ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा

Submitted by सामो on 10 July, 2022 - 01:24

-अन्यत्र पूर्वप्रकाशित-
चित्राचा मूळ संदर्भ - https://en.wikipedia.org/wiki/Fran%C3%A7ois-%C3%89douard_Picot
------------------------------------
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा वाचनात आली. तिचा हा अनुवाद -

खूप पूर्वी पृथ्वीवर एक राजा रहात होता. राजाला ३ मुली होत्या. सर्वात जी धाकटी होती ती अत्यंत मोहक होती. तिचे नाव होते साइक. ती इतकी सुंदर होती की दूरदूरुन तिला पहाण्यासाठी लोकं येत आणि तिच्या सौंदर्याची स्तुती करत. ते म्हणत की साईक ही प्रत्यक्ष सौंदर्याची देवता अ‍ॅफ्रोडाइट पेक्षाही सुंदर आहे. अ‍ॅफ्रोडाइट ची साइकशी काय तुलना? अ‍ॅफ्रोडाइटचे दुसरे नाव व्हिनस.

यामुळे झाले काय, अ‍ॅफ्रोडाइट ची मंदिरे ओस पडू लागली, लोक तिची पूजा करेनासे झाले. अ‍ॅफ्रोडाइट ची झोप उडाली, तिला साइकचा दुस्वास वाटू लागला. मनातल्या मनात ती साइकविरुद्ध कट-कारस्थान रचू लागली.

अ‍ॅफ्रोडाइट चा मुलगा होता प्रत्यक्ष तीव्र कामवासनेचा देव. त्याचे नाव होते ईरॉस, ज्याला क्युपिड म्हणुन देखिल संबोधतात. ईरॉस हा सोनेरी, कुरळ्या केसांचा , सदैव बाणांचा भाता व धनुष्य घेऊन सुसज्ज असलेला देव जेव्हा कोणावर शरसंधान करीत असे ती त्याच्या बाणाने विद्ध व्यक्ती/प्राणी/पक्षी तत्काळ प्रेमात पडत असे.

अ‍ॅफ्रोडाइट ने एरॉसची मदत घेऊन , साइकचा काटा काढण्याचे ठरविले. तिने ईरॉसला साइक झोपेत असताना विद्ध करण्याचा हुकूम केला. इरॉसने विचारले पण झोपेत विद्ध करुन काय फायदा त्यावर अ‍ॅफ्रोडाइट उत्तरली की ती अशी व्यवस्था करेल की जेव्हा साइक जागी होईल तेव्हा तिची नजर अतिशय कुरुप, खुज्या, व्यंग असलेल्या व्यक्तीवर पडेल.

आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एरॉस रात्री साइकपाशी गेला. पण योगायोगाने त्याचा बाण त्यालाच टोचला आणि तो साइकच्या प्रेमात पडला.
.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLX9v_xHaga2o_xFC3gSmrimZDJ05QEkTrtS4c34QBN3tnMOVpT7zBHOfLwhKKcXcd4n5Sk15u7QS7eyV7UyoZhXBSz-7XzGCqT2Vfed10mv6j8W2aOcYOiw8KP_SfAH7W7yIzJeDMQiKmWGDoIHtzv68A=w783-h625-no?authuser=0

आता साइक ही एरॉसला, जगातील सर्वात मौल्यवान व्यक्ती वाटू लागली. आणि आईच्या हुकमाचे पालन न करण्याचे त्याने ठरविले. तो तीव्र कामवासनेचा देव असल्याने, तो अन्य कोणालाही साइकच्या प्रेमात पडू देई ना. आता साइकच्या प्रेमात कोणी मर्त्य व्यक्ती पडेचना. सर्व लोक फक्त दूरदूरुन तिच्या सौंदर्याची स्तुती करुन जाऊ लागले. साइकच्या अन्य बहीणी फारशा सुंदर नसूनही त्यांची लग्ने झाली पण साइक मात्र एकटी कुढू लागली.

शेवटी साइकचा पिता , राजा हा भविष्यवेत्त्या अपोलो कडे गेला. अपोलोने भयंकर भविष्य वर्तविले की साइकचा होणारा नवरा हा देवांपेक्षाही शक्तीशाली असा एक पंख असलेला सर्प असून तो तिला एका पर्वताच्या शिखरावरुन उडवून घेऊन जाइल तेव्हा तिला काळा वेश परीधान करण्यास सांगावा आणि शिखरावर एकटे सोडावे. साइकचे कुटुंबिय दु:खाच्या समुद्रात बुडून गेले. त्यांनी अपोलोने सांगीतल्याप्रमाणे साइकला शिखरावर एकटे सोडले.

