पाकिस्तानी मालिका

Submitted by जिज्ञासा on 3 January, 2022 - 11:46

पाकिस्तानी मालिकांचा चस्का लागून आता ६/७ तरी वर्षं झाली असतील. वेड लागल्यासारख्या मालिका पाहिल्या सुरुवातीला – total binge watching. बरेच दिवस माबोवर झी जिंदगीच्या धाग्यावर लिहित होते पण नंतर ते थांबलं. ह्या मालिकांमुळे मी भरपूर प्रमाणात पाकिस्तानी टीव्ही पाहीला/पाहते आहे – म्हणजे talk shows, promotional कार्यक्रम, मुलाखती वगैरे वगैरे. I was totally into it! आता थोडीशी बाहेर आले आहे त्यातून!

ह्या मालिकांनी मला एक वेगळी दृष्टी दिली, दुःख ह्या भावनेशी नव्याने ओळख करून दिली, और उर्दू से इश्क करवा दिया! या मालिकांचं एक वैशिष्ठ्य म्हणजे त्या कुठेही predictable होत नाहीत, त्यांच्यात व्यक्तिरेखांची विविधता आहे आणि सर्व व्यक्तिरेखा फार छान मेहनत घेऊन उभ्या केलेल्या असतात. भाषेची आणि संवादांची गोडी हा तर वेगळ्या लेखाचा विषय होईल! ह्या मालिका दिग्दर्शकाच्या नावाने ओळखल्या जातात हेही मला त्यांच एक वैशिष्ठ्य वाटतं. शिवाय सुंदर शीर्षकगीते हेही एक वैशिष्ठ्य आहे. अनेक मालिकांची गाणी माझ्या प्लेलिस्ट मध्ये आहेत.
दुःख, असहायता, वेदना या गोष्टी भारतीय मालिकांमध्ये अभावाने पाहायला मिळतात. म्हणजे जरी नायिकेवर अत्याचार होत असला तरी तो इतक्या खलनायकी व्यक्तीकडून होत असतो की अन्याय झेलणारी ती बरोबर/चांगली व्यक्ती आणि जुलूम करणारी वाईट व्यक्ती हे अगदी ठासून ठासून दाखवलं जातं. पण असं खऱ्या जगात असत नाही. जगताना आपण दुःखाचे अनेक पोत पाहतो. बरेचदा कोणाचाच दोष नसतो – सगळं परिस्थिती घडवत असते, प्रत्येक व्यक्तीच्या ग्रे शेड्स असतात. हे सर्व या मालिका फार सुरेख पकडतात. बहुतांश मालिकांमध्ये एक अंतस्थ उदासीचा सूर सापडतो. या मालिका बघताना मी वेगवेगळ्या स्तरावरचं दुःख अनुभवू शकले. जर तुम्ही तितक्या संवेदनशीलतेने आणि समरसून पहात असाल तर तुम्हाला अनेक दिवस पोटात तुटेल इतकं अगतिक, दुःखी करणारं काहीतरी तुम्हाला नक्की गवसेल. केवळ काळ्या पांढऱ्या रंगात न रंगवल्याने या मालिकांमधल्या व्यक्तिरेखा तुम्हाला विचार करायला भाग पडतात. मला स्वतःला प्रश्नात पाडणारी, “ही व्यक्ती अशी का वागते आहे?” असे प्रश्न विचारायला भाग पाडणारी मालिका आवडते. आपल्या जाणीवेने भरता येण्यासारख्या अशा अनेक जागा या मालिकांमध्ये सापडतात.
दुसरी मला आवडणारी गोष्ट म्हणजे या मालिका बनवताना काही आव आणून बनवल्या जात नाहीत. एक प्रकारचा नवखेपणा (rawness) असतो – तुम्हाला हसवायला/रडवायला/फसवायला/धक्के द्यायला कथानक घडवलं जात नाही. कथा घडते. कुठेही manipulative न वाटता. एका भागात गोष्ट १० वर्षे पुढे जाते with no fuss! ह्या लवचिकतेमुळे एका व्यक्तीचा आयुष्याचा ग्राफ एका २६ भागांच्या मालिकेत मांडता येतो.
कमी भागांच्या मालिका असण्याचे अनंत फायदे प्रेक्षक म्हणून जाणवतातच पण कलाकारांना देखील विविध भूमिका करायला वाव मिळतो. आपल्याकडे इतके गुणी कलावंत एकाच डेलीसोपचे दळण दळल्यावर दुसऱ्या मालिकेत तितक्या ताकदीने उभे राहताना दिसत नाहीत. आणि मालिकेचे शेकडो भाग होऊन सुद्धा कोणत्याच भूमिकेला काही ग्राफ असलेला दिसत नाही. मी खूप लिहू शकेन पण ते बोअर होईल जर तुम्हाला सगळे संदर्भ लागले नाहीत तर! त्यामुळे सुरुवातीला माझ्या आवडत्या काही मालिकांबद्दल लिहिते. आणि मग जमेल तसं इतर मालिकांविषयी. थोडीशी तोंडओळख फक्त! पहिल्या ३ क्रमांकात नंबर गेम आहे मात्र उरलेल्या काही तशा अनुक्रमे नाहीत! पहिल्या तीनही मालिकांवर मी आधीच लिहिलं आहे. त्यामुळे इथे अगदी त्रोटक लिहिते आणि त्या लेखांची लिंक देते.

