म्हणे हर्पा, करितो वारी

Submitted by हरचंद पालव on 10 July, 2022 - 00:54

चला पंढरीला जाऊ
पांडुरंग डोळां पाहू,
विठूराय डोळां पाहू ||

गाऊ चंद्रभागातीरी
टाळ-मृदुंग गजरी ||

संत-सज्जनांचा मेळा
थोर आनंद सोहळा ||

पहा पहा आला क्षण
देत विठूराय दर्शन ||

तोचि पुण्यपर्वकाळ
घोष विठूनामावळ ||

शीण जन्मांतरिचा जाई
भक्त-भाव एकचि होई ||

काहि नुरे मी-तू-पण
होय विठूमय मन ||

विठूनामाचाचि ध्यास
विठू भारे अवघा श्वास ||

बाह्य देह पंढरपुर,
पांडुरंग अभ्यंतर ||

म्हणे हर्पा, करितो वारी -
कल्पनेने घेत भरारी ||

Group content visibility: 
Use group defaults

ही भक्तीभावाची भरारी
कल्पांता लिलया पार करी...
रामकृष्ण हरी....
खूप सुरेख..

छान कविता.
हबाच्या अशा कवितांची आठवण झाली.