निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्...

Submitted by गीतानंद on 18 October, 2021 - 21:45

श्रीभगवानुवाच |

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् |
मयैवैते निहता: पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् || (११.३३)

अन्वय - तस्मात् त्वं उत्तिष्ठ| यश: लभस्व| शत्रून् जित्वा समृध्दं राज्यं भुंक्ष्व| एते मया एव पूर्वम् एव निहता:| हे सव्यसाचिन् निमित्तमात्रं भव|

अर्थ – म्हणून तू ऊठ! यश संपादन कर. शत्रूंना जिंकून संपन्न राज्याचा उपभोग घे. हे पूर्वीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना तू केवळ निमित्तमात्र हो म्हणजे साधन हो किंवा उपकरण हो.

म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ती
जिंकूनी निष्कंटक राज्य भोगी
मी मारिले हे सगळेची आधी
निमित्त हो केवळ सव्यसाची. (विनोबांची गीताई ११/३३)

“म्हणून” हा शब्द आला की त्याआधी बरंच काही घडून गेलेलं आहे, सांगून झालेलं आहे असं समजावं. त्यामुळे भगवंताने याआधी काय सांगितलंय त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.

याआधीचा दहावा अध्याय म्हणजेच विभूतीयोग! ईश्वराचे ऐश्वर्य ज्यात प्रगट झाले आहे तो विभूति योग! अर्जुनाने विचारले की “जगातील सर्व नामरूपामध्ये तू कशाप्रकारे भरून राहिला आहेस हे मला दाखव. तू जर सर्व आकारांना व्यापून आहेस तर प्रत्येक आकारात तुझा आशय कसा आहे? ते मला सांग. प्रत्येक आकारात तू कोठे आहेस ते सांग.” तेव्हा भगवंताने जवळपास १९४ विभूती अर्जुनाला सांगितल्या आणि शेवटी म्हणाला “अरे अर्जुना किती सांगू? या माझ्या विभूतींना अंत नाही. कोणत्याही प्राणीमात्रातील जे जे वैभवसंपन्न आहे, समृध्द आहे, सामर्थ्यशाली आहे ते सर्व माझ्याच तेज्याचे केवळ अंशमात्र प्रकटन आहे असे तू जाण.” इति दशमोध्याय:|

यानंतर अर्जुनाने विचारले, “सर्व विश्वात अनेक रूपांत तू भरून आहेस हे लक्षात आले, आता तुझ्याठीकाणी सर्व विश्व आहे ते मला दाखव.” म्हणजेच analysis झाला आता synthesis करून दाखव. उदाहरणार्थ, पाण्याच्या एका रेणूतून २ हायड्रोजनचे अणू आणि १ ऑक्सिजनचा अणू वेगळा करणे म्हणजे analysis आणि २ हायड्रोजन आणि १ ऑक्सिजन मिसळून पुन्हा पाण्याचा एक रेणू तयार करणे म्हणजे synthesis. विज्ञानाप्रमाणे वेदांतामध्ये सुध्दा हे सूत्र दोन्ही तऱ्हेने सिध्द झाले पाहिजे.

भगवंताने अर्जुनाची ही विनंती मान्य केली आणि synthesis घडवून आणला. तो synthesis म्हणजेच विश्वरूपदर्शन. सापेक्षतेनं पाहता विश्वातील नामरूपाचा गाभा अनुभवणं तसं सोपं आहे परंतु त्याच्याऊलट एकामध्ये अनेक पाहणं अवघड आहे. हे काम सूक्ष्म बुध्दीचं आहे. एखादी कविता वाचण्यासाठी अक्षरओळख पुरेशी आहे पण त्या कवितेला कडकडून, ऊराऊरी भेटण्यासाठी मनाची प्रगल्भता हवी, एक निराळी दृष्टी हवी. ही एक प्रकारची दिव्य दृष्टीच! ही अशीच दिव्य दृष्टी विश्वरूपदर्शन अनुभवण्यासाठी भगवंताने अर्जुनाला दिली. त्याच्या स्थूल डोळ्यांनी विश्वरूपदर्शन अनुभवणे अर्जुनाला अशक्य होते. ते महाभयंकर विश्वरूप पाहताना अर्जुन म्हणतो,

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा:
सर्वे सहैवावनिपालसङ्घै: |
भीष्मो द्रोण: सूतपुत्रस्तथासौ
सहास्मदीयैरपि योधमुख्यै: || (११.२६)

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि |
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु
सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गै:|| (११.२७)

अन्वय : अमी सर्वे अवनिपालसंगै: सह एव धृतराष्ट्रस्य पुत्रा: भीष्म: द्रोण: तथा अस्मदीयै: अपि योधमुखै: सह असौ सूतपुत्र: त्वां त्वरमाणा ते द्रष्टांकरालानि भयानकानि वक्त्राणि विशन्ति| केचित् चूर्णिते: उत्तमांङ्गै: दशनान्तरेषु विलग्ना: सन्दृश्यन्ते|

अर्थ : (अर्जुन म्हणतो,) हे सर्व पृथ्वीपालांच्या संघासह हे सर्व धृतराष्ट्राचे पुत्र, भीष्म, द्रोण त्याचप्रमाणे आमच्यामधीलही मुख्य योद्ध्यांसह हा सूतपत्र कर्ण विक्राळ दाढांनी भयानक दिसणाऱ्या तुझ्या मुखामध्ये त्वरेने प्रवेश करतात. त्यांतील काही जण मस्तके चूर्ण होऊन दातांच्या फटीत अडकून राहिलेले दिसतात.

