मुलांच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट सुचवा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 November, 2021 - 12:54

सर्वप्रथम प्रामाणिकपणे सांगू ईच्छितो की रिटर्न गिफ्ट काय द्यायचे याआधी त्याचे पर पीस बजेट काय असावे याचा अंदाज घेणे आणि मगच त्या बजेटमध्ये काय घेता येईल हे शोधणे असे मध्यमवर्गीय कुटुंब आहोत आम्ही.

तर आम्ही याआधी भाड्याने राहायचो त्या सोसायटीमध्ये मुलांच्या वाढदिवसाला केवळ दहा बारा मुलेच यायची. ती अधिक एक-दोन नात्यातील आणि कामवाल्या मावशींची पकडून आकडा पंधराच्या फार पुढे जायचा नाही. त्यामुळे व्यवस्थित योग्य बजेट राखत रिटर्न गिप्ट देता यायचे जे मुलांना आवडेल आणि उपयुक्तही ठरेल.

मुलीच्या आधीच्या प्लेग्रूप नर्सरीलाही मोजकीच मुले होती. त्यामुळे तिथेही रिटर्न गिफ्टचे बजेट काय ठेवावे या प्रश्नाने फार सतावले नाही. नंतर शाळा बदलली तशी मुले वाढली पण त्या शाळेत बड्डे सेलिब्रेट करताना रिटर्न गिफ्ट नावाचा प्रकार अलौडच नव्हता.

त्यानंतर मग नव्या सोसायटीत मुलीचा वाढदिवस झाला तेव्हा ईथले सारे रहिवाशी नवीनच होते. तरीही मुलीने वीसपंचवीस मुलांना गोळा करून आणले होते. तेव्हा या सोसायटीत रिटर्न गिफ्ट नावाचे फॅड सुरू करायचा पहिला मान पटकवायचे आम्ही टाळले. पण नंतरच्या ईतर बड्डेजना ती प्रथा सुरू झालीच.

आता मुलाचा बड्डे येतोय तर आम्हालाही रिटर्न गिफ्टचा खर्चा करावाच लागणार. पोरगी जगतमित्र असल्याने तिच्याच मित्रमैत्रीणींनी घर भरणार. तिला नेमकी किती तो आकडा मोजायला लावला तर तिने चटचट पन्नासेक नावे घेतली. मग आम्ही त्यातील काही मोठ्या वयाच्या मुलांवर काटछाट मारली आणि तिलाही बजावले की सगळीकडे उगाच दवंडी पिटू नकोस. तेवढेच रिटर्न गिफ्टचे बजेट कमी होईल. वा पर पीस बजेट वाढेल असेही म्हणू शकता.

पण तरीही तीस ते पस्तीस मुले येतीलच. ईतर वरचे घरचे दोनचार आणि थोडीशी मार्जिन पकडून साधारण चाळीसेक रिटर्न गिफ्ट मागवावे लागतील. त्याचसोबत मुलाची ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष शाळाही सुरू झालीय. तिथेही दहा बारा गिफ्ट आणखी पकडा. अर्थात ती सगळी छोटूशी चार वर्षांचीच मुले असल्याने त्यांच्यासाठी वयाला साजेसे वेगळे गिप्टस आणायचा विचार करतोय. सोसायटीतील मुले मात्र तीनचार ते दहाबारा वयापर्यंतची मिक्स येतील.

आमच्या ओवरऑल बड्डे बजेटनुसार आणि मुलांचा आकडा पाहता पर पीस बजेट आम्ही ७० रुपये ठरवले आहे. तरी आधी मी पन्नासच म्हणत होतो. पण बायकोने झुरळासारखे झटकले. एवढ्यात काही येत नाही म्हणाली. उगाच काहीतरी द्यायचे म्हणून द्यायचे हे मलाही पटत नाही. आणि न देण्याचाही जणू पर्यायच नाही. पण चारचौघांकडे चौकशी केली तर स्वस्तातही मस्त मिळू शकतेच. मग नेहमीसारखी मायबोली आठवली. प्लीज मदत करा स्वस्त आणि मस्त रिटर्न गिफ्ट सुचवा. सोबत एक नग कितीला पडेल हे सुद्धा लिहा. ऑनलाईन लिंका दिल्यास उत्तमच. अन्यथा बड्डेच्या ईतर खरेदीसाठी वाशीच्या एपीएमसी मार्केटलाही राऊंड मारायचा विचार आहेच. तिथेही बघता येईल.

