. मुलांची ती आवडती शिक्षिका होती..... अन् याचा तिला सार्थ अभिमान होता.
मुलांनी साहजिकच तिला विचारलं, "बाई, आज कोणती गोष्ट?"
"अं..... आज गोष्ट नाही...... आज मी ऍकणार अन् तुम्ही बोलणार....." विद्या म्हणाली.
"म्हणजे आम्ही गोष्टी सांगायच्या?" बरीच मुले एकसुरात म्हणाली.
"नाही...... तुम्ही गोष्टी सांगायच्या नाहीत..... व मीही तुम्हाला गोष्ट सांगणार नाही....... आता तुम्ही मोठे झालेले आहात. तुम्हाला स्वतःची..... आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होवू लागलीय...... त्यामुळे आता तुम्ही तुमच्या भविष्याविषयी विचार हळूहळू करायला हरकत नाही. हेच वय असतं ज्यामध्ये आपलं ध्येय ठरवायचं असतं, नाहीतर काही वेळेला असं होतं आपण आपलं ध्येयच ठरवत नाही अन् मग आपल्याला दुस-यांच्या ध्येयासाठी आयुष्यभर काम करावं लागतं....... कधीकधी संपूर्ण आयुष्यसुध्दा या दुस-यांच्या ध्येयापोटी खर्ची होतं. कळतंय का मी काय म्हणतेय ते.....?" मुलांना जागं करत विद्या म्हणाली.
"हो......." मुलांनी होकार दिला.
"मी काय सांगतेय ते शांतपणे ऍका..... ब-याच जणांना मन आणि मेंदू यातील फरक माहित नसतो. या दोन वेगळ्या वास्तवता आहेत. आता तुम्ही कंप्युटर वापरू लागला आहात. म्हणून कंम्युटरच्या भाषेत सांगायचं झालं तर, मेंदू म्हणजे हार्डवेअर आणि मेंदू म्हणजे सॉफ्टवेअर...... आपल्या मनाचे दोन प्रकार पडतात. एक जागृत मन..... (कॉन्शस माईंड), अन् दुसरं सुप्त मन (सबकॉन्शस माईंड)...... तुम्हाला माझे बोलणे जरा गंभीर स्वरूपाचे वाटेल. पण आपले जागृत मन आपण जेव्हा जागे असतो तेव्हा सक्रीय असते....... पण याउलट आपण जेंव्हा झोपी जातो तेव्हा तेही झोपी जाते. तर आपले सुप्त मन आयुष्यभर, सतत, दिवसाचे चोवीस तास सक्रीय..... जागे असते. खरे पाहता, आपल्या आशा-आकांक्षा पूर्ततेची, सुख-समृध्दीचा लाभ देण्याची क्षमता या सुप्त मनांत असते. या सुप्त मनाचे कार्य सतत चालू असते. जसं आपल्याला झोपेत डास चावतो...... तेव्हा आपण आपोआप त्या डासाला हाकलून लावतो..... तसेच एखादेवेळी आपल्याला पहाटे उठायचे असते..... तेव्हा आपल्याला गजर होण्यापूर्वीच जाग येते. ते कशामुळे? निसर्गाने आपल्या सुप्त मनामध्ये वेळेची नाँद घेणारी यंत्रणा..... घड्याळ बसवलेले असते. या यंत्रणेत गजर लावण्याचीही सोय असते. त्यामुळे आपण जागे होतो..... तसेच एखादे वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीची तीव्रतेने आठवण येते. तिला भेटावे वाटते.... अशावेळी कधी कधी ती व्यक्ती आपणहून आपल्यासमोर उभी राहते....... अन् आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. ही सर्व कार्ये आपल्या सुप्त मनाकडूनच होतात. तुम्हाला सुप्त मनाचे महत्व सांगायचे कारण तुमच्या या लहान वयापासूनच तुम्ही आपल्याला मोठेपणी कोण व्हायचे हे ठरवले.... त्यासंबंधीचे ध्येय ठरवले अन् तुम्ही ते सुप्त मनाकडे नकळतपणे सोपवून त्या दृष्टीने वागू लागता...... आणि मग आपोआपच ध्येय साध्य होण्यास सुप्त मनाची मदत होते. आपले सुप्त मन हे