थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिक प्रश्न

Submitted by कुमार१ on 29 July, 2022 - 02:36

नुकताच घडलेला एक किस्सा.
माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".

संबंधित मुलीच्या वडिलांनी माझ्या मित्राला ते सर्व रिपोर्ट्स दाखवले. आता त्या मुलीतील तो रक्तदोष पाहता काय करावे असा पेच त्याला पडला. मग त्याने मला सर्व रिपोर्टस् पाठवून माझा सल्ला विचारला.

थॅलसिमिया हा मुळात ( लिंगभेदविरहित) आनुवंशिक आजार असून तो दोन प्रकारे दिसू शकतो:
१. जन्मापासूनच प्रत्यक्ष आजार होणे अशा बालकांचे हिमोग्लोबिन कायमच कमी राहते आणि त्यांची शारीरिक वाढ प्रचंड खुंटते.

२. संबंधित व्यक्तीला आजार नसतो परंतु ती त्या दोषाची वाहक असते. जर अशा व्यक्तीची विशिष्ट रक्तचाचणी कधी केलीच नाही तर तो दोष असल्याचे समजणार देखील नाही.

भारतात दरवर्षी हा आजार असलेली सुमारे 10,000 बालके जन्माला येतात. तसेच निव्वळ हा दोषवाहक असलेल्या व्यक्तींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 3-17 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

या लेखाचा उद्देश या आजाराची सखोल माहिती देणे हा नाही. परंतु त्याचे गांभीर्य समजण्यासाठी अजून थोडी माहिती.
या आजाराचे उपचार खूप कटकटीचे आहेत.
सतत निरोगी माणसाचे रक्त संक्रमणाद्वारे घेणे इथपासून ते मूळ पेशी आणि जनुकीय उपचार इथपर्यंत त्यांची व्याप्ती आहे.
वारंवार रक्त संक्रमण घेतल्याने शरीराच्या मेंदू सकट सर्व महत्त्वाच्या इंद्रियांमध्ये लोह जमा होऊ लागते. ते काढण्यासाठी अजून औषधे घ्या....
एकंदरीत अशा रुग्णांचे आयुष्य दुःसह असते.
हे सर्व पाहता या आजाराची बालके जन्माला न येणे हे फार महत्त्वाचे आहे. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ.
....

तूर्त आपण माझ्या मित्राचा किस्सा पुढे नेऊ आणि त्या अनुषंगाने जे सामाजिक प्रश्न उपस्थित होतात त्यावर चर्चा करू.

त्या मुलीचे सर्व रिपोर्ट्स मी वाचले आणि त्यावर मनन केले. त्यानंतर मी माझ्या मित्राला अशी माहिती दिली :

१. त्या मुलीला जरी प्रत्यक्ष हा आजार नसला तरी ती त्या आजाराची वाहक आहे .
समजा, तिचा संभाव्य नवरा पण थॅलसिमियाचा दोषवाहक असेल, तर मग त्यांना होणाऱ्या मुलांमध्ये प्रत्यक्ष तो आजार होण्याची शक्यता असते. ती शक्यता प्रत्येक गरोदरपणात 25% राहते.

२. म्हणजेच, इथे आपल्याला मित्राच्या मुलाचीही हिमोग्लोबिन संदर्भातली ती विशिष्ट चाचणी करून बघावी लागेल. त्याचा जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार वैद्यकीय समुपदेशन घेता येईल.
जर जोडीदारांपैकी एकच वाहक असेल आणि दुसरा पूर्ण निरोगी, तर मग लग्न करायला हरकत नाही.
अशा जोडप्याला जन्मणाऱ्या मुलांमध्ये कोणालाच प्रत्यक्ष (मेजर) आजार नसतो. दोषवाहक संतती जन्मण्याची शक्यता 50% राहते.

