महाराष्ट्राच्या या प्रतिभावान टेनिसपटूच्या स्वप्नांना बळ हवंय

Submitted by दिनेशG on 8 November, 2021 - 03:38

दोनच वर्षांपूर्वी पुण्याला झालेल्या एका आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेमध्ये भारतात आज ज्युनिअर गटाच्या क्रमवारीत नंबर २ आणि महिलांच्या गटातील क्रमवारीत नंबर २१ वर असणाऱ्या नवी मुंबईच्या आकांशा नित्तुरेची गाठ पहिल्याच फेरीत यावर्षीची यूएस ओपनची विजेती एमा राडूकानू हिच्याशी पडली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर फार कमी अनुभव असणारी सोळा वर्षीय आकांशा हरली खरी पण तो अनुभव तिला फार काही शिकवून गेला.

गेली तेरा वर्षे मी आकांशाची टेनिस मधील मेहनत आणि प्रगती जवळून पाहिली आहे. एमा प्रमाणे वयाच्या पाचव्या वर्षांपासून टेनिस ची रॅकेट हातात धरलेल्या आकांशाकडे इच्छाशक्ती आणि प्रतिभेची कमी नाही. परंतु गेल्या दोन वर्षात एमा जिथे यूएस ओपन स्पर्धा विजेती ठरली तेथे भारताची ज्युनिअर नंबर दोन ची खेळाडूला मात्र देश विदेशातील जास्तीत जास्त स्पर्धा खेळता याव्यात यासाठी स्पॉन्सर्स शोधावे लागत आहेत.

टेनिस हा खेळ मुळातच महागडा. त्यात एका मध्यमवर्गीय घरातील मराठी मुलगी भारतासाठी ऑलिम्पिक मध्ये टेनिस मधील सुवर्णपदक जिंकण्याचे किंवा ग्रँडस्लॅम जिकण्याचे स्वप्न बघते तेव्हा ते हिमालयाला गवसणी घालण्यासारखे असते. आकांशाचा बाबा दिलीप मुंबईच्या एका तंत्रनिकेतनामध्ये लेक्चरर म्हणून गेली २२ वर्षे नोकरी करतोय. आकांशाला टेनिस प्लेअर बनवायचे हे स्वप्न त्याने पाहिले आणि जगले. त्याला पुरेपूर साथ दिली ती आकांशाने. हातातल्या नोकरीच्या जोरावर टेनिस चे महागडे कोचिंग परवडणार नाही म्हणून पूर्वी कधीची टेनिस न खेळलेला दिलीप मेहनतीने स्वतः सर्टिफाईड कोच बनला. गेली तेरा वर्षे त्याचा दिनक्रम म्हणजे सकाळी पाच ला उठून टेनिस कोर्ट वर जाणे त्यानंतर कॉलेजचा जॉब आणि संध्याकाळी ९ वाजेपर्यंत पुन्हा टेनिस कोर्ट.

राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमधून जेव्हा आकांशाचे भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिच्याबरोबर दिपाने म्हणजे दिलीप च्या पत्नीने जायला सुरुवात केली. वयाच्या ९ व्या वर्षी आकांशा महाराष्ट्राची नंबर १ खेळाडू बनली तसेच वयाच्या १६ व्या वर्षी ती मुलींच्या अठरा वर्षे वयोगटामध्ये भारताची नंबर २ खेळाडू बनली. २०२० च्या खेलो इंडिया खेलो मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या आकांशाने टेनिस हब MPTA नॅशनल ज्युनियर क्ले कोर्ट चॅम्पियनशिप पण जिंकली आहे. अठरा वर्षाची आकांशा आज राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे.