धाग्याचा फायदा सर्वांना _/\_

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन वर्षाचं कॅलेंडर आणि वाॅल प्लॅनर

कपकेकवरचं डेकोरेशन शिकवा आणि मग ग्लिटर्स वगैरे द्या

नवीन वर्षाचे ग्रिटींग कार्डस् शिकवा आणि साहीत्य द्या घरी.
कार्डशीट, स्केचपेन्स वगैरे. होईल तुमच्या बजेटमधे

रिटर्न गिफ्ट नको असं म्हटलं तर मुलं‌ वैतागतील असं पालकांच्या मनातच फक्त असतं - वर लिहिल्याप्रमाणे आधीपासूनच जर एक्सप्केटेशन‌ सेट केले असतील‌ - नो गिफ्ट‌ आणि रिटर्न गिफ्ट अशाप्रकारे - तर मुलं आणि पालक दोन्ही गट सहज तयार होतात असा माझा लेक लहान असतानाचा अनुभव आहे

थोडीफार गेम वगैरेची तयारी ठेवावी मात्र बहुतेकदा मुलांना दंगा करण्यातच इंटरेस्ट असतो असा माझाही अनुभव आहे, किंबहुना तो दंगा करतानाच त्यांना भरपूर मजा येते असं लक्षात आल्यानंतर मी केवळ दंगा अशीच थीम ठेवून पार्टी करायला लागले.... अशी पार्टी भरपूर हिट होते असा अनुभव आहे- सगळेजण सेफ आहे तेवढं बघणं हेच मोठ्यांनी करायचं बाकी लहानांना काय तो गोंधळ घालू द्यायचा/ मोडतोड होऊ शकतील अशा वस्तू वर उचलून ठेवायच्या आणि अजिबात मुलांच्या मध्ये पडायचं नाही एवढेच पथ्य पाळत असे- अशा पार्टीसाठी खाऊ सुद्धा येता-जाता चरता येईल अशा पद्धतीचा ठेवत असे

मुलांचा किती हिरमोड होईल रिटर्न गिफ्ट नसेल तर... ...काहीही हिरमोड होत नाही.माझा लेक लहान असताना,कामवाली आणि वॉचमनची ३ मुले(त्यावेळी ते लोक बिल्डिंगच्या खाली रहायचे.) पण बर्थडेला आली होती.त्यांना गिफ्ट देण्याबाबत कमीपणा वाटू नये म्हणून मी,कोणीही गिफ्ट आणायची नाहीत म्हणून बजावले होते.पूर्ण घर मुलांच्या स्वाधीन होते.सर्वांनी मिळून हॅरी पॉटरचा मूव्ही पाहिला.११ वाजल्यापासून सर्वजण खेळत होते.संध्याकाळी मी कुठले कपडे घालायचे ते देखील त्यांनीच ठरवले होते.माझा मुलगा प्रेझेंट न मिळाल्याने नंतर जरा नाराज होता.

मुलांच्या दंग्याला शिस्त लावावी म्हणून त्यांना
साने गुरूजींच्या गोष्टी सांगाव्यात.
त्यांच्याकडून भजन / कीर्तन करवून घ्यावे
नामस्मरणाचे फायद सांगावेत
एखादे धार्मिक कार्य टास्क म्हणून द्यावे.

यामुळे वाढदिवसाला विधायक वळण लावून मुलेही आयुष्यभर हा वाढदिवस विसरणार नाहीत.

