असंच काहीतरी......

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महिना होवून गेला हे रंगीबेरंगीचं पान भेट मिळाल्याला. पण यावर माझ्याकडून काही लिहिणं होईल असं वाटत नव्हतं. मधून अधून काही फोटो वगैरे टाकत रहावे असं ठरवलं होतं. अन अचानक मागे डायरीत खरडलेलं हे सापडलं. खरंतर परत एकदा वाचून त्यात सुधारणा करण्यासाठी तसचं ठेवलं होतं हे, त्यालाही २-३ महिने झाले. आता हे लिहिलेलं ललित म्हणा किंवा मनोगत म्हणा तसच्या तसं इथे टाकून ह्या पानाची किमान सुरवात तरी करतेय.

मध्यंतरी एक भाषांतर करताना लक्षात आलं, मला कित्येक सोप्पे-सोप्पे मराठी शब्द आठवतच नव्हते. कित्येकदा तर चक्क पर्यायी हिंदी शब्द आठवले मला. गम्मतच आहे नै? कारण माझं हिंदी तितकस चांगलं नाहीये. म्हणजे अगदी बंबय्या किंवा आमच्या मराठवाड्यातलं हिंदी नाही बोलत मी ,पण सरकारी शब्द हिंदीत आठवण्याइतकं शुद्ध हिंदी कधी वाचलच नाहीये. शाळेत वाचलेल्या प्रेमचंदांच्या हिंदी पुस्तकाच्या आणि तमसच्या पुढे माझं हिंदी वाचन कधीच सरकलं नाही. हल्ली तर चक्क माझ्या हिंदीवर पंजाबी लहेजा चढलाय. म्हणजे फोनची सुरवात मी बहुतेकवेळा हांजी कहिये अशीच करत असते. घरी किंवा शेजारी पाजारी बोलताना पण मी मधूनच हिंदीत एखादं पंजाबी वाक्य किंवा पंजाबी शब्द वापरते. आता यावरून मला पंजाबी नीट येत असेल असं वाटत असेल तर साफ चूक. पंजाबी बोलताना पण मला, चार वाक्य बोलल्यानंतर मनात पुढचं वाक्य जुळवावं लागत किंवा पर्यायी शब्द शोधावा लागतो.

हे लिहिता लिहिता जाणवतयं, मला बहुतेक कोणतीच भाषा नीट येत नाहीये. म्हटलं तर कितीतरी भाषा येतात, पण धड अशी एकही नाही. कॉलेजात असताना दोन वर्ष अहमदाबादेत होते, त्यावेळी सुरवातीच्या दिवसातच अचानक लक्षात आलेलं, अरे आपल्याला गुजराती बर्‍यापैकी समजते की. तिकडे जायच्या अगोदर गुजरातीशी कधी फारसा संबंध आलाच नव्हता. त्यामूळे मला गुजराती समजतं याचं मलाच खुप आश्चर्य वाटायचं. गंमत म्हणजे मला लिपीपण बर्‍यापै़की वाचायला जमायची. हॉस्टेलवरच्या मैत्रिणींपैकी कुणालाच नीट समजायची नाही गुजराती. त्यामुळे मला उगिचच स्वतःचं कौतुक वाटायला लागलं होतं. नंतर पूढे लक्षात आलं, actively नसेल पण passively थोडाफार संबंध आला होता माझा त्या भाषेशी. त्यातनं मराठीशी भरपूर साधर्म्य असल्यामूळे मला ही भाषा समजली यात नवल ते काय. पण इथेही मी याचा जास्त उपयोग करुन घेतला नाही. माझं गुजरातीचं गाडं बोलण्यापर्यंत पोचलंच नाही. कॉलेजात प्रकल्पाचा भाग म्हणून एका खेड्यात अन नंतर झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षण करताना प्रश्ण विचारण्यापेक्षा जास्त गुजराती मी कधी बोलू शकले नाही.

