तरी वाटते की...

Submitted by सुशांत खुरसाले on 23 October, 2015 - 06:15

तसा मी नसे या किनार्यावरी वा
तसा मी नसे आज नावेतही
तरी वाटते की तुझ्या सागराशी
पुन्हा बंध माझे जुळावेतही

तुझ्या सागराच्या तळी शिंपल्यांना
जसा रंग आहे तसा मी नसे
तसा ठोस साचा नसावाच माझा
कुठे वाचले मी ऋतू फारसे ?

तरी वाटते की तुझे बिंब पाहुन
मला रंग माझेच कळतीलही
तरी वाटते की तुझी लाट सोसुन
किनार्यावरी क्षण थबकतीलही

तरी फार काही नको व्हायला
हेच संकेत दोघांस कळतीलही
पुढे भास माझे ऋतुंसारखे
फक्त येतील..संपून जातीलही

कुठे काय बदलेल या वाटण्याने
असे वाटुनी क्षण पुढे चालले
तुझ्या मात्र डोळ्यांतले ते किनारे
तसेच्या तसे कोरडे राहिले

तुझ्या सागराच्या सुन्या भव्यतेचे
कधी क्षार सगळे वितळतील का ?
मला शोधण्याला तुझे पाय तेव्हा
प्रवाहात माझ्या उतरतील का ?

--सुशांत खुरसाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तुझ्या सागराच्या सुन्या भव्यतेचे
कधी क्षार सगळे वितळतील का ?"
कसली भारी प्रतिमा सृष्टी आहे सुशांत! अगदी पहिल्यापासूनच.

वा ! सुंदर ! खूप आवडलं..

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे !
ह्या ओळी स्मरल्या..