क्रिप्टो ( Crypto) भाग - १७

Submitted by मिलिंद महांगडे on 7 June, 2022 - 00:21

₿₿₿

सकाळचे साडे नऊ वाजले तरी जयसिंग बिछान्यात तसाच पडून होता. त्याला उठावंसं वाटेना. काय करायचं उठून ? आता सगळं संपल्यात जमा होतं. ज्याच्या भरवशावर पैसे टाकले होते त्या टोनीचेही पैसे बिटकॉईन मध्ये बुडाले होते. आता पुढे काय ? सर्वत्र अंधार दिसत होता. आता सुहासिनीताई आणि प्रतापरावांना कोणत्या तोंडाने सांगायचं कि सगळे पैसे बुडाले म्हणून ? जसजसा तो जास्त विचार करू लागला तसतसा त्याला आणखीन अस्वस्थ वाटू लागलं. यमुना आत आली त्यावेळी तो डोळे सताड उघडे ठेऊन वर बघत होता.
“ काय हो , आज उठायचं नाही का ? ” , तिने विचारलं.
“ इच्छाच नाही गं . उठून तरी काय करू ? ”, निराश झालेला जयसिंग म्हणाला.
“ उठा , अंघोळ करून घ्या. मी नाष्टा केलाय . तुमच्या आवडीचा उपमा केलाय. चला उठा … ”
“ मला काही खावंसं वाटेना . नको मला काही . ”
“ असं काय करताय ? चला उठा . ” , तिने बळजबरीने त्याला उठवलं. अंघोळ वगैरे करून तो हॉलमध्ये येऊन बसला. यमुनेने गरमागरम उपम्याची डिश त्याच्या हाती दिली. त्याची अन्नावरची वासना उडून गेली होती. उपमा त्याच्या आवडीचा , पण एखादं औषध खावं तसं तो ते खाऊ लागला. यमुनेला त्याची दया आली. वाघासारखा आपला नवरा आता मांजर होऊन बसला होता. त्याला धीर देणं गरजेचं आहे असं तिला वाटू लागलं. ती म्हणाली , “ तुम्ही काही काळजी करू नका . थोडे दिवस थांबा . सगळं नीट होईल. ” त्यावर तो काहीच बोलला नाही . निमूटपणे समोरचा उपमा पोटात ढकलू लागला. “ काय झालं ? ”
“ कसंल डोंबलाचं ठीक होणारे ? २० कोट रुपये आपल्या बापजन्मात तरी कमावता येणार आहेत काय ? मला तर आता लय टेन्शन यायला लागलंय. ताईला कोणत्या तोंडाने सांगायचं ? ” , हातातली उपम्याची डिश त्याने तशीच बाजूला ठेऊन दिली.
“ मी काय म्हणते, थोडे दिवस थांबा. कदाचित तुमचे पैसे परत मिळाले तर त्यांना काही सांगायची गरजच पडणार नाही. ”
“ आपल्याकड एकदा बंद झालेली कंपनी परत सुरु होती का ? कायबी आशा लावू नकोस . ते बिटकॉईन म्हणजे फ्रॉडच असणार. त्यात त्यो कंपनीचा मालक मेला. ती कंपनी बंद पडली , आता ते पैसे डुबले असंच समज . अगं ज्याच्या सांगण्यावरून लावले होते पैसे , त्याचेबी गेलेत. त्याचे तर खायचे प्यायचे वांदे झालेत … ”,जयसिंग असं म्हणाला आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने बघितलं तर टोनीचाच फोन होता. “ बघ , शंभर वर्षे मरणार नाय ह्यो टोन्या … ”
“ पण तो का फोन करतोय तुम्हाला ? ”
“ आता मला काय माहित ? फोन घेतल्याशिवाय कसं कळंल ? फोन तर घेऊ दे … ”, म्हणत त्याने टोनीचा फोन घेतला. " बोला टोनी भाऊ ….. काय ? …. काय सांगता ! ….. तुमाला कोणी सांगितलं हे ? ….. रिपोर्टर ? कोण रिपोर्टर ? …..खरं हाय का पण ? बरं बरं … मी निघतो . येतो . " , म्हणत तो घाईघाईने उठून कपडे घालू लागला.
“ काय हो ? काय झालं एवढं ? आणि कुठं चाललाय एवढ्या घाईत ? ”, यमुना आश्चर्याने त्याला विचारत होती. पण त्याचं लक्षच नव्हतं. त्याने लगेच झिपऱ्याला फोन लावला.
“ हॅलो , कुठं हायस ? आपल्याला जायचंय . लगीच ये … आश्शील तसा … ”
“ मला सांगाल का , काय झालं ते ? ” यमुनेने पुन्हा विचारलं.
“अगं , त्या टोनीचा फोन होता . ”
“ काय म्हणतोय तो ? ”
“ त्याने भेटायला बोलावलंय . मला जायला पाहिजे लवकर. ” , पायात पँट चढवत तो म्हणाला.
“ अहो , पण का भेटायला बोलावलंय ? ”, तिने जराशी चिडून विचारलं.
“ तो टोनी सांगत होता , म्हणजे त्याला कुठून तरी बातमी कळली , मला जायला लागेल जरा . माझा शर्ट कुठंय… ? आन लवकर . ” , तो खेकसला. यमुनेने आत जाऊन कपाटातून एक शर्ट काढून आणला.
" हे घ्या , आणि सांगा मला "
" काय सांगू तुला आता ? " , तो शर्ट अंगावर चढवत म्हणाला .
“ अहो कसली बातमी कळली ? नीट सांगा मला . ” , यमुना त्याच्या मागेच लागली. जणूकाही त्याचं उत्तर ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झाले होते.
“ तो टोनी म्हणतोय , ओमी मिरचंदानी जिवंत आहे. ”