अल्लाऊद्दीनच्या जादूच्या दिव्याप्रामाणे आहे. या सुप्त मनाला चांगल्या आज्ञा कशा द्यायच्या त्याचा फक्त आपण विचार करायचा...... चुकूनही वाईट आज्ञा द्यायच्या नाहीत. नाहीतर मग ते तसेच करेल....... मग बघा..... आयुष्यातील तुमचे उच्च ध्येय साध्य होताना तुम्हाला दिसून येइल. आपल्या आजूबाजूला अनेक आदर्श असतात. त्यातून आपण मोठेपणी काय व्हायचे ते ठरवू शकतो. सर्वांचीच बुध्दीमत्ता सारखी नसते. किंवा सर्वच इंजिनियर किंवा डॉक्टर होवू शकत नसतात. तसेच इंजिनियर किंवा डॉक्टर होवूनच आपण खूप मोठे व सुखी होतो असेही नसते........ समाजामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींची ..... करियर्सची गरज असते...... त्या पुरवण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती लागतात. तर आज आपण पाहणार आहोत तुम्ही मोठेपणी काय होणार ते....? आपल्याला दोन तास वेळ आहे....... त्यामुळे मी प्रत्येकाला विचारणार आहे...... प्रत्येकाने आपण मोठेपणी काय व्हायचे ठरवले आहे व कां? हे थोडक्यात सांगायचे...... काय कबूल आहे?" विद्या मुलांना म्हणाली.
"हो......." एकसुरात मुले म्हणाली.
"तर मग ठिक आहे..... मी तुम्हाला विचार करायला दहा मिनिटे देते. त्यानंतर प्रत्येकाने मी विचारेन तसे ओळीने सांगायला सुरुवात करायची...." विद्या म्हणाली.
मुले शांत होऊन विचार करू लागली. मुलांना आपल्या भविष्याविशयी विचार करताना पाहून विद्या मनातल्या मनांत स्वतःवरच खूष झाली.
"येथे कोण काय बोलेल यावर कोणीही हसायचे नाही..... कुणाला चिडवायचे नाही. प्रत्येकाने अगदी आपल्या मनांतील बोलायचे...." विद्याने परत मुलांना बजावून सांगितले.
थोड्या वेळाने तिने एका विद्यार्थ्यास उभे केले...... "राजू, तू सांग.... तुला मोठेपणी कोण व्हायचेय?"
"बाई, मला मोठेपणी ड्रायव्हर व्हायचेय..... माझे वडीलही ड्रायव्हरच आहेत. मला मी कधी मोठा होतो..... अन् गाडी चालवतो असं झालंय...... माझे वडिल मला अजून गाडीला हातच लावू देत नाहीत. माझे वडिल दुस-यांच्या गाडीवर ड्रायव्हरचे काम करतात. पण मी स्वतःच्या खूप गाड्या विकत घेणार..... अन् खूप ड्रायव्हर्सना माझ्याकडे नोकरीला ठेवणार...... दुस-याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करणारे माझे वडिल अनेक ड्रायव्हर्सना पगार देत आहेत..... हे स्वप्न मी नेहमी पाहतो...... आणि मी ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार...... टुरिस्ट म्हणूनही मी भारतातील सर्व ठिकाणे अनेकांना दाखवणार!" राजू म्हणाला.
"शाब्बास राजू,...... तुझ्या वडिलांसाठी तुझ्या मनांत खूप आदर आहे हे पाहून खूप आनंद झाला. सध्या टुरिस्ट-ट्रान्सपोर्टच्या धंद्याला खूप गती आहे.... तसंच ट्रीपसाठी वेगवेग्ळ्या ठिकाणी जाण्याचा धंदाही सध्या जोर धरतोय..... तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही...... कष्ट करायची तयारी ठेव.... बेस्ट लक......" विद्या म्हणाली.
अन् तिने दुस-या मुलाकडे..... गोविंदाकडे बोट केले, अन् म्हणाली, "गोविंदा, तू बोल..... तू काय ठरवले आहेस?"
