दिगंत २.२ : Symptoms!

Submitted by सांज on 30 August, 2021 - 12:49

त्याच्या आवाजावरुन तो माझ्या फोनची वाट पाहत होता हे अगदीच जाणवलं. तसा बोलला नेहमी सारखाच मिश्किलपणे पण त्या बोलण्याला यावेळी कसलीतरी उदास किनार होती. तो खिन्न होता का? की माझ्यावर नाराज? की disappointed? काहीही असू शकतं. हम्पीमध्ये आमचं ते romantically एकमेकांना भेटणं, त्यानंतर तिथले 3-4 दिवस लाभलेला सहवास, माझं माझ्याही नकळत झालेलं मतपरिवर्तन, नंतर पुण्याला परतल्यावर पहिला महिनाभर झालेल्या गाठीभेटी.. आणि मग नंतर मी जवळपास अलूफ झाले ती आत्तापर्यन्त. किती अचानक तो आयुष्यात आला. आता विचार करून माझंच मला नवल वाटतंय. तो चांगलाच आहे तसा इन फॅक्ट मी तर म्हणेन उत्तम आहे! पण मनात भीती वाटायला लागलीये. तो कॉर्पोरेटवाला. मी सिविल सर्विसेस वाली. कसं काय निभेल पुढे जाऊन.

संहिता उठली वाटतं. फ्रीज उघडल्याचा आवाज. आता लायटर चा. गॅस ऑन. चहाचं भांडं वर ठेवेल आता... अरे अजून कसं नाही ठेवलं? ओहह मी ते चवळीच्या डब्यावर ठेवलंय फोनवर बोलता बोलता.

‘रिया.. चहाचं भांडं कुठेय गं?’

आलीच हाक... ‘अम्म? अगं चवळीच्या डब्यावर बघ. तिथे असेल...’

‘चवळीच्या डब्यावर चहा करणार होतीस का? तिथे कसं गेलं..’

हम्म.. बोलल्या मॅडम! जिथली वस्तु तिथे ठेवण्याचा केवढा हा अट्टहास. थोडं इकडचं तिकडे झालं हिचा जीव खालीवर. तो अनिकेत कसं काय निभावतो काय माहित. हम्म पाणी ओतलेलं दिसतंय भांड्यात. आता तिच्या भाषेत ‘मंदाग्नी’वर ते ती उकळेल. मग चहा पत्ती टाकणार. उघडला डबा. बरोब्बर दीड चमचा. आता पुन्हा ‘मंदाग्ंनिवर’ उकळणार. चहाचा पाण्यात उतरणारा रंग मॅडम निरखत बसल्या असतील. आता साखर टाकेल. अर्थात मोजून. इतर लोक चमच्याने मोजतात. पण आमची संहिता कणांनी मोजते :D. आलं, दुधाचं पातेलं बाहेर आलं. अख्ख्या जगातल्या म्हशी गाभण असल्यासारखं दूध वापरते ही. थेंबात मोजून. आता बरोब्बर पाऊण कप स्वत:ला आणि पाऊण कप मला असा ओतून बाहेर आणेल. आली आली.

‘काय गं कसला एवढा गहन विचार करतेयस?’

चहाचा कप हातात घेत मी क्षणभर विचार केला, गहन विचार?

‘अगं काही नाही.. ते आपलं असंच.’ आता हिला काय सांगू तुझी चहा-मेकिंग प्रोसेस डिसकस करत होते स्वत:शीच.

‘असंच काय असंच? परीक्षा संपल्यापासून पाहतेय. काही बोलत नाहीस. करत नाहीस. अशीच बसलेली असतेस. झालंय काय तुला?’

‘काही नाही गं. निकालाचं टेंशन बाकी काही नाही’

तिने वरपासून खालपर्यन्त माझ्याकडे पाहिलं. आणि मी न वाचत असलेला माझ्या हातातला पेपर मागितला. मग मी उगाच खूप वाचत असल्याचा आव आणत म्हणाले,

‘एडिटोरियल अर्धं राहिलंय माझं.. तुझा इकनॉमिक टाइम्स तिकडेय.. तो वाच तोपर्यंत.’

तिने नाखुशीनेच तो उघडला. आणि चाळत-चाळत म्हणाली,

‘अनुरागशी बोललीस की नाही?’

आता मी जरा जास्तच गंभीरपणे वाचत असल्याचा आव आणला.

‘रिया..?’

‘अम्म?’

‘अनुरागशी बोललीस की नाही?’

‘हो.. बोलले काल..’

‘काय सांगतेस? काय म्हणाला मग.. भेटताय की नाही?’

‘अम्म.. म्हणाला असं विशेष काही नाही. दोन-चार पीजे crack केले. आम्ही थोडे हसलो बास. भेटतोय आज.’

‘ओह मस्त.. कुठे?’

‘इथे’

‘काय?’

‘हो घरीच बोलावलं मी त्याला. बाहेर कोण जा?’

