चैन से -

Submitted by गिरिश देशमुख on 23 January, 2022 - 13:26

*चैन से....*

मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांतली आळसावलेली एक दुपार ...
मित्रांच्या खोलीवर अस्त्याव्यस्त पसरलेली तीन -चार क्लांत शरीरे..
नाईट शिफ्ट करून आलेल्या या तिघांची झोपेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तळमळ...अगतिक तड़फड़ !
चोळामोळा झालेल्या कळकट सतरंज्यावरच्या सुरकुत्या स्पर्धा करताहेत कपाळांवरल्या आठयांशी !

कोपऱ्यातल्या एकुलता जीर्ण टेबल फॅन कशीबशी तग धरून वायूविजनाचे आपले कर्तव्य चोख पार पाडण्याच्या - बकरीच्या शेपटासारख्या अपुऱ्या धडपडीत कसलेसे आवाज काढत गरगरतोय बापडा !

चौघांनी मिळून सुट्टा मारून संपवलेल्या एकल विल्सच्या धुराच्या शिळावलेल्या वासाचे अस्पष्ट अस्तित्व त्या अंधाऱ्या खोलीच्या वातावरणातलं आळसटलेपण अजून च गहीरं करतय !

साऱ्या जमान्याने केलेले अपमान, आयुष्यभराच्या वंचना, विश्वासघात, क्लेश भोगून निगरगट्ट झालेल्या संवेदना!
फसवले गेल्याची अनावर भावना...
भूतकाळातल्या चुकांची बोचरी जाणीव-
वर्तमानातली अनिश्चितता ...वास्तवातली अगतिकता....
आणि भविष्याच्या चिंता कर करून आता रिक्त झालेली मने !

केवळ पहायलाही परवडत नाहीत अशी स्वप्ने, अधुऱ्या आकांक्षा - महिनाभर न धुतलेल्या जीन्स सोबत टांगून लोम्बताहेत, खुंट्या-खुंटयांवर !!!!

हा आळस- ही दुपार- हे नाकर्तेपण !
साऱ्यांनी एकमेकात कसला अभद्र करार करून ठेवलाय, कोण जाणे !

झोप अत्यावश्यक आहे, यायला हवीय,
पण येतच नाही !
बाहेर आभाळ भरून आलंय,
पाऊस यायला हवाय,
पण येतच नाही !
वारा पडलेला आहे, उकाडा वाढलेला आहे,
थंड हवेची एक झुळूक यायला हवीय,
पण येतच नाही !
काहीतरी घडायला हवंय,
पण घडतच नाही !

स्टेलमेट !!!!!

चौघांतला एकजण सुस्कारत उठून बसतो!
मागे वळून, हात लांब करत, बुटक्याश्या स्टुलावर टेकवलेल्या कॅसेट प्लेयर चं बटन दाबतो !
कॅसेट होल्डर च दार खाडकन उघडतं !
असमान रचलेल्या कॅसेट्स च्या थरांतून रँडमली एक कॅसेट काढतो- प्लेयर मध्ये टाकून त्याचं दार ढकलतो !
या सगळ्या खडखडीने त्रस्त झालेला दुसरा खेकसतो-
"नीट ना, ए s s ! बापाचा माले का ?"
पहिला उत्तरतो -
"गप रे ए- गाणं ऐक गपचूप !"
!?!?
आता 'प्ले' चं बटन दाबलं जातं...
कॅसेट सुरू होते ...

सुरुवाती ला थोडा पॉज.. मग काही क्षण अगम्य खरखर...

दुपारचा असह्य प्रहर, कूस बदलतो !

गाणं सुरू होतं...
सुरुवातीला हलके हलके आघाता द्वारे उत्पन्न झालेला घंटानाद ..
त्यात बासरीचे हलके हळवे सूर मिण्ड घेत प्रवेशतात...

प्रिल्युड संपून आता आशा ताईंचे सूर प्रगटतात ...

*_चैन से हमको कभी...._*
*_आपने जीने ना दिया..._*

गाण्याचे पहिलेच शब्द, "चैन से" आशाताईंनी असे काही उच्चारलेले असतात की काळजाचं पाणी पाणी होऊन जातं!

*_चैन से हमको कभी...._*
*_आपने जीने ना दिया..._*
*_जहर भी चाहा अगर..._*
*_पीना तो पीने ना दिया.._*

गाणं पुढे सरकत राहतं...

