एक वेगळा दिवस!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 12 January, 2021 - 03:31

"डॅड, तू त्या लॅपटॉप वर नक्की काय करतोस? माझं एक काम आहे!" अकरा वर्षाच्या शशांकने, आपल्या कसल्याश्या मोठ्या कंपनीत बॉस असलेल्या आपल्या बापाला विचारले.

बापाने घाई घाईत आपला ती 'ऑफिसचे काम' वाली विंडो बंद केली. आणि कम्पनीच्या ऑडिटची pdf फाईल ओपन केली. रात्रीचे आकरा वाजले होते, आणि चिरंजीव जागेच होते! त्यात नवल काहीच नव्हते. रात्री उशीर पर्यंत, ऑन लाईन रहाणे, हा त्या घरातील पुरुषांचा, डिजिटल हक्क होता!

"मी न? अरे, ऑफिसचं काम असत. वेळेत व्हायला हवं. मिट्स आणि कॉन्फरन्सेस असतात. डाटा आणि रिपोर्ट्स स्टुडी करावे लागतात. टेन्शन असत, सन, तुला नाही कळायचं! तू माझ्या एव्हडं होशील तेव्हा कळेल, ऑफिस काय असत आणि जवाबदारी काय असते? पण तुझं काय काम होत?"

"डॅड, मी उद्या स्कुलला जाणार नाही! तुला सिक नोट लिहून द्यायला लागेल, क्लास टीचर साठी! अन, खरं टेन्शनत आम्हा स्टुडन्ट्सलाच असत! आमच्या सारखं टेन्शन कुणालाच नाही! ती स्टुपिड, हिस्ट्रीची मॅम, आपण स्वतः पुस्तकात पाहून शिकवते अन आम्हाला प्रश्न विचारताना मात्र, 'डोन्ट रेफर द बुक्स' म्हणते! काही टीचर्सला चिट करतो आम्ही, पण काही खूप टफ असतात! ती स्वाती मॅम, दिसायला चिकणी आहे, पण बथड डोक्याची! पण बियर कराव लागत तीच हिंदी!"

"ये! काय बोलतोस? आपल्या टीचर्स बद्दल आदर हवा!"

"डॅड! आदराच, नको सांगू मला, ती तसलीच आहे! रेस्पेक्टफुल असलं, दिसलं तर. रिस्पेक्ट देता येतो! सगळ्यात रिस्पेकटफुल आपली मम्मी आहे! पण ते जाऊ दे. आता उद्याचंच पहा ना, ती द्राक्षा मॅडम, मॅथ्स! हिटलर आहे! पंधरा प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून आणा म्हणाली! शीट! मी नाही जात उद्या शाळेत!"

"सन! होल्ड ऑन! असं वैतागून जमत नसत! डेली स्कुल अटेंड करायला पाहिजे!"

"डॅड, एक दिवस बघ स्कुल अटेंड करून, मग तुला कळेल! काय टेन्शन असत, टीचर्स वर्गात, अन सिनियर्स कॅम्पसमध्ये, जीव कसा नकोसा करतात ते!"

"सन! चल तुझं चॅलेंज मी स्वीकारतो! एक दिवस तुझ्या स्कुल मध्ये, तुझ्या ऐवजी मी जातो! पण माझं ऑफिस?"

"डॅड! एक आयडिया! आपण एक्सचेंज करू! तू 'शशांक' हो, मी डॅड होतो अन तुझं ऑफिस सांभाळतो!"

"वेट! मी माझा ब्रेन सोबत घेऊन स्कुल मध्ये जाणार! तुझ्या टिचरनी काहीहि विचारू दे, मी अन्सर देईन!फटाफट! ओके?"

"डन!"

बाप-लेक या मनोराज्यात फनी टाईमपास करत होते! पण कोपऱ्यातील वास्तुपुरुष तथास्तु म्हणून अंतर्धान पावला होता! दोघांसाठी उद्याचा एक वेगळा दिवस असणार होता.