"बाई, मी मोठा झालो की शिक्षक होणार..... अगदी तुमच्यासारखा...... शिक्षकांना समाजामध्ये किती आदर असतो. मुलांच्या मनांमध्ये शिक्षक म्हणजे सर्व काही असतं.... तुम्ही जेव्हा तन्मयतेनं शिकवता तेव्हा आम्ही मुले किती हरखून जातो...... माझे आई-वडिलही त्यांच्या शाळेतल्या.... कॉलेजमधल्या शिक्षकांची अजूनही आठवणी काढतात...... आणि विद्यादानाचे पुण्य तर नक्कीच आहे...... माझी आई म्हणते, शिक्षकच विद्यार्थ्यांना घडवतात.... त्यामुळे मी मोठा झाल्यावर आदर्श शिक्षक होवून आदर्श शिक्षकाचा पुरस्कारही मिळवणार...... खूप वाचन करणार..... मुलांना खूप काही शिकवणार......" गोविंदा जणू शिक्षक झाल्याप्रमाणे हातवारे करून बोलत होता.....
"बरोबर आहे तुझं..... शिक्षकी पेशास समाजामध्ये खूप चांगलं मानाचं स्थान आहे. तू नक्कीच चांगला शिक्षक होशील. पण त्यासाठी तुला आधी खूप शिकायला हवं..... वाचन करायला हवं...." विद्या म्हणाली.
"आता तू सुरेश..... तू कोण होणार मोठेपणी?" विद्या म्हणाली.
"बाई, मी पण मोठेपणी शिक्षकच होणार.... पण चांगल्या धडधाकट मुलांचा नाही..... मी मानसिक निकलांग मुलांचा शिक्षक होणार...... बाई माझा धाकटा भाऊ एकदा तापाने आजारी पडला..... अन् त्याच्या मेंदूवर परिणाम झाला. तेव्हापासून त्याला नेहमीच्या मुलांच्या मानाने कमी समजते...... त्याच्या मेंदूची वाढ खूप हळूहळू होतेय...... तो एका खास त्यांच्यासाठी असलेल्या शाळेत जातोही..... त्याच्यात खूप सुधारणा होतेय........ पण मी एकदा तेथील मुले पाहिली..... ती वेगवेगळ्या कला-गुणांमध्ये खूप हुषार आहेत. फक्त त्यांना कुणीतरी वेळ देऊन शिकवायला हवे. मी मोठा झालो की अशा मुलांना शिकवणार..... त्यांच्यासाठी सुसज्ज शाळा काढणार......" सुरेश म्हणाला.
"वा.........! खूप चांगली कल्पना आहे तुझी...... तुझ्या भावामुळे तुझ्या मनांत अशा मुलांविषयी जी आस्था निर्माण झालीय ती अशीच जपून ठेव. तिची जोपासना कर..... समाजातील अशा घटकांसाठीही चांगल्या माणसांची काहीतरी जबाबदारी असते. त्याची जाण सर्वांनीच ठेवायला हवी." विद्या म्हणाली.
"आता तू सांग ननिता...... तू कोण होणार मोठेपणी?" विद्या म्हणाली.
"मी नां बाई.... नर्स होणार...... मी एकदा आजारी पडले होते...... तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. तेव्हा माझ्याजवळ सारखी एक नर्स असायची..... ती माझी खूप चांगली देखभाल करायची. मला खूप आवडली ती..... आमच्या घरातील सर्वजण तिला खूप मान द्यायचे. तेव्हाच मी पण ठरवले की आपणही असेच नर्स व्हायचे...... पेशंटची काळजी घ्यायची....... समाजसेवा करायची....." ननिता म्हणाली.
"छान...... नर्सचा पेशाच समाजसेवेचा आहे....... डॉक्टरांप्रमाणेच आपल्या समाजामध्ये नर्सलाही खूप मान आहे. पण त्यासाठी वेगळे प्रशिक्षण घ्यावे लागते हं..." विद्या म्हणाली.
"पण बाई एक विचारू? काही नर्स वाईट असतात का? काही दिवसांपूर्वी मी एका सिरियलमध्ये बघितले....... एका नर्सला एक श्रीमंत बाई खूप पैसे देऊन एका पेशंटच्या तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढायला सांगत होती...... अशाही वाईट नर्स असू शकतात का?" ननिता म्हणाली.