झालं ! इथे माझे सल्ला देण्याचे काम संपले. तूर्त हे प्रकरण माझ्या नजरेआड आहे. माझा मित्र पुढे काय करणार आहे याची मला सध्या तरी कल्पना नाही.

चर्चेसाठी म्हणून आपण अशा प्रकरणातील संभाव्य शक्यता पाहू:
त्या मुलाची रक्तचाचणी केली गेली तर दोन शक्यता आहेत :
१. त्याचा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल येईल किंवा
२. त्याच्यातही तोच दोष निघेल.

समजा, तोच वाहकदोष या मुलात आढळलाय. आता प्रश्न असा आहे, की संबंधित मुलगा व मुलीने या विवाहाबाबत काय निर्णय घ्यावा?

१. निव्वळ थियरीनुसार पाहता या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर, त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करू नये असे देता येईल पण…..
२. समजा, मुलगा व मुलीला एकमेकांच्या बाकीच्या गोष्टी खूप आवडलेल्या आहेत आणि ते एकमेकाला पसंत आहेत. तर मग आजाराचे समान दोषवाहक या मुद्द्यावरून त्यांनी लग्न करू नये का ?

नैतिकदृष्ट्या आपण त्यांना एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला देऊ शकत नाही !

माझ्या वाचनानुसार भारतात विवाहपूर्व समुपदेशन आणि हा दोष आढळल्यास विवाहप्रतिबंध या संदर्भात कायदे नाहीत. थॅलसिमियाच्या संदर्भात सौदी अरेबियासारख्या देशात विवाहपूर्व चाचण्या करणे आणि समुपदेशन सक्तीचे आहे. परंतु समान दोषवाहक असूनही अनेक विवाहेच्छु मुले मुली एकमेकांशी लग्न करतातच.

या विषयाला एक महत्त्वाचा सामाजिक पदर देखील आहे. समजा, एखाद्या तरुण किंवा तरुणीमध्ये तो वाहकदोष आहे. त्याने किंवा तिने तो विवाहपूर्व उघड केला आणि तो पाहून अनेक जणांनी जर प्रथमदर्शनीच त्यांच्याशी लग्न करायला नकार दिला, तर त्याचे मानसिक परिणाम वाईट होतात. असे जर मोठ्या प्रमाणावर होऊ लागले तर त्याचे सामाजिक दुष्परिणामही होतील.

वरील उदाहरण आपण कल्पनेने पुढे नेऊ. त्या दोघांमध्येही समान दोष आढळला परंतु त्याची फिकीर न करता त्यांनी एकमेकांशी लग्न केलंय.
आता पुनरुत्पादन या संदर्भात त्यांना काय करता येईल ?

१. डोक्याला कुठलाच त्रास नको असेल तर मुले होऊ न देणे हा एक उपाय आहे ! समजा, तशीही त्यांची "डिंक" पद्धतीने सुखात राहायची तयारी असेल तर मग प्रश्नच मिटला. सुंठेवाचून खोकला गेला.

२.पण समजा तसे नाहीये. त्यांना स्वतःचीच मुले हवी आहेत. मग संबंधित स्त्री गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीत गर्भावरील काही गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागतील. त्यातून जर लक्षात आले की गर्भाला तो आजार नाही, तर चांगलेच. परंतु तो आजार असल्याचे लक्षात आले तर मग पुन्हा एकदा निर्णयाची गुंतागुंत निर्माण होईल- गर्भपात करण्यासंबंधी.

३. वरील परिस्थिती येऊ द्यायची नसल्यास कृत्रिम गर्भधारणा हा एक मार्ग सुचवता येतो. यामध्ये प्रयोगशाळेत गर्भनिर्मिती केली जाते. मग तंत्रज्ञानाच्या मदतीने, जेव्हां तो गर्भ दोषविरहित असल्याची खात्री होते तेव्हाच तो स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. अर्थात हे उपचार बरेच खर्चिक, कटकटीचे आणि मानसिक ताण वाढवणारे असतात. ते सर्वांनाच ते पसंत पडत नाहीत किंवा परवडत नाहीत.