₿₿₿

सायबर सेल ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला होता. कधी नव्हे ते सायबर सेलच्या बाहेर पत्रकार आणि न्यूज चॅनल्सच्या गाड्यांची गर्दी जमा झाली होती . त्यांना आवरता आवरता पोलिसांची दमछाक होत होती. सकाळी वाघचौरे साहेबांची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली आली. हि गर्दी बघून ते सुद्धा जरासे गडबडले. अमरने आधी फोन करून त्यांना ह्याची कल्पना देऊन ठेवली होती , परंतु एवढे पत्रकार जमा होतील ह्याची त्यांना कल्पना नव्हती. ते गाडीतून उतरले , तसे पत्रकार आणि न्यूजचॅनल वाल्या लोकांनी त्यांना घेराव घातला.
“ सर , सर ...हा जो ईमेल आला आहे , तो कितपत खरा आहे ? ” , एका पत्रकाराने विचारलं.
“ ओमी मिरचंदानी खरोखर जिवंत आहे का ? ” दुसऱ्याने विचारलं.
“ ओमी मिरचंदानीला कधी अटक होईल सर ? ” , तिसरा.
“ मिरचंदानी पोलिसांना फसवण्यात यशस्वी झालाय असं तुम्हाला वाटतं का ?”, चौथा. टोळधाड अंगावर यावी तसे पत्रकार त्याच्या अंगावर धावून जात होते. प्रश्नांची सरबत्ती ऐकून वाघचौरे साहेबांसारखा सिनियर ऑफिसरही गोंधळून गेला होता. शहरातले जवळपास सगळेच पत्रकार आपापला कामधंदा सोडून पोलीस स्टेशनला आले होते कि काय असं वाटू लागलं. अमर चार हवालदारांना सोबत घेऊन पत्रकारांच्या घोळक्यात शिरला. त्याने पत्रकारांना बाजूला सारून वाघचौरे साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं . बाहेर पत्रकारांचा गोंधळ चालूच होता . सौदामिनी मॅडमही आलेल्या होत्या. वाघचौरे साहेब शांतपणे त्यांच्या खुर्चीत येऊन बसले . एका हवालदाराने पाणी आणून दिलं ते त्यांनी प्यायलं . ते थोडे अस्वस्थ दिसत होते. तसं तर त्यांचं वय सुद्धा झालं होतं. कपाळावरचा घाम त्यांनी हातरुमालाने टिपून घेतला. त्यांनी अमरला खुण केली तसं अमर त्यांना सांगू लागला , " एक अनोनिमस ईमेल अकाऊंट वरून पोलिसांना एक इमेल आलाय सर . आणि त्यात लिहिलं आहे की ओमी मिरचंदानी मेलेला नसून तो जिवंत आहे. आणि अशाच प्रकारचा ईमेल मुंबईतल्या प्रमूख न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे कार्यालयांनाही प्राप्त झाला आहे, त्यामुळे हे सगळे आलेत."
" छे ! काय कटकट आहे यार ! कोण आहे हा ईमेल करणारा ? " , वैतागून त्यांनी सिगारेट पेटवली.
" अनोनिमस अकाउंट आहे सर . आपल्या लोकांना ट्रेस करायला सांगितलं आहे. पण मला वाटतं, तो ट्रेस होणार नाही. कोणीतरी गंमत म्हणून हा प्रकार केला असावा . "
" आयला , आधीच टेंशन्स काय कमी आहेत ! त्यात हा कोण आहे तो आणखी वाढवतोय … " , सिगारेटचा झुरका मारत वाघचौरे साहेब म्हणाले.
“ कोणीतरी हॅकर वगैरे असेल सर. ” , अमर म्हणाला.
“ ह्या पत्रकारांना काय सांगायचं ? ते काही तसे जाणार नाहीत. ”, सौदामिनी मॅडम बाहेर नजर टाकत म्हणाल्या .
“ मीच बोलतो त्यांच्याशी ”, असं म्हणत हातातली सिगारेट ऍशट्रेमध्ये विझवून ते उठले आणि बाहेर आले. त्यांच्या मागोमाग सौदामिनी मॅडम आणि अमरही बाहेर आले. पत्रकार त्यांचे माईक घेऊन तयारच होते. ते बाहेर आलेले बघून सर्वजण पुन्हा प्रश्न विचारायला लागले . एकच गोंधळ उडाला कुणालाच काही ऐकू येत नव्हतं. वाघचौरे साहेबांनी सगळ्यांना शांत केलं.