"अगं समाजामध्ये जसे चांगले लोक असतात तसेच कांही वाईटही असतात...... मागे काय व्हायचे...... समाजातील गोष्टींचे चित्रण मालिका..... चित्रपटांमधून दिसायचे...... आता काय झालेय..... अतिरंजित कथानकांमुळे सिरियल्समध्ये काहीही दाखवतात..... त्यामुळे त्याचा समाजमनावर वाईट परिणाम होतो..... पण आपण त्याकडे लक्ष द्यायचे नाही..... तू लक्षात ठेवायची ती तुझी हॉस्पिटलमध्ये सेवा केलेली नर्स......." विद्या म्हणाली.
"बरं आता तू सांग रिया.... तू मोठेपणी कोण होणार?" विद्या रियास म्हणाली.
"बाई...... मला तुम्ही हसणार नाही नां?......" रिया लाजून म्हणाली.
"अगं आपलं आधीच ठरलंय..... कुणी कुणाला हसायचं नाही....... बोल.... तू मोकळेपणाने बोल......" विद्या म्हणाली.
"बाई, मी ग्रेज्युएट होणार...... शिकणार..... पण मी बाहेर कोणतीही नोकरी..... व्यवसाय करणार नाही..... मी घरातच राहणार..... माझ्या घरामध्ये मी सर्वांची देखभाल करणार...... माझ्या घरातल्यांची काळजी घेणार...... बाई, माझी आई नोकरी करते...... मग आम्हा सर्वाना व तिलाही खूप त्रास होतो..... आपण शाळेतून घरी गेल्यावर कधीही आई घरात असावी असे मला नेहमी वाटते...... मला आईशी खूप बोलायचे असते..... पण तिच्याकडे वेळ्च नसतो..... व वेळ असतो तेव्हा ती खूप दमलेली असते...... एकच रविवार येतो...... तेव्हा तिला खूप कामे असतात..... विश्रांती घ्यायची असते..... त्यामुळे मी मोठी झाली की घरातच राहणार.... घरच्यांसाठी वेळ देणार..... मी कुठेही बाहेर जाणार नाही....." रिया म्हणाली.
"अगं बरोबर आहे तुझं..... पण सध्या महागाईच्या दिवसात एकट्याच्या पगारात भागत नाही...... म्हणून नोकरी करावी लागते...... शिवाय घरच्या कामाव्यतिरिक्त आपण समाजासाठी केलेल्या कामाचे समाधान काही वेगळेच असते..... तू मोठी झालीस की तुला कळेल..... तसंच घरात राहूनही खूप काही करता येते.... जसे ट्यूशन्स..... एखादा लघु उद्योग.... शिवणकाम..... वगैरे......" विद्या म्हणाली. आईच्या नोकरी करण्याने रियाची होणारी कुचंबणा ऍकून विद्याला खूप वाईट वाटले. अन् आपल्या मुलीची मनापासून आठवण झाली. तिच्याही मनांत असेच विचार येत असतील कां? तिच्यासाठी वेळ काढायला हवा..... असाही विचार विद्याच्या मनांत येऊन गेला.
"आता तू सांग रिचा..... तू कोण होणार मोठेपणी?" विद्या म्हणाली.
"बाई मी कल्पना चावला सारखी खूप मोठी होणार..... अन् आकाशात ...... अंतराळात जावून काम करणार..... त्यासाठी इंजिनियर होणार..... देशासाठी खूप खूप काम करणार...." रिचा म्हणाली.
"बाई मी डॉक्टर होणार..... अन् गरीब लोकांना मोफत ऑषधे देणार..... त्यांना मोफत तपासणार...." देवाशिष म्हणाला.
"बाई मी मोठेपणी सॅनिक होणार..... देशासाठी लढायला जाणार...... पण मी मरणारच नाही..... मी शत्रूला मारणार..... माझा काका कारगिलमध्ये मारला गेला..... पण मी कधीच हरणार नाही....." रौनक म्हणाला.
"बाई, मी खूप मोठे हॉटेल चालवणार..... सर्वच पदार्थ माझ्या हॉटेलमध्ये सर्वाना मिळतील असे मी पाहणार..... आणि उरलेले अन्न रोज गरिबांना वाटणार....." श्रीकांत म्हणाला.
