विपश्यना आणि मी

Submitted by पाचपाटील on 18 November, 2021 - 14:52

(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहित असेल, असं गृहीत धरून लिहितोय.)

तर फारा वर्षांनी एकदाचा योग जुळून आला आणि दहा
दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, बॅग वगैरे पद्धतशीर भरून,
स्टेशनवर उतरलो.
रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना वाटेतच 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला.
म्हटलं, बरंय. ही विपश्यना वगैरे झेपली नाही तर जवळच ह्या कदम बंधूंनी आपल्यासाठी सोय करून ठेवली आहे.
तेवढाच आधार.

रिक्षातून सेंटरच्या गेटवर उतरलो. तिथेच थोड्या अंतरावर दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे दिसले.
ते विपश्यनेसाठीच आले आहेत, हे मला लगेच कळले.
कारण आता दहा दिवस सिगरेट किंवा तत्सम पदार्थांचा विरह होणार म्हणून आधीच मनसोक्त तलफ भागवून घ्यावी, हा विचार मला नाही कळणार तर कुणाला कळणार!

बाहेरचा सगळा नजारा एकदा बघून घेतला आणि गेटमधून आत गेलो. संपूर्ण परिसर एकदम शांत.
ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट, आयडी प्रूफ, कोविड
निगेटिव्ह रिपोर्ट, व्हॅक्सिनेशन सर्टीफिकेट्स हे सगळं
रजिस्ट्रेशन काउंटरवर हे जमा केल्यावर रूम ॲलॉट झाली.
रूम सेपेरेट आहे. परफेक्ट आहे. आकाश दिसतंय. झाडं
दिसतायत. पक्षी दिसतायत. एवढं पुष्कळ आहे.

नंतर स्विच्ड ऑफ मोबाईल, वॉलेट, पेन आणि बॅगेतलं एक पुस्तक, त्यांच्याकडे जमा केलं.
इतर सगळ्यांनी आपापल्या चीजवस्तू जमा केल्या.
तेवढ्यात एक दोघांची हाय हॅलो पुरती ओळख.
तुम्ही कुठले. मी इथला. वगैरे टाईपची.
अशा औपचारिक अनोळखी ठिकाणी तरूण जे करतात ते म्हणजे, सहज इकडं तिकडं पाहिल्यासारखं करत क्राउडमध्ये जरा ॲस्थेटिकली चांगलं कुठे काही दिसतंय का वगैरे...
परंतु हे एकमेकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीची कसरत फार करावी लागते ह्यात.
अर्थात माझे ॲस्थेटिक्सचे निकष हे तसे दारिद्र्यरेषेच्या दहा फूट खालचे वगैरे असल्यामुळे मला त्याबाबतीत समाधानी होण्यात फारशी अडचण कधीच येत नाही. तिथेही आली नाही. असो.

मग संध्याकाळी सगळ्या साधकांना एकत्रितपणे नियम वगैरे सांगण्यासाठी एक छोटासा सेशन.
तो सेशन संपल्या क्षणापासून नऊ दिवसांचं 'आर्यमौन' सुरू झालं. आता सगळ्यांची आयडेंटिटी-'साधक'

झोप. पहाटे चारला घंटेचे टोल पडतायत. धम्मसेवक छोटीशी घंटी वाजवत रूमच्या पुढून निघून गेलेले ऐकू येतायत.
पापण्यांना जणू दगड बांधून ठेवलेयत. डोळे चुरचुरतायत. उघडायला ठाम नकार देतायत.. रोजच्या गणितात काहीतरी त्रासदायक बिघाड झाल्याचं शरीराला कळतंय.
''जरा वेळ लोळूया..! पहिलाच तर दिवस आहे.! पहाटे चार म्हणजे खूपच लवकर होतंय राव..! एवढ्या पहाटे उठून कुठे कुणी ध्यान करत असतं काय..!
झोप व्यवस्थित पूर्ण झाली तरच ध्यान नीट होईल ना..!
एवढंही कसं लक्षात येत नाही ह्यांच्या..!
आणि गारठाही बऱ्यापैकी आहे..! झोप अजून थोडा वेळ..!!
कुणी बोलवायला आलं तर जाऊया..''
अशी माझी ड्रामेबाजी चाललेली असतानाच डॉट साडेचारला धम्मसेवकाकडून दारावर टकटक.
मग उर्वरित काळात कधी वेळ चुकवली नाही.

ओह् नो.
काही साधकांना पचनसंस्थेसंबंधी वगैरे विकार आहेत, असं दिसतंय. ह्या विकारांनी बऱ्यापैकी जुनाट आणि तीव्र स्वरूप धारण केलेलं आहे, असंही दिसतंय.
कारण स्वतःच्या गॅसेसवर नियंत्रण ठेवणं, त्या बिचाऱ्यांना जमत नाहीये. ह्या विकारापुढे त्यांनी सपशेल हार मानलेली असेल का ?? कारण काळवेळेचे, स्थळाचे वगैरे बंधनही त्यांस क्षुद्र वाटते आहे..! की हे सगळे स्थलकालाच्या सीमा उल्लंघून जाण्यात यशस्वी झाले आहेत पहिल्याच दिवशी ?

