क्रिप्टो ( Crypto ) भाग -२०

Submitted by मिलिंद महांगडे on 16 June, 2022 - 09:58

₿₿₿

सायबर क्राईमची टीम पुन्हा आपल्या पोलीस स्टेशनला आली. अमर , सौदामिनी आणि तिचा असिस्टंट चिकटे वाघचौरे साहेबांच्या केबिनमध्ये बसले होते. वाघचौरे साहेबांनी त्याच्या ड्रॉवरमधून सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यांनी एक सिगारेट पेटवली. जेव्हापासून हे ओमी मिरचंदानीचं प्रकरण सुरू झालं, तेव्हापासून त्यांचं सिगारेट ओढण्याचं प्रमाण वाढलं होतं . वाघचौरे साहेब रिटायरमेंटला आले होते. उरलेले दिवस शांततेत जावेत अशी त्यांची इच्छा होती , पण ह्या केसमुळे त्यांची रात्रीची झोपही उडाली होती . मिडियामुळे या केसला खूपच ग्लॅमर आलं होतं. न्युज चॅनलवाले तिखट मीठ लावून बातम्या सांगत होते , आणि लोक चवीने बघत होते. काही न्यूज चॅनलवाले स्वतःच तर्क वितर्क करून या केसमध्ये पुढे काय होईल , किंवा इतर शक्यता काय असतील याचे विवेचन करण्यात गुंग होते. आताही वाघचौरे साहेबांच्या केबिनमध्ये टीव्हीवरच्या न्यूजचॅनलवर तीच बातमी होती . बातम्या सांगणारी अँकर जोरजोरात ओरडून ओमी मिरचंदानी जिवंत असून तो कुठे लपून बसला असावा याबाबत माहिती सांगत होती.
" बंद करा तो टीव्ही ! च्यायला… " , वाघचौरे साहेब वैतागले. हातातली सिगारेट खिडकीच्या काचेवर विझवून ती सिगारेट रागाने बाहेर फेकून दिली. अमर निमूटपणे उठला आणि टीव्ही बंद केला . काही क्षण केबिनमध्ये गूढ शांतता पसरली. साहेब चिडले असल्याने सर्वजण शांतपणे बसले होते.
" सर तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण लवकरच काहीतरी शोधून काढू. ", सौदामिनी मॅडम म्हणाल्या. वाघचौरे सरांनी एकदा त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिलं
" तुम्ही हा मोबाईल आणि लॅपटॉप ,किती दिवसांत ओपन करू शकाल मॅडम ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं , त्यावर त्यांनी त्यांच्या असिस्टंट चिकटे यांच्याकडे पाहिलं . चिकटे त्यांच्या कानाशी लागला .
" सर , आम्ही पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करू . " ,त्या म्हणाल्या .
" पंधरा दिवस ? मॅडम ही खूप सेन्सिटिव्ह केस झालीय , इतका वेळ लावून नाही चालणार , एका आठवड्यात मला रिपोर्ट करा . तुम्हाला जमत नसेल तर आमच्या टीमकडे द्या तो लॅपटॉप आणि मोबाईल. " , वाघचौरे साहेबांनी आदेश दिला .
" ठीक आहे सर , आम्ही प्रयत्न करू ." असं म्हणत सौदामिनी मॅडम आणि चिकटे उठले आणि केबिनबाहेर पडले.
" अमर, तुला काय वाटतं ? ही रागिणी बोलतेय ते खरं असेल का ? " , वाघचौरे साहेबांनी पुन्हा एक सिगारेट पेटवली.
" काहीच कळत नाही सर , एकीकडे तिच्यावरच संशय जातोय , पण आपल्या हातात तसा काही ठोस पुरावा नाही . ओमी मिरचंदानीचा मृत्यू झालाय की खून हेही कळायला मार्ग नाही , पण लेह मधल्या हॉस्पिटलच्या रेकॉर्डवरून तर कळतंय की ओमी मिरचंदानी मेला आहे हे मात्र नक्की ! आणि आज हा ओमी मिरचंदानी जिवंत असल्याचा मेल आला . मला असं वाटतंय की हा जो मेल आलाय तो आपली तपासाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न आहे . " , अमरने त्याचं मत मांडलं .