यानंतरच्या दोन श्लोकांमध्ये दृष्टांत दिले आहेत.
ज्याप्रमाणे समुद्राकडे धाव घेतल्यानंतर नद्यांचे नामोनिशाण राहत नाही त्याप्रमाणे हे मानवलोकातील वीर तुझ्या सर्व बाजूनी प्रदीप्त होणाऱ्या मुखात प्रवेश करतात. (११.२८)
ज्याप्रमाणे पतंग प्रदीप्त अग्नीत स्वत:च्या नाशासाठी अत्यंत त्वरेने प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र मोठ्या वेगाने तुझ्या मुखामध्ये विनाशासाठी प्रवेश करतात. (११.२९)

लेलिह्यसे ग्रसमान: समन्ता-
ल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भि: |
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं
भासस्तवोग्रा: प्रतपन्ति विष्णो || (११.३०)

अन्वय : विष्णो समन्तात् समग्रान् लोकान् ज्वलभ्दि: वदनै: ग्रसमान: लेलिह्यसे | तव उग्रा: भास: समग्रं जगत् तेजोभि: आपूर्य प्रतपन्ति |

अर्थ : हे विष्णो सर्व बाजूंनी सर्व भुवनांना जळत्या मुखांनी गिळणारा, असा तू जिभल्या चाटत आहेस, तुझे उग्र किरण सर्व जगाला तेजाने भरून टाकून तळपत आहेत.

असे हे भगवंताचे भयंकर विराट विश्वरूप पाहून अर्जुन अर्थातच घाबरला आणि त्याने विचारले की, “असं अक्राळविक्राळ रूप धारण करण्याचं कारण काय?”

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त: |
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिता: प्रत्यनीकेषु योधा || (११.३२)

अन्वय : ये प्रत्यनीकेषु योध्दा: इह लोकक्षयकृत् प्रवृध्दा: काल: अस्मि| ते सर्वे त्वां ऋते अपि न भविष्यन्ति|

अर्थ: येथे लोकांचा विनाश करण्यास प्रवृत्त झालो आहे. मी लोकांचा क्षय करणारा अतिशय शक्तिशाली काल आहे. शत्रूच्या सैन्यात रांगेने उभे असणारे योध्दे तुझ्यावाचूनही जिवंत राहणार नाहीत.

प्रवृध्दा: (प्रकर्षेण वृध्दा:) काल:| शक्तिशाली काळ.. लय ही प्रक्रिया सृष्टीमध्ये सदैव चालूच आहे. परंतु भगवंताच्या विश्वरूपदर्शनात दिसतो तो सर्वसाधारण नाश नाही. तो दुष्टांचा नाश आहे. भगवंत म्हणाला, “मी या दुष्ट लोकांचा संहार करण्यास प्रवृत्त झालो आहे. अर्जुना तू असलास काय किंवा नसलास काय या लोकांचे काही खरे नाही. ऋतेsपि म्हणजेच तुझ्याशिवाय या लोकांची गच्छन्ति होणार आहे.” खरंतर या दुष्टजनांचा अर्जुनाकरवी विनाश होणं अपेक्षित होतं. पण अर्जुन रथात बसकण मारून बसला. मी युध्द करणार नाही ते महापाप आहे असं म्हणाला.

भगवंताची अपेक्षा अशी होती की अर्जुनाने त्याचे निमित्त व्हावे. उपकरण म्हणून उपयोगी पडावे. भगवंताला जे काही साधावयाचे होते ते भगवंत अर्जुनासारख्या सज्जन माणसाच्या माध्यमातून साधू इच्छीत होता. अर्जुन सत्प्रवृत्त होता, योध्दा होता. सत्याचे रक्षण करण्याची त्याची ताकद होती. पण सर्व तऱ्हेने पात्र असूनही तो मला युध्दच नको म्हणाला. वस्तुत: त्याने ईश्वराचा हेतू लक्षात घेऊन त्यानुसार अनुकूल असं वागायला हवं होतं. पण केवळ अर्जुनाच्या प्रतिकूल वागण्याने या दुष्ट लोकांचा संहार होणं थांबणार नाही. जसं एखादी बहुराष्ट्रीय संस्था एखादं माणूस सोडून गेल्यानं बंद पडत नाही तसंच इथंही आहे. अर्जुनाशिवायही हे कार्य भगवंताने विनासायास पार पाडलंच असतं. जीवनामध्ये चुकीची मूल्ये जगलेले कौरव ही अवनत झालेली पिढी होती. या अवनत लोकांना निपटून काढण्यासाठीच भगवंताने तो अवतार घेतला होता.