बाकी ऋन्मेष चा निर्णय.इथे खूप पर्याय मिळाले आहेत.
हे अजून काही.

मासा शेप घडीची पिशवी
https://www.amazon.in/Oytra-Reusable-Foldable-Friendly-Shopping/dp/B0843...

हँड पपेट
https://www.amazon.in/House-Quirk-Animal-Finger-Puppets/dp/B01FXBSKFC/re...

सॅक
https://www.amazon.in/TruVeli-Cartoon-Haversack-Birthday-Assorted/dp/B07...

एलईडी लँप
https://www.amazon.in/Jiada-Favourite-Birthday-Portable-Flexible/dp/B01M...

हँड सॅनिटायझर
https://www.amazon.in/Livsmart-character-Antibacterial-sanitizer-availab...

बॅक पॅक
https://www.amazon.in/Birthday-Popper-Pieces-Mermaid-Haversack/dp/B084LC...

१) एका वर्षी आम्ही स्टेशनरी घाऊक विक्रेत्याकडे जाऊन - एक पेन्सिल जिला मागच्या टोकाला वेगवेगळ्या आकारातले खोडरबर (फुलपाखरू, मिकीमाऊस, इ.) असते + एक मिनि क्रेयॉन्सचे पाकीट + एक अगदी छोटे नोटपॅड + हे सगळे एका छोट्या वेगवेगळ्या रंगातल्या अर्धपारदर्शी पाकीट/पाऊचमध्ये (ज्याला उघडबंद करण्यासाठी खाटखूटवाले - म्हणजे दाबून बंद करायचे - बटन असते), असे रिटर्नगिफ्ट म्हणून दिले. एकदम चाळीस-पन्नास गिफ्ट्स हवे होते म्हणून हे चांगले वाटले. आश्चर्य म्हणजे अजिबात अपेक्षा नसताना हे गिफ्ट भयंकर हिट झाले. त्यात मुलांना नेमके काय आवडले हे मला आजतागायत कळले नाही.

२) एका वर्षी सगळ्यांना एकाच प्रकारचे गिफ्ट देण्याऐवजी प्रत्येकाला वेगळे दिले तर काय हरकत आहे असे म्हणून, छोटे रंगीत रबरी प्राणी, पक्षी, जवान + छोटी शोभायंत्रे + काचेचे छोटे वेगवेगळे पेपरवेट + लाकडी केसमध्ये फिट केलेले छोटे लोलक + काचेच्या रंगीत गोट्या अश्या वस्तू जमा केल्या आणि त्यातल्या हाताला येतील त्या तीन वेगवेगळ्या वस्तू उचलून रंगीत कागदात पुडे बांधले. हे गिफ्टही मुलांना फार आवडले. घरी जायला निघण्यापूर्वी कोणाच्या पुड्यात काय आले असेल हे उघडून पाहण्यात आणि त्या हातात घेऊन बघण्यात मुले बराच वेळ रमली.सोसायटीतली मुले नंतरही या वस्तूंनी खेळत तेंव्हा 'माझे घुबड, हत्ती आणि काचेची एक निळी गोटी या बदल्यात तू मला तुझा लोलक दे' असे सौदेही करत.

रिटर्नगिफ्ट अमूकच किंवा अमूक बजेटचेच असेल तर मुलांना आवडेल असा बाऊ मुख्यत्वे मोठ्यांच्या कडूनच जास्त केला जातो. मुलांना छोटेसे आणि साधेसे जरी गिफ्ट मिळाले तरी ती खूश होतात.

रिटर्न गिफ्ट नको असं म्हटलं तर मुलं‌ वैतागतील असं पालकांच्या मनातच फक्त असतं. <<< यातही तथ्य आहे. पण हल्ली रिटर्नगिफ्ट मिळेल अशी एक अपेक्षा आणि उत्सुकता मुलांच्या मनात असते. तेंव्हा असे करण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा नीट सेट केल्या तर काही अडचण येणार नाही.

अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने ब-याच वर्षांपूर्वी एका पेपरमध्ये एक वीकली कॉलम लिहिला होता. त्यात एकदा तिने तिच्या मुलाच्या वाढदिवसाला काय केलं ते सांगितलं. घरी चांगली माती आणली, छोटे पॉट्स, पणत्या वगैरे करता येतील अशी. १५-२० मुलं होती, ४-१२ वयाची. तिने माती चाळून पाणी घालून नीट सारखी करून घेऊन एक छोटा कप हातानेच घडवून दाखवला. मग मुलांना थोडी माती, पाणी दिलं. आवडीनुसार आकार करा, पुन्हा मोडा पुन्हा करा... मुलं २ तास मस्त रमली. शेवटच्या अर्ध्या तासात जो होईल तो आकार तुमचं रिटर्न गिफ्ट असं आधीच सांगितलं होतं. मग तो रंगवायला रंग आणि ब्रश तिने गिफ्ट म्हणून दिले.
रोजचे साधे कपडे घालून या, धमाल आहे आणि सरप्राइज आहे असं तिने आधीच सांगितलं होतं. आवर्जून नंतर तिला कौतुकाने फोन आले, मुलांनी धमाल केली म्हणून.

आता तिचं घर म्हणजे मोठा बंगला, वेगळं अंगण, मातीचा राडा निस्तरायला हाताशी माणसं वगैरे गृहीत धरलं तरी कल्पना छान होती. ८-१० वर्षांपूर्वी. वर कोणीतरी ओरिगामी सुचवलं आहे ते आवडलं मला. किंवा साधे सोपे एक-मिनिट गेम्स, जिंकल्यावर/पूर्ण केल्यानंतर चिठ्ठी उचलून मिळेल ते रिटर्न गिफ्ट. म्हणजे व्हरायटी होईल गिफ्टसाठी. गेम्स खेळताना वेळपण जाईल. पण ४० मुलं म्हणजे किमान २ माणसं हवीत मॅनेज करायला.

तुम्हाला आणि मुलांना शुभेच्छा.

भरभरून प्रतिसाद आणि खूप छान पर्याय सुचवले गेले. सर्वांचे आभार आणि धन्यवाद Happy

धाग्याचा फायदा सर्वांनाच पण माझ्यासाठी तुर्तास कहानी मे ट्विस्ट आलाय

काल रात्री घरी रिटर्न गिफ्टचा विषय निघाला. मी लगोलग ईथे धागा काढला. त्यानंतर बायकोने मुलीला सोबत घेत बिल्डींगमधील मुलांची लिस्ट बनवायला घेतली. नावे कागदावर लिहायला सुरुवात करताच ती पन्नासच्याही बरेच पुढे गेली. काटछाट करूनही मोठा आकडा राहिला. त्यामुळे शाळेतली मुलेही पकडून एकूण रिटर्न गिफ्ट ५० आणायचे ठरवले. बजेट अर्थात तेच राहील असे ठरवून मी झोपलो.
पहाटे उठून मुलांना घेऊन अर्ली मॉर्निंग वॉकला गेलो. घरी आल्यावर पुन्हा झोपलो. दुपारी जेव्हा उठलो तेव्हा समजले की बायको तिच्या बहिणींना घेउन रिटर्न गिफ्ट शोधायला एपीएमसी मार्केटला गेलीही. आज जायचे हे काल आमच्या प्लानमध्ये नव्हते. त्यांचे अचानक ठरले. थोडक्यात हा धागा आणि ईथले पर्याय यंदा तरी माझ्या कामाचे नाही. ते बायकोपर्यंत पोहोचवताच आले नाहीत.