०००

सकाळ झाली. शशांकच्या बॉडीत डॅड आणि डॅडच्या देहात शशांक ट्रांस्पोर्ट झाले होते! सकाळी पाचला माधवीने, शशांकच्या पाठीत धपाटा मारून उठवले. माधवला, बायको का पिसाळी सकाळी सकाळी कळेना?

"शश्या! उठ मॅथ्स करायचंय ना तुला?" तेव्हा त्यांनी स्वतःच्या देहाकडे पहिले. बापरे रात्री गमतीत केलेली डील फायनल झाली? ते झटपट उठले. आरश्यात पहिले, त गोंडस शशांक दिसत होता!

"सन!" ते ओरडतच आपल्या बेड रूम मध्ये शिरले.

"अरे, झोपू देना, आई! आज मी शाळेत जाणार नाही!" डॅडच्या देहातील, शशांक अजून झोपेतच होता.

"माधव! अरे उठ, तुझी मिटिंग आहे म्हणालास ना? अन हे काय? आज आई, दिसायला लागले काय मी?" माधवी त्याच्या अंगावरली दुलई ओढत म्हणत होती.

तेव्हड्यात शशांक झालेले डॅड धावत आले अन डॅड असलेल्या शशांकच्या पांघरुणात घुसले!

"बसा घरी! दोघे बापल्योक! मला काय करायचं? उगाच सकाळी उठून, तुम्हाला उठवाव लागत!" माधवी वैतागून तरातरा बेडरूम बाहेर निघून गेली!

"सन, प्रॉब्लेम झालाय! रियाली तू माधव अन मी शशांकच्या बॉडीत गेलोयत! आता उठून बस! तुझ्या शाळेचे मला काही माहित नाही! तू सिक्सथ ला आहेस. डिव्हिजन आणि तुझा रोल नंबर सांग! बाकी मी मॅनेज करतो!"

"माय गॉड! मी डॅड झालोय! माझी 'बी' डिव्हिजन, इलेव्हन रोल नंबर! मॅथ्सच काय करणार? हिटलर जबर पनिशमेंट देते!"

"डोन्ट वरी! मी घेतो सांभाळून! पण लक्षात ठेव आज मिटिंग आहे आकाराला! कशी मॅनेज करशील? तो झुनझुनवाला म्हणजे डोकेदुखी असते! तो बॉस आहे माझा, दिल्लीचा!"

"डॅड! काय करू?"

"मी आता स्कुलला गेल्यावर, लंच मध्ये तुला रिंग करून ब्रिफ करतो! अन अडलंच तर रोझी आहे. तिला विचार. माझी पर्सनल सेक्रेटरी आहे माझी. तिला सगळं माहित असत. ऑल द बेस्ट! बापाचं टेन्शन काय असत, ते आज तुला कळेल बच्चमजी!!"

"डॅड! चॅलेंज?"

"एस!"

शशांक झालेल्या माधवला, माधवीने स्कुलसाठी तयार केले! हाऊ रोमँटिक? माधवला वाटून गेले. त्याने माधवीच्या कमरेला विळखा घातला.

"शशी? आज आईवरच प्रेम इतकं कस उतू जातंय? काय भानगड आहे? पण शाळा मिस करायची परमिशन देणार नाही! लक्षात ठेव!"

"नो प्रॉब्लेम! मी शाळेत जातोय! पण तुला एक सांगायचंय!"

"काय?"

"आत्ता तू खूप क्युट दिसती आहेस!" म्हणून तो पळून गेला.

तिला शशांकच्या प्रतिक्रियेचे आश्चर्य आणि कौतुक वाटले.

"चल! चावट कुठला!' ती स्वतःशीच पुटपुटली.

०००

शाळेत गेल्याबरोबर, शशांक झालेल्या माधवच्या मोबाईलची रिंग वाजली! ऑफिसातून फोन होता. रोझी होती.

"गुड मॉर्निंग सर! झुनझुनवाला सरांचा फोन होता! तुम्ही आलात कि कळव म्हणालेत. तुम्ही जमल्यास लवकर या! काय बोलायचं ते ठरवता येईल."

