वाया जातानाच्या गोष्टी

Submitted by पाचपाटील on 16 May, 2022 - 13:57

'पुष्पक' असे पौराणिक नाव धारण केलेल्या
शववाहिनीतून ती अंत्ययात्रा चाललेलीय.
पुष्पकचे गंजके पत्रे ठिकठिकाणी बाहेर आलेत.
आणि पुष्पकचा वैमानिक वारंवार खिडकीतून
बाहेर पिचकाऱ्या मारण्याचं स्वातंत्र्य उपभोगतोय.
काही अडचण नाही.
सगळी जमीन देवाचीच आहे. हगा कुठेही.
माझी काही तक्रार नाहीये.
शेवटी असंय की काही अधिकार थेट
राज्यघटनेतूनच नागरिकांपर्यंत प्रवाहित झालेले
असतात. त्यात आक्षेप घेण्यासारखं काय असतं?
आणि तसा घेणारे आपण कोण?
आणि तुमच्या आक्षेपांना विचारतो कोण ?

असो. बाकी यात्रा-बित्रा म्हणजेसुद्धा फारच गुळमुळीत
शब्द झाला समजा..
कारण वैमानिकाच्या शेजारी मडकं धरून फक्त मीच
बसलेलो..!
मागं माझीच बॉडी..! त्यावर भरपूर वेळा सेवा दिलेलं
मळकट पांढरं कापड.
वरती चिमुटभर गुलाल आणि चार सुकलेली झेंडूची
फुलं कम् कळ्या.
बाकी नेहमीप्रमाणे वास लपवण्यासाठी उदबत्त्या
वगैरेंची काही गरज उद्भवली नाही.
कारण हे 'पुष्पक' विमान चांगलं हवेशीर होतं.
त्याचं मागचं दार फार पूर्वीच निखळून भंगारात गेलेलं.
त्यामुळे सिग्नलला थांबलेले सगळे जण आत डोकावू
शकतायत.
एवढं भव्यदिव्य पुष्पक विमान तुमच्या पुढ्यात
येऊन थांबल्यावर न डोकावून सांगता कुणाला ?

बाकी, हे असं नजर चुकवत बघणं माझ्या चांगलं
ओळखीचं आहे.
त्यातून बघणाऱ्यांना किंचितशा इंट्रोस्पेक्शनची
विनामूल्य संधी वगैरे मिळते..!
मग प्रत्येकाला आपापलं अटळ भविष्य आठवणं वगैरे..
फार नाही.! सेकंदभरच..!
कारण मग आपल्याला अजून खूप टाईम आहे,
असं स्वतःला पटवून देत, सिग्नल सुटल्यावर
घाईघाईने निसटावं लागतं..
जीवन-मृत्यू संबंधी प्रदीर्घ चिंतन करण्यासाठी 'सिग्नल'
ही काही योग्य जागा नाही.
आणि तेवढी सवड तरी कुणाकडे असणारे? नाही का?

"बाई द वे, ए के हंगलसाब, जानते हो दुनिया का सबसे बड़ा बोझ क्या होता है...?"
आपलं मडकं आपल्यालाच धरायला लागणं..!
किंवा नंतर समजा माती वगैरे सावडायला कुणीच न फिरकणं..!

त्याचं झालं असं की काल रात्री स्वप्नातच माझा
खेळ आटोपला.
एकाक्षणी होतो आणि अचानक गुडूप झालो.
मेमरी साफ कोरी.
पण सकाळी जाग आली आणि बघतोय तर
रूममध्ये काळाचा स्थिर समुद्र साचून राहिलेला..!
आणि त्या समुद्रतळाशी ठेवलेल्या बेडवर मी
वळवळतोय..!
अजून जिवंतच. जसाच्या तसा.
उजाडला बहुतेक आणखी एक दिवस.
जगा च्यायला.
आला अजूनेक दिवस अंगावर.
एकापेक्षा दुसरा वेगळा नाही.
कालचा आजचा उद्याचा परवाचा आधीचा
नंतरचा.

त्याच सकाळी. तेच आलार्म. तेच शरीर.
तीच आंघोळ. तोच नाश्ता. तीच दुपार. तेच जेवण.
तेच चेहरे. तेच उदास आत्मे. त्याच संध्याकाळी.
तेच हेडफोन्स.
त्याच प्ले-लिस्ट्स. तोच सेक्स.

साला हल्ली सेक्स करतानापण जांभया यायला
लागतात..! विचित्रच आहे.
डॉक्टर गाठावा काय एखादा? नकोच..!
तो येडा जांभया न येण्याच्या गोळ्या लिहून देईल..
आणि वर हसत हसत हजार रूपैचा झब्बू लावेल..!
शिवाय संध्याकाळी बायकोला सांगणार की,
असा असा पेशंट आला होता आज.
मग त्याची बायको कौतुकाने म्हणणार की, बापरे
कसले कसले च्युतियानंदन पेशंट येतात
तुझ्याकडे..!

