आमचे शिनिमाचे गाव - ४

Submitted by shabdamitra on 24 November, 2021 - 00:24
Movies

तर मी काय सांगत होतो.... माझ्या शिनिमाच्या गावातील प्रेक्षक फक्त सिनेमातील गाण्या संगीताला ठेका धरून टाळ्या देण्या इतपतच रसिक नव्हते तर सिनेमातील इतर चांगल्या गोष्टींनाही ते तितकीच दाद देत.

शांतारामबापूंच्या ‘शकुंतला’ सिनेमात श्रेय नामावली सरोवरातील कमळांच्या एकेक पानावर उमटू लागते किंवा ‘सुरंग’ सिनेमात सुरुंगाच्या स्फोटाने उडणाऱ्या दगडावर नावे कोरल्यासारखी येत तेव्हा टाळ्यांनी दाद देतात तशीच डॅा. कोटणीसांची प्रेयसी चिंग लान त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देते. त्या आनंदात ते पायऱ्या चढून आपल्या खोलीकडे जातात तेव्हा प्रत्येक पायरीवर “इं-ट-र-व्ह-ल” ही अक्षरे दिसू लागतात तसे आमच्या गावचे प्रेक्षक प्रत्येक पायरीला टाळ्या वाजवीत!

मध्यंतरावरून आठवला गदिमा आणि पु.लं.चा अप्रतिम सिनेमा ‘वंदे मातरम’-ह्याच सिनेमात वंदेमातरमला वेदांपेक्षाही महान केलेले गीत ‘वेदवाक्यांहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’आहे- आठवला. सिनेमा स्वातंत्र्याच्या लढ्यातील एका उज्वल पर्वासंबंधी आहे.भूमिगत नायक पोलिसांच्या ससेमिऱ्याला सतत चुकवत तो लावणीच्या बैठकीत मिसळून जातो. ती लावणीही सुंदर आहे. लावणी म्हणणारी कलावती नायकाकडे बघत, “राया बोलत नाही का? हासत नाही का? आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का?”, गात असते. नायक बाहेर पडण्याच्या तयारीत असतो. त्यावेळीही ह्या ओळी ती म्हणतच असते. इतक्यात खाली टेहळणी करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांकडून चिठ्ठी येते. चिंताग्रस्त नायक ती उघडून वाचतो. ती उघडलेली चिठ्ठीच पडद्यावर ठळक होत दिसते “ थोडा वेळ थांबा”! तेव्हा माझ्या शिनेमाच्या गावातील साधे,सामान्य रसिक प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटांनी कौतुक करत; कारण त्याच वेळी थेटरमधले मध्यंतरचे सर्व दिवे भक्कन लागलेले असतात! !

आमच्या शिनेमाच्या गावाने प्रत्येक हिंदी चित्रपटच तीन चार वेळा पाहिले नाहीत तर मराठीही चित्रपटांचेही रौप्य महोत्सव करायला लावले! लहानपणी पाहिलेले ‘रामराज्य, भरतभेट’असो की नंतरचे ‘सीता स्वयंवर, माया बाजार’ असोत. हे सिनेमाही गावातल्या प्रेक्षकांनी कमीत कमी तीन चार वेळा पाहिल्यशिवाय थेटरातून हलले नाहीत.

हिंदी गाण्यांइतकीच मराठी सिनेमातील गाण्यांनाही तेव्हढीच दाद ते देत असत. “जय मल्हार” मधील “माझ्या व्हठाचं डाळिंब फुटलं, राया मी नाही कंधी म्हटलं” ला तर टाळ्या ह्या शिट्ट्यांच्या गजरातच वाजवल्या जात असत! पहिले दोन तीन आठवडे रसिकांनी तसा कायदाच जारी केला होता !
“जशास तसे”मधील ‘चिंचा आल्यात पाडाला’ किंवा ‘हुकमाची राणी माझी राया मी डाव जिंकला’ ही गाणी किंवा ‘पुढचं पाऊल’ मधली ‘ माझ्या जाळ्यात गावला मासा, आणि ‘ जाळीमंदी पिकली करवंदं’ लाही अशीच दाद मिळायची. मग लोकशाहीर रामजोशींची ‘सुंदरा मनामधे’ लोकांच्याही मनात का भरणार नाही! त्या गाण्यालाही शिट्ट्या टाळ्या पडतच; पण त्यातील ‘सवाल जबाबाला’जास्त! ‘अमर भूपाळी’ मधील ‘लटपट लटपट तुझं चालणं’ ह्या लावणीला तिच्या मुखड्यापासूनच जो वेग आहे आणि नाचताना संध्यानेही तिला गतिमान गिरक्या दिल्या आहेत, आणि दृश्यातील लोकांनी ज्या द्रुतगतीने टाळ्या वाजवल्यात, त्याला माझ्या शिनिमाचा गावातील प्रेक्षकही त्याच तालात टाळ्या वाजवत दाद देत! त्या बरोबरच ‘लाखाची गोष्ट’मधील ‘ त्या तिथे पलीकडे’ ‘त्या स्वप्नांच्या आठवणींना, ‘ डोळ्यांत वाच माझ्या’ ह्या काव्यमधुर प्रेमगीतांना आणि ‘बाळा जो जो रे’मधील ‘पापणीच्या पंखातील डोळ्यांची पाखरे किंवा वेलींची लेकरे’ अशा काव्यात्म ओळीनाही मान हलवत,हलक्या टाळ्यांची का होईना दाद मिळत असे!