और ज़िंदगी बदलती है – दोन half sisters ची कथा आहे. १३ भागांची छोटीशी मालिका आहे. कथा तशी सरळ आहे. सुरुवातीला आणि शेवटाच्या जवळ अशी दोन वळणं येतात पण बाकी प्लॉट असा काही नाही. संपूर्ण मालिका दिग्दर्शन, अभिनय आणि संवाद यांनी तोलून धरली आहे. अप्रतिम पार्श्वसंगीत! धाग्याची लिंक: https://www.maayboli.com/node/51745

धूप किनारे –प्रेमात पडायला लावणारी गोड मालिका आहे! १९८६ साली आलेली पण तरीही आजच्या काळात घडते आहे इतकी relevant! फैझ अहमद फैझ या जादुगार कवीची ओळख मला या मालिकेमुळे झाली! धाग्याची लिंक: https://www.maayboli.com/node/51645

सदके तुम्हारे – आज पाहायला गेले तर कदाचित मी इतकी हळवी होणार नाही. पण ह्या थोड्या melodramatic मालिकेने मला इतकं गुंतवलं की तिच्या प्रभावातून बाहेर पडायला मला काही दिवस लागले. ही एक अशी मालिका आहे जिच्यामध्ये असलेल्या नकारात्मक भूमिकेने मला खूप प्रश्नात पाडलं. ही नेटफ्लिक्स वर आहे. धाग्याची लिंक: https://www.maayboli.com/node/53380

किस की आयेगी बारात – विनोदी पाकिस्तानी मालिका फार बनत नसाव्यात. पूर्वीच्या काही गाजलेल्या विनोदी मालिका आहेत पण त्या मी पाहीलेल्या नाहीत. ही एक विनोदी मालिकांची मालिका आहे.पहिली अझर की. आ. बा. मग डॉली की. आ. बा. मग ताके की. आ. बा. आणि शेवटी अॅनी की आ. बा. सगळे characters तेच आणि प्रत्येक वेळी नवीन लग्नाच्या स्टोऱ्या! अतिविनोदी, किंवा दर वाक्याला विनोद नाहीये पण एकदा सगळ्या व्यक्तिरेखा ओळखीच्या झाल्या की बघायला जाम धमाल येते. जरा पंजाबीवर भर आहे पण संदर्भाने कळते भाषा. या चारही मालिकांची निर्विवाद नायिका आहे द सायमा चौधरी अर्थात द बुशरा अन्सारी (एक अत्यंत गुणी पाकिस्तानी अभिनेत्री). अर्थात बाकीचे सहकलाकार देखील मजा आणतात. जरा अतिशयोक्ती आणि बरेचसे sitcom प्रकारातले विनोद यावर भर आहे. पंजाबी कानाला गोड वाटायला लागली की ह्या मालिका पुन्हा पुन्हा बघण्यासारख्या आहेत.

कहानियां – ही मालिका नाहीये. मेहरीन जब्बारने एका भागात एक कथा अशी एक मालिका दिग्दर्शित केली होती ती म्हणजे कहानियां. मला यातल्या बहुतेक सगळ्या कथा आवडल्या. एकदा नक्की बघण्यासारख्या आहेत.

तल्खीयाँ (talkhiyan) – अरुंधती रॉय यांच्या God of small things वर आधारीत ही मालिका आहे. ज्यांना सनम सईद हिचा खरा अभिनय पाहायचा असेल त्यांनी ही मालिका बघावी. The mood is melancholy. ही आणि ज़िंगुहै एकाच काळात टीव्हीवर प्रक्षेपित झाल्या. एकीकडे बंडखोर तरुण युवती आणि दुसरीकडे तारुण्यात घटस्फोट घेऊन माहेरी आलेली जुळ्या मुलांची आई अशा दोन्ही भूमिका तिने उत्तम निभावल्या आहेत. ह्या कादंबरीचे दुसऱ्या कोणत्याही माध्यमात रुपांतर करणे कठीण पण ते लेखिका बी गुल हिने यशस्वी करून दाखवले आहे.