बाकी तो विशिष्ट आवाजही असा असतो की तो ऐकता क्षणी जगातील कोणताही माणूस गंभीर/तटस्थ राहू शकत नाही. हसू येणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट.

आणि शिवाय ध्यानासाठी हॉलमध्ये सगळे डोळे मिटून
बसलेले असताना समजा असे वेगवेगळे सूक्ष्म, अतिसूक्ष्म
पिपाणीसारखे किंवा दीर्घ आपटीबारांसारखे आवाज कानावर आले, तर मग हसू दाबणं हीच एक मोठी खडतर साधना होऊन बसते.
ह्या विशिष्ट साधकांना आत्ताच कुणीतरी आवरलं पाहिजे.
नाहीतर पुढचे नऊ दिवस हे स्वतःच्या घरातच असल्याप्रमाणे निर्ढावत जातील आणि पुढे पुढे मोठमोठ्ठे स्फोट वगैरे ऐकावे लागतील...!

हे सगळं चालतच राहणार. तू तुझा श्वास बघ.

मग सकाळी सहा ते साडेसहा गोयंका गुरूजींच्या
आवाजातले पाली भाषेतील तालबद्ध लयबद्ध जप. त्यातला एक शब्दही समजत नाही..! पण मन गुंगावतं..! झंकारत राहतं..!

नंतर आंघोळ करतोय. दुरून गुरूजींचे हिंदी दोहे कानावर पडतायत.. सुंदर आहेत अर्थातच.
मन चंचल मन चपल है भागे चारों ओर,
सांस डोर से बाँध कर रोक रख एक ठोर,
सांस देखते देखते मन अविचल हो जाय,
सांस देखते देखते सत्य प्रकट हो जाय,
सत्य देखते देखते परम सत्य दिख जाय।

पहिले तीन दिवस आनापान. श्वास मेहसूस करत राहणं.
दिवसातले सहा-सात तास मांडी घालून बसणं कठीण आहे.

खाली ऐसपैस कुशन असतंच.‌ पण मी त्यावर दोन एक्स्ट्रा उशा घेतल्या. मग उजव्या मांडीखाली एक छोटी दुमडलेली उशी. मग डाव्या मांडीखाली एक छोटी दुमडलेली उशी. मग गुडघ्याखाली छोटासा सपोर्ट..
असा ऐसपैस राजेशाही ध्यानास बैसलो.
दुसऱ्या दिवशी कंबरदुखी, पाठदुखी, मांड्यादुखी, पायदुखी, हेदुखी, तेदुखी.

गुरूजींना भेटण्याच्या वेळेत भेटलो.
म्हटलं, 'मला बॅकरेस्ट किंवा चेअर मिळेल काय?'

ते म्हणाले, ''स्पॉन्डिलायटिस, अर्थ्रायटीस, काही मेजर ऑपरेशन वगैरे झालेल्या लोकांसाठी मी ती सवलत दिलेली आहे. तुम्हाला मिळणार नाही. मणका, मान, डोकं सरळ एका रेषेत जमिनीला काटकोनात ठेवा. अन्यथा इतर जागांवर दबाव येतो. आणि मग श्वासाचं आलंबन सोडून वेदनेकडेच सगळं लक्ष तुमचं. आता अधूनमधून जरा वेळ हार्ड श्वासांवर काम करा.. या आता.''

(क्रमशः)

पुढील अंतिम लेखाचा धागा:
https://www.maayboli.com/node/80586

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विपश्यनेच्या दहा दिवसांत संपूर्ण मौन असतं ना ?>>
हो.. पण टेक्निकच्या संदर्भात वा इतर काही शारीरिक अडचण असेल तर गुरूजींना भेटण्यासाठी दुपारी १२ ते १२.३० आणि रात्री ९ ते ९.३० वैयक्तिकरित्या भेटून बोलू शकतो..
रूम/व्यवस्थेसंदर्भात काही अडचण/अपेक्षा असेल तर धम्मसेवकाशी बोलू शकतो. कमीत कमी शब्दांत आणि कमीत कमी आवाजात. गप्पा टप्पा नाही. साधकांनी आपापसात बोलणं किंवा खाणाखुणा वगैरे करणं मात्र पूर्णपणे मना आहे.

सुरुवात तर सुंदर झालीय. सूक्ष्म गंध - नाद हळू हळू विरतील की नाही हे जाणण्याची उत्सुकता आणि अर्थातच उत्कंठा वाढली आहे!
Wink

छान लिहिलेयं. सुरुवात छान झाली आहे.

पुभाप्र Happy

क्रमशः नका लिहू हो कधीच. पूर्ण वेळ घ्या आणि एकदाच काय ते लिहा.
छान लिहिताय म्हणून वाचायला येतो तर अर्धवट....