पेडगावचे शहाणे’ मधील वेड्यांच्या इस्पितळातील कुणी चार पाच वेडे झुकझुक आगगाडी करत ‘झांझीबार झांझीबार’ म्हणताहेत, पूर्वीचा छपाई कामगार त्याचे काम इथेही करतोय.पण समोर यंत्र नाही, कागद नाही; केवळ अप्रतिम मुकाभिनयाने mimingने त्या वेड्याने बारिकसारीक तपशीलासह ते दृश्य जिवंत केलेले पाहून आमच्या ‘कामगारांच्या गावचे’ प्रेक्षक टाळ्यांनी दाद देतच पण कोणीतरी” अबे ‘रसूल-पैसा वसूल’,देख ! आगे जाके तू भी वहा ऐसाच्य करेगा !” ओरडल्यावर सगळे थेटर हसायचे! लगेच त्या कोण्या रसूलचेही तयार उत्तर ऐकू येई. “ अरे ते राहू दे बे, तू भी ‘झांझीबार झांझीबार’ म्हणत फिरेगा. काय?”लोक पुन्हा हसत.

रामशास्त्री, पेडगावचे शहाणे, चिमणी पाखरे, भाग्यरेखा, बोलविता धनी,गंगेत घोडं न्हालं, प्रतापगड, जागा भाड्याने देणे आहे, गुळाचा गणपति, देव पावला, वंशाचा दिवा, भालजींचे मीठ भाकर, साधी माणसं, किती किती नावे सांगायची.

मराठी सिनेमाचे प्रसंग सांगताना त्यावेळी लोकप्रिय असलेला एक विनोदी किस्साही आठवला. आमच्या गावातले मराठी मुसलमान तर चांगले मराठी बोलत. एकाने विचारले,”मराठी पिच्चरके उषा किरण,राजा गोसावी, हंसा वाडकर,चंद्रकांत, दामुअण्णा,धुमाल सगळे माहित है. लेकिन जाहिरातीमें एक नाव हमेशा असते बघ.समदे मराठी सिनेमात असतो.”“कोण?”
“अबे वो ‘वगैरे’ “ वगैरे” कोन है बे वो वगैरे?”

हिंदी सिनेमातही दिलिपकुमार,देव आनंद, राजकपूर ह्यांच्या सिनेमांना प्रचंड दाद मिळायची पण ह्या गर्दीत हे तिघे काम करत नसलेल्या पण अत्यंत प्रभावी कथानक, उत्तम दिग्दर्शन आणि दर्जेदार फोटोग्राफी असलेले सिनेमे एकदा दोनदा तरी पाहिले जातच. दो बिघा जमीन, परिणिता, बिराज बहू, मझली दीदी, दो ॲाखे बारह हाथ, आनंदमठ, शांता आपटेची तडफदार भूमिका असलेला ‘स्वयंसिद्धा,’ वेगळ्याच प्रकारच्या कथेवरील ‘रत्नदीप’,किंवा न्यू थिएटर्सचा सुंदर कथाविषय व तितकेच उत्तम छायाचित्रण असलेला ‘यात्रिक’ अशा सिनेमानाही चाांगली दाद देत.