"मी कंप्युटर इंजिनियर होणार..... मला कंप्युटर बसले की उठूच नये असे वाटते.... संपूर्ण जगाशी आपल्याला जोडणारा कंप्युटरचे मी रिपेअरिंगही करणार....." विवेक म्हणाला.
"बाई, मी बॅकेत मॅनेजर होणार....., मी नेव्हीत जाणार....., मी वृध्दांसाठी आश्रम काढणार....., मी प्रिटिंग प्रेस काढणार....., मी डेअरी काढणार..... कारण माझे वडिल दुधाची लाईन टाकतात......, बाई मी वर्तमानपत्र काढणार..... माझ्या वर्तमानपत्रात फक्त चांगल्याच बातम्या असणार......, मी पत्रकार होणार....., मी लेखक होणार....., मी टीव्ही वर कार्यक्रमाचे संयोजन करणार....., मी पायलट होणार....., मी मुख्यमंत्री होणार...... मी ऍक्टर होणार..... मी व्यापारी होणार...., मी आमच्या गांवाकडे जाऊन खूप छान फुलाची शेती करणार.....अन् शहरात..... परदेशात फुले पाठवणार......" अशी अनेक मुलांनी आपली वेगवेगळी मनोगते मांडून आपण काय होणार ते सांगितले..... सर्वच मुले आपल्या आयुष्यातील ध्येयाच्या स्वप्नात दंग होवून गेली......
एवढ्यात घंटा वाजली...... विद्याचा सातवीच्या वर्गावरील ऑफ पिरियड संपला होता...... मुलांना त्यांच्या ध्येयाविषयी तसंच सुप्त मनाच्या शक्तीचे महत्व पटवून त्यांच्या मनाचा "स्वीच ऑन" करण्यात विद्याला खूप समाधान मिळाले..... तिला आता दुस-या वर्गावर जायला लागणार होते..... मुलांच्या मनांतील वेगवेगळ्या करियर्स विषयी ऍकून तिला मुलांच्या विषयी अभिमान दाटून आला...... तिच्या मनांत विचार आला..... "प्रत्येकाच्या मनांवर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम झालेला आहे..... आपल्याला वाटते तसे प्रत्येकास 'इंजिनियर व डॉक्टरच' व्हायचे नाहीये......" तसंच पालकांवरचं प्रेम मुलांच्या बोलण्यातून प्रतीत झाल्याने प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय ऍकून घेताना विद्याचे भान हरपून गेले.....
तिच्या मनांत विचार आला...... "कोण म्हणतेय आजची पिढी दिशाहिन व बिधडलेली आहे.....? त्यांची चांगली स्वप्ने नाहीत.....? पण हे मात्र नक्की..... देशाचे उद्याचे भवितव्य असलेले भावी नागरिक म्हणून मुलांना घडवताना कुटुंबाकडून..... समाजाकडून..... बालमनाबाबत जागरुकता हवी..... समाजात वेळोवेळी आजूबाजूच्या दिसणा-या बाल अत्याचाराविरुध्दही समाजानेच डोळस होऊन लक्ष द्यायला हवे..... १४ नोव्हेंबर ह्या बालदिनीच ह्या बाल्यांची आठवण ठेवायला नको..... तसंच ही फक्त सरकारचीच जबाबदारी मानायला नको...... प्रत्येक बालमनाची..... मग तो मुलगा असो वा मुलगी...... ही कळी उमलताना काळजी घ्यायलाच हवी......! ह्या ओल्या मातीला आकार देवून..... "न पिचणारा घडा" बनवायचे काम समाजाचेच आहे..... प्रत्येक सुजाण नागरिकाने निदान एखाद्या तरी गरजू बाल्याचे बालपण जपून..... सुसंस्कार निर्माण करण्याची जबाबदारी घेतली तर भविष्यकाळात हे भारताचे अभिमानास्पद नागरिक बनतील यात शंका नाही.....
आपापली ध्येये साकार झालेली ही आनंदी मुले विद्याला तिच्या भविष्यकालीन मनःपटलावर दिसू लागली.....
(समाप्त).......सौ. कल्पना रमेश धर्माधिकारी.......

गुलमोहर: 

khup chhan ahe katha.....