साइक शोक करत होणार्‍या नवर्‍याची वाट पाहू लागली. ती अशीच एका रात्री रडत असतेवेळी पश्चिमेचा वारा, झेफायर तिच्यापाशी आला आणि तिला उडवून हिरव्या सुंदर गालीच्यावर, फुलांच्या राशीत , सुंदर वनराईने नटलेल्या प्रदेशात घेऊन गेला. त्याने तिचे दु:ख हलके करण्याचा खूप प्रयत्न केला आणि ती निद्राधीन झाल्यावर तो तिला देवनगरीत घेऊन गेला.

या नगरीत एरॉसने तिचे मधुर शब्दात, प्रेमाने स्वागत केले व स्वतःची ओळख दिली. तिला नाना तर्‍हेने खूष केले. पण एकच कमतरता होती ती ही की स्वतःच्या आईच्या भीतीमुळे एरॉस तिच्यापुढे कधीच प्रकट झाला नाही. त्याने तिला आनंद दिला, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला पण स्वतःला लपविले. साइक फार फार आनंदात होती आणि असेच दिवस जात होते. ती या ज्ञानावरच खूष होती की तिचा नवरा कोणी दुष्ट सर्प नाही.

पण नशीबाला हे सुख मान्य झाले नाही आणि झेफायर बरोबर एकदा तिच्या बहीणी आल्या. त्यांनी तिचे कान भरले की तिचा नवरा कोणीतरी कुरुप अथवा रोगट व्यक्ती असावा व त्यामुळे तो स्वतःला लपवित असावा. साइकने अनेक दिवस अस्वस्थतेत घालविले. शेवटी न राहवून एका रात्री तिने मेणबत्तीच्या प्रकाशात नवर्‍याला पहायचे ठरविले. पण त्याचा सुंदर मुखचंद्रमा पहात असतेवेळी चुकून थोडेसे मेण त्याच्यावर अर्थात इरॉसवर पडून, इरॉस जागा झाला. त्याने अवाक्षर न बोलता अंधार्‍या आकाशात झेप घेतली. आता पश्चात्तपदग्ध साइक त्याच्याकडे धावली पण अंधारात तिला एवढेच शब्द ऐकू आले की "जेथे अविश्वास असतो तेथे प्रेम नसते."

व्याकुळ साइकने ठरविले की काहीही झाले तरी ती त्याचे प्रेम परत मिळवणारच. ती अ‍ॅफ्रोडाईट कडे गेली व तिने तिला मदतीची विनंती केली. अ‍ॅफ्रोडाइटला सूड घेण्याची आयतीच संधी चालून आली. ती साइकला म्हणाली की "मी तुला ३ कामे सांगीन. ती जर तू यशस्वीरीत्या पार पाडलीस तर तुला एरॉस प्राप्त होईल मात्र एकही काम चुकले तर तू त्याच्या प्रेमाला कायमची मुकशील". साइकने मान्य केले.

पहीले काम - अ‍ॅफ्रोडाइटने बर्‍याच लहान धान्याचा सकाळी एकत्र ढीग बनविला. जसे नाचणी, मोहरी, तीळ,गहू वगैरे एकत्र केलेआ ढीग तिने साइकपुढे ठेवला व तिला ते धान्य दुपारच्या आत वेगळे करावयास फर्मावले. साइक चिंतातुर मनस्थितीत बसली असताना तेथून काही मुंग्या जात होत्या. त्यांना साइकचे मन कळले व त्यांनी तिची मदत करावयाचे ठरविले.दुपारच्या आत सर्व धान्य वेगळे वेगळे झाले.

दुसरे काम - सोनेरी दोरे बनविण्याकरता, साइकने एका महाभयंकर व नरभक्षक प्राण्याच्या अंगावरील लोकर काढून आणावेत. हे काम फक्त जोखमीचे नव्हे तर प्राणघातक असल्याने, अशक्यच होते. परंतु त्या जाळीतल्या, एका पोपटी तजेलदार रोपाच्या सांगण्यानुसार, सायंकाळ होइपर्यंत साईक थांबली. व सायंकाळी जेव्हा थकून भागून, तो प्राणी झोपला, तेव्हा तिने पटापट लोकर गोळा केली. अशा रीतीने, दुसरे काम साध्य झाले.

तिसरे काम - आता अ‍ॅफ्रोडाइट चिदली व तिने साइकला अधिक अवघड काम देण्याचा निश्चय केला. तिने साइकला "एस्टीज" या डोंगरदरीतून बेफाम वहाणार्‍या नदीचे पाणी आणन्यास फर्मावले. साइक पाणी आणन्यास निघाली. लवकरच तिला कळून चुकले की काम अवघडच नाही तर अतिशय धोकादायक आहे. निसरड्या दगडांवरुन घसरुन कपाळमोक्ष होण्याची संभावना पुरेपूर आहे. केवळ पंखधारी व्यक्ती अथवा प्राणी हे काम करु शकेल. तेथून एक गरुड जात होता त्याला साइकची दया आली व त्याने तिला एका कुपीत पाणी भरुन आणून दिले. अशा रीतीने साइक दुसर्‍या कामातही यशस्वी झाली.