त्या वेळीही माझ्या शिनिमाच्या गावात इंग्रजी सिनेमा येत असत. त्यांचे खेळ शनिवारी दुपारी १२:३० किंवा १:३० असायचे तर रविवारी सकाळी १०:३० वा. सुरु होत. काही सिनेमा दुपारी मॅटिनीच्या वेळेत ३:००-३:३०वा.ही दाखवले जात. ‘सॅमसन ॲन्ड डिलाएला’ भागवत चित्र मंदिरात नेहमीच्या तीन खेळात लागला होता. अनेक नामांकित नट नट्यांचे गाजलेल्या इंग्लिश चित्रपटांची मांदियाळी आमच्या शिनिमाच्या गावाने भरवली होती. सर्व सामान्यांनाही आवडणारे तसेच थोडेफार इंग्रजी संभाषणाची ओळख असलेल्यांनाही आवडणारे सिनेमा आमच्या गावाला पाहायला मिळाले.

शाळकरी मुलांपासून ते हसायला आवडणाऱ्या मोठ्यांनीही लॅारेल हार्डीच्या सिनेमांना टॅाकीज भरलेले असे.! मग ते पूर्वीचे, खुर्च्या बाके नसलेले तमाशाचे श्री टॅाकीज का असेना गर्दी करीत. हसण्यासाठी बसायला बाके, खुर्च्या आणि इंग्रजी समजायलाच हवे अशी लॅारेल हार्डी या अजरामर विनोदी जोडीची कधीच अट नसे. माझ्या शिनिमाच्या गावातील कामकरी आणि कामगार या जोडगोळीचा सिनेमा संपल्यावर हसत हसत बाहेर येत. न समजणाऱ्या इंग्रजी सिनेमाला भर म्हणून लॅारेल हार्डीची दहा पंधरा मिनिटांची रीळ आहे असे नुसते समजण्याचा अवकाश तिथेही आमचे गाववाले गर्दी करायचे.

ईस्थर विल्यम्सच्या ‘ बेदिंग ब्युटी’ सिनेमाला ‘ब्युटी’ पाहाण्यासाठीच सगळे लोक गर्दी करायचे. हिंदी सिनेमात जे पाहायला मिळत नाही “ अबे ते पाह्यला मिळते बे चल!” ह्यासाठी बहुतेक इंग्रजी सिनेमाला सगळेच जात असत.. याला कोणीही अपवाद नसे. चुंबनाचे दृश्य आले व एरॅाल फ्लिन,ग्रेगरी पेक, क्लार्क गेबल आणि माॅरिन ओ’हारा, सोफिया लॅारेन, हम्फ्री बोगार्ट हे जास्त वेळ घेऊ लागले की “ सोड बे! अबे छोड छोड !” चा गलका सुरु व्हायचा. सॅम्सन ॲन्ड डिलाईला, मर्लिन मनरोचा ‘नायगरा’ आणि तशा बऱ्याच सिनेमांना होणाऱ्या गर्दीचे कारण हेच असे.काही व्यवहारी प्रेक्षक तर “चल उठ, निघू या” “चल बे सब “देखा चल”किंवा “आता काय पाहायचं बे?” म्हणत उठू लागत. लोक असे का म्हणत तर त्याचा खुलासा लगेच एकजण मोठ्याने सांगतो,” अरे संपला की सिनेमा!” “सिनमा खतम झाला बे उठा,संपला की! अबे दोघंही म्हणाली ना “ I love you” झालं. संपला सिनेमा. असं म्हणत लोक बाहेर पडत. इंग्लिश सिनेमाचे सार ह्या एका I love you वाक्यात सामावलेले आहे ही साधी बाब फक्त माझ्या शिनिमाच्या गाववाल्यांनाच कळली होती!

माझ्या शिनिमाच्या गावाने लॅारेल हार्डी शिवाय डॅनी के,बॅाब होप, डीन मार्टिन-जेरी लुईस ह्या सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या विनोदी नटांचे व कथांचे विनोदी सिनेमे दाखवले. त्यांच्यात Marx Brothers ही उठून दिसायचे. तर Three Musketeers, La Miserable, For Whom The Bell Tolls, गॅरी कूपरचा High Noon, जॅान वेनचे वेस्टर्न्स, Robin Hood चे सिनेमे, बर्ट लॅन्कस्टरचा Flame And the Arrow, डॅनी केचा The Secret lives of Walter Mitty; Stalag -17, ॲाड्रे हेपबर्नचे Roman Holiday, Sabrina सारखे चित्रपट तर जेनिफर जोन्स चा गूढरम्य Portrait of Janie, Jose Ferrer ह्या श्रेष्ठ नटाचे मुलॅां रूझ आणि Cyrano de Bergerac , Million Pound Note, सोफिया लॅारेन, फ्रॅन्क सिनाट्रा आणि कॅरी ग्रॅंट ह्या उत्कृष्ठ नटांचा The Pride and Passion, तसेच बोलपट ऐन बहरात असताना रे मिलॅन्डचा अप्रतिम मूकपट The Thief किती नावे सांगायची! नामांकित व उत्कृष्ठ सिनेमांची ही यादी न संपणारी आहे.