त्यापेक्षा नकोच ते.

खरंतर 'त्या' ऐन मोक्याच्या क्षणी जांभया येणं
हे एक चांगलंच लक्षण म्हणायला पाहिजे..!
बहुतेक मी सेक्सच्या जंजाळातून मुक्त वगैरे होत चाललोय.! नकळत योगी वगैरे होण्याचा प्रवास चालू झालाय माझा..! आणि तो ही आपोआपच.
आता ताबडतोब एखादा मठ टाकायला हरकत नाही..!
खराय गा खोटंय पाटला?

''काय बोलताय काय कळंना झालंय ब्वा..!
मला तर मघापास्नंच भिंगाय लागलंय..!
शेवटची नाईन्टी जरा जडच गेली, विजुभौ..! चला निघूया आता..!
ओला बोलवा..! नायतर उबेर बोलवा.!''

-------------------*****************---------------------------
-------------------*****************---------------------------

{ पुढचा भाग..किंवा मागचाही असेल कदाचित.. बघायला पाहिजे..! }

तर दहा वर्षांपूर्वी हे सगळं सुरू झालं.
'हे' म्हणजे हे असं आतल्या आत बोलणं.
येता जाता डोक्यात काय काय पॉप अप होत राहतं.
इलाज नाही.

लहान मुलाकडे जे अप्रूप असतं, ते आता माझ्यात
राहिलेलं नाही. आता माझं सगळं जवळपास ठरूनच
गेल्यासारखं असतं. काय बोलायचं. कसं बोलायचं.
कशी शेरेबाजी करायची. कोणते अपमान गिळायचे.
कोणते लक्षात ठेवायचे. सगळं रेडी असतं.
सकाळी साधारण नऊ वाजेपर्यंत मी ठीक असतो.
नंतर sarcasm चा ग्राफ चढत जातो. दुपारनंतर आणखी
जोर येतो.

आतासुद्धा हे जे लिहायला लागलोय त्या गोष्टींचा शेवट
कसा होईल कुणास ठाऊक.
अर्थात मला माहितीये की कुठल्याच गोष्टीचा शेवट असा
काही फिक्स ठरलेला नसतो.
रस्त्यावरून जाताजाता हळूहळू शेवट दिसायला
लागतो.
आपण जसजसे बदलू तसतसा शेवटपण बदलत
जातो.
कधी कधी अचानक डोळ्यापुढं जे उभं राहतं
त्यालाच शेवट म्हणून स्वीकारायला लागतं.
नाही तर तो बोकांडी बसतो.
त्यापेक्षा स्वीकारलेलं बरं.
आणि शेवटी असंय की सुरूवात तुम्हीच केली ना..!!
कारण खाज तुम्हालाच होती ना..!
सुरूवातीला गोड गोड वाटलं ना..!
मग आता काय होतंय ?
आता ही अंधरूनी डुचमळ का ?
ही पाकपुक कशासाठी?

अर्थात, हे असं असतंच ना म्हणजे..!

सुरूवातीला तिचं हसणं ही तुम्हाला जगातली
सगळ्यात सुंदर गोष्ट वाटत असते आणि त्यामुळे
तुमच्या अंगावर रोमांच वगैरे उठत असतात..!

परंतु आता ती हसायला लागली की तुमची
घाबरगुंडी उडते...! तिचं हसणं आता तुम्हाला
चिचुंद्रीसारखं भीतीदायक वाटतं..!
ती चिवचिवायला लागली की तुम्हाला अशक्तपणा
यायला लागतो..!
ती तुमच्या भावी जीवनाची स्वप्नं रंगवायला लागली
की तुमच्या आयुष्यातले रंग उडून चालल्यासारखं
वाटतं.

आणि तुम्ही तिला विनंती करता की बाई तू तुझं
तोंड थोडावेळ बंद ठेवू शकशील काय ?
परंतु आता तिला ते कसं शक्यं आहे बरं?
आता तिला पझेसिव्ह होण्याशिवाय दुसरा काही
ऑप्शन आहे काय ?
आता ती तुमची काळजी वगैरे घेणारच..!
दिवसातून दहा वेळा अपडेट्स घेणार आणि देणार..!
ती तुमची आईच होऊन बसणार..!
मग आता ती तुम्हाला सुखानं पिऊ कशी बरं देईल ?
फोनवर फोन करणारच ना..!

