व्हाट्सएप ट्रॅप

Submitted by Kavita Datar on 14 November, 2021 - 06:33

व्हाट्सएप ट्रॅप

रविवारची मस्त सकाळ. आजचा दिवस आरामात घालवायचा, असा विचार करून दामिनी कॉफीचा मग हातात घेऊन  न्यूज पेपर वाचत बसली होती. अचानक तिची नजर एका बातमीवर स्थिरावली.

"द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन ला अटक"

लक्षपूर्वक तिने ती बातमी वाचली. ज्या ग्रुप ॲडमीन ला पोलिसांनी काही व्हॉट्सऍप वापरकर्त्यांच्या तक्रारीवरून अटक केली होती, त्याचं नाव वाचून ती चक्रावली. आयुष अजय सिंघवी ???

आयुष, तिची मैत्रिण अश्विनीचा बावीस वर्षांचा तरुण मुलगा. दामिनी आयुषला लहानपणापासून अगदी जवळून ओळखत होती. अत्यंत साधा, सरळ, अभ्यासात हुशार असलेला आयुष असं काहीही करणार नाही, त्याला नक्कीच कोणीतरी यात अडकवलं असणार, याची तिला खात्री होती. दामिनीने अश्विनीला कॉल केला.

"हॅलो !  दामिनी, अगं, आयु ला काल काहीही कारण नसताना पोलीस घेऊन गेले..."
"अश्विनी ! मला एक फोन तर करायचास..."
"मला काही सुचतच नाहीये ग..."
" बरं...तू कोणा वकिलाचा सल्ला घेतलास का ?"
"हो...ॲड सचिन देशमुख त्याला जमीन मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण नेमकी आज सुट्टी आहे कोर्टाला... बिचारा माझा आयुष... त्याला पोलिसांनी मारलं वगैरे तर नसेल ना ग??"
एव्हढं बोलून अश्विनी रडायला लागली.
"शांत हो आशू... मी सचिनशी बोलते... आयुषला काहीही होणार नाही."

अश्विनी ची समजूत काढून दामिनीने फोन बंद केला आणि लगेच ॲड सचिन ला कॉल लावला.
"सचिन ! मला आयुषच्या केसचे डिटेल्स सांगशील का ?"
"हो...काही लोकांच्या तक्रारींची दखल घेऊन, पोलिसांनी आयुषला माहिती तंत्रज्ञान कायद्या च्या 67 कलमाखाली अटक केली आहे.  तक्रारदारांनुसार आयुष ज्या व्हाट्सअप ग्रुपचा ऍडमिन आहे, त्या ग्रुप वरून द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट गेल्या तीन-चार दिवसांपासून व्हायरल झाली आहे."
"ओह !! आयुष चा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला असणार. माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येतोस का ?त्याच्या फोनचं अँनालिसिस करायला मिळालं तर यातून काही तरी मार्ग निघेल."
"हो... लगेच नाही, पण दोन अडीच तासात पोलीस स्टेशनला ये... मी तिथे पोहोचतो..."
"ठीक आहे..."

दामिनी ने फोन बंद केला. दोन तासांत पोलीस स्टेशनला पोहोचायचं होतं. तिच्या हातात तासाभराचा वेळ होता. तेवढ्या वेळात तिने आयुषचे सोशल मीडिया हँडल्स अनालाइज करायचे ठरवले. लॅपटॉप उघडून तिने आयुष सिंघवी चे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटचे सोशल मीडिया अनालीटीक टूल द्वारे परीक्षण केले. या प्रकारच्या अँनालिसिस मुळे त्या व्यक्तीची मानसिक अवस्था बऱ्याच प्रमाणात जाणून घेता येते. जसं की ती व्यक्ती उदासीन, अस्वस्थ, रागीट आहे की संतुलित स्वभावाची आहे? त्या व्यक्तीच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक धारणा, मतं काय आहेत ?? वगैरे...

सोशल मीडिया अँनालिसिस वरून तरी आयुष एक संतुलित व्यक्तित्वाचा तरुण आहे, यावर शिक्कामोर्तब झालं.

दामिनी आणि  सचिनच्या विनंतीवरून पोलिसांनी आयुषच्या मोबाईल फोनची क्लोन्ड (cloned) कॉपी त्यांना तिथं बसून चेक करण्याची परवानगी दिली.