"लूक, रोझी! मी ---" तेव्हड्यात एका चष्मेवाल्या उग्र चेहऱ्याच्या बाईने, त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला!

"शाळेत मोबाईल आणायचा नाही! हा नियम तुला कितीदा सांगायचा? तुझ्या बापाला हि कळत नाही का?फोन शाळेत घेऊन पाठवताना." असे दटावत ती बाई म्हणाली. आणि फोन जप्त करून, ऑफिसमध्ये निघून गेली. ती गेली, त्या रूमच्या दारावर 'प्रिन्सिपॉल' अशी पाटी होती! म्हणजे हि हेडमास्तरीण होती तर!

माधव प्रार्थनेला उभा रहाताना अडथळलाच. राष्ट्रगीत सुरु झाले. आज कधी नव्हे, तो त्याला स्वतःची लाज वाटली. त्याला आपल्या देशाचे राष्ट्रगीत सुद्धा पूर्ण पाठ नव्हते! शाळा सुटल्या पासून, पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी, त्याने झेंडावंदन कधीच अटेंड केले नव्हते! सुट्टी मात्र फुल धमाल एन्जॉय केली होती! खाली मान घालून तो वर्गात जाऊन बसला! मोबाईल नसल्याने, शशांकची काय गोची होत असेल, कळायला मार्ग नव्हता! त्याची काळजी वाटत होती, त्यांचे स्टेट्स आणि नौकरी त्याच्या हाती होती!

०००

"शाळेत गेला?" माधव झालेल्या शशांकने माधवीला विचारले.

"हो, तू ब्रेकफास्ट करून घे! ऑफिसला उशीर होईल!"

"ये! मी काय म्हणतो? तू, त्याला शाळेसाठी जस तयार केलंस, तस मलापण ऑफिससाठी तयार कर ना?" लाडात येऊन शशांक म्हणाला. त्याची अडचण जेन्यून होती. तो शर्ट, पॅन्ट, कोट हे जमलं असत, पण टाय कुठं बांधायला येत होती? स्कुलची इलॅस्टिकची टाय सोपी होती, गळ्यात अडकवली कि काम झालं!

माधवी लाजली. तिने त्याला पूर्ण सूट चढवून, त्यावर त्याचा डिओ स्प्रे करून दिला. आज तिचा माधव खूप हँडसम दिसत होता. शशांकच्या डोळ्यात असते, तशी निरागसता त्याच्या नजरेत दिसत होती! हाऊ स्वीट अँड रोमँटिक? तिला वाटून गेलं. तो तिच्याकडेच टक लावून पहात होता.

"काय पहातोयस माझ्या कडे?"

"तू जगातली सगळ्यात स्वीट मम्मी आहेस!!"

"मम्मी? कुणाची?" आज या बाप लेकांना काय झालंय? काही का असेना, त्यांच्यातली आपुलकी ज्यास्तच जाणवती आहे हे मात्र खरं.

"माझी सुद्धा!" शशांकला आपण आजच्या दिवसापुरते डॅड असल्याचे आठवले.

ऑफिसबॅग उचलून तो गाडीत जाऊन बसला.

आज डिनरसाठी काहीतरी स्पेशल करीन. खूप दिवस झाले. माधवला स्वीट डिश पासून दूर ठेवलय. थोडं वजन वाढतय म्हणून. पण आज त्याच्या आवडीचे गुलाब जाम करीन, अन पिल्लू साठी व्हेज पुलाव!

अन स्वतः साठी? तिने स्वतःलाच विचारलं.

ती दोघे जेवताना पहाणं! या शिवाय वेगळी ट्रीट माझ्या साठी दुसरी काय असेल?!! त्या दोघांत मी असतेच कि!

माधवच्या गाडीत बसताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे, ती पहात राहिली.