हमसफर – फवाद खान आणि माहिरा खान यांची मालिका जी झी जिंदगीने भारतात दाखवली होती. झी जिंदगीच्या धाग्यावर या मालिकेबद्दल खूप लिहिलंय त्यामुळे जास्त लिहीत नाही. ह्यात फवाद खान ज़िंगुहै पेक्षा अधिक देखणा दिसलाय (हेमावैम)! आणि माहिरा-फवाद ही जोडी अधिक आवडते!

ज़िंदगी गुलझार है – ही सर्वात जास्त पाहीली गेलेली पाकिस्तानी मालिका असणार! मालिका मस्तच आहे. मलाही आवडते. पण सगळ्या पाकिस्तानी मालिका अशा धर्तीच्या नसतात. सगळ्या कथांना सुखांत नसतो. ही शोकेस मधली मालिका आहे – पॉलिशड! अर्थात तरीही खूप पारायणं झाली आहेत हिची!

Jackson heights – दहा मधल्या तीन मालिका जिच्या नावे आहेत तिची म्हणजे मेहरीन जब्बारची ही मालिका आहे. संपूर्णपणे (जवळपास) अमेरिकेत घडणारी, तिथल्या स्थलांतरीत पाकिस्तानी लोकांच्या सुखदुःखाची गोष्ट. नोमन इजाझ आणि आमना शेख या दोघांचा अभिनय फार छान! एकदा बघावी अशी मालिका नक्कीच आहे.

दूर ए शेह्वार (durr-e-shehwar) – वरकरणी ही एका खाष्ट सासूच्या ताब्यात सापडलेल्या सुनेला अगदी जुन्या सबर आणि नेकी वगैरे मूल्यांना चिकटून राहण्याचा सल्ला देणारी प्रतिगामी मालिका वाटते. पण तरीही तिच्यात एक सच्चेपणा आहे. सगळ्यांची कामं फार सुंदर झाली आहेत आणि संवाद अप्रतिम आहेत. त्यामुळे एकदा बघण्याच्या लिस्टमध्ये ही मालिका नक्कीच आहे.

रकीब से (raqeeb se) - बी गुल फार कमी मालिका लिहिते पण ज्या लिहिते त्या खासच असतात! इतक्यात आलेली रकीब से अशीच एक मालिका.
रकीब से ये नजारें फरेब देते रहें
हमें तो झुठे सहारे फरेब देते रहें
(प्रेमातल्या प्रतिस्पर्धी/शत्रू सारखे या आयुष्यातले प्रसंग मला दगा देत राहिले. मला तर खोट्या आधारांनीच दगा दिला आहे.)
जेव्हा मालिका सुरू होते तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे असं कसं? म्हणजे कन्व्हेंशनल गोष्टी घडतात पण तरीही reaction मात्र तशी येत नाही. कोणती बायको नवऱ्याच्या २० वर्षांपूर्वी असलेल्या प्रेमप्रकरणाची भलामण करेल? कोणत्या घरात वडिलांच्या डायऱ्या मुलीला वाचायला मिळतील? पण हे घर असं आहे! बी गुल ने दुनियेचे नॉर्म्स झुगारून देत ही पात्रं उभी केली आहेत.
स्टोरी वेगळी नाहीये पण व्यक्तीरेखा complex आहेत आणि conventionally वागत नाहीत. त्या तशा का वागत नाहीत याची काही कारणं नंतर येतात. No one has a clean slate. हाजरा, मक्सूदसाब आणि सकीना सगळ्यांचे स्वतःचे आणि काही एकमेकांशी जोडलेले unresolved issues आहेत. पुढे त्यांचा उलगडा होतो. मग जेव्हा सकीनाला मारहाण करणारा तिचा नवरा रफिक अली याची एंट्री होते तेव्हा आपल्याला त्याची ओळख होते. तो देखील व्हिलन नाहीये जसा कन्व्हेन्शनली असतो. त्याचीही काही व्हॅलिड दुःखं आहेत.
म्हटलं तर ही हाजरा, सकीना, इन्शा आणि अमीरा या चार बायकांची गोष्ट आहे. मालिका सुरू होते तेव्हा या चौघीजणी स्वतःच्या baggage सकट, प्रश्नांसकट एकमेकींच्या आयुष्यात येतात. मालिका संपते तेव्हा प्रत्येकीने आपला मार्ग शोधलेला असतो. मक्सूदसाब जरी पुरूष असले तरी त्यांचाही एक प्रवास आहे. तोही liberating आहे. पहिल्या काही भागांत पार्श्वभूमी तयार होते आणि मग पुढचे भाग सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या सुंदर arc ने प्रवास करताना दिसतात की तुम्हालाच closure मिळाल्याचा आनंद होतो!
या मालिकेत मसूद आणि आतिका ही पठडीतली पात्रं आहेत. ती आपल्याला reality check देत राहतात. But Bee Gul successfully manages to sell you her alternate universe! Bee Gul is a genius. थोडक्यात काय तर पेशन्स ठेवून पहा. थोडा वेगळा विचार आहे पण अप्रतिम मालिका आहे. Very rewarding!
सानिया सईद (हाजरा), नौमन एजाज (मक्सूदसाब), इक्रा अझीझ (अमीरा), फरियाल मेहमूद ( इन्शा) या साऱ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत. आणि कोण विश्वास ठेवेल की सकीना चं काम करणारी कलाकार पाकिस्तानची टॉपची पॉप गायिका हदिका कियानीची ही पहिली मालिका आहे आणि तिने याआधी अभिनय केलेला नाही! She is simply wonderful!