सायबर गुन्हा घडल्यानंतर, डिजिटल फॉरेन्सिक्स करताना ओरिजनल डिव्हाईस (या केसमध्ये मोबाईल फोन) जसाच्या तसा preserve करून त्याची क्लोन कॉपी तयार केली जाते. आणि संपूर्ण इन्वेस्टीगेशन त्या कॉपी वरच केलं जातं. ओरिजिनल डिव्हाईस मधील डेटा राखून ठेवला जाऊन त्याची एक हॅश की तयार केली जाते.  हॅश की म्हणजे एखाद्या मेमरीचे युनिक सिग्नेचर असतं. त्यामुळे कोर्टात ते डिव्हाईस पक्का पुरावा म्हणून सादर करता येतं.

दामिनी ने आयुष च्या मोबाईलची क्लोन कॉपी तपासायला सुरुवात केली. बरेच व्हाट्सअप ग्रुप्स दिसत होते. तिचे लक्ष एका व्हाट्सअप ग्रुप ने वेधून घेतले. "अमेझिंग वर्ल्ड" असे त्या ग्रुपचे नाव होते. त्या ग्रुपमधील बरेच नंबर्स पाकिस्तानी आणि बांगलादेशातील होते. त्या ग्रुपमध्ये बर्‍याच लिंक्स पोस्ट केलेल्या दिसत होत्या. पण आश्चर्य म्हणजे त्या लिंक्सवर आता कुठलेही कन्टेन्ट दिसत नव्हते.

सुदैवाने इतर कुठल्याही ग्रुप मध्ये कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट नव्हती. अमेझिंग वर्ल्ड या व्हाट्सअप ग्रुप मधील मेम्बर्स चे नंबर्स नोट करून घेऊन दामिनी ने सचिन सोबत आयुष ला भेटायचं ठरवलं.

"तुझ्या अमेझिंग वर्ल्ड या व्हाट्सअप ग्रुप मधल्या बऱ्याच मेम्बर्स चे नंबर पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहेत. तू या सगळ्यांना ओळखतोस का?"
तिने आयुषला विचारले.
"नाही, मी कोणालाच ओळखत नाही."
"मग तू त्यांना ग्रुप मध्ये का ॲड केलं ?"
"मी नाही कोणाला ऍड केलं. कोणीतरी मला या ग्रुप ची इन्व्हाईट लिंक पाठवली. नावावरून ग्रुप इंटरेस्टिंग वाटला. म्हणून त्या लिंक वरून मी ऍड झालो. त्यात झूलॉजी आणि जिओलॉजी विषयांवरील व्हिडीओज च्या लिंक्स पोस्ट व्हायच्या. त्या मी बऱ्याच वेळेस फॉरवर्ड केल्या आहेत."
"अरे, पण तू तर त्या ग्रुपचा ऍडमिन आहेस ना ?"
"त्या ग्रुपमध्ये मी एकटाच ॲडमिन नाहीये मावशी, बाकी अजून दोन-तीन ॲडमिन आहेत."
दामिनी ने त्या ग्रुप मधील विदेशी नंबर्स चं बऱ्याच वेळेस, व्यवस्थित अनालिसिस केल्यावर,  तिच्या लक्षात आलं, आयुष क्रॉस बॉर्डर सोशल इन्फ्ल्यून्सर ग्रुपमध्ये ट्रॅप झाला आहे.

आपल्या शेजारील देशातील काही समाजकंटक हे टेक्निक वापरून आपल्या देशातील काही लोकांमध्ये प्रभाव किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाचा वापर योजनापूर्वक केला जातो. सोशल मीडियावर आधी एक ग्रुप तयार करून त्यात काही भारतीयांना इन्व्हाईट लिंक द्वारे ऍड केलं जातं. सुरुवातीला मनोरंजक लिंक्स, व्हिडिओज आणि मेसेजेस द्वारे ऍड झालेल्या मेंबर्सना ग्रुपमध्ये राहण्यास भाग पाडलं जातं. ॲड झालेल्या मेंबर्सना पाठवलेल्या व्हिडिओ लिंक्स मध्ये ग्रुप ची इन्व्हाईट लिंक एम्बेड केली (लपवली) जाते. त्या मेंबरने ती लिंक फॉरवर्ड केल्यास इतर लोकही इन्व्हाईट लिंक द्वारे अशा ग्रुपमध्ये येतात. काहीजण quit होतात. काहीजण फारसा विचार न करता ग्रुपचे मेम्बर बनून राहतात.