०००

या डॅडची कसली तरी मिटिंग का काय आहे माहित नाही. मिटिंग म्हणजे, एका हॉल मध्ये, लांब लचक टेबल भोवती सुटाबुटातली माणसं बसून काही तरी बोलतात, मग चहा, कॉफी पितात अन आपापल्या कामला निघून जातात. हि शशांकची मीटिंगची कल्पना होती! तिथं काय बोलायचं? अन त्यातल्या त्यात आज काय बोलायचं? माहित नाही! काही लफडं झालं तर? ऑफिस जवळ गाडी थांबली आणि ड्रायव्हरने मागचा दरवाजा उघडला. शशांक गाडी बाहेर पडला. ड्रायव्हर लगबगीने त्याची ऑफिस बॅग उचलली, आणि आदबीने तो पुढे चालू लागला.

साला, डॅडचा रुबाब आहे तर ऑफिसात! पण बरे झाले. तो ड्रायव्हर आपल्याला, आता डॅडच्या केबिन पर्यंत घेऊन जाणार. नाहीतर आपल्याला कुठं माहित आहे, त्याच ऑफिस अन केबिन?

शशांक त्या ड्रॉयव्हर मागोमाग निघाला. आज डॅडच ऑफिस तो पहिल्यांदाच पहात होता! पॉश होत. एकदम चकाचक!

त्याला पाहून सगळे उभे रहात होते, 'गुड मॉर्निंग, सर!' म्हणत होते. तो खाली मुंडी घालून तडक ड्रॉयव्हरच्या मागे, 'माधव सहानी' पाटी असलेल्या केबिन मध्ये घुसला! तिथल्या खुर्चीत बसल्यावर, ड्रायव्हर, भव्य टेबलवर, त्याची बॅग ठेवून निघून गेला!

काय मोठं टेबल आहे डॅडच! आपल्या घरातल्या सहा खुर्च्यांच्या डायनिंग टेबल पेक्षाही मोठ्ठं! अन टेबलवर लार्ग मॉनिटर सुद्धा! गेम खेळायला मजा येईल! अश्या विचारात असतानाच. दारावर नाजूक टक टक ऐकू आली. कोण असेल?

दुसऱ्या क्षणी लांडा स्कर्ट घातलेली, लालचीटुक लिपस्टिक लावलेली, स्लीव्ह लेस ब्लाऊज अन तोही लांडाच होता, त्यामुळे तीच गोरपान पॉट दिसत होत, एक आंटी आत आली अन त्याच्या मांडीवर बसली! शशांकला हि अशी सलगी मुळीच आवडली नाही!

"आंटी! प्लिज!" तो हळूच म्हणाला. तशी अंगावर पाल पडल्यासारखी ती चटकन दूर झाली! आणि विचित्र नजरेने त्याच्याकडे पहात राहिली!

'आंटी! प्लिज!' हा रोजचा बॉस नाही!! रोझी सटपटली होती. काहीतरी बिनसलं होत!

माधव बेधडक तिच्या डोळ्यात पहात होता! अनोळखी नजरेने!

"सॉरी सर, आजच्या मिटिंगच्या नोट्स---"

"काय आहे मिटिंग? अन रोझी कोण?"

"सर, असे काय करताय? मीच रोझी!"

"नाही म्हणजे कोण येतंय मीटिंगला? कॅन्सल करा ती मिटिंग!" शशांकला हि ब्याद नकोच होती.

"कॅन्सल? सर काय झालाय? आज बर वाटत नाही का? मिटिंग कॅन्सल करण्या ऐवजी पोस्टपोन करूयात."

"हा! हा! तेच करा! पण हि मिटिंग कशाला होती? मी विसरलो."

रोझीने पुन्हा विचित्र नजरेने त्याच्याकडे पहिले. सतरा भानगडी मागे लावून घेतात अन विसरून जातात. हल्ली बरेचदा असे blank होतात!

"सर, आपण एक प्रोजेक्ट घेतलाय. त्यात सॉफ्टवेयरच वीस एक प्रोगाम्स आहेत. मिस्टर अंबादास ते मॉनिटर करतात. बोलावू त्यांना?"