“ हे बघा , आम्हाला जो ईमेल प्राप्त झालाय , तो एका वेगळ्याच अकाउंट वरून आलाय . नॉन ट्रेसेबल अकाउंट आहे ते , पण तरीही त्याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. कदाचित कोणीतरी मुद्दाम हे केलं असण्याची शक्यता आहे. ”
“ पण सर , ओमी मिरचंदानी जिवंत आहे असं त्यात लिहिलं आहे . त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ? ” , एका पत्रकाराने तावातावात विचारलं.
“ लिहायला तर काय लागतं ? काहीही लिहू शकतो. त्याने काही पुरावे दिलेत का ? तुम्हालाही तो इमेल आलेला आहे . काय लिहिलंय त्यात . फक्त ओमी मिरचंदानी जिवंत आहे. ह्याच्या पुढे त्याने काही लिहिलं नाही. मला वाटतं हे उगाचच कोणीतरी गोंधळ निर्माण करण्यासाठी लिहिलं आहे. ”
“ मिसेस रागिणी , ह्यांचं ह्यावर काय मत आहे सर ? ”, एका तरुण रिपोर्टरने विचारलं.
“ मॅडम , तो ईमेल येऊन तासभर सुद्धा नाही झाला. आम्हीही चौकशी करत आहोत. मिसेस रागिणी ह्यांची चौकशी सुरु आहे. ”
“ सर , तो ओमी मिरचंदानी खरोखच जिवंत असेल तर ? ” , आणखी एकाने विचारलं.
“ तर आमचं काम आणखी सोपं होईल . माझीही इच्छा आहे कि तो जिवंत असावा . ”, वाघचौरे साहेबांच्या ह्या वक्तव्यावर सर्वजण हसले. त्यानंतर ते पुन्हा म्हणाले , “ हे बघा , हि आमच्यासाठी इतर केस सारखीच ही एक केस आहे. ह्यात अनेक लोकांचे पैसे अडकलेले आहेत , ह्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही दिवस रात्र ह्या केसवर काम करत आहोत. लवकरच खरं काय ते समजेल. पण माझी आपल्या माध्यमातून सर्वांना हीच विनंती राहील की असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका . तपासात गोंधळ निर्माण करण्याचा कुणाचातरी प्रयत्न आहे. आपण शांतता राखा , पॅनिक होऊ नका . आपण सहकार्य केलेत त्याबद्दल धन्यवाद ! ” , एवढं बोलून ते आत आले. पत्रकारांना गोल गोल उत्तरे मिळाली होती ज्यातून त्यांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. पण ही सुद्धा त्यांच्यासाठी एक न्यूज होती. आता त्यांना एक विषय मिळाला होता. त्यावर चर्चसत्रे होणार होती , तज्ञांच्या मुलाखती होणार होत्या . न्यूज चॅनलमध्ये ग्राफिक्स तयार करणाऱ्या लोकांना काम मिळणार होतं. वाघचौरे साहेबांनी पत्रकारांचं आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावलं होतं. खोटं लपवायचं नाही आणि खरं काय ते सांगायचं नाही. खऱ्या ऑफिसरची खासियत तीच असते, हे वाघचौरे साहेबांनी दाखवून दिलं होतं.
आधी मिसेस रागिणी बाबत त्यांना संशय होता कि तिनेच ओमी मिरचंदानीचा खून केला आणि त्याची सगळी संपत्ती हडप केली असावी , पण आता ओमी मिरचंदानी जर जिवंत असेल तर सगळी केसच संपून जाईल. पण दुसरीकडे श्रीमती रागिणी असं सांगतेय कि ओमी मिरचंदानीचं सर्व उत्तरकार्य लेह - लडाख मधेच पार पाडलं , मग तो जिवंत कसा असेल ? मग एवढा घाट कशासाठी घातला असेल ? वर वर बघता हे सगळं एवढं सोप्पं असेल असं त्यांच्या पोलिसी डोक्याला पटेना. पण एक प्रश्न त्यांना स्वतःला पडला होता , की ओमी मिरचंदानी खरोखर मेलाय की जिवंत आहे. ह्याचं उत्तर आता त्यांना मिसेस रागिणीच देऊ शकणार होती. त्यांनी आपला फोन काढला , आणि एक नंबर डायल केला.

क्रमशः

माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

Group content visibility: 
Public - accessible to all site users