" पण कोण करेल हे ? आणि कशाला ? " , वाघचौरे साहेब सिगारेटचा झुरका घेत म्हणाले .
" तेच तर कळत नाही . त्या मेलचा ट्रेस लागत नाही . "
" मला वाटतंय की आपण काहीतरी मिस करतोय , काहीतरी आहे जे आपल्या लक्षात येत नाही. " , वाघचौरे साहेब विचार करीत म्हणाले.
" म्हणजे काय सर ? "
" मला त्या रागिणीशिवाय आणखी एकावर संशय येतोय , ज्या पद्धतीने तिने लग्न केलं , लगेच ओमीचं मृत्यपत्र बनवलं , हनिमूनला लडाखला एखादा निर्जन रेस्टॉरंटमध्ये राहिले , तिथे ओमी मेला किंवा मारला गेला आणि त्याचे अंतिम संस्कार सुद्धा तिथेच झाले ? हे सगळं रागिणीने एकटीने केलंय असं मला वाटत नाही. सारखं मला असं वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये तिला कोणाचीतरी मदत झाली आहे. किंवा तिने हे कोणाच्या तरी मदतीने केलं आहे . " , वाघचौरे साहेब सिगारेटचा धूर वर हवेत सोडत म्हणाले.
" तिचा वकील , मेघनाद निशाणदार ? " , अमरने विचारलं .
" येस्स ! तुलाही वाटतंय ना की त्याचा हात असू शकतो ह्यात ? "
" हो सर ! मिसेस रागिणी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या , त्यावेळी तो आला होता , तेव्हा खिडकीतून चुकून माझी नजर गेली तेव्हा बेशुद्धावस्थेत पडलेल्या रागिणीचा हात त्याने हातात घेतलेला मी पाहिला होता. आता त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटत असेल, किंवा त्या दोघांचं काहीतरी असेल तेव्हाच त्याने हे केलं असावं . "
" हम्म … बरोबर ! मृत्युपत्र सुद्धा त्या वकील मेघनाद निशाणदारनेच करायला सांगितलं असणार ! पण एक प्रश्न आहे , तो ओमी आपल्या अस्थी सिंधू नदीत अर्पण कराव्यात असं का लिहिल ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" मला तर हे एकूण मृत्यपत्र प्रकरणच खोटं वाटतंय ! या दोघांनी फसवून मृत्युपत्रावर ओमी मिरचंदानीच्या सह्या घेतल्या नसतील कशावरून ? या जगात असा कोण आहे की लग्न झाल्यावर लगेच मृत्युपत्र बनवेल ? " , अमरने योग्य मुद्दा मांडला.
" येस ! असंच काहीतरी झालं असणार … ओमी मिरचंदानीला सुद्धा कदाचित या प्रकरणाची कुणकुण लागली असणार , त्यामुळे त्याने सगळे बिटकॉईन एका कोल्ड वॉलेटमध्ये लपवून ठेवले. पण ते कोल्ड वॉलेट कुठे हे आपल्याला शोधावं लागणार आहे. "
" बरोबर आहे सर , कदाचित ते दोघेही याचा शोध घेत असतील . या दोघांनी संपत्तीच्या हव्यासापोटी ओमी मिरचंदानीला मारलं असणार ."
" त्या रागिणीने सांगितलं नाही का , फॉर सिक्युरिटी रिझन , ओमी मिरचंदानी त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलचा पासवर्ड सारखा बदलायचा ! त्याला त्याच्या बायकोवर संशय होता की काय ? "
" शक्यता आहे सर "
" ओमी मिरचंदानी आणि रागिणी यांचे संबंध कसे होते याची माहिती घ्यायला हवी . "
" हो सर, त्यांचे संबंध फार चांगले नसावेत , एकतर तो ओमी मिरचंदानी दिसायला फार चांगला नाही , त्यात त्याला टक्कल पडलं होतं , आणि त्याच्या उलट रागिणीकडे बघा ! एखाद्या फिल्मची हिरोईन शोभते . ह्या दोघांचं कसं काय जुळलं असेल ? "
" पैसा ! बाबा पैसा … हा पैसा खूप काही गोष्टी करायला भाग पाडतो. तू तिला ओमी मिरचंदानीबरोबर जास्त फोटोज नाहीत असं विचारल्यावर ती चिडली होती थोडीशी . तिने नाईलाजाने पैशांसाठीच त्याच्याशी लग्न केलंय असं वाटतंय. " वाघचौरे साहेब हे बोलत असतानाच एक हवालदार वाघचौरे साहेबांच्या केबिन मध्ये आला आणि त्याने बाहेर वकील निशाणदार आले असल्याची वर्दी दिली.