चवथे काम - आता अ‍ॅफ्रोडाइटच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली व तिने अजून अवघड काम देण्याचा घाट घातला. तिने एक कुपी साइकला दिली व पाताळाच्या पर्सिफन राणीचे थोडे सौंदर्य त्या आणायची आज्ञा केली. साइक या कामगिरीवर निघाली असता तिला मृत लोकांचा अंधारा प्रदेश लागला. साइकने एका नावाड्याला विनंती केली आणि नवल म्हणजे त्या नावाड्याने मोठ्या कौशल्याने तिला पर्सिफन राणीच्या राजवाड्यापर्यंत पोचविले. साइक न घाबरता पर्सिफन राणीपाशी गेली व तिला थेंबभर सौंदर्य कुपीत टाकायची विनंती केली. आश्चर्य म्हणजे पर्सिफन राणीने ती मान्य केली व साइक ती कुपी अ‍ॅफ्रोडाइट कडे घेऊन आली.

आता मात्र अ‍ॅफ्रोडाइट रागाने वेडीपिशी झाली व किंचाळत म्हणाली "तू कशी इरॉस ला भेटते ते मी बघतेच. तुला जन्मभर माझी दासी बनावे लागेल." इतका वेळ अन्य देव हा अन्याय पहात होते ते आता साइकच्या मदतीस धावले व त्यांनी इरॉसला सर्व कहाणी सांगीतली. इरॉस चे हृदय द्रवले आणि तो तत्काळ साइकला भेटला. देवांचा राजा झिअस याने साइकला अमृत दिले व साइक आता तिच्या प्रियकरासमवेत आकाशात राहू लागली. लवकरच पृथ्वीवरील लोक तिला विसरले व परत पूर्ववत अ‍ॅफ्रोडाइट्ची पूजा करु लागले. अशा रीतीने सारे काही आलबेल झाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@वर्षा,
>>>>>या नगरीत एरॉसने तिचे मधुर शब्दात, प्रेमाने स्वागत केले व स्वतःची ओळख दिली. तिला नाना तर्‍हेने खूष केले. पण एकच कमतरता होती ती ही की स्वतःच्या आईच्या भीतीमुळे एरॉस तिच्यापुढे कधीच प्रकट झाला नाही.

स्वतःच्या आईच्या भीतीमुळे एरॉस तिच्यापुढे कधीच प्रकट झाला नाही.>> कोणत्याही बाप्यास आई समोर असली की बायको बरोबर रोमेंटिक वागता येत नाही. वैश्विक आहे हे. त्याचे मूळ इथे आहे. व सासू सून मध्यील सनातन संघर्ष म्हणूनच असतो. मुलगा मोठा झाला आहे व तो दुसर्‍या स्त्रीवर वेगळ्या प्रकारे अनुरक्त होतो हे आई सहन करू शकत नाही. मधल्यामध्ये सुनेला त्रास.

मेलं परदेशातही तेच.>>> Happy
'मलेफिसंट 2' (अँजेलिना जोली व मिशेल फायफर असल्यावर दुसरं काय होणार म्हणा. Wink ) तर विहिणींच्या भांडणावरच बेतलेला चित्रपट आहे. या कथेत तर फक्त सासू आहे तर एवढं ग्रीक पुराण झालं. हे त्यांचं 'चातुर्मास' व्हर्जन वाटतंय.

छान कथा.

<< ती साइकला म्हणाली की "मी तुला ३ कामे सांगीन. >>
प्रत्यक्षात ४ कामे केल्याचे लिहिले आहे.

अशा रीतीने साइक दुसर्‍या तिसऱ्या कामातही यशस्वी झाली.

अनुवाद छान आहे. आपल्याकडेही सावत्र राजकन्येला किंवा राजकुमाराला त्यांच्या त्यांच्या आवडत्या कुमार किंवा कन्यकांशी लग्न करायचे असेल तर सावत्र आई अशीच कठीण कठीण कामे सांगे.

प्रत्यक्षात ४ कामे केल्याचे लिहिले आहे.>> अरे स्वयंपाक कर म्हणून सांगतात नंतर ओटा साफ करणे अपेक्षितच आहे. चौथे मोठे काम. माझी सासूतर मोलकरणीने घासुन आणून ठेवलेली भांडी परत विसळायला लावायची.

Pages