"हो!"

अंबादास केबिन मध्ये भीतभीतच आला. तशी रोझी बाहेर निघून गेली. बॉस फाडून खाणार. याची त्याला खात्री होती! शेवटच्या प्रोग्रामिंगच्या काही कमांड्स बाकी होत्या. तासाभरात काम होणार होत. काल अचानक त्याच्या बापाला हॉस्पिटलाईझ करावं लागलं होत. आणि इमर्जन्सी बायपास झाली होती! रात्रभर हॉस्पिटलात लटकला होता. नसता रात्रीच तो प्रोजेक्ट पूर्ण झाला असता. पण या बाबाला कोण समजावणार? घरच्या भानगडी ऑफिसात आणू नका, म्हणून त्याने पहिल्याच मिटिंगमध्ये निक्षून सांगितले होते!

"सर!'

"ते प्रोजेक्ट--"

"सर, तासा भरात --"

"पूर्ण होतय ना?"

"हो! कालच झालं असत पण--"

"पण --?"

त्याने सगळी कहाणी सांगितली. शशांकला वाईट वाटले.

"अंबादास, ते करा आणि झाल्यावर कुठं देणार?"

"कुठं म्हणजे? तुमच्याच कडेच, सर."

"माझ्या कडे? मी काय करू?"

"ते तुम्ही झुनझुनवाला सरांना पाठवणार!"

"मग तुम्हीच त्याला पाठवा! अन घरी जा. डॅड साठी!"

या माणसाला आज काय झालाय? इतकी माणुसकी? एक शब्दही वाकडा न बोलता? गेल्या चार वर्षातला हा पहिलाच अनुभव!

तो केबिन बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होते! बॉसने जबर धुलाई केलेली दिसती आहे. बाकी स्टाफने कयास बांधला. या दुष्ट माणसाकडून दुसरं काय अपेक्षित होत म्हणा?

अंबादास केबिनबाहेर गेल्यावर, रोझी पुन्हा केबिन मध्ये गेली.

तिने त्याच केबिन मधून मिटिंग नेक्स्ट वीक मध्ये होत असल्याचे फोन केले. सगळे कम्युनिकेशन 'मला कळले पाहिजेत' या अट्टाहासापायी माधवनेच हा नियम केला होता.

"रोझी, भूक लागली!"

"सर, लंच साठी काय मागवू?"

"पिझा अन मग आईस्क्रीम मला! अन तुम्हाला पण सांगा."

रोज बोनसेल खाणारा आज लहान मुलासारखं पिझा अन आईस्क्रीम? अन वर सोबत मला पण?! याना खाताना इतर कोणी असलेल आवडत नाही ना!

तिने फार विचार केला नाही. त्याच्या सोबत स्वतः साठी व्हेज सँडविच मागवले.

"तुमचं कोणी 'शंकर स्कुल' मध्ये आहे का? सिक्सथ स्टॅण्डर्ड मध्ये?"

"हो! लहान बहीण आहे! पण तुम्हाला काय माहित?"

"पिंकी! माझ्या शेजारीच बसते. ती तुमच्या सारखीच दिसते अन बोलते!" शशांक बोलून गेला. आपण 'माधव' आहोत हे तो विसरला होता.

"शेजारी? सर, आज काय होतय? तुम्ही त्या शाळेत कधी गेला होतात? आणि तिच्या वर्गात?"

"नाही, माझा सन, शशांक तेथे असतो. म्हणून एकदा शाळेत गेलो होतो!"

बापरे हा डॅडचा रोल काय टफ आहे? डॅडच काय होत असेल शाळेत माहित नाही. म्हणे लंच मध्ये फोन करतो. कुठं आला फोन? बरोबर कसा करणार? मोबाईल आमच्या शाळेत बॅन आहे!!

०००

"मॅडम, शशांकने माझी हातातली पुस्तक पडली, डोळा मारला आणि पळून गेला!"