“ हा कसा काय आला साहेब ? ”, अमरने आश्चर्याने विचारलं.
“ मीच बोलावलंय त्याला . "
" पण सर , आत्ताच आपलं डिस्कशन झालं ना , तो एक संशयित आहे , त्याला असं डायरेक्ट कशाला बोलावलं ? तो आणखी सतर्क व्हायचा. " , अमरने आपली शंका बोलून दाखवली.
" मुद्दामच बोलवलंय त्याला. त्याच्याशी समोरासमोर बोलल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. कधीकधी गुन्हेगार अति हुशारीने वागण्याच्या नादात चुका करून बसतो . बघूया , हा मेघनाद किती हुशार आहे ते ! "
" येस सर ! " , अमर म्हणाला.
" एका तासाने पाठव त्याला आत , आता लगेच नको . ”, वाघचौरे साहेब सिगारेट एशट्रेमध्ये विझवत हवालदाराला म्हणाले. अमरने त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. “ बसू देत जरा त्याला ताटकळत … ” वाघचौरे साहेब मिश्किल चेहऱ्याने म्हणाले. अमरचा चेहरा खुलला .

₿₿₿

दीड तास झाला तरी वकील मेघनाद निशाणदार अजूनही पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या एका बाकड्यावर बसून होता. त्याने अंगावर काळा कोट घातला होता , बाहेर बसून त्याला गरम होऊ लागलं तसं त्याने कोट काढून मांडीवर ठेवला . पांढऱ्याशुभ्र शर्टाच्या हाताच्या बाह्या त्याने कोपरापर्यंत वर दुमडल्या. कपाळावर जमा झालेला घाम त्याने रुमालाने टिपून घेतला . वकील मेघनाद निशाणदार जवळपास तीस बत्तीस वयाचा तरुण होता , वर्ण गव्हाळ , बारीक कोरलेली दाढी आणि मिशी त्याच्या चेहऱ्याला शोभून दिसत होती , डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा त्यातून काहीसा निळसर रंग परावर्तित होत होता. ओमी मिरचंदानीचा वकील असल्याने वाघचौरे साहेबांनी त्याला भेटायला बोलावलं होतं. आपल्याला चौकशीसाठी पोलीस बोलावून घेणार याचा त्याला आधीच अंदाज आला होता. पण आता जवळपास दोन तास व्हायला आले होते तरी तो बाहेरच्या बाकड्यावर बसून होता. त्याने दोन तीन वेळा हवालदारामार्फत तो आला असल्याचा निरोप आत पाठवला , परंतु साहेब मीटिंगमध्ये आहेत थोडा वेळ थांबा असंच त्याला सांगण्यात येत होतं. पोलीस स्टेशनमधलं वातावरण म्हणजे नेहमीच धामधुमीचं असतं , कोणी तक्रार घेऊन आलंय , कुठे मारामारी झालीय आणि डोकी फुटलेली दोन्ही पार्टीचे लोक जमा झालेत , पोलीस काही जणांवर खेकसतायत , आरोपीना इकडून तिकडे नेलं जातंय , आतल्या काही खोल्यांतून फटके दिल्याचे आणि त्यामागून ओरडण्याचे आवाज येतायत , असं सगळं चालू होतं . आताही त्याच्या बाजूला बाकड्यावर दारू प्यायलेला एक आरोपी पोलिसांनी आणून बसवला होता . दारूचा वास काही त्याला सहन होईना , त्याच्याही सहनशक्तीचा आता अंत झाला होता . आपल्या वेळेला काही किंमत आहे की नाही , आपण काय कोणी असे तसे आहोत , की कोणी आरोपी आहोत जे आपल्याला असं दोन दोन तास उगाच बसवून ठेवलंय ते ? त्याने घड्याळात पाहिलं, दुपारचा एक वाजला होता ,आता फक्त पंधरा मिनिटे वाट बघायची . आतून निरोप आला नाही तर सव्वा वाजता आपण सरळ निघून जायचं , मग काय होईल ते होईल त्याने मनाशी ठरवलं . इतक्यात त्याला सब इन्स्पेक्टर अमर शेजारून जाताना दिसला.