उल्लू बराए फरोख्त नहीं (घुबड विकण्यासाठी उपलब्ध नाही; ullu baraye farokht nahi) - ज्यांना डार्क मालिका आवडतात त्यांना ही मालिका नक्की आवडेल. पण माझ्यासारख्या डार्क मालिका न आवडणाऱ्या व्यक्तीला देखील ही मालिका आपल्या पटकथेने आणि अप्रतिम अभिनयाने बांधून ठेवते. जमिनीच्या वादामुळे वितुष्ट आलेल्या दोन सख्ख्या भावांची आणि त्यांच्या मुलांची कहाणी. झी जिंदगी वर 'आज रंग है' या नावाने ही मालिका प्रसारित झाली होती. अफाट कामं झाली आहेत सगळ्यांचीच! जरूर बघाच असं सांगेन.

परिजाद (parizaad) - परीझाद म्हणजे सुंदर, परीचा मुलगा असावा असा. या मालिकेच्या नायकाचं नाव परीझाद आहे पण गरीबीत वाढणारा, दिसायला यथातथाच, सर्व भावंडात धाकटा त्यामुळे सतत दुर्लक्षित, आत्मविश्वास नसलेला असा आहे. दोन्ही भाऊ आणि वहिन्या चांगले नाहीत पण त्याची बहिण खूप चांगली आहे. आणि मुख्य म्हणजे तो स्वतः खूप हुशार, साहित्याची आवड असलेला आणि स्वभावाने अत्यंत नेक, सत्याची कास धरून चालणारा आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आहे. त्याला त्याच्या आयुष्यात जी भलीबुरी माणसे भेटतात त्यांच्यामुळे परीझादचे आयुष्य कसे बदलत जाते याची गोष्ट आहे. परीझाद चे काम केलेल्या एहमद अली अकबर ने कमाल काम केलंय! बाकीचे सर्व जण देखील उत्तम. नेहमीच्या गोष्टींपेक्षा खूप वेगळी आणि छान हाताळलेली गोष्ट आहे. जरूर पहावी अशी. सध्याच्या सुरु असलेल्या मालिकांमध्ये हिट मालिका आहे ही.

हम कहाँ के सच्चे थे (hum kahan ke sachay thay) - माहिरा खानची comeback मालिका जी काल रविवारी संपली. पालकांच्या अट्टहासापायी भावंडांमधली स्पर्धा किती टोकाला जाऊ शकते हे सांगणारी मालिका. कामं सगळ्यांचीच खूप छान झाली आहेत पण मधले एक दोन भाग जरा ताणले आहेत आणि शेवट मला पूर्णपणे आवडला नाही. तरीही एकदा नक्की बघता येईल अशी मालिका आहे.

जो बिछड गये (Jo Bichar Gaye) - दास्तान या भारत पाकिस्तान फाळणी वरच्या उत्तम मालिकेचं दिग्दर्शन करणाऱ्या हायसम हुसेन ने या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. ही मालिका बांगलादेश युध्दात सामील झालेल्या कर्नल फारूक यांच्या पुस्तकावर आधारित मालिका आहे. उत्तम निर्मितीमूल्य आणि पकड घेणारे कथानक आहे. आत्तापर्यंत फक्त ४ भाग झाले आहेत. जरूर बघा असं सुचवेन. माझ्या अत्यंत लाडक्या नादिया जमील ला पुन्हा काम करताना पाहून फार फार छान वाटलं कारण मध्यंतरी तिला कॅन्सर झाला आहे आणि ती उपचारांसाठी परदेशी गेली आहे असं वाचलं होतं!

दोबारा - माझ्या आवडत्या हदिका कियानीची दुसरी मालिका! एका लवकर लग्न झालेल्या आणि वयाच्या चाळीशीत वैधव्य आलेल्या स्त्रीची प्रेमात पडण्याची, स्वतंत्र होण्याची गोष्ट आहे. या मालिकेचे देखील ७/८ भाग झाले आहेत. त्यामुळे पुढे ही मालिका कोणते वळण घेईल आणि आवडत राहील का ते माहिती नाही. पण अजूनतरी खूपच छान चालू आहे.