स्टेशनरी सेट, पॉप ईट वा तत्सम गेम, क्ले ईत्यादी पर्याय मनाशी ठरवून ती गेली होती. त्यातले स्टेशनरी सेट तिला आवडला ते घेतले. तसेच बजेट ऊंचावून पर पीस ९० रुपयाचे ५० पीस घेऊन आली. म्हणजे अजून घेऊन नाही आली, तर ईतरही बरेच गिफ्टस घेतल्याने ते रात्री होम डीलीव्हरी करणार आहेत. उरलेले पीस परत घ्याल तरच विकत घेते असे त्या दुकानदाराला सांगायचे हे मी काल बायकोला बोललो होतो. तसे डील झाले की नाही कल्पना नाही. नाहीतर स्टेशनरीच आहे, आपली पोरं वापरतील म्हणून शिल्लक माल उगाच गळ्यात पडणार आहे.

असो,
पण वर आलेले बरेच पर्याय आवडले आहेत. पुढे कामात येतीलच. पण यंदाचे काम झाल्याने प्रत्येकाला आता वैयक्तिक पोचपावती देत नाही. तरी थोडक्यात...

१) प्लांट देण्याची कल्पना छान आहे. किंबहुना आदर्श आहे. पण आमच्याईथे आजवर कोणी मुलांना असे रिटर्न गिफ्ट न दिल्याने मुले कसे रिअ‍ॅक्ट करतात याबाबत अंदाज लागत नाहीये. तरी द्यायचे झाल्यास ते कसे द्यायचे? म्हणजे माती, कुंडी, बिया वगैरेचा सेट मिळतो का? की छोट्याश्या कुंडीत उगवलेले छोटेसे प्लांटच द्यायचे असते? यातले काही ऑनलाईन मागवता येईल का? प्लीज लिंक असल्यास शेअर करा. माझ्यातर्फे तरी या आयडीयेला होकार आहे.

२) प्रत्येकाचे नाव टाकून पर्सनलाईज केलेले गिफ्ट देणे हे ऐकायला भारी वाटत असले तरी प्रॅक्टीकली हे मॅनेज करायला एखादा ईव्हेंट मॅनेजरच हायर करावा लागेल Happy
पण येस्स, शाळेच्या मित्रांबाबत हजेरीपटानुसार नावे घेऊन हे करणे शक्य आहे..

३) नो गिफ्ट, नो रिटर्न गिफ्ट.. हे तर माझ्यासाठी बेस्टच होते. पण घरून मान्यता मिळणार नाही. आणि याबाबतीत (किंबौना कसल्याच बाबतीत) माझी घरी चालत नाही.

४) पुस्तकांची कल्पनाही आवडली आहे. प्लांटसारखीच आदर्श वगैरे. पण हल्ली पुस्तकेही फार महाग मिळतात. मुलीसोबत पॅरेंट टीचर मिटींगला जायचो तिथे बाहेर मुद्दाम स्टॉल लाऊन लुटायचे नुसते.

५) रंगीत कागदे आणून काहीतरी करायला शिकवा वगैरे ओरीगामी आयड्याही आम्हाला एवढ्या मुलांमध्ये मॅनेज करायला अवघड. त्यात ईथली मुलेही नुसते धिंगाणा आहेत. कुठली नसतात म्हणा.

६) छोट्या छोट्या मिक्स गिफ्टसची कल्पनाही आवडली. ज्याला जे येईल ते. पॅक करून द्यायचे जाताना. मग बाहेर जाऊन तुला मला काय करत मजा घ्या. एक पॅकमध्ये दोन तीन छोटे आयटम असल्यास त्यातील एखादे तरी प्रत्येकाला आवडेल. जेणेकरून कोणी बदलून द्या म्हणत येणार नाही. अर्थात हे जमवायला तश्याच छोट्या गिफ्ट आवडीने शोधाव्या लागतील. त्यासाठीही हा धागा पुढच्यावेळी कामाला येईल. उदाहरणार्थ अनू यांनी वर सुचवलेले फिंगर पपेटस मला आवडले. त्यातले एकेक यात टाकता येईल.