तिथे असतानाच एक बिहारी, एक पंजाबी एक आसामी अश्या तिन जवळच्या मैत्रिणी अन एक बंगाली मित्र मिळाला. पण त्यांच्या भाषा शिकाव्यात हे डोक्यात आलंच नाही. नाही म्हणायला या लोकांचं आपापल्या घरच्यांशी फोनवर बोललेलं मला समजायचं. पण यात माझं काही कौशल्य असण्यापेक्षा माझा अंदाज अन कॉमनसेन्सच जास्त असणार. पण हे जे काही होतं त्याचा वापर करुन या भाषा नाही शिकू शकले मी हे मात्र खरं.

नंतर पुढे मुंबईला युएन्डीपीबरोबर काम करत असताना मंत्रालयात जाणं व्हायचं. तिथे दोघेजण ओरिसाचे होते. ते आपापसात ओरियामध्ये बोलायचे अन ते काय बोलताहेत हे मी त्यांना सागून चकित करायचे. हे सुद्धा माझा अंदाज अन त्या भाषेचं असलेलं बंगालीशी साधर्म्य यामुळे. पण इथेही मी यापूढे गेले नाही.
लग्न होवून दिल्लीला आल्यानंतर मात्र माझ्या पंजाबीमध्ये भरपूर सुधारणा झाली. आता अगदी गावाकडची थेट पंजाबीपण मला समजते. एव्हढंच नव्हे तर हिमाचलप्रदेशात बोलली जाणारी पहाडी ही पंजाबीची अजुनएक बोलीभाषा पण समजायला लागली आहे. लिहिण्या-वाचण्याच्या बाबतित मात्र अजुनही नन्नाचा पाढा आहे. माझी मजल वाचनामध्ये जास्तितजास्त दुकानावरच्या पाट्या वाचण्यापर्यंतच गेलिये. तसं बरीच पंजाबी गाणीपण मला अजुन समजून घ्यावी लागतात.

मध्यंतरी माझी एक खुप जवळची मैत्रिण अमेरिकेत स्पॅनिश शिकत होती. तिचं ऐकून मलापण स्पॅनिश शिकायची उगिचच इच्छा झाली. कुठेही क्लास लावून शिकणे काही मला त्यावेळी जमलं नाही, पण ओळखीतुन एक-दोन जूनी पुस्तकं अन रेकॉर्ड्च्या मदतीने मी शिकायचा प्रयत्न सुरू केला होता. त्या रेकॉर्डी वाजवण्यासाठी घरी ग्रामोफोन नसल्याने मला उच्चार कळले नाहीत अन माझा हा प्रयत्न त्या पुस्तकांच्या ३-४ पानांनंतर बंद पडला.

यासगळ्या भाषांशिवाय उगिचच कामवाली बोलते म्हणून तुकड्या-तुकड्यात कळणारी राजस्थानी, नवरा अन त्याच्या मित्रांच ऐकून अर्धवट समजणारी हरयाणवी या भाषा शिकायची अधून मधून इच्छा होते. शाळेत असताना शिकलेल्या संस्कृतशी तर आता काही संबंधच उरला नाहीये. मी कधीकाळी संस्कृत शिकले होते हे सांगायची पण लाज वाटावी इतक्या भयाण अवस्थेमध्ये पोचलयं माझं संस्कृत.
ह्या सगळ्या भाषा मला मोडक्या-तोडक्या येतात. याशिवाय आपल्या हुकमी मराठी अन इंग्रजी आहेतच. तशी इंग्रजीबद्दल कधीच खात्री नव्हती. मला ईंग्रजी येते ते अगदीच कामचलावू. थोडंफार बोलणं, कामानिमित्त वेगवेगळे रिपोर्ट बनवणे इतपतच. बरं हे रिपोर्टपण ठराविक साच्यातले असतात. पूर्वी तर अभ्यासाव्यतिरिक्त काही वाचलच नव्हतं मी. अजुनही जास्त काही अवांतर वाचल नाहीये. जे काही वाचलय किंवा वाचते ते अगदी प्रयत्नपुर्वक.

