मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसानंतर आज या फलकावर आज मी आलो.. नविन मजकूर वाचून छान वाटलं.

मागे ३-४ वर्षापुर्वी, मी उन्हाळ्यात भारतात गेलो होतो त्यावेळी मी आजूबाजूच्या पोरापोरींकडून आणि माझ्या भाच्याभाचीकंडून स्मृतीचित्राचे चारी भाग अशिक्षित अनुभवी लोकांसाठी घराच्या अंगणात, झाडांच्या सावलीत वाचले होते. ऐकून पन्नास एक जण आले होते श्रवणाला. एक महिना सलग वाचन केले होते.

पण जरा वेगळं काहीतरी वाचायचे असेल स्टिफनी मेयरची Twilight सिरीज वाचा.

व्हॅम्पायर आणि एक मुलगी यांची प्रेमकथा आहे. त्यातच वेयरवुल्फ वगैरे प्रकारही आहे.
Twilight, New moon, Eclipse, Breaking Dawn अशी चार वेगवेगळी पुस्तके आहेत या सिरीजमध्ये. आधीची तीन छान आहेत, Breaking Dawn जरा गंडले आहे. एक तर एकाच विषयावरचीच पुस्तके असल्याने जरा तोच तोच पणा आहे आणि Breaking Dawn मध्ये तर तो खूपच जाणवतो.

याच सिरीजमध्ये अजून एक पुस्तक Midnight Sun येणार होते, पण पूर्ण लिहून होण्याआधीच त्याचा काही भाग नेटवर प्रसिद्ध झाल्याने लेखिकेचा लिहिण्याचा मूड गेला म्हणे, त्यामुळे सध्यातरी ते पुस्तक लांबणीवर टाकण्यात आले आहे. Happy

या पुस्तकावर एक चित्रपटही निघाला आहे.

जगन्नाथ कुन्टेची पुस्तके देखिल फारच छान असतात. जसे नित्य निरन्जन, साधना मस्त, कालिन्दी, नर्मदे हर. एका वेगळ्या विषयाचे आकलन होते.

नुकतेच 'मुक्काम : आर्मी पोस्ट ऑफिस' वाचले. आर्मी आयुष्याची, तिथल्या जगावेगळ्या अनुभवांची साध्या शब्दांत ओळख आहे. अनेक रंजक घटना असल्याने पुस्तक खाली ठेववत नाही. फक्त साहित्य लेखनाचा अनुभव नसल्यामुळे की काय काही ठिकाणी वाक्यरचना गडबडल्यासारखी वाटते. पण सगळे पुस्तक कुठलाही आव न आणता, कृत्रिम उपमा वगैरे न पेरता अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहे त्यामुळे हे अगदी किरकोळ म्हणता येइल. हत्ती येतात ते प्रकरण मला फार्फार आवडले. सगळ्यांची भंबेरी वाचताना हहपुवा होते Happy पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल चिनूक्स आणि पुस्तक उपलब्ध करुन दिल्याबद्दल सायो दोघांना धन्यवाद.

प्रतिभा रानडे यांचे अफगाण डायरी काल आणि आज हे पुस्तक नुकतेच वाचले. अफगाणिस्तानातल्या भयंकर परिस्थितीची थोडीशी कल्पना आली. किती वर्षे हे लोक एकमेकांशी आणि बाहेरील शक्तींशी लढणार? आणि लढायचे नसले तर पळून तरी कुठे जाणार? पुस्तकाची ओळख करून द्यायला नवीन धागा इथे उघडला आहे.

आज मौजच्या दिवाळी अंकामधे ह्या तीन पुस्तकांची जाहिरात वाचली: मास्तरांची सावली (कृष्णाबाई नारायण सुर्वे), मी नंदा (डॉ. नंदा केशव मेश्राम), मेरी गोल्ड (मंदाकिनी जाधव).

तीनही पुस्तके कंसात नाव दिलेल्या व्यक्तींची आत्मचरित्रे/आत्मकथनं आहेत. कुणी वाचले असल्यास अवश्य लिहा.

सध्या मी लोकमान्य टिळकांवरचं 'दुर्दम्य' वाचते आहे. गंगाधर गाडगीळांनी लिहीलेलं. कोणी वाचलं आहे का?
खुप छान वाटतं आहे. 'केसरी' आणि 'मराठा' च्या जन्मापर्यंत पोचले आहे सध्या. पुर्ण वाचुन झालं की लिहीन कसं वाटलं ते.
- सुरुचि

"मास्तरांची सावली " खरच सुरेख आहे.
एका अशिक्षीत बाईचे विचार त्यांनी केले कष्ट..अन नारायण सुर्वे नक्की कसे घडले ते वाचताना खुप काही समजले असे वाटते..माझे विद्यापिठ मी साधारण नववीत असताना वाचले आईच्या कप्प्यातुन काढुन .आई ला ते बहुदा एम ए ला असेल.. मला कळाले नाही तेव्हा पण मास्तरांची सावली वाचल्यावर मी परत एकदा वाचले ..
सुरेख आहे पुस्तक

दुर्दम्य छानच आहे.. मला आवडले होते वाचले होते तेव्हा..