हे समाजकंटक मालवेअर लिंक्स पाठवून मोबाईल देखील हॅक करतात. त्याद्वारे ब्लॅकमेल करतात. सुरुवातीला मनोरंजक पोस्ट ग्रुप वर येतात. नंतर त्यातच छुप्या लिंक्स एम्बेड करून धार्मिक तेढ वाढवणारा, आक्षेपार्ह कंटेंट शेअर केला जातो आणि ह्या ग्रुप द्वारे व्हायरल केला जातो.

या क्रॉस बॉर्डर ग्रुपच्या कोणा समाजकंटक मेंबरने, जाणीवपूर्वक, आक्षेपार्ह कंटेंट एम्बेड करून, कुठलीतरी, वरकरणी माहितीपूर्ण वाटणारी पोस्ट टाकली होती. पोस्ट टाकून हा समाजकंटक संगनमताने इतर मेंबर्स सोबत ग्रुप मधून बाहेर पडला होता. बाहेर पडणाऱ्यां मध्ये इतर ॲडमिन देखील होते. त्यामुळे आयुष एकटाच ग्रुपचा ऍडमिन म्हणून ट्रॅप झाला होता.

आयुष ने मनोरंजक व्हिडिओ समजून ती पोस्ट इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली होती. त्या पोस्टमध्ये लपलेली, धार्मिक तेढ निर्माण करणारी, आक्षेपार्ह कंटेंट ची लिंक एक्सेस झाल्याने, त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.

दामिनी ने या सगळ्या अनालिसिस चा एक रिपोर्ट तयार करुन, जरुरी ते स्क्रीनशॉट्स त्याला जोडले आणि तो रिपोर्ट ॲड सचिन देशमुख च्या हवाली केला. त्या अनालिसिस/ रिपोर्ट च्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे आयुष ची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली. 

वरील सत्यघटनेवर आधारित कथेवरून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे जरुरी आहे. अनोळखी लिंक्स क्लिक करणे टाळावे.
अनोळखी ग्रुप मध्ये सामील होऊ नये.
कॉन्टॅक्ट लिस्ट मधील व्यक्तीं शिवाय कोणीही आपल्याला कुठल्याही ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही अशी सेटिंग करावी.
चुकून जरी अशा एखाद्या अनोळखी ग्रुप मध्ये ऍड झाल्यास लगेच बाहेर पडावे.
सजग आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत...

©कविता दातार

(सत्यघटनेवर आधारित ही कथा वाचकांना जागृत करण्यासाठी लिहली आहे. कथेच्या अनुषंगाने त्यात आणि माझ्या इतरही कथांमध्ये काही घटना काल्पनिक असू शकतात. माफ करा पण मायबोलीवर काही थोडे वाचक माझ्या सायबर गुन्हे कथा, त्यात काही त्रुटी कशा काढून दाखवता येतील या उद्देशानेच वाचतात. त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि वाचकांची जागृती हा माझा उद्देश लक्षात घ्यावा ही विनंती)

Group content visibility: 
Use group defaults

अमा - Happy तात्या म्हणजे तात्याच आहेत अगदी
पालथा घडा पण लाजेल त्यांच्यापुढे>> बघ ना.

बर्‍याचदा अनोळखी समुहात आपल्याला सामिल केलं जातं.
व्हाट्सएपवर सदर प्रकार तुलनेने नवीन असेल पण इतर सोशल माध्यमांत मात्र फार पुर्वीपासुन आहे.
इमेलचंही तसंच आहे.

व्हाट्सएपवर जरी कोणीही तुम्हाला समुहात सामिल करत असेल तरीही कोणत्याही लिंकवर न गेलेले बरं.

वरील लेखानुसार व्हाट्सएपवर सध्या तरी एका सुविधेचा नितांत गरज आहे, ज्यात वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय त्याला कोणीही समूहाचा अ‍ॅडमिन करू शकणार नाही.

Pages