" अमर साहेब , इकडे इकडे …. " म्हणत त्याने त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला .
" वकील साहेब , तुम्ही ? इकडे काय काम काढलं ? " , त्याने काहीच माहीत नसल्यासारखं साळसूदपणे विचारलं .
" तुमच्याच साहेबांनी बोलावलंय मला , आता दोन तास झाले मी बसलोय , जरा एकदा विचाराना त्यांना . बिझी असतील तर नंतर कधीतरी बोलवा म्हणावं , मला एका क्लायंटला भेटायला जायचं होतं. "
" हो का ? थांबा मी विचारून येतो . ", म्हणत अमर वाघचौरे साहेबांच्या केबिनमध्ये गेला . थोड्या वेळाने आला आणि म्हणाला , " चला , साहेबांनी बोलावलं आहे . "
" थँक्स बरं का… " म्हणत ते दोघे आत केबिनमध्ये गेले.
" सॉरी ,सॉरी वकील साहेब , तुम्हाला जरा थांबावं लागलं . बसा बसा … काय घेणार तुम्ही ? चहा की कॉफी ? " वाघचौरे साहेब दिलगिरी व्यक्त करत म्हणाले.
" नाही , काही नको प्लिज … ", मेघनाद म्हणाला .
" तुम्ही रागावलात बहुतेक … ", वाघचौरे साहेब त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत म्हणाले .
" नाही , तसं काही नाही . थोडा उशीर झाला . मला एका ठिकाणी जायचं होतं . "
" ठीक आहे , लेमन टी सांगतो , सगळ्यांसाठी … " म्हणत त्यांनी चहावाल्याला फोन देखील केला . मेघनाद काहीच बोलू शकला नाही .
" तर वकील साहेब , तुम्हाला आमच्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो . मला थोडी माहिती हवी होती तुमच्याकडून. " वाघचौरे साहेब असं म्हणाले आणि मेघनाद खुर्चीत सावरून बसला.
" बोला ना , काय माहिती हवीय ? "
" तुम्ही ओमी मिरचंदानी यांना कधीपासून ओळखता ? "
“ तसं फार काही नाही … मागच्या तीन चार वर्षांपासून ”, मेघनाद चष्मा नाकावर व्यवस्थित बसवत म्हणाला.
“ त्यांचे इतर कोणी नातेवाईक आहेत का ? ”
“ माझ्या माहितीत तर कोणी नाहीत. ”
“ त्यांच्या बिझनेसबद्दल माहिती असेल ना तुम्हाला ? ”, वाघचौरे साहेबांनी विचारलं.
“ थोडं फार माहित आहे. बिझनेसमधल्या लीगल इश्यूसंदर्भातच आमचं बोलणं होत होतं. बाकी ते एक्स्चेंज, बिटकॉइन वगैरे बद्दल फार माहीत नाही , थोडं टेक्निकल आहे ना , त्यामुळे … ”
“ येस … येस … बरोबर आहे. बरं मला सांगा , त्यांनी बिटकॉइन साठवलेलं कोल्ड वॉलेट कुठे ठेवलं असावं असं तुम्हाला वाटतं ? ”
“ ते काही माहीत नाही साहेब. ”, मेघनादने नकारार्थी मान हलवली. इतक्यात लेमन टी घेऊन एकजण केबिनमध्ये आला.
“ वकील साहेब , घ्या ”
“ थँक्स ”, म्हणत त्याने कप उचलला.
“ ओके , मला सांगा , मिसेस रागिणी आणि ओमी मिरचंदानी यांचे संबंध कसे होते ? ”, वाघचौरे साहेब मेघनादच्या डोळ्यांत बघत म्हणाले. अमर बाजूला बसून त्याची देहबोली निरखत होता.
“ कुठल्याही सामान्य नवरा बायकोचे असतात तसेच होते. ”, मेघनाद लेमन टी चा कप तोंडाला लावत सहजपणे म्हणाला.