७) पोरांना घालायला टोप्या एका प्रतिसादात वाचलेले. मागच्यावेळी एकदोनदा आणलेल्या. आम्हीही घातलेल्या. यावेळी करायला हवे होते तसे. पण आज बायकोने मार्केटला जात सारी खरेदी केली असेल तर हे पुढच्यावेळीसाठी ठेवतो. दरवेळी टोप्या आणण्यात मजा नाही पण अध्येमध्ये एखाद्या वर्षी बड्डेचा माहौल करायला छान आहे हे.

८) लोकांनी ईतर सल्यात मुलांना बिजी ठेवायला आणि पार्टीचा माहौल बनवायला गेम्स की नुसता दंगा यावरही चर्चा केली आहे. ते डिपार्टमेंट मुलीकडे दिले आहे. ती तिच्या मैत्रीणी जमवून नाचायची हौस भागवून घेईल. त्या सर्वजणी सेल्फ कोरीओग्राफड डान्सर आहेत. मग सिस्टेमेटीक नाचो वा दंगा घालोत. आमच्यामते तरी सोसायटीतील सर्वात बेशिस्त मुले आमचीच असल्याने दंग्याचा बेंचमार्क हाय लेव्हलला सेट झाला आहे Happy

मुलगी सहा वर्षांची झाली तेव्हापासून यशस्वीरित्या नो गिफ्ट्स बर्थडे करतेय. तुला हवं तितक्या मित्रमैत्रिणींना बोलाव, पण त्यांनी कुठलंही गिफ्ट विकत आणायचं नाही, (स्वतः बनवलेलं चालेल) हे पटवून दिलं लेकीला. गिफ्ट नाही तसं रिटर्न गिफ्टसुद्धा विकत आणलेलं नाही. वेळ होता तेव्हा घरी बनवलेले कप केक, स्वतः बनवलेले ओरिगामीचे उड्या मारणारे बेडूक असं चाळीस पोरांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं आहे. बाकी पोरांच्या गिफ्ट्स म्हणजे रॅपिंग पेपर आणि प्लॅस्टिकचा कचरा असतात, ज्यात वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशी पोरीला काडीचा रस नसतो. पैसे खर्च करून कचरा वाढवाण्यापलिकडे यातून काही साध्य होत नाही.
सुदैवाने तिच्या घट्ट मैत्रिणीच्य़ा घरच्यांनाही हेच वाटतंय, तिचाही वाढदिवस असाच होतो. बाकी मैत्रिणींच्या वाढदिवसाला जातानासुद्धा या दोघींचं गिप्ट म्हणून जवळच्या दुकानाचं गिफ्ट व्हाऊचर देतो.

नो गिफ्ट, नो रिटर्न गिफ्ट हे आपण लहानपणापासून मुलांना शिकवलं ती गोष्ट वेगळी. पण ज्या सोसायटी मध्ये ती पद्धत आहे तिथे या लहान मुलांना मुलांकडूनच चार चौघात सुनावलं जातं, इतकंच काय 'आपण यांच्या घरी पुढच्या वाढदिवसापासून जायचं नाही' हे म्हणणारी मुलं पण पाहिली आहेत. अशा ठिकाणी आपलं इवलसं पोर अगदी एकटं पडल्यासारखं होतं. एका ठराविक वयानंतर मुलांना समज येते तेंव्हा हे सगळं समजावून सांगून ती पद्धत बंद करता येऊ शकतेच. आता ते ठराविक वय ठरवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी. . शिवाय गिफ्ट म्हणजे फार मोठं खर्चिक काही द्यायला हवं असं थोडीच आहे. माझ्या मैत्रिणीने मुलांना एक पेन्सिल, वासाचं खोडरबर आणि एक 5 रुपयांची कॅडबरी दिली तरी मुलं उड्या मारत होती.