अशा प्रकरणांमध्ये सुवर्णमध्य निघेल असा सल्ला काय देता येईल?
१. गरज पडल्यास वरील २ व ३ या गोष्टी करायच्या नसतील तर पुनरुत्पादनाच्या फंदात न पडता मूल दत्तक घेणे.

२. स्वतःचेच मूल हवे असल्यास अपत्यांची संख्या एकदम मर्यादित ठेवणे- शक्यतो एकच.

वैद्यकीय समुपदेशकांचा सल्ला ही या प्रश्नाची एक बाजू आहे. परंतु दुसऱ्या बाजूस पाहता समाज, संस्कृती, चालीरीती, रक्ताच्या नात्यांमधील विवाह, मानवी हक्क आणि व्यक्तीस्वातंत्र्य असे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार करून कायदे तयार करणे हे काम सोपे नसते.
……………..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे चांगला लेख डॉक्टर

नात्यातल्या एका लहान मुलाला Suggestive of Heterozygous Beta Thalassemia डीटेक्ट झालाय.
कृपया या बद्द्ल सांगाल का? हा आजार कितपत गंभीर आहे? यामुळे त्या बाळाला भविष्यात काही त्रास होऊ शकतो का?
या मुलाचेही हिमोग्लोबिन ९ च्या वर जात नसल्याने त्याच्या डॉक्टरांनी हि टेस्ट करुन घेतली होती अन त्यावर काही ईलाज नाही असे सांगीतले.

Suggestive of Heterozygous Beta Thalassemia >>>
heterozygous = thalassemia trait = thalassemia minor
यात सौम्य ते मध्यम anemia होतो.
हिमोग्लोबीन थोडे कमीच राहील. परंतु यासाठी उपचार घ्यायची गरज नसते.
थोडक्यात हा दोषवाहक झाला.

धन्यवाद डॉक्टर

या केसमध्ये लोहाची औषधे घेणे कितपत परिणाम कारक असते कृपया सांगाल का?

नाही, सरसकट लोह देऊन काही उपयोग होत नाही, कारण मुळात हा आजार आनुवंशिक आहे.

( कुपोषित बालकांच्या बाबतीत त्यांना स्वतंत्रपणे लोह कमतरता झाली आहे का हे बघावे लागेल. ते रक्ताच्या विशिष्ट तपासण्यांवरून लक्षात येते).

एक आठवड्यापूर्वी एमएससी मेडिकल बायोकेमिस्ट्रीची एक विद्यार्थिनी भेटून गेली, ती थॅलॅसेमिया व सिकेलसेल ऍनेमिया असे दोन रुग्णगट घेऊन नुट्रीएंट्स डेफिसिएंशीचा अभ्यास करणार आहे.

बावनकुळेसाहेब आपण शेजारी शेजारी आहोत
जेमतेम 52 पावलं अंतर आहे.
लोकसंख्या संस्थान आणि शताब्दी गोवंडी

थॅलॅसेमिया व सिकेलसेल ऍनेमिया असे दोन रुग्णगट घेऊन
>>>
चांगला आणि उपयुक्त विषय आहे.
थॅलसेमिया आणि सिकल्सेल आजार हे दोन्ही एकत्र असणारे रुग्ण सुद्धा असतात.

ब्लॅककॅट >>>> काही महीन्यांपूर्वी गोवंडीपासून 52000 पावले दूर एमजीएम आरोग्यविज्ञान विद्यापीठ, कामोठयाला बाओस्टॅटिस्टिशिएन कम ट्युटर म्हणून रूजू झालोय.
कुमार1 >>>> मी हीही शक्यता तिला सांगितली आहे. एमजीएमला थॅलसेमियाच्या नियमितपणे येणार्या रूग्णांची रजिस्ट्री आहे, त्यातून सगळी पडताळणी करूनच रूग्णगट तयार करू अशी माहिती भेटली.