राधा डोळे पुसत प्रिन्सिपॉलच्या ऑफिसमध्ये उभा होती! प्रकरण फारसे गंभीर नव्हते. पण शशांककडे सकाळी मोबाईल सापडल्याने प्रिन्सिपॉलचा शशांकवर रोश होता. राधा आठवीतली. शशांक सहावीतला! शशांकला पण बोलावले.

"काय रे? काय म्हणतीयय हि खरे आहे का?"त्याला दरडावून विचारले.

"हो! पण राजेंद्र मला ---"

राजेंद्रचे नाव ऐकताच मॅडमनी कान टवकारले. कारण राजेंद्र त्यांचाच मुलगा होता! दहावीतला!

"राजेंद्रच काय?---"

"त्यानच मला तस करायला सांगितलं!"

"तो उद्या विहिरीत उडी मारायला सांगेल, तू मारणार का?"

"नाही! पण तो सिनियर आहे ना? त्याच ऐकायला लागत!"

माधवने हे प्रकरण मुद्दाम ओढवून घेतलं होत! लहान आणि लाजाळू मुलांना, हे सिनियर म्हणजे वरच्या वर्गातील मुलं छळतात आणि शिक्षक मुलांची भांडण म्हणून दुर्लक्ष करतात. हे त्याने ऐकले होते आज तर ते अनुभवलेही होते! शशांकलाही त्रास होतच असणार, पण लेकरू घरी सांगत नाही.

"ते नको सांगू! तू हिची पुस्तक पुस्तक पडलीस का नाहीस? इतकंच सांग!"

"हो! पडली!"

"तुझ्या बापाचा फोन नंबर सांग!"

त्याने खाडखाड आपल्या ऑफिसचा नंबर सांगितला!

"लँडलाईन? मोबाईल नाही?"

"मॅम, तो तुमच्याकडेच आहे!"

रागारागा त्यांनी माधवच्या ऑफिसला फोन लावला आणि मुलाची तक्रार सांगितली.

"ताबडतोब या!" सांगून फोन ठेवून दिला.

०००

वीस मिनिटात एक काळी कुळकुळीत बी यम डब्यू 'शंकर एजुकेशन्स'च्या आवारात डौलदारपणे दाखल झाली.

गाडीतून माधवच्या अविर्भावातला रुबाबदार शशांक खाली उतरला.

त्याचा रुबाब पाहून मॅडमनी त्याला नमस्कार केला. बसायला खुर्ची ऑफर केली. हेड मॅडम आपल्याला आदरानं वागवतात हे पाहून 'माधव' जाम खुश झाला.

डॅडला आपल्या सारखे स्कुल युनिफॉर्म मध्ये पाहून शशांकला गम्मत वाटली. आणि आपल्या सुटमधे त्याला पाहून, माधवला कौतुक वाटले. उद्या मोठा झाल्यावर हा असाच दिसेल नाही?

बाप लेकानी एकमेकांना पाहून डोळा मारला!

"हाय सन!" शशांकने सगळ्या समोर आपल्या बापाला विश केले.

आपण 'माधव' आहेत, या समोरच्या शशांकचे डॅड, हे दोन तीनदा मनात त्याने मनात रिपीट केले.

"सॉरी टू से, पण शशांकने आज मिस बिहेव्ह केलय! त्याला पनिश करण्याअगोदर तुम्हाला कल्पना द्यावी म्हणून बोलवावं लागलं!" त्या चष्मिस्ट बाईंनी सुरवात केली.

डॅडनी काय राडा केलाय? गॉड नोज!

"काय झालं?"

"राधाच्या हातातील पुस्तक पडली!"

"हो? यु डिड इट?" डॅडकडे पहात शशांकने विचारले.

"तो राजेंद्र----"

साला रास्कल राजेंद्र! बेस्ट आज मी 'माधव सहानी'! आता या राजेंद्रला एक्सपोज करायला हरकत नाही! थँक डॅड!

"आलं लक्षात! मॅम, हा राजेंद्र ---टेंथ मधला! राईट!"