कोणा एस एच बिहारी नावाच्या कवी ने, मनाच्या कुठल्या अवस्थेत प्रसावल्या असतील या ओळी ??
ओ पी नय्यर या बाप संगीतकाराने बांधलेल्या अप्रतिम कम्पोझिशन च्या सुरावटी सोबत आशा ताई गीत आळवत रहातात....
गाण्याच्या पार्श्वभूमीवर बासरीचे दुखरे स्वर आणि घंटा नादासदृश्य साउंड होणाऱ्या कुठल्याश्या अनाम वाद्याचे (Xylophone असेल का?) हलके हलके आघात !
अस्पष्ट पण जाणवतील असे तालवाद्याचे बिट्स ..!
गाणं सुरूच आहे -

चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना, तो पीने ना दिया
चैन से हमको कभी

चांद के रथ में रात की दुल्हन जब-जब आएगी
याद हमारी आपके दिल को तड़पा जाएगी
आपने जो है दिया, वो तो किसी ने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना, तो पीने ना दिया
चैन से हमको कभी...

आपका ग़म जो इस दिल में, दिन-रात अगर होगा
सोच के ये दम घुटता है, फिर कैसे गुज़र होगा
काश ना आती अपनी जुदाई, मौत ही आ जाती
कोई बहाने चैन हमारी, रूह तो पा जाती
इक पल हँसना कभी, दिल की लगी ने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना, तो पीने ना दिया
चैन से हमको कभी...

हे गीत आळवणाऱ्या त्या सुकोमल प्रियेला कोण्या निष्ठुर प्रियकराने कसले बरे हे आभाळभर दुःख दिले असेल? का ही प्रिया इतकी व्यथित झाली असेल?
विश्वासघात? प्रतारणा???
A woman scorned ???
की नुसताच गैरसमज केवळ ????

गाणं संपत आलंय,
त्या आळसावलेल्या खोलीतल्या सगळ्यांना आता जाग आलेली आहे ..
बोधिसत्वाला बोधिवृक्षाखाली झाला होता, तसलाच एक वेगळाच बोध आता झालाय, अचानक !!!!

हे गाणं, या ओळी, कुठलीही व्यथित प्रेमिका आपल्या प्रियकराला उद्देशून म्हणते आहे, असं भासमान होत आहे वर वर,
पण खरं हे गाणं म्हणजे आपल्याच भावना आहेत,
माझ्या, तुमच्या, ह्यांच्या - त्यांच्या सगळ्यांच्या !

ह्या ओळी तक्रार- कैफियत मांडत आहेत, आपली - त्या जमान्याला - त्या दुनियेला उद्देशून ....
ज्या दुनियेने आपली कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या प्रकारे - वंचना केली- फसवणूक केली- विश्वासघात केला- अन्याय केला-आपल्या अगतिकतेचा फायदा उठवला- आपलं हसू केलं - लांच्छनास्पद वागणूक दिली- खोटे आरोप केले !

सुफी संत काव्यात परमेश्वराला प्रियपात्र समजून काव्य रचले जाते, तसेच, *चैन से हमको कभी* या गाण्यात कवीने अन्याय करणाऱ्या दुनियेला आपले प्रेमपात्र असे समजून आपली कैफियत मांडली आहे-

हे एक साधे विरहगीत नसून एक सुंदर आर्चटायपल (Archetypal) गीत आहे !

या गीताला एका नव्या अर्थाच्या दृष्टीने, पुन्हा एकदा ऐकून बघितलं, तर मनातल्या साऱ्या कचऱ्याचा निचरा झाला, मळभ दूर झालं आणि आकाश निरभ्र, मोकळं झालं !!!

ओ पी नय्यर साहेब, एस एच बिहारी आणि आशा भोसले यांनी हे एक अमृतासमान गीत रसिकांना अर्पण केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करावेत तेवढे थोडेच आहेत !

********************

जुन्या जमान्याचे प्रतिथयश लोकप्रिय संगीतकार ओ पी नय्यर यांचा आज जन्मदिन ! अगणित उत्तम, सुश्राव्य गीतांचे अमृत त्यांनी रसिकांना पाजले आहे !

त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांपैकी *चैन से हमको कभी* हे माझं सर्वात जास्त आवडतं गीत ! हे गीत परत एकदा ऐकताना काही अनामिक स्पंदने मनात उमटली, तीच आपल्यापर्यंत पोचवून ओ पी नय्यर साहेबांना श्रध्दासुमने वाहण्याचा उद्योग केलेला आहे !
धन्यवाद !!

(गिरीश देशमुख)
16 जानेवारी 2022

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांपैकी *चैन से हमको कभी* हे माझं सर्वात जास्त आवडतं गीत ! >
माझंही. गाण्याचं तुम्ही केलेलं वर्णन गाण्याइतकंच आवडलं

पहिल्या कडव्यात आणखी दोन ओळी आहेत.
माझ्याकडे आशा सिंग्स फॉर ओपी - दोन कॅसेट्सचा संच होता. त्यात होत्या बहुतेक. रेडियोवर नाही वाजत त्या.

प्यार के जलते जखमों से जो दिल में उजाला है
अब तो बिछडके और भी ज्यादा बढने वाला है

भरत
>> पहिल्या कडव्यात आणखी दोन ओळी आहेत.
असं मी ऐकलय, पण त्या ओळी मात्र अजून ऐकायला नाही मिळाल्या !