छान लेख आणि प्रतिसादही...
आपल्याकडं ग्रामीण भागात हे सगळं गौण...त्यांना नावरुस जमणं म्हत्वाचं...

>>>नावरुस >>> शब्द छान आहे . नव्हता ऐकला.
अर्थ ?>>>>>
नावाचं अध्याक्षर राशीशी निगडित असतं....त्या अध्याक्षरावरुन विवाह‌ईच्छूक मुला, मुलींच्या कुंडल्या जुळतात का पाहणे.
एखादा/एखादी पसंत नसेल तर नावरुस जुळत नाही ही एक छान सबब असते सांगायला.

अज्ञान मध्येच सुख आहे
किती ही काळजी घेतली तरी कधी कोणता जीव घेणं रोग होईल ह्यांची शास्वती नाही.
काय काय शोधणार आणि कोणत्या कोणत्या रोगाची पूर्व सूचना मिळवण्याचा प्रयत्न करणार.
खूप प्रकार चे आजार आहेत.
मानवी शरीर म्हणजे एक गुढ आहे.
जेव्हा एकदा आजार होतो तेव्हा आपल्याला किती शरीर माहीत आहे ते समजत.
सर्व टेस्ट fail होतात.कोणत्याच टेस्ट खरी माहिती देत नाहीत .असतात फक्त अंदाज .आणि किचकट शक्यता.
त्या मुळे जास्त विचार न करता आहे ते आयुष्य सुखात जगा

कोणताही आजार ज्याला गंभीर ह्या श्रेणीत मोजले जाते
ते बरे करण्याची कुवत आज पण मेडिकल सायन्स मध्ये नाही.
फक्त दोन चार वर्ष आयुष्य खाटेवर झोपून ते वाढवू शकतात
ह्या पलीकडे काही करू शकत नाहीत.
जे किरकोळ आजार आहेत ते असेच बरे होतात.
गंभीर आजार असलेल्या व्यक्ती ल आत्महत्या करण्याचा पर्याय देणे हे सर्वात उत्तम
लोकांचे पैसे वाचतील,उपचार विषयी केली जाणारी पोपट पंची कोणी करणार नाही .
स्वतः त्या व्यक्ती चा त्रास वाचेल.
असे पण उपचार करून पण तो जगणार नसतो
.आणि जगला तरी अतिशय दुर्बल असतो.

असे नाही
नवीन Submitted by BLACKCAT on 1 August, 2022 - 16:32 >>>>> +१११११११
......
लेखाचा विषय थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन हा आहे.

भीर आजार असलेल्या व्यक्ती ल आत्महत्या करण्याचा पर्याय देणे हे सर्वात उत्तम
लोकांचे पैसे वाचतील,उपचार विषयी केली ,जाणारी पोपट पंची कोणी करणार नाही .>> अगदी चुकीचा विचार. हेमंत विचार बदलण्याची गरज नक्की आहे. कारण तुम्हाला अनुभव नसेल पण मनुष्य कधीही जगण्याची व क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करायचीच इच्छा बाळगतो व प्रयत्न करतो. चौथ्या स्टेज कॅन्सर पासुन पुढे नीट जगलेले व जगत असलेले सुद्धा अनेक लोक आहेत. असा फेटलिस्टिक विचार करु नका केल्यास इथे मांडताना विचार करा कोविड मधुन आपण बाहेर येत आहोत लोकांचे मनो धैर्य अजूनही नाजूकच आहे.

इथे निव्वळ प्रतिसाद वाचून, कोण कुणाचा डू.आय.डी. आहे, ते बरेच जण चटकन ओळखतात. मला ते कधीच जमले नाही, म्हणून मी निराशेने खचलो होतो.

