जीवन माझे..

Submitted by _आदित्य_ on 28 October, 2021 - 03:09

सुखदुःखांच्या हिंदोळ्यांवर.. झुलते जीवन माझे !
कधी पाचोळा, कधी कळीसम खुलते जीवन माझे !

लाटांवरती नाव जशी.. असहाय तरंगत जावी..
परिस्थितींवर तसे काहीसे.. हलते जीवन माझे !

जीवनास कंटाळून जीवन स्वप्न मनी रंगवते..
त्या स्वप्नांना जीवन समजत भुलते जीवन माझे !!

प्रश्न अनावर होता, उत्तर धुंडाळत फिरताना..
कवितेच्या क्षितिजावर हळूच कलते जीवन माझे !

संभ्रमात असल्याची येता प्रचिती.. होऊन हळवे,
डोळ्यांमधल्या आसवांसवे... गळते जीवन माझे !

संसारातील सत्य - असत्याशी घेते जमवून..
निमुटपणे संसारामध्ये.. रुळते जीवन माझे !

झुलते, खुलते, हलते, भुलते, कलते, गळते, रुळते !!
परंतु कधी खरेच मजला.. कळते जीवन माझे??

.................

Group content visibility: 
Use group defaults