‘अगं? तुला झालंय काय.. बरं ठिके घरी तर घरी. उठ. आवर. पार्लरला जाऊन ये. मी अपॉईंटमेंट घेऊन ठेवते. अवतार बघ कसा झालाय.’

‘काय?? ऐ हॅलो.. मी कै जाणार नाही कुठे. आणि प्लीज तू आईसारखी नको वागूस हा.. काय दाखवण्याचा कार्यक्रम ए की काय माझा!’

‘नाही. मी तुला एक्सट्रा काही कर म्हणतच नाहीये. पण किमान ‘नॉर्मल’ तरी राहशील ना? किती महीने झालेत तुला पार्लरला जाऊन? चेहरा बघ जरा.. सारखी कॉफी, अभ्यास आणि जागरण. भुवयांचं जंगल झालंय. केसांना शेप उरलेला नाही. आणि डोळ्यांभोवती वर्तुळं’

‘ए पुरे गं.. नाही जाणारे मी कुठे. असुदे. काही होत नाही. काय होईल जास्तीत जास्त? अनुराग पळून जाईल.. बघू काय करतोय ते. मज्जा येईल नं.’

हे ऐकून संहिताने डोक्यालाच हात लावला.

‘काहीही कर. कधी येणारे तो? संध्याकाळी ना? मी ऑफिसमधून आल्यावर घर आवरते..’

‘कशाला आवरायचंय घर? उत्तम आहे की. छान छान अस्ताव्यस्त.. बाय द वे, तो आत्ताच येतोय. पोचेल थोड्यावेळात.’

मी एडिटोरियल मध्ये शक्य तितकं जास्त डोकं खुपसून म्हणाले. ती वळली.

‘काय?? अगं?’

‘काय झालं? सकाळी येतो म्हणाला. मी ये म्हटलं.’

‘छान. मग ब्रेकफास्टचं काय?’

‘घेऊन येईल तो येताना.. तू नको टेंशन घेऊ.’

‘अगं मुली.. तो येतोय ना आपल्याकडे? तेही पहिल्यांदा? त्यालाच आणायला सांगितलंस तू?’

‘हो त्यात काय झालं. उलट त्याला जे आवडतं ते आणेल ना तो..’

मी टाळी द्यायला हात पुढे केला. पण ती मला एक अजब लुक देऊन आत निघून गेली.

ती आजकाल जराशा संशयानेच पाहते माझ्याकडे. म्हणजे मी पण थोडी नेहमीपेक्षा जास्तच mad वागतेय म्हणा एक्झॅम झाल्यापासून. Withdrawal symptoms आहेत का हे? अभ्यास बंद झाल्याचे पण असू शकतात की withdrawal symptoms.

मी मनातल्या मनात ही theory मांडत असतानाच काहीतरी आठवल्या सारखं संहिता आतून बाहेर आली. आणि calendar कडे पाहत म्हणाली,

‘छ्या.. उगाच टेंशन घेत होते मी. मला वाटलं खरंच तुला निकालाचं टेंशन वगैरे आलंय, पेपर म्हणावे तसे गेले नसतील वगैरे.. पण तुझ्या या madछाप वागण्याचं कारण वेगळंच ए..’

‘काय??’ मला काहीही अर्थ लागला नाही.

‘काही नाही.. वाच वाच ते एडिटोरियल वाच. तासभरापासून तेच वाचतेयस. पूर्ण कर एकदाचं. You are PMSing. Nothing else..’

ती वळली आणि आत निघून पण गेली. मी तिच्याकडे पाहतच राहिले. मग कॅलेंडर कडे पाहिलं. खरंच की. तारीख जवळ येतेय. हाहा. हिच्या बरं लक्षात राहतं सगळं. मला तर हिने काल काय घातलं होतं तेही आठवत नाही. पण, खरंच हे PMS वगैरे फारच वाढलंय अशात. काहीतरी केलं पाहिजे बाबा. चल सर्च मारते. फोन कुठेय.. हम्म. सापडला..

अरे बापरे, ‘yoga to reduce premenstrual symptoms!’ असं पण असतं काय?

‘Yoga To reduce what?’

अरे! हा वेगळा आवाज कोणाचा? मान वर करून पाहिलं तर दारात अनुराग उभा. मला क्षणभर काही समजलंच नाही. गडबडीत उठायला गेले तर पेपर आणि फोन दोन्ही खाली पडले. उचलून वर बघेतो तो आत येऊन बसलेला पण होता..

क्रमश:

सांज
www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिजात, Lol

Currently I’m working on both the stories and posting them soon. I know it’s been a while and stories are apparently paused. Sorry about that.
खूप दिवसांनी माबोवर आले. कथेची बरेच जण वाट पाहतायत हे वाचून छान वाटलं.

हिरवणीस घर आवरायची, स्वयंपाकाची चांगले दिसायची आवड नाही बहुत खूब. लेझी बम. गहन विचारात गुंतलेली आहे सो क्युट. छान चित्रण