खरं तर येथूनच भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीसे मागे पडायला चालू होतात कारण त्या स्तरावर खेळण्याचा पुरेसा अनुभव घेणे , आंतराष्ट्रीय दर्जेदार ट्रेंनिग प्रोग्रॅम मध्ये भाग घेणे, चांगल्या कोचला हायर करणे या गोष्टी आकांशा सारख्या माध्यमवर्गातून आलेल्या खेळाडूच्या आवाक्याबाहेरच्या असतात. भारताच्या नामवंत खेळाडूंना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला स्वतंत्र कोच बरोबर घेऊन खेळणे आर्थिकदृष्ट्या कठीण जाते. जागतिक क्रमवारीत स्थान मिळवायचे तर बाहेरच्या देशातील स्पर्धा खेळणे क्रमप्राप्त आहे. इंग्लंड, अमेरिका सोडा पण इजिप्त, मलेशिया, सिंगापूर येथील स्पर्धामध्ये सतत स्वखर्चाने भाग घेणे एका मध्यमवर्गातून आलेल्या खेळाडूला सहज शक्य होत नाही. सतत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळणाऱ्या एका खेळाडूचा वार्षिक खर्च हा तीस ते पन्नास लाख एवढा येऊ शकतो. स्पर्धांचे सोडा, पण फिजिओ, न्यूट्रिशन, ट्रेनिंग याचाच खर्च लाखोंच्या घरात जातो आणि याच आर्थिक पाठबळाच्या अभावी कित्येक प्रतिभावान भारतीय खेळाडू मागे पडलेत. ऑलिम्पिक पदक मिळवल्यावर त्याच्यावर जी बक्षिसांची खैरात होते तशी खैरात जर प्रतिभावान खेळाडूंना त्याच्या ट्रेनिंगच्या दरम्यान मिळाली तर सव्वाशे करोड भारतीय सव्वाशे मेडल्स नक्कीच जिंकू शकतील.

अवघ्या दोन वर्षांपूर्वी जिच्याबरोबर खेळलो त्या एमाला यूएस ओपनची ट्रॉफी उचलताना पाहून आकांशाच्या मनातील भावनांचा आपण विचार करू शकतो. गेल्या एक दीड वर्षात महिलांच्या गटातील फक्त काहीच स्पर्धा खेळून अठराव्या वर्षी AITA रँकिंग मध्ये २१ व्या स्थानावर असलेली आकांशा पहिल्या क्रमांकावर असलेल्या अंकिता रैना पेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. या वर्षी जास्तीत जास्त स्पर्धा खेळायला मिळाल्यास ती आपल्या रँकिंग मध्ये बरीचशी सुधारणा करू शकते पण त्यासाठी गरज आहे ती चांगल्या स्पॉन्सर्सची. गेल्या वर्षीच्या खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्रासाठी रौप्यपदक मिळविलेल्या या खेळाडूला राज्यसरकार, केंद्राकडून किंवा कॉर्पोरेट कडून भरीव मदत मिळाल्यास भविष्यात आपल्या आकांक्षांना गवसणी घालून महाराष्ट्राची ही मुलगी आपले नाव सार्थकी ठरवेल!

राष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत आकांशाचे जिंकलेल्या प्रमुख स्पर्धा
● Tennishub MPTA नॅशनल ज्युनियर U-18 क्ले कोर्ट टेनिस चॅम्पियनशिप चेन्नई.
● HTPC स्पर्धा दिल्ली
● रौप्य पदक मुली अंडर-17 खेलो इंडिया खेलो 2020, गुवाहाटी.
● आशियाई टेनिस टूर महिला एकेरी, म्हैसूर
● ITF ज्युनियर टेनिस स्पर्धा, इंदूर
● महिला खुली टेनिस स्पर्धा, मुंबई
● राष्ट्रीय मालिका टेनिस स्पर्धा, चेन्नई
● राष्ट्रीय मालिका टेनिस स्पर्धा, अहमदाबाद
एकंदर 5 सुवर्ण पदके, 77 ट्रॉफी, 250 + राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रे

भारतात दरवर्षी ६ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात परंतु ITF क्रमवारीत आपले स्थान राखण्यासाठी १६ स्पर्धांचे गुण मानले जातात त्यामुळे उरलेल्या १० स्पर्धा आकांशाला परदेशात खेळायच्या आहेत., जानेवारी २०२२ मध्ये इजिप्त मधील दोन तीन स्पर्धा खेळण्याचे ध्येय आहे. त्यासाठी साडेतीन ते चार लाख खर्च अपेक्षित आहे. त्या स्पर्धांमध्ये यशस्वी झाल्यास सिंगापूर मधील स्पर्धा ती खेळू शकते. सिंगापूर मधील राहण्याची सारी व्यवस्था माझा एक मित्र करणार आहे.

आपल्याकडे यासंदर्भात काही सूचना असल्यास जरूर कळवा. आकांशाच्या मेहनतीला आणि स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी तिचे akanksha_nitture हे इन्स्टाग्राम हँडल आणि फेसबुक पेज जरूर follow करा.

#akanshanitture

Group content visibility: 
Use group defaults

चांगला परिचय.
खाते details मिळाले तर यथाशक्ती हातभार लावू शकेन.