आता उरली फक्त मातृभाषा मराठी. पण जर मला मराठी चांगले येत असते तर मग मला आता मराठी वाक्यांमध्ये इंग्रजी शब्द का वापरावे लागतात? मला मग भाषांतर करताना इंग्रजीला पर्यायी शब्द का नाही पटकन आठवत? मराठीत लिहिताना र्‍हस्व-दिर्घ सारख्या अगदी सोप्प्या शुद्धलेखनाच्या चूका का होतात? मराठी माध्यमात शिक्षण झालेल्या, बर्‍यापैकी मराठी वाचन असलेल्या (अशात हे वाचनाचं प्रमाण अगदीच नगण्य झालय हे मात्र खरं) मुलीला मराठीच्या बाबतित असा प्रश्ण यायला नको. पण असं होतय खरं, म्हणजे काहीतरी चुकतय नक्की. अन हे चुकणं जास्त जाणवत जेव्हा मी एखाद्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या व्यक्तीला, एखाद्या अमराठी वातावरणात वाढलेल्या व्यक्तीला मी माझ्यापेक्षा शुद्ध, कमी भेसळ्युक्त मराठी आवर्जुन वापरताना बघते.

किमान आपली मातृभाषा चांगली यायला हवी ही अपेक्षा काही चुकीची नाही.

हा असा विचार केला की मला भितीच वाटते. मी अगदी मराठी वातावरणात वाढून, मराठी माध्यमात शिकूनही माझ्या भाषेचे अगदी कडबोळे झाले आहे. मग माझ्या पोराचं काय होईल? त्याच्या कानावर माझं मराठी-हिंदी, त्याच्या बाबाचं अन काकालोकांचं पंजाबी हिंदी, शेजारपाजार्‍यांचे पंजाबी आणि हिंदी मिश्रित हिंदी, कामवालीचे राजस्थानी अन राजस्थानी मिश्रित हिंदी, ड्रायव्हरचे पहाडी, पुढे शाळेत गेल्यावर इंग्रजी या भाषा पडणार....... जर त्याने या सगळ्या भाषांची खिचडी केली तर?

मागे कुणीतरी मला सांगितलं होतं, लहान मुलांमध्ये एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषा आत्मसात करण्याची अन त्यामध्ये फरक करण्याची क्षमता असते. सध्यातरी मी माझी किमान एक भाषा (मातृभाषा) परत सुधारायचा प्रयत्न अन त्याची क्षमता या दोन गोष्टींवर विसंबून आहे.

प्रकार: 

अल्पना
नवीन पानाबद्दल अभिनंदन.
भाषेची सरमिसळ म्हणशील तर मला वाटत महाराष्ट्राबाहेर रहाणार्‍या बहुतेक सगळ्यांच असे होत असणार वेगवेगळ्या भाषेच्या बाबतीत, पण मला ही एक चांगली संधी वाटते दुसरी भाषा शिकायची. ज्या प्रदेशात रहातो तिथे बोलल्या जाणार्‍या भाषेवर प्रभुत्व मिळवायची.
माझ्या वेगवेगळ्या देशातल्या मित्र मैत्रीणींच्या अनुभवावरून एक मात्र मला नक्की जाणवले की आपण भारतीय लोक (काही अपवाद असतीलही) इतर भाषा शिकायचा कंटाळा करतो अगदी नाईलाज झाला तरच दुसरी भाषा शिकायला जातो. जितक्या सहजतेने अभारतीय विचार करतात की जिथे रहातो तिथली भाषा त्यांना यायला हवी तितक्या सहजतेने/नैसर्गिक पद्धतीने आपल्या डोक्यात भाषेचा हा विचार येत नाही. अर्थात माझा अनुभव सार्वत्रिक नसेलही.