छान सुरुवात! चांगले मोठे भाग लिहा. विपश्यना या प्रकाराविषयी भीती मिश्रित कुतुहल आहे उगाच. मला शक्यतो नियम पाळायला आवडतात पण लॉजिकली अगदी नको वाटले तर नियम तोडायला देखील काही वाटत नाही. त्यामुळे सक्तीचे मौन किती झेपेल याबद्दल खात्री वाटत नाही स्वतःबद्दल!
पुभाप्र.

विपष्यनेविषयी मनात उत्कंठा होतीच... त्यात हा लेख आला. लेखाची सुरुवात खुमासदार झाली अन लोटपोट हसताना उत्कंठा वाढवणार्‍या शेवटाला कधी येऊन पोचलो ते कळलंच नाही.

लेखाच्या सुरुवातीला तुम्हाला विपश्यनेला का जावंसं वाटलं, विपश्यनेचे ठिकाण, कोणत्या स्टेशनवर उतरलात, विपश्यनेसाठीचा १० दिवसांचा खर्च वगैरेची माहिती मिळाली असती तर अजुन बरं झालं असतं असं वाटलं.

होय व्यत्यय Happy
आज उद्याकडे होऊन जाईल हे.
अडचण वेळेचीच आहे.. बाकी काही नाही.
सध्या दोन-तीन गोष्टींत/कामांत गुंतलेपणा आहे.
पण तुमचं म्हणणं पोचलं. आता हा धागा तर टाकला गेला आहे. पुढे नवीन काही लिहिताना तुमच्या फीडबॅक जरूर विचार करेन.
त्यामुळे पुढे कदाचित माझी जी काही तुटपुंजी प्रतिमा होती तुमच्या मनात, ती पुन्हा थोडीशी उजळून निघेल अशी मला आशा आहे.
फीडबॅकबद्दल तुमचे आभार. Happy

वुईथ काईंड रिगार्ड्स,
पाचपाटील

मी पण जाऊन आली आहे विपश्यनेला. सकाळी चार वाजतां उठणं खरंच जीवावर यायचं. पण गोयंका गुरुजींचे शब्द कानावर पडले की खुप छान वाटायचं. ते दिवस कधीच विसरता येणार नाही.

खूप छान लिहिलंय.
अगदी विस्तृत लिहा पुढचे भाग वेळ घेऊन.
मला खूप उत्सुकता आहे याबद्दल.
Dj... +1
मौन पाळणं मला जमेल पण ते काकडी गाजर खाऊन दिवस ,रात्र काढणं अवघड आहे. तुमच्या खाण्याची व्यवस्था कशी होती?

गुरुजींशी तुम्ही बोलू शकता संध्याकाळी. पण ते देखील केवळ टेक्निक वा अत्यंत आवश्यक बाब असेल तर. बाकी पूर्ण वेळ मौन.
जेवण देखील मिताहार असतो व दिवसातून एकदा. संध्याकाळी थोडेसे पोटाला आधार म्हणून चुरमुर्‍यासारखे हलके काही मिळते. मी ऐकले आहे की काही ठिकाणी संध्याकाळचा अल्पोपहार उपलब्ध नसतो.

मी ऐकले आहे की काही ठिकाणी संध्याकाळचा अल्पोपहार उपलब्ध नसतो.>> बरंय नसतील देत तर. निदान पुढचे नऊ दिवस पहाटेचा ध्यानाचा कार्यक्रम तरी निर्विघनपणे पार पडत असावा.

विपश्यनेबद्दल टोकाची मते ऐकली आहेत. लेख मात्र फार आवडला, दिलखुलास आणि नो अभिनिवेश Happy

स्मरणशक्ती उत्तम आहे तुमची, अकरा दिवसांचे अनुभव सुसूत्रपणे आठवतात हे भारी आहे (डायरी-फोन सोबत नसतो त्यावरून)

आज बुद्धाच्या जातक कथा वाचल्या. बुद्धपदाला पोचण्यापूर्वी, बुद्ध हे बोधिसत्व असताना, मनुष्य, प्राणी, वनस्पती पक्षी रुपात , अनेक योनीत भ्रमण करत असत तेव्हाच्या या गोष्टी आहेत.
ते वाचताना ६ पारमिता वाचनात आल्या.
https://www.vridhamma.org/ - ही विपश्यनेची साईट सापडली.
सगळं अतिशय रोचक आहे. रंजक आहे. खूप सौंदर्य व अमृत आहे हे सर्व शिकण्यात.

सगळं अतिशय रोचक आहे. रंजक आहे. खूप सौंदर्य व अमृत आहे हे सर्व शिकण्यात.>>> +११
जातककथा सुंदरच आहेत.
आनंद विनायक जातेगावकरांचे 'अस्वस्थ वर्तमान' म्हणून एक पुस्तक आहे.. त्यामध्ये त्यांनी काही जातककथांवर त्यांच्या अप्रतिम ओघवत्या शैलीत चिंतन केले आहे.
धर्मानंद कोसंबींनी संग्रहित केलेल्या जातककथा पीडीएफ स्वरुपात खालील लिंकवर विनामूल्य उपलब्ध आहेत.
फार आनंददायी आहे ते सगळं वाचणं.. Happy

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://sahitya.mar...