एव्हाना बराचसा शिक्षक वर्ग त्या ऑफिस आसपास जमला होता.

"हो! पण तो काहीही सांगेल----"

"वेट मॅम! राजेंद्रहा रॅगिंग करतो शाळेत! तुम्हाला माहित आहे का?"

"सर, तुम्हाला आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यांवर असा आरोप---" पण मॅडमच्या आवाजात जोर नव्हता! राजेंद्र, वयात आलेला पोरगा, हल्ली थोडा सैराट वागत होता. शाळेतील हे शेवटचे वर्ष, निर्विघन पार पडलेकि, कॉलेज साठी लांब होस्टेलवर ठेवायचं ठरवलं होत त्यांनी.

"मॅम, सगळी शाळा त्याला ओळखते, तो ब्याड बॉय आहे! लहान वर्गाच्या मुलांना, पोरींची छेड काढायला लावतो. कधी पुस्तक पडायला लावतो, कधी मागून चिमटा काढ म्हणतो, तर कधी डोळा मार म्हणतो! मग दूर उभा राहून फिदीफिदी हसतो! त्याची मोठ्या मुलांची टोळी आहे. नाही ऐकलं तर शाळा सुटल्यावर मारतात! वह्या पुस्तक फाडून टाकतात! तो तुमचा मुलगा आहे! म्हणून तुम्ही त्याला शिक्षा करत नाही!"

मॅमला घाम फुटायचा बाकी होता! आपल्या शाळेत शशांक येतो कि त्याचा बाप? इतकी इंसाईड माहिती? का शशांक सांगतोय?

"असं काही नाही! रीतसर पुराव्या सह लेखी तक्रार असेल तर शाळेचे प्रशासन नक्की शिक्षा करेल त्याला!"

लेखी तक्रार! आणि ती हि पुराव्या सह? मग शाळा काय तपास करणार?

"मॅम, आत्ता राजेंद्रला बोलवा! पुरावा देतो!" दप्तर सांभाळत सहावीतला 'माधव' म्हणाला.

बाहेरच्या गर्दीत राजेंद्र उभा होता. कोणी तरी त्याला ऑफिसात ढकलले.

"त्याच्या दप्तरात मोबाईल आहे! अन, मॅम सकाळी तुम्ही माझा मोबाईल काढून घेतलात!"

एका शिक्षकाने चतुराईने राजेंद्रचे दप्तर मॅमच्या टेबलवर उपडे केले. कारण, हा टोणगा त्या शिक्षकाच्या पिरेडला त्यांची टवाळी करायचा. त्याच्या बॅक सॅक मधून मोबाईल आणि सिगारेटचे पाकीट टपकले!

"या मोबाईलवर तो काय दाखवतो आणि काय पहातो? हे तुम्ही पण पहा मॅम! आणि मला का याला पनिश करायचं ते तुम्हीच ठरवा! चलो सन!" असे म्हणून तो शाळकरी शशांक गाडीत जाऊन बसला! त्या पाठोपाठ त्याचे 'डॅड' बाहेर पडले!

आता ऑफिसमध्ये फक्त मॅम आणि त्यांचा मुलगा राजेंद्र शिल्लक होते!

मॅम डोळ्याला रुमाल लावून बसल्या होत्या. राजेंद्रने चपळाईने सिगारेटचे पाकीट आणि मोबाईल खिशात सारून, सॅकमध्ये पुस्तके कोंबन पोबारा केला.

मॅडमनी मानवर केली, तेव्हा त्या एकट्याच ऑफिसात होत्या. शिक्षा करण्याचा त्यांनी निर्णय, ते सिगारेटचे पाकीट पहिले, तेव्हाच घेतला होता. त्यांना 'आई'च्या परीक्षेत, त्यांच्याच मुलाने नापास केले होते!

त्या ऑफिसबाहेर पडल्या तेव्हा रात्र झाली होती.

त्यांच्या टेबलवर, राजीनाम्याचा अर्ज सकाळ होण्याची वाट पहात होता!