आकान्क्षा राष्ट्रिय स्तरावरील खेळाडु आहे तर सरकारकडुन मदत मिळत नाही का? अशी मदत मिळते हे फक्त ऐकुन आहे, प्रत्यक्षात माहिती नाही.

आकान्क्षाला भरभरुन शुभेच्छा.

शोधाशोध करताना खालिल लिन्क सापडली.

https://yas.nic.in/sports/national-sports-development-fund-0

आकांक्षाला मनःपूर्वक शुभेच्छा.
ते SAI ला कॉन्टॅक्ट करून बघू शकतात. डायरेक्ट किरेन रिजिजुना फेसबुक किंवा इंस्टा वरून संपर्क करून बघू शकता.
रिलायन्स फाउंडेशन, जिंदाल फाउंडेशन, महिंद्रा अँड महिंद्रा यांना संपर्क करून बघा, यांच्याकडून स्पोर्ट्स ला मदत मिळू शकते.

साधना,
सरकारी पातळीवर आत्ता थोडी मदत मिळत असेलच
खेलो इंडिया मेडलिस्ट ला वन टाइम प्राईस मनी
आणि दर वर्षी 5लाख रूपये 8 वर्ष मिळतात
खेळतात. पण हे अजिबात पुरत नाहीत कारण परदेशात खेळण्यासाठी खूप खर्च करावा लागतो.

टॉप्स स्कीम मध्ये अजून बरीच मदत मिळते पण टॉप्स स्कीम मध्ये जाण कठीण आहे .

खूप सार्‍या शुभेच्छा.
इंस्टिट्युशनल मदत मिळाली तर उत्तमच. फंड मी सारखे काही असेल तर यथाशक्ती मदत नक्की करेन.

इंस्टिट्युशनल मदत मिळाली तर उत्तमच. फंड मी सारखे काही असेल तर यथाशक्ती मदत नक्की करेन. >>> अनुमोदन. आकांक्षासारख्या खेळाडुंना क्राउड फंडिंगसारख्या माध्यमातून आर्थिक मदत करता येइल ना?

@साधना, राष्ट्रीय स्तरावरील टेनिस मधील पहिल्या चार पाच खेळाडूंसाठी सरकार मदत करते परंतू तेथवर पोहचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भाग घेऊन ATP/WTA रँकिंग मध्ये स्थान मिळवावे लागते. आपण दिलेल्या लिंक साठी धन्यवाद

ज्यांनी मदतीची इच्छा व्यक्त केलीय त्यांचे खूप खूप धन्यवाद. Crowd Funding हा ही एक पर्याय आहे जो नंतर नक्कीच विचारात घेऊ. तूर्तास सरकार आणि विविध संस्थाकडे प्रपोजल पाठवणे सुरू आहे. FB आणि इंस्टा वर आकांशाला फॉलो करून तिचा उत्साह नक्की वाढवा.

दिनेश, बाकी काही नसले तरी निदान ती जिथे खेळायला जाणार असेल तिथल्या राहण्या आणि जेवणाचा खर्च तिथे असलेल्या माबोकारानी उचलला तरी थोडा तरी खर्च वाचू चालेल
सध्या आशा सुविधेची कल्पना नाही, पण दिवाळी अंक किंवा गणपती साठी ज्या घोषणा असतात, तश्या घोषणा माबो वर always on top ठेवता येतील , प्रायोजक मिळेपर्यंत

वेमा, अशी announcement ची काही व्यवस्था करता येईल का, करण ही जाहिरात नाहीये

Alternatively, जिथे ती जाते आहे तिथल्या मराठी मंडळांना पण कॉन्टॅक्ट करता येईल, अगदी सगळी नसतील तरी काही मंडळे तर नक्की सपोर्ट करतील.।

हो , जर्मनीमध्ये विशेषतः म्युनिक , स्टुटगार्ट, बर्लिन येथे राहण्या ,फिरण्या, खाण्याची पूर्ण सोय आमच्याकडून होऊ शकेल.

स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया मध्येही सोय करता येईल.

दिनेशG असा प्रॉब्लेम सर्वच खेळाडूंना येत असावा. हा युकेमधल्या खेळाडूंच्या समस्येवर व्हिडीओ बघण्यात आला.
https://youtu.be/ncsNZacfla0
आणि किंग रिचर्ड हा चित्रपटही इतक्यातच बघितला. विनस आणि सेरेना विल्यम्स बहिणींच्या वडिलांची कहाणी आहे.
तुमच्या मुलीची आठवण आली. आशा आहे तिला तिच्या मनासारखी वाटचाल करायला मिळत आहे. तिला शुभेच्छा!