तिच्यासोबत फिरायलाही तुम्हाला भाग पाडणार..!
एफसी रोडवरचे कपड्यांचे स्टॉल्स म्हणजे खजाना
असल्याप्रमाणे एकेक टॉप निरखत तासन् तास रेंगाळणार..!
तिच्यासारख्याच अनेक मुलींनी तिथे पुरा
ट्रॅफिक जॅम करून टाकलेला असणार..!
मग आणखी थोड्या वर्षांनी ती मध्यमवयीन होणार..
आणि लक्ष्मी रोड किंवा तत्सम
तुळशीबागेत अगदी ध्यानमग्न वगैरे होऊन मन
रमवणार..

झालंच तर साळकाया म्हाळकायांबद्दल तिचं मत
सांगणार.
तुम्हाला ते ऐकून घ्यावं लागणार.
कारण त्या साळकाया म्हाळकायांबद्दल तुमचं मत
विचारलं जाणार.

तिच्या आवडीनिवडींची सतत अपडेट होणारी यादी सांगणार.
ह्या ड्रेसमध्ये मी कशी दिसतेय, हे विचारणार.
मग कोणती भाजी करू विचारणार.
कर ना बाई कोणतीही भाजी आणि घाल काहीही
आवडेल ते...
विचारण्यासारखं काय असतं त्यात.
आपल्याला आवडतं ते करून टाकावं.
आहे काय आणि नाही काय..!

अहो थांबाss थांबा जराss.!!
तुम्ही कुठल्या कुठे गेलात विजुभौ?
अजून कशात काय नाही..!
आणि तुमचं कायतरी वेगळंच चाललंय..!
कुठली पोरगी आणि काय घेऊन बसलात..!
सगळ्या पोरी मला झुरळासारख्या झटकून टाकतात,
हाडहुड करतात..! लय वाईट वाटतं..!
पण काय करणार..! सोसावं लागतं..!

एकदा मोठ्या मुश्किलीने मागे लागून लागून एक पटली होती..! आणि प्रथेप्रमाणे मग जेवायला वगैरे घेऊन गेलो
होतो तिला..!
झालं असं की जेवताना मी मांडीवर रूमाल अंथरून
ठेवला..! नेहमीचीच सवय आहे..!

तर तिला वाटले की मला फार मॅनर्स वगैरे आहेत...!
परंतु तसं काहीच नसल्याचं मी लगेच स्पष्ट केलं.
तिला खरंखरं सांगितलं की तंबाखूमुळे माझ्या
तोंडातली काही स्कीन जळालीय..!
त्यामुळे थोडंसं तिखट लागलं तरी नाकावर,
गालांवर घाम जमा होतो..! म्हणून मला मांडीवर
रूमाल लागतो..!
मॅनर्सचा वगैरे तसा काही संबंध नाही ह्यात..!

हे ऐकून ती "ईsss " असा आवाज काढत पळून गेली.
सगळे वेटर माझ्याकडं बघायला लागले.
त्यांना वाटलं असणार की मी तिच्याशी काही
अनैसर्गिक असामाजिक कृती केली की काय..!

खरंतर तिनं असं नाय करायला पायजे होतं..!
तिला माझं मृदू काळीज नाही दिसलं..!
त्या काळजातून ओथंबून वाहणारं प्यार नाही दिसलं..!
तिला फक्त तंबाखू दिसली..!
आणि ती पळून गेली.

चांगल्याची काय दुनियाच राह्यली नाय बघा..!
खराय गा खोटंय विजुमालक ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
पुष्पक नावाचं ते वाहन पहिल्यांदा बघितलं तेव्हा आधी (अस्थानी) गंमत वाटली होती आणि मग ते नाव ज्याला सुचलं त्याच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं होतं.

छान.
आमच्याकडे वैकुंठधाम नाव आहे.
पाचपाटील, लिहित रहा. तुमचं लेखन खरं वाटतं. कुठलाही आव न आणता लिहिलेलं.

तुम्ही तिला विनंती करता की बाई तू तुझं
तोंड थोडावेळ बंद ठेवू शकशील काय ?
परंतु आता तिला ते कसं शक्यं आहे बरं?
आता तिला पझेसिव्ह होण्याशिवाय दुसरा काही
ऑप्शन आहे काय ?
आता ती तुमची काळजी वगैरे घेणारच..!
दिवसातून दहा वेळा अपडेट्स घेणार आणि देणार..!
ती तुमची आईच होऊन बसणार..!
मग आता ती तुम्हाला सुखानं पिऊ कशी बरं देईल ?
फोनवर फोन करणारच ना..!

Bapre .... Swatantryawar Halla bol zhala ki ha....
Ohh..
Amchyahi babtit...tanto tant julte he.