हिंदी मराठी इंग्रजी सिनेमांनी जवळपास पूर्ण दिवस थिएटर्स भरलेली असत. आमच्या गावातील प्रेक्षकांसाठी सिनेमा टॅाकीज हे केवळ टॅाकीज नव्हते तर ते दुसरे घर होते!

पडद्यावरील सिनेमा तर कुठलेही गाव पाहील. पण पडद्यावरील सिनेमाला सजीव करून संपूर्ण थिएटरात चैतन्य भरणारे माझ्या शिनिमाचे गाव एकच असेल. आमच्या प्रेक्षकातूनच दिग्दर्शक मिळे. नायक नायिका आणि व्हिलनला संवाद म्हणावे लागत नसत. महंमद रफीला आवाज चढवला नाही तरी चालत असे, कोरसचीही गरज भासत नसे! हे सर्व आमच्या शिनिमाच्या गावातील सामान्य रसिक प्रेक्षकच करीत!

आमच्या शिनिमाच्या गावातील थिएटरात समीक्षक नव्हते. होते ते प्रेक्षक. सिनेमाचे शौकीन.त्यामुळे आमच्या शिनिमाच्या गावात सिनेमा चांगला किंवा वाईट हा प्रकार नसे. तो फक्त सिनेमा असे.

सिनेमा आमच्या गावाचा श्वास होता. सिनेमाची गाणी गावाचा प्राण होता.हिरॅाइन प्रत्येकाच्या हृदयात होती. तिच्यामुळेच गावाच्या हृदयाची धडधड चालू असे. गावच्या लोकांच्या केसाचे भांगही हिरोसारखेच होते.

दानशूर कर्णाकडून याचक कधीही रिकाम्या हातांनी परत जात नसे. आमच्या गावातील उदार सिनेशोकिनांनीही एकही थिएटर कधी रिकामे ठेवले नाही!

माझ्या सिनेमाच्या गावातील थेटराचीही आपापली काही वैशिष्ठ्ये होती. ती पुढील भागात....

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागचा आणि हा भाग पण छान !

लेकिन जाहिरातीमें एक नाव हमेशा असते बघ.समदे मराठी सिनेमात असतो.”“कोण?”
“अबे वो ‘वगैरे’ “ वगैरे” कोन है बे वो वगैरे?” >>>> हे नाही कळाले...

इतक्या जुन्या सिनेमांच्या आठवणी आहेत तुमच्या. भाग्यवान आहात. हे सगळं आठवणी स्वरूपात लिहाच तुम्ही. सुंदर डॉक्युमेंटेशन होईल.
खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हे सगळे चित्रपट अर्थात आम्ही सकाळचे जुन्या पिक्चरचे शो म्हणून पाहिले. प्रथम प्रदर्शनानंतर पंधरा वीस पंचवीस वर्षांनी. बेन हर, गनस ऑव्ह नॅवरोन, हिचकॉक चे सिनेमे, पीटर सेलर्स चे सिनेमे, जेरी लुईस, बिली विल्डे (Wilder) अगणित विस्मृत नावे झर्रकन डोळ्यांसमोरून गेली.
लेख तर सुंदर आहेच. गावची भाषा छान वाटते वाचायला. गावचा निरागस पण इरसाल बिलंदरपणा नीटच टिपलाय तुम्ही. मराठवाडयातलं गाव का?
लेखमाला आवडतेय.

@आबा - मुख्य नट नट्यांची नावे लिहून झाल्यावर किरकोळ भूमिका करणाऱ्या अनेकांचा ‘इत्यादि इत्यादि’ ऐवजी ‘वगैरे’ ह्या शब्दाने उल्लेख करण्याची पद्धत. पण ‘वगैरे’ हे नटाचे किंवा नटीचे हे नावच असावे अशा समजुतीने तो विचारलेला प्रश्न.