अजून खूप नावं डोळ्यासमोर येत आहेत. दास्तान, आंगन, दाम, बिन रोए, संग ए मर मर, दियार ए दिल, दिल ना उम्मीद तो नहीं, उदारी, रांझा रांझा कर दी, खुदा और मुहोब्बत - यातल्या काही मी पाहिलेल्या नाहीत अजून पण सगळ्यांबद्दल चांगलंच ऐकलंय. अजून ईद स्पेशल मालिका (सुनो चंदा) आणि टेलिफिल्म्स बद्दल तर लिहिलंच नाहीये! पण ते सगळं प्रतिसादांत वेळ मिळेल लिहिते. शिवाय काही छान reviews आणि कलाकारांच्या मुलाखती यांच्याबद्दल पण लिहिनच. यातील बहुतांश मालिका या युट्युबवर उपलब्ध आहेत. नाहीतर dailymotion वर पण आहेत. पाकिस्तानी मालिकांचा एक मोठा चाहतावर्ग मायबोलीवर आहेच. त्यांना सर्वांना भरपूर भरभरून लिहा अशी विनंती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख करून दिली आहे सगळ्या मालिकांची.
मी यातील काहीच पाहिले नाहीये. पण आवडेल पाहायला.
युट्युबवर आहे तर पाहता येईल.

धन्यवाद ही यादी दिल्याबद्दल.

ज़िंदगी गुलझार है आवडल्यावर इथे वाचून हमसफर बघितली. पण ती नाही आवडली. माहीरा खान रड रड रडते आणि उरलेल्या वेळात पडेल डोळ्यांनी वावरते. ती आणि फवाद खानमध्ये केमिस्ट्री-बिमिस्ट्री काही दिसली नाही.
जिंगुहै सनम सईदचं काम आणि एकूण वावर खूपच चांगला होता. तिची कुठलीतरी मालिका बघेन आता.
नंतर परत एकदा इथे मालिकांची यादी शोधायचा प्रयत्न केला होता पण ती प्रतिसादांमध्ये असल्याने आळशीपणा केला. आता ह्यातल्या काही बघेन नक्की.

बापरे पाकिस्तानी मालिकांची एवढी लिस्ट.. भारी आहे

ज़िंदगी गुलझार है - हि माझी फेवरेट
हि बघितल्यावर कोणीही फवाद खानच्या प्रेमात पडेल
>>>>
हा फवाद खान त्या खूबसुरत पिक्चरमधला का? विराट कोहलीसारखा दिसणारा..

जिंदगी गुलजार, हमसफर आणि जॅक्सन हाईट्स पाहिल्यात आणि तिन्ही खूप आवडल्या. टायटल सॉंग खरंच बेस्ट असतात.. जॅक्सन हाईट्स चं लाईया लाईया फार आवडलं होतं आणि हमसफरचं पण फार आवडते (हे किती अगणित वेळा ऐकलंय..). लाईया लाईया मॅडमच ऐकलं होतं त्यांनी ते बहुदा एकदम उतार वयात गायलं होतं (फास्ट रिथम आहे ) पण ऐकताना अजिबात वाटत नाही.. हे सॉफ्ट व्हर्जन एकदम वेगळंच वाटलं त्यामुळे.

Mast Dhaga !

Suno Chanda is my most favorite serial. Actually it needs separate thread.

हा फवाद खान त्या खूबसुरत पिक्चरमधला का? विराट कोहलीसारखा दिसणारा >> हो तोच.. पण त्यात त्याला सोनम कपूरने फार काही बोलू दिलं नाही

हमसफर बघितली. पण ती नाही आवडली. माहीरा खान रड रड रडते आणि उरलेल्या वेळात पडेल डोळ्यांनी वावरते>> अगदी.. मी आधी जिंदगी गुलजार है बघितली त्यामुळे मला तरी हमसफर कॅान्सेप्च्या दृष्टीने थोडीफार बॅालिवूड टाईप वाटली.. जिंदगी गुलजार है चे आवडणारे एपिसोड्स मी अधूनमधून बघतच असते.. ती मला कायम वेगळ्याच लेवलची वाटते.

हमसफर बघितली. पण ती नाही आवडली. माहीरा खान रड रड रडते आणि उरलेल्या वेळात पडेल डोळ्यांनी वावरते
+१ मलाही वेळ वाया गेला असे वाटले.