“ त्यांच्यात काही भांडण , किंवा मतभेद झाल्याचं कधी तुमच्या कानावर आलं होतं का ? ”
“ नवरा बायकोमध्ये थोडंफार होतंच ना साहेब … एक गोष्ट मला आठवतेय , ओमी सरांचे केस थोडे कमी होते , त्यामुळे मग रागिणी मॅडम त्यांना विग लावण्यासाठी मागे लागल्या होत्या. ओमी सरांना ते काही आवडत नव्हतं. पण मग रागिणी मॅडमच्या हट्टापायी त्यांना विग लावावा लागला. अशाच छोट्या मोठ्या कुरबुरी होत राहतात. ”, मेघनाद बोलून गेला.
“ त्यांचं दोघांचं लग्न कसं जुळलं ? लव कि अरेंज ? ”
“ ते एवढं काही माहिती नाही साहेब. ”
“ मिसेस रागिणी कधी तुम्हाला त्यांच्या मिस्टरांबद्दल बोलल्या होत्या का ? ”, अमरने मधेच विचारलं. त्यावर मेघनाद थोडासा गोंधळला.
“ म्हणजे ? कशाबद्दल ? मला नाही समजलं . ”
“ हेच कि मिसेस रागिणी यांनी ओमी मिरचंदानी यांच्याबद्दल कधी तुमच्याकडे त्यांचे मतभेद झाल्याबाबत किंवा त्यांच्याबाबत तक्रार केली होती का ? ”
“ नाही … मला तरी तसं काही आठवत नाही. ”, मेघनाद चष्मा नीट करत म्हणाला.
“ तुमचे आणि मिसेस रागिणी यांचे संबंध कसे आहेत ? ”, अमर त्याला उकसवायचा प्रयत्न करू लागला.
“ ओमी मिरचंदानी माझे क्लायंट होते , तशाच मिसेस रागिणीही आहेत. त्यांना कायदेशीर जी काही मदत लागते , ती मी करतो. ”, मेघनाद शांत राहून उत्तरे देत होता.
“ ओमी मिरचंदानी यांचे मृत्युपत्र आपणच तयार केलं असेल ना ? ”
“ हो , मीच केलं . ”
“ लग्न झाल्यानंतर लगेच मृत्युपत्र कोणी का करेल ? काय कारण असावं ? ”, वाघचौरे साहेबांनी विचारलं.
” तुम्हाला खोटं वाटेल साहेब , त्यावेळी माझ्याही मनात तोच विचार आला होता. मी विचारलं पण होतं त्यांना तसं , पण त्यांनी फक्त स्माईल केलं . पुढे काही बोलले नाहीत. त्यांनी जसं मृत्यपत्र करायला सांगितलं , तसं मी केलं. ”, मेघनाद म्हणाला.
“ त्यांच्या या मृत्युपत्राबद्दल मिसेस रागिणींना माहिती होती का ? ”, अमरने विचारलं.
“ आधी नव्हती. कदाचित ओमी सरांनी त्यांना नंतर ही गोष्ट त्यांना सांगितली असणार . कारण ओमी सरांच्या मृत्यूनंतर मिसेस रागिणी मॅमनी मला त्यांच्या विल संदर्भात विचारणा केली होती. पण त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही , कारण एका मोठ्या एक्स्चेंजच्या मालकाचा मृत्यू झाल्यावर पुढचे लीगल इश्यू सांभाळणं गरजेचं होतं. ”
“ ठीक आहे. थँक्स फॉर दि इन्फॉर्मेशन . आपल्याला थांबावं लागलं त्याबद्दल सॉरी. तुम्ही येऊ शकता. ”, वाघचौरे साहेब म्हणाले.
“ ओह ! मेन्शन नॉट सर . पोलिसांना मदत करणे आमचं कर्तव्यच आहे. येऊ मी . अँड थँक्स फॉर दि लेमन टी ! ” मेघनाद पोलीस स्टेशन मधून बाहेर पडला. आपल्या कार मध्ये बसला , कार स्टार्ट केली. थोडं पुढं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं कि आपला कोणीतरी पाठलाग करतंय. त्याने खिशातून फोन काढला आणि दुसऱ्या नंबरवरून रागिणीला फोन केला.
" आताच्या आत्ता तुझ्या त्या म्हाताऱ्या नोकराला काढून टाक "

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users