नुकतेच इनटू थिन एअर वाचले.. जॉन क्रॉकर आपला आवडता लेखक आहे.. त्यात हे पुस्तक तर बेष्टच आहे.. ज्यांना एव्हरेस्टवर वाचायला आवडते त्यांना अधिक आवडेल.. ९६सालच्या झालेल्या दुर्घटनेत रॉब हॉल, स्कॉट फिशर हे दोन उत्कृष्ट गिर्यारोहक आणि गाइड आणि त्यांचे काही क्लायंट हे नेहेमीच्या मार्गाने आणि नॉर्थवेस्ट (तिबेट) कडून तीन आयटीबीपीचे जवान असे जवळपास १० जण एका आठवड्यात एव्हरेस्टवर मेले.. हे पुस्तक त्याच घटनेवर आहे..
ख्रिस बॉनिंग्टन हा एक एव्हरेस्टवर लिहिणारा जबरदस्त लेखक.. आता मेसनरचे द क्रिस्टल होरायझन वाचायचे आहे..

श्याम मनोहरचे शीतयुद्ध सदानंद आवडले नाही.. एकसुरी वाटले.. त्याचे कळ सगळ्यात जास्त आवडले आणि उत्सुकतेने मी झोपलो.. शीतयुद्ध सदानंद खूपच प्रवचनकी, उथळ वाटले (जसं १९८४ वाचल्यावर अ‍ॅनिमल फार्म खूप थेट वाटते तसे.. )

हिरावलेले आवाज या नावाचे एक अनुवादित पुस्तक वाचले.

युद्धकाळामधे लिहिलेल्या वेगवेगळ्या देशातील मुलाच्या डायर्‍याचे संकलन आहे. जगामधे किती ठिकाणी युद्धे होतात, त्याची मुले कशा पअरिस्थितीत जगतात हे वाचून माझ्या बाल्पणाची किंमत समजली. कित्येक ठिकाणी तर पुस्तक पुढे वाचवत नाही असे वर्णन येते. तसेच लहान मुलाच्या चष्म्यातून दिसत असलेला जगण्याचा दुर्दम्य आशावाद पण सतत दिसत राहतो.

एकदा तरी वाचावेच असे पुस्तक!

परवा चेतन भगत चे टू स्टेट्स वाचले.त्याचे नवीन पुस्तक्.खूप फास्ट व ग्रिपिन्ग आहें नर्म विनोद आहे.हलक्या फुलक्या वाचना साठी शिफारस करतो

किती नशिबवान लोक आहात तुम्ही सगळे , मी मागील ४-५ वर्षात एकही पुस्तक वाचु शकलो नाही Sad
म्हणुन हल्ली मायबोलीवर जेवढावेळ मिळेल त्यावेळेत वाचता येईल तेवढं वाचुन घेतोयं .

मित्रांनो .आनंदाची बातमी.
माझ्या वडीलांना त्यांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाकरिता राज्यशासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5298363.cms

मी गेल्या आठवड्यात खुप पुर्वी वाचलेली पुस्तके परत वाचायला घेतली..एक म्हणजे रंग सुखाचे
डॉ. रमा मराठे यांचे..
त्यातील प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे ते खुप पटले.."एखाद्याने आपल्याला काहि देऊ केले आणि आपण ते घेतल नाहि तर काय होईल? ते त्याच त्याच्या जवळच राहिल्.... दुखाचे तसेच आहे एखाद्याने देऊ केलेले दु:ख मी घ्यायचीच बंद झाले...कुणी काय द्यावे हे मी ठरवले नाहिच. आणि याने हेच द्यावे हा अट्टाहासहि बंद आणी....मी सुखी झाले" Happy
दुसरे सुंदर पुस्तक जे बर्‍याच जणांनी वाचले असेलच्..ते म्हणजे 'एक होता कार्व्हर' वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेल पुस्तक..
आणि स्वभाव्-विभाव डॉ आनंद नाडकर्णि यांचे...

महागुरु, मस्तच एकदम. वडिलांचे अभिनंदन. पुस्तकाची ओळख मायबोलीवर करून द्या नक्की ( अक्षरवार्ता मधे )

अभिनंदन! Happy

जसं १९८४ वाचल्यावर अ‍ॅनिमल फार्म खूप थेट वाटते तसे..>>>
एकदम पटेश!!
सध्या चेतन भगतचे 'टू स्टेट्स' वाचतोय. तोचतोचपणा जाणवतो आणि त्या शैलीचेही अप्रूप आता उरले नाही. 'फाईव्ह पॉईंट समवन' चा सिक्वेल आहे त्यामुळे त्याबद्द्ल नॉस्टॅलजिक असलेल्यांना आवडेल कदाचित.

महागुरू तुमच्या वडिलांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
त्यांच्या पुस्तकांविषयी लिहा म्हणजे वाचता येतील.

Pages