मस्त लिहिलं आहेस. फार फॉलो करून नाही बघितल्या, पण टीव्ही वर लागलेली असेल, तर कायम त्यात गुंतून गेलेलं आठवतंय. दुःखाची, उदासपणाची किनार, परिस्थितीचे खलनायकी असणे ++.
त्यातली पात्रांची नावं पण फार भारी असतात. तबरेज आणि अलीसे ची काही दिवसांपूर्वी बघत होतो. मालिकेचे नाव नाही लक्षात. तब्रेज नाव आधी माहीत असतं तर पोराला ठेवलं असतं इतकं आवडलं. Proud

ती वर झी जिंदगीच्या धाग्याची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.. काय छान छान लिहिलंय फवाद बद्द्ल.. शाहरूख नंतर जर कोणी मनापासून आवडलाय तर हाच.. प्लिज प्लिज प्लिज देवा, आज फवाद येऊदेत स्वप्नात Happy

खरचं खुपच छान मालिका यांच्या.. फवाद खान अन त्याच्याबरोबर ची ती नायिका मला दोघेहि आवडले..चॅनेल बंद झाल्यावर मग नाहि आल्या पाहण्यात मालीका.

जिंदगी गुलजार है पुन्हा एकदा पाहायला हवी.

मला सगळ्या मालिकांची नावं आठवत नाहीएत. पण फाळणीच्या पार्श्वभूमीवरची दास्तान, इम्रान अब्बास एक जमीनदार असतो - अमेरिकेत शिकत असतो आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न लावून दिलं जातं ती , बडी आपा , दोन बहिणींची एक गोष्ट - ज्यातल्या एकीचा नवरा इम्रान अब्बास,
जॅक्सन हाइट्समधल्या पुरुष कलाकाराने साकारलेली मुलगा / मूल हवं म्हणून वेडा झालेल्या आणि त्यापायी अल्पवयीन मुलीशी दुसरं लग्न करणार्‍या माणसाची स्टोरी, माहीरा खान - मिकाल झुल्फिकारची एक मालिका शहर - ए झात .

फार कमी मालिकांची कथानकं ग्रेट किंवा वेगळी होती. अनेकदा शेवट लादलेले वाटले . तरीही सादरीकरण , भडकपणाचा अभाव हे मुख्य कारण , सहज संवादफेक , अभिनय या गोष्टी आवडल्या.

२६ भागांची मालिका >> मला आवडतात अशा छोट्या मालिका म्हणून मी मध्यंतरी कोरीयन मालिका पाहत होतो. वरील मालिका मी पाहिल्या नाहीत पण सध्या ए आर वाय डिजिटल ने युट्युब वर सिन्फ - ए - आहान म्हणून मालिका सुरू केलेली आहे. आपल्याकडे पल्लवी जोशीची आरोहण म्हणून मालिका लागलेली दूरदर्शनवर १९९६ मध्ये तसा थोडासा बाज दिसतो आहे. पल्लवी जोशी नेव्ही मध्ये जाते त्याची कथा होती. ती मालिका पण मस्त आहे सध्या युट्युब वर आहे. सिन्फ मध्ये जास्ती नायिका दाखवलेल्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळे राहणीमान - बॅकग्राऊंड दाखवलेली आहे. यातून तिकडे बलूचिस्तान, पठाण, लाहोर, इस्लामाबाद असे वेगळे लोक आहेत आणि त्यांच्या वेगळ्या समजूती आहेत पण अजूनही काही घरांमधला विरोध सारखाच आहे असे दिसते. यात इंटरेस्टिंगली एक श्रीलंकन मुलगी पण पाकिस्तानी मिल्ट्री मध्ये शिकायला जातेय असे दाखवले आहे. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मिल्ट्रीच्या स्टोरी पेक्षा त्या नायिकांच्या घरची स्टोरी फारच इंटरेस्टींग आहे.

उगीचच आपल्याकडे अशी मालिका २५ वर्षांपूर्वी आली याचा थोडा आनंद झाला. (त्यातल्या त्यात पुढारलेला Lol )

हमसफर छान आहे. फवाद आणि माहिरा खूप सिंपल न सोबर दिसतात. सगळ्याच पाकिस्तानी सिरियल्स मधे ही सिंप्लिसिटी बघायला मिळते. जसे नॉर्मली लोक राहतात तसेच. आपल्यासारखं नाही, मोकळे(च) केस, भरजरी साड्या, किलोभर मेकअप आणि तशीच किलोभर ज्वेलरी. ओव्हरacting राहिलीच.

बिन रोये आणि दिलं लगी या दोन पाकिस्तानी सीरिअल्स सुद्धा खूप मस्त आहेत... हुमायन सईद माझा ऑल टाईम फेवरेट ॲक्टर आहे.