मला स्वतःला रिटर्न गिफ्ट ही कन्सेप्ट कळत नाही आणि आवडतही नाही पण इतरांकडे जाऊन आपण गिफ्ट घेऊन यायचं आणि आपण द्यायचं नाही हे मला पटत नाही त्यामुळे मी दोन्ही वेळेला छोटं छोटं दिलं काही ना काही. आता दुसऱ्यांना तुमही देऊ नका हे समजावू शकत नाही आणि त्यांनी स्वतःहून दिलेलं रिटर्न गिफ्ट आम्ही घेणार नाही हे म्हणण्याचा उद्दामपणा (?) मला जमणार नाही त्यामुळे काळानुसार स्वतःला बदललं मी, काय करणार!

अगदी खरं रिया.
थोड्या नीट विचार करून उपयोग होईल अश्या गिफ्ट दिल्या घेतल्या तर मुलं व्यवस्थित आनंदाने वापरतात.

आणि एका ठराविक काळानंतर मुलं स्वतःच 'मोठी' होतात, जवळच्या लोकांसोबत वादि करायला लागतात तेंव्हा आपण 'गेले ते दिवस' म्हणत उसासत बसतो त्यापेक्षा करू दे की त्यांना पण मजा त्यांच्या काळातल्या पद्धतीनुसार. आपण आपलं बजेट ठरवायचं आणि त्यात त्यांची मजा बसवायची.

मी रिदीतच्या पहिल्या वाढदिवसाला 2-3 आर्ट प्रकार ठेवले होते, मुलांनी काही केलं नाही, फुगेच खेळत बसले.
दुसऱ्या वादिला मुलांना पॉट पेंटिंग शिकवायचा प्रयत्न केला तर मुलांनी सरळ तोंडावर 'आंटी ये बोरिंग है, गाना लगाओ ना हम नाचते है' म्हणून प्लॅन फूस केला.
आता तिसऱ्या वादिला आम्ही ट्रेजर हंट ठेवू पण आमच्या आमच्यातच. या मुलांना गाणी लावून देऊ.

पण ज्या सोसायटी मध्ये ती पद्धत आहे तिथे ...........................
Submitted by रीया on 13 November, 2021 - 23:15
>>>>

+७८६
आपले विचार चारचौघांपेक्षा वेगळे असतील तर ट्रेंड सेटर बनायला काही हरत नसते. पण जर ते मुलांशी संबंधित असेल आणि समोरच्याला हे समजवायची, उत्तरे द्यायची जबाबदारी पोरांवरही येत असेल तर ते त्यांच्यावर अन्यायकारक होईल.

अमि धन्यवाद, सध्या तर घेउन झालेत रिटर्न गिफ्टस. ईथले पर्याय आता पुढच्या मुलीच्या वाढदिवसाला कामी येतील.

त्या दिवशी मी वर अनु यांचे फिंगर पपेट्स आवडले आणि घ्यायला हवेत कधीतरी असा उल्लेख केलेला. योगायोगाने पररवाच्या चिल्ड्रन्स डेला बायकोने मुलांना जे गिफ्ट्स दिले त्यात ते सुद्धा होते Happy

मुलीचा बड्डे आला तोंडावर त्यामुळे धागा वर काढतोय.
आता बसल्या बसल्या रिटर्न गिफ्ट काय याची चर्चा चालू असताना मायबोलीवर एक धागा आहे असे आठवले.. रिटर्न गिफ्ट टाकून सर्च केले तर धागा माझाच निघाला Happy

जोक्स द अपार्ट,
स्टोरीबूक्स हा विचार माझ्या डोक्यात आहे. किमान ४०-५० मुले येण्याची शक्यता आहे. जर ५०-५० रुपयात ५० पुस्तके घेता आली ती देखील शक्य तितकी वेगवेगळी ज्यात छोट्या छोट्या स्टोरीज असतील तर मुले एकमेकांशी ते बूक्स वाचून झाल्यावर शेअर सुद्धा करू शकतील.