०००

रात्री माधवीने केलेल्या मेजवानीवर दोघा बापलेकांनी येथेच ताव मारला. आणि बाहेर लॉनवरच्या खुर्च्यात बसले.

"डॅड! तुझं ऑफिस एकदम सॉलिड आहे. पण ---"

"पण काय, सन?"

"ती रोझी आंटी, सरळ माझ्या मांडीवर येऊन बसली! ब्याड वाटलं! रोज अशीच वागते कारे?"

अरे बापरे! हि भलतीच आफत झाली.

"नाही. पण, मी सांगेन तिला! तू मात्र, यातलं आईला काही सांगू नकोस!"

"डायलिसिस म्हणजे काय रे, डॅड?"

"अरे ती एक वारंवार करावी लागणारी मेडिकल ट्रीटमेंट असते. किडनीचा प्रॉब्लेम असेल तर ती करावी लागते. पण मधेच का विचारतोस?"

"अरे, त्या रोझी आंटीच्या आईला डायलिसिस लागत म्हणे. तिच्या घरी फक्त तिलाच नौकरी आहे. अन डॅड अजून एक गम्मत मला समजली. तिची लहान बहीण, पिंकी माझी क्लासमेट आहे! तीच पण एजुकेशन आंटीलाच करावं लागत. 'प्लिज मला नौकरीवरून काढू नका' म्हणत होती. ती तशी बरी आहे. लंचला मला तिने पिझा अन आईस्क्रीम दिलय! तू तिला डिसमिस करू नकोस."

माधव अंतर्मुख झाला. रोझीच्या असहायतेचा आपण फायदा घेत होतो, याची त्याला लाज वाटून गेली. तिला नौकरीची किती गरज आहे, आणि त्यासाठी ती आपल्याला विरोध करत नव्हती, हे आज कळत होत. तिच्या आईचा किंवा डोमेस्टिक अडचणींचा आपण कधीच विचार केला नाही! तशी साधी चौकशी पण कधी केली नाही. तिच्या असहाययतेला आपण लूज कॅरेकटरची समजत होतो.

"तुला ती इतकं कशी बोलली? अन कधी?"

"आम्ही आज सोबतच लंच खाताना बोलली. माझं चुकलं कारे डॅड? बोलायला नको होत का मी?"

"नाही सन! तुझं नाही चुकलं! चूक माझीच होत होती."

"पण डॅड, खर्रर्र सांगू? सगळ्यात आपली मम्मीच क्युट आणि स्वीट आहे!"

"करेक्ट! माय सन!"

"अजून एक मी केलय. सांगू?"

"अजून काय केलंस?"

"अंबादास अंकलला लवकर घरी सोडला! त्याच्या डॅड साठी! ते काल रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत!"

"का? अरे, घरच्या अडचणी साठी ऑफिसचं काम-------"

माधव गप्पकन बोलायचं थांबला. मन थाऱ्यावर नसेल, घरी अडचणी असतील तर ऑफिसातल्या कामावर लक्ष कसे लागणार? नुसता देह कॉम्पुटर समोर ठेवल्याने प्रोग्रामिंग नाही होत. मन शांत असेल तरच मेंदू सक्रिय होतो! आजवर शिस्तीच्या नावाखाली आपण किती घातक चूक करत होतो! 'घरच्या भानगडी ऑफिसात आणू नका', म्हणून आपणच पहिल्याच मिटिंगमध्ये निक्षून सांगितले होते!

"अरे, चला झोपायला बारा वाजत आलेत! उद्या शाळा- ऑफिस आहे ना?" माधवीच्या आवाजाने दोघे भानावर आले. आणि घरात पळाले.

०००

सकाळ झाली तेव्हा माधव माधवच्या देहात आणि शशांकच्या देहात परतले होते! पण आज माधवचे ऑफिस आणि शशांकची शाळा नवीन असणार होती. कारण दोघातहि कालच्या दिवसाने बदल घडवून आणला होता!

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users