सदके तुम्हारे –. ही एक अशी मालिका आहे जिच्यामध्ये असलेल्या नकारात्मक भूमिकेने मला खूप प्रश्नात पाडलं. ही नेटफ्लिक्स वर आहे. धाग्याची >> +++++१

Daughter in law नावाची short film आहे पाकिस्तानी
.
छान आहे.
अनेक वेळा पाहिली गेली तरी boar नाही झाली.
Witty आहे

सगळ्यांचे आभार! छान मालिका सुचवत आहात!
जमल्यास वीकएंडला सगळ्या मालिकांच्या पहिल्या भागाची युट्युब लिंक देते.
किल्ली, डॉटर इन लॉ मस्त आहे!
धनि, तीच तर गंमत आहे. आपल्याकडच्या ८० च्या दशकातल्या किंवा अगदी दैनंदिन मालिकांचं दळण सुरु होण्यापूर्वीच्या मालिका इतक्याच छान होत्या. Pakistani dramas are stuck in a good time period in that sense. सिंफ-ए-आहन मला सुरु करायची आहे अजून.

कितीही नाही म्हटलं तरी या मालिका बघताना मन खंतावतंच कुठेतरी! इंग्रजी चांगल्या मालिका बघताना इतकं काही वाटत नाही. पण पाकिस्तानी टीव्ही आणि मराठी टीव्ही मालिकांची तुलना नकळत केली जाते. कारण या दोन्ही इंडस्ट्रीज मध्ये समानता आहे. पाकिस्तानी टीव्ही वरच्या ९५% मालिका या टिपिकल, run of mill प्रकारच्या असतात. पण ५% मालिका मात्र अप्रतिम असतात. एक चोखंदळ प्रेक्षक म्हणून माझी खरंतर तेवढीच अपेक्षा आहे की मला वर्षांतून ३ ते ४ दर्जेदार मालिका पहायला मिळाव्यात. बाकी मग तुम्ही टीआरपी ची गणितं सांभाळा.
मराठीत मात्र आज घडीला १००% मालिका या टिपिकल, run of mill प्रकारच्या असतात. सर्व प्रकारचे टॅलेंट आणि पैसे असूनही वर्षांतून किमान २ किंवा ३ उत्कृष्ट टीव्ही मालिका का तयार होऊ शकत नाहीत हे मला पडलेलं कोडं आहे.
टिपिकल मालिका देखील मर्यादित भागांच्या असतील तर त्या पहायला रंजक वाटू शकतात. आपल्याकडे मर्यादित भाग ही संकल्पनाच उरली नाही त्यामुळे quality content असलेली मालिका बनवण्याच्या रेसिपीतला मुख्य घटक पदार्थच आपल्याकडे नाही अशी गत आहे. असो, तेच रडगाणं नव्या वर्षात गायला नको. मराठीतून मनोरंजनाची भूक मात्र मुळीच भागत नाही सध्या ही खंत आहे.

हम कहां के सच्चे थे मी अगदी रेग्युलरली बघितली. रविवारचा एपिसोड अपलोड झाला की लगेच बघत होते. तितक्याच उत्सुकतेने हसन आणि आमना चा रिव्ह्यू बघत होते. ते वाट बघणं मी एंजॉय केलं. माहिरा इतकीच कुब्रा मला ह्या सिरीयलमध्ये आवडली. खरंतर सगळ्यांचीच अ‍ॅक्टिंग फार सुंदर होती. काही फ्लॉज होते पण ओव्हरॉल मालिका आवडली.
आता जो बिछड गये आणि हदिकासाठी दोबारा जसं जमेल तसं बघतेय. हदिकाची मुलाखत पण लगेचच बघितली होती. तिचं प्रामाणिक बोलणं फार आवडलं मला.

संपदा, येस हसन आणि आमना चे रिव्ह्यू बघायला मजा येते! हे दोघे एक something haute नावाचा युट्यूब चॅनल चालवतात जिथे चालू असलेल्या सिरियल पैकी काहींचे रिव्ह्यू, कलाकारांच्या मुलाखती असा कंटेट असतो.
मला हसनने घेतलेल्या माहिरा आणि कुब्रा दोघींच्या मुलाखती पण आवडल्या.
हदिका तर फारच आवडू लागली आहे. गोड, विशुद्ध (खालिस) व्यक्ती वाटते ती - soft spoken, elegant, beautiful, and spiritual!