पण आज हेमंत सरांचे पहिले वाक्य वाचताक्षणीच मला कळले की हा प्रतिसाद त्यांचा आहे. माझी प्रगती होत आहे. _/\_

अमा यांच्याशी सहमत.

कोविड मधुन आपण बाहेर येत आहोत लोकांचे मनो धैर्य अजूनही नाजूकच आहे.>>अशी लोक खुपच कमी असतील. आदरवाइज कोविड म्हणजे काय भाऊ अशी परिस्थिती आहे बाहेर. सगळीकडे गर्दी, ट्रफिक डोमेस्टिक एअरपोर्टला पिक टाइमला तर भेंडीबाजार असतो.

अशी लोक खुपच कमी असतील. आदरवाइज कोविड म्हणजे काय भाऊ अशी परिस्थिती आहे बाहेर. सगळीकडे गर्दी, ट्रफिक डोमेस्टिक एअरपोर्टला पिक टाइमला तर भेंडीबाजार असतो.>> असे वरून दिसते. पण घरात कोंडली गेलेली बालके. तरुणाई हे अगदी तरल मानसिकतेत आहेत. ही गर्दी म्हणता तो नॉर्मल जीवन ओर बाडून जगून घेण्याचा प्रकार आहे. कसे का असेना जीवन व चैतन्य हीच देणगी आहे. ती जपली पाहिजे संवर्धन केले पाहिजे.

गुड मेडिकेअर अवेलेबल आहे. त्याचा उपयोग करुन सहजीवन साध्य करून घेता आले वरील जोडप्याला तर काय वाइट. डि मोटिव्हेट करणॅ योग्य नाही.

>>>>हा आजार प्रथम भूमध्य समुद्रा भोवती राहणाऱ्या वसाहतींमध्ये आढळला होता. याव्यतिरिक्त तो आफ्रिका खंड, आखाती देश आणि भारतासह सार्क देशांमध्ये बर्यापैकी आढळतो.>>>
या भागात हा आजार जास्त असण्यामागे काय कारण असावे?

असे समुदाय इतरांपासून वेगळे रहात व आपापसात लग्न करीत असत.

मालदीवमध्येही हेच कारण असल्याने हा रोग तिकडे जास्त प्रमाणात आहे

एकमेकाशी नात्यात लग्न केल्या मुळे आनुवंशिक आजार वाढतात.
हां नियम फक्त माणसालाच का ?
अनेक प्राण्यात टोळ्या असतात आणि त्यांचे संबंध येवून नवीन पिढी तयार होते ते सर्व नात्यात च असतात.
तर माणूस सोडून बाकी कोणत्या प्राण्यात आनुवंशिक रोग वाढत आहेत असा अभ्यास आहे का?
निसर्गाचे नियम सर्वांना सामान असायला हवा

Proud

सर्वत्र सेमच नियम आहे हो. पण माकडाची मायबोली , वडाच्या झाडांची मायबोली असे काही नसल्याने आपणास समजत नाही

माणसामधील जेनेटिक्सचे नियम समजायला जर माणूसच वापरला असता तर 60 वर्षात तीनच पिढ्या झाल्या असत्या व तोवर प्रयोग करणारा शास्त्रज्ञच स्वाहा झाला असता.

म्हणून जीन्सचे नियम समजावून घेताना मेंडेलने वाटाणा हे झाड निवडले. कारण त्याच्या एकाच वर्षात तीन चार पिढ्या निघतात व नियम अभ्यासता येतात.

मग त्याने जे लिहून ठेवले ते माणसालाही लागू होते हे समजायला 60 वर्षे लागली.

नैसर्गिक रीत्या जे गर्भपात होतात ते बहुतांश जीव गंभीर जेनेटिक व्याधी असणारे असतात, म्हणून ते निसर्गाकडून नष्ट होतात.

व्याधी असल्या तरी प्राणी जगू शकेल इतपत सौम्य व्याधी असतील तर ते जीव जन्माला येतात

Pages