तर आता प्लीज असे स्टोरीबूक्स सेट कोणाला माहीत असल्यास सुचवा. फेअरीटेल्स ऐवजी बोधकथा चांगल्या. ऑनलाईन काही पर्याय दिसत आहेत. पण आत किती कश्या स्टोरीज आहेत याचा अंदाज येत नाहीये. तरी बायकोला म्हटलेय की अजून एक आठवडा आहे तर दुकानातच जाऊन बघूया पुस्तके.

आणि, हो. ईंग्लिश स्टोरीबूक्सच बघतोय. मराठीचा टक्का कमी आहे सोसायटीमध्ये..

मॅगी/ओरिओ/चिप्स/एखादे juice पॅक/चुपाचूप तत्सम बारक्या टाईमपास गोष्टींचं हॅम्पर बनवून देऊ शकता,
usually रिटर्न गिफ्ट म्हणून दिली जाणारी वस्तू घरी असतेच , किंबहुना गिफ्टपेक्षा चांगल्या दर्जाची असते.( म्हणजे गिफ्ट म्हणून camale चे खडू वॅक्स क्रेओंस येतात, घरी फॅबर कॅसल चे ऑइल पेस्टल असतात वगैरे) त्यामुळे वस्तू न वापरता पडून राहतात किंवा पुढे सरकवल्या जातात.

त्यामुळे गोष्टी न देता खाऊ द्यायला जास्त पसंती.

खाऊ इज नॉट अ रीटर्न गिफ्ट फॉर किड्स. ते तर असतेच असते Wink

छोटे पझल किट्स येतात, किंवा डीआयवाय आर्ट किट्स, मण्यांचे स्वतः बनवायचे किट्स ऑनलाईन पण मिळतात फ्लिपकार्ट वर. मुलं खूप खुश होतात.

लहान मुलीच्या वाढदिवसाला मैत्रिणीच येणार असतील ना ?
प्रत्येकीला हे रिटर्न गिफ्ट खूपच आवडेल. सगळे जण नाव काढतील आयुष्यभर. >>>>>>>>>> फारच छान गिफ्ट सजेस्ट केलत हे गिफ्ट दिल्यावर पुढचे काही वर्ष मग वाढदिवसच सेलीब्रेट नको करायला

लहान मुलीच्या वाढदिवसाला मैत्रिणीच येणार असतील ना ?
प्रत्येकीला हे रिटर्न गिफ्ट खूपच आवडेल. सगळे जण नाव काढतील आयुष्यभर. >>>>>>>>>> फारच छान गिफ्ट सजेस्ट केलत हे गिफ्ट दिल्यावर पुढचे काही वर्ष मग वाढदिवसच सेलीब्रेट नको करायला

सर्व पोरं बिल्डींगमधीलच असणार. आपापसात तर भेटणारच. वेगवेगळ्या वयोगटानुसार गिफ्ट आणायचे म्हटले तर हिशोबात आणखी काटेकोर अंदाज बांधावे लागतील.

नॉर्थ च्या देसींची टेस्ट आणि आपली वेगळी असते. सो कानाला खडा कि मराठी घरात कौतुकास्पद वाटतील अशा सगळ्याच गोष्टी टाळायच्या जर ते पार्टीला येणार असतील तर. आपली मेहनत वाया जाते.

ईंग्लिश स्टोरीबूक्सच बघतोय.> किंग सर्कल ला एका स्टेशनरी शॉप मध्ये चांगल्या पेपर/प्रिंटींग क्वालिटी ची पुस्तक मी गिफ्ट द्यायला घेतली होती. ५० रुपयाच्या एका पुस्तकात २ गोष्टी होत्या. पब्लिकेशन आठवत नाही . तिथे गेले तर फोटो काढून पाठवेन.
अमेझॉन वर Moral Stories Set of Books असे सर्च केल्यास बरेच ऑप्शन मिळतील review वाचून सिलेक्ट कर.
हि एक लिंक बघ
https://www.amazon.in/s?i=stripbooks&rh=p_27%3AMaple+Press&ref=dp_byline...

Pages