संग ए माह (=चंद्रावरील दगड/चंद्राचा तुकडा) चे दोन भाग झाले. तगडी स्टारकास्ट आणि आतिफ अस्लमची अभिनेता म्हणून पहिली मालिका. छानच काम करतोय तो! पहिल्याच मालिकेत नौमन एजाज, सानिया सईद, सामिया मुमताज यांच्या सारख्या कसलेल्या लोकांसोबत काम करताना उठून दिसणं सोपं नाही. शिवाय एका सध्याच्या काळातल्या (contemporary) मालिकेत एक बिगर-मुस्लिम पात्र (शीख) पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत असलेलं पाहते आहे. In fact, मालिकेची सुरुवातच गुरुद्वारा आणि गुरुबानी ने झाली आहे. कथा खूप गुंतागुंतीची वाटतेय. एकूण मजा येईल बघायला.
जो बिछड गये देखील चांगली चालू आहे. बांगलादेश निर्मितीचा इतिहास इतका नीट माहिती नाहीये पण त्याने मालिका कळत नाही असे होत नाही. कारण जी पात्रं आहेत त्यांच्या कथा देखील आहेतच ना. निर्मितीमूल्यं जबरदस्त आहेत. एकदम १९७१ सालातील घटना पाहत असल्याचा फील येतो.
दोबारा - पॉलिटिकली करेक्ट आणि प्रोग्रेसिव्ह असा अत्यंत अवघड तोल या मालिकेने फार छान सांभाळला आहे. विधवा (उर्दूत बेवा) स्त्री ने कसं दिसावं, जगावं, लग्न करावं का, कोणाशी करावं, का करावं? जर मोठी जाणत्या वयाची मुलं असतील तर त्या बाईला जोडीदाराची गरज असते का? अशा अनेक प्रश्नांना या मालिकेत केंद्रस्थानी आणलं आहे. शिवाय सगळे कलाकार जबरदस्त! आता मालिकेत पुढे काय दाखवतात याची मला उत्सुकता आहे.
परीझाद - पुढच्या मंगळवारी या मालिकेचा शेवटचा भाग येईल. फारच वेगळी मालिका आहे जी एक क्षणही प्रेडिक्टबल झाली नाही आणि जिने कधी निराशाही केली नाही. अहमद अली अकबर च्या करिअर मधली माईलस्टोन भूमिका आहे ही. हॅट्स ऑफ टू हिम!

आता सिंफ ए आहन पाहायला सुरु करणार आहे. आधीच करणार होते पण आतिफ अस्लम मुळे संग ए माह ने बाजी मारली!

जिंदगी गुलजार है चे आवडणारे एपिसोड्स मी अधूनमधून बघतच असते.. ती मला कायम वेगळ्याच लेवलची वाटते.

नवीन Submitted by म्हाळसा on 3 January, 2022 - 15:17 >>>>> सेम हियर.

पुर्वी झी जिंदगीवर 'कितनी गिरह अब बाकी है', सिरीयल होती त्यात बहुतेक वेगवेगळ्या कथा होत्या. ती मला आवडायची, काही कथा फार सुरेख होत्या. टायटल साँग पण मस्त होतं.

बाकी हमसफर बघितली, मधले भाग वगळून, ती आवड्ली. मागे कुठेतरी लिहीलेलं परत लिहीते, जिंदगी गुलजार है मला बोअर वाटली. मी एकदा पुर्ण रविवार दाखवणार होते, तेव्हा बघायला घेतली होती, फार संथ वाटली, नाही बघू शकले. फवाद माहीरा जोडी जास्त आवडली हमसफर मधली. त्यातली त्यांची मुलगी पण फार आवडलेली.

जि ने सुचवलेली परीझाद बघायची आहे, राहून जातंय.

मेरे हमसफर नावाची नवीन सिरियल आहे. थोडीफार हमसफर सारखीच वाटते. हिरोईन अगदी स्नो व्हाइट आहे. हाला आणि हिरो हमजा. छान आहे. यू ट्यूबवर एपिसोड्स येतात. १४ झालेत आतापर्यंत.

मला ए मुश्त ए खाक मालिका यु ट्युबवर दिसली. दोन भिन्न विचारसरणी असलेल्या लोकांची गोष्ट एवढी साधी स्टोरी आहे. पण सादरीकरण फार आवडलं, म्हणजे एक भाग पाहीला की पुढचा बघावासा वाटतोय.
वर तुम्ही जे काही लिहिलंय पाकिस्तानी मालिका बदल ते सग ळं रीलेट होतंय हीपण बघताना. सिंपल फॅमिली स्टोरीज , पण तरीही खिळवून ठेवते. यातली लीड पेअर आवडतेय, सना जावेद फारच छान आहे.

आजच रमझान स्पेशल सिरियल चौधरी अँड सन्स चा पहिला भाग पाहीला. चांगली टाईमपास वाटते आहे. रोज एक भाग.. ईदच्या दिवशी शेवटचा एपिसोड.
सुनो चंदा च्या सारखी एक हम तुम म्हणून पण रमझान सिरियल सुरू आहे. तिचा पहिला भाग चांगला वाटला. पण पुढे नाही पाहिले अजून.
भारतात युट्यूबवर आहेत दोन्ही सिरियल्स.

मेरे हमसफर नावाची नवीन सिरियल आहे. थोडीफार हमसफर सारखीच वाटते. हिरोईन अगदी स्नो व्हाइट आहे. हाला आणि हिरो हमजा. छान आहे. यू ट्यूबवर एपिसोड्स येतात. १४ झालेत आतापर्यंत.>>>>>>>>>>>

इकडे वाचल्यावर बघायला सुरू केली, सात एपिसोड पाहिले.. .

Pages