अल्पना,
सर्वप्रथम लिहायला सुरुवात केलीस म्हणून अभिनंदन!
माझी मातृभाषा तेलुगु असली तरी मला ती आपल्या मराठी इतकी सफाईदार येत नाही. पण समजते. त्यामुळे मुलाचे कसे होईल ही भीती बाळगायचे काही कारण नाही. फक्त एक.. मुलाला हीच भाषा म्हणून जबरदस्ती करू नकोस. कदाचित त्याला मराठी, पंजाबीसहीत इतर अनेक भाषाही आत्मसात होतील.
तुझे अनुभव लिहीत रहा. माझ्या शुभेच्छा.

अल्पना ,ही समस्या अनेकांची आहे .समस्येची जाणीव होण ही समस्यानिवारणाच्या आधिची पायरी आहे
तेव्हा प्रयत्न केल्यास समस्यानिवारणसुद्धा होऊ शकत . यासाठी लेखन वाचनात सातत्य हा मला सुचलेला पर्याय आहे .लेख आवडला .

बापरे तूला केवढ्या भाषा येतात Happy रंगेबिरंगीवरची ही पहिली पोस्ट आवडली. कुठली ही भाषा येण्यासाठी आ प्ण त्या त्या प्रदेशात राहिहि, मिसळलो तर सोप्प होतं मग

माझी स्टोरी अशीच आहे. शिक्षण कॉन्वेंट मधून झाले. सुरुवातीची वर्षे मुंबईत म्हणून मराठी( मातृभाषा गोव्याची कोकणी) पण वाढले सिंधी,पंजाबी वस्तीत. शाळेत सिंधी,पंजाबी,गुजराती, तामिळ,बंगाली मग मल्लू असा ओळीने भरणा मित्र-मैत्रीणीचा. त्यामूळे विश्वास बसणार नाही इतक्या ह्या भाषा बर्‍यापैकी बोलू शकत 'होते'/समजत होत्या. विशेष करून तामिळ.(बेस्ट मैत्रीण तामिळ).
मुंबईत शाळेत असताना हिंदी एकदम खतरनाक. त्या हिंदीत गुज्जु मित्राचे शब्द, थोडे मराठी,कधी तामिळ शब्द,कधी पंजाबी.
क्या कंटाला आया. क्या भाजी लेके आई डब्बे में. तू एकदम पैत्यम है. व्हाट अ पावम यार. तू एकदम लोचा करता है. पायसम और बटाटा भाजी चपाती(असे तामिळ मैत्रीण म्हणणार).

मग महाराष्ट्राबाहेर गेले, फायनली इथे आली फॅमीली. त्यामूळे वरच्या भाषांचा तेवढा संबध राहिला नाही व विसरले. पण अजून समजते गुजरती,तामिळ, पंजाबी व बोलता येते तसे.
शाळेत दुसरी भाषा फ्रेंच मग हिंदी. थोडेफार फ्रेंच शिकले ते विसरले.
स्पॅनिश अर्धवट शिकले, सोडून दिले स्कूल मधे इथे. मायबोलीवर मराठी सुधारली तशी (ही फक्त एकून लिहायचे सुरुवातीला) पण कितीतरी शब्द तसे आठवत नसतात मराठीत.
कोकणी भाषा आजी जिवंत असेपर्यंत बोलायचे तिच्याशी. आम्ही भावंडे विशेष बोलत नाही आई-पप्पांशी कोकणी.
तर अशी सरमिसळ. त्यातल्या त्यात ईंग्लींश बरी राहीली आहे. Happy इथे कधी कधी मराठी ईंग्लीश करताना ईंग्लीश पण विसरायला होते. Happy

तेव्हा,आपण एकाच बोटीत आहोत.

अनेक भाषा येत असलेल्या सगळ्यांना __/\__. Happy

(खाणीतून इतकी मस्त रत्नं मिळतायत... बरं झालं जुनं खणून काढावंसं वाटलं ते!)