खरंतर भगवंताला परमदयाळू, परमकृपाळू म्हटलंय. पण हाच परमकृपाळू भगवंत विश्वरूपात सर्वभक्षक झाला. हा विरोधाभास वाटत असला तरी हीसुध्दा परमकृपाच आहे. दुष्प्रवृत्त माणसांचा नाश करणे म्हणजे उरलेल्या सत्प्रवृत्त समाजावर कृपा करणेच आहे. ज्याला मारणे योग्य नाही त्याला मारण्याने होणारे पाप, ज्याला मारणे योग्य आहे त्याला न मारण्याने होणाऱ्या पापाइतकेच मोठे आहे.

स्वामी चिन्मयानंद म्हणतात, ‘तुटलेला पूल, जुनाट इमारत आणि फुटलेलं धरण. हे तोडण्याच्या कार्याला दुष्ट कर्म म्हणता येणार नाही.’ किंवा शेक्सपिअर हॅम्लेटमध्ये म्हणालाय तसं “I must be cruel only to be kind.” समाजकंटक आणि शल्यविशारद दोघेही हातात सुरी घेतात. पण भगवंताने केलेला संहार हा शल्य विशारदाने सुरी चालण्यासारखा आहे समाजकंटकाणे सुरी चालवण्यासारखा नाही. ज्याप्रमाणे एखादा शल्यविशारद रोग्याच्या भल्यासाठीच शरीरावर सुरी चालवतो त्याचप्रमाणे भगवंताने केलेला हा संहार समजावा. म्हणून परमेश्वराला अधून मधून दुष्टजणांची अशी सामुहिक कत्तल करावीच लागते.
दुसरं असं की भगवंताला अर्जुनाकडून पुरुषार्थाची अपेक्षा होती. माणसाच्या बाबतीत दोन प्रकारची कर्म संभवतात १. प्रारब्ध कर्म आणि २ स्वत: स्वतंत्रपणे बुध्दी पुरस्सर आचरलेले कर्म. भगवंताची इथे दुसऱ्या कर्माची अपेक्षा आहे. जे भूतकाळाशी संबंधित आहे त्याला प्रारब्ध म्हणतात आणि ज्याचा संबंध भविष्याशी आहे त्याला पुरुषार्थ म्हणतात. दैव याचा अर्थ प्रारब्ध! माणसे या प्रारब्धाच्या हातातील बाहुल्या असतात हे आपण नेहमीच ऐकतो. पण प्रारब्धाच्या दृष्टीने हतबल असलेला माणूसही स्वतंत्रपणे एखादे कार्य करू शकतो. आज आता माझ्यासमोर काय परिस्थिती यावी हे माझे प्रारब्ध ठरवते. पण या परिस्थितीला मी कसे तोंड द्यावे हे माझा पुरुषार्थ ठरवितो. प्रारब्धाचा प्रवाह थांबविणे आपल्या हातात नाही पण तो थोडा इकडे तिकडे वळविणे आपल्या हातात आहे. बुध्दि ड्रायव्हरसारखी आहे. आतून वासनेचा आणि विचारांचा प्रवाह चालू आहे. त्यातून चांगल्या वाईट वृत्ती बाहेर पडत आहेत. वाईट वृत्तीला कसे वळवायचे ते आपण ठरवू शकतो. कार चालविताना कार खड्ड्यात घालायची की आपल्या गन्तव्यापर्यंत सुखरूप न्यायची हे आपल्या हातात आहे. तसंच नातलग, आप्तेष्ट समोर युध्द करायला उभे असणं हे अर्जुनाचं प्रारब्ध पण त्यांना समोर पाहून बसकण मारून न बसता युध्दाला उभं राहणं हा त्याचा पुरुषार्थ होता. समोर उभे ठाकलेले हे काका, मामा, गुरुजन, भाऊ, पुतणे नसून ते शत्रू होते. त्यांना मारणे हा स्वधर्म होता. हे युध्द निती अनितीचे होते, धर्मयुध्द होते आणि अर्जुनाची बाजू न्याय्य होती. “म्हणून तू ऊठ आणि यश संपादन कर, समृध्द राज्याचा उपभोग घे. मी यांना आधीच मारलेले आहे हे सव्यसाचीन् तू निमित्तमात्र हो.”

सव्यसाची म्हणजे ambidextrous. डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांचा वापर सारख्याच कौशल्याने करू शकणारा. सव्य म्हणजे डावा. सव्यापसव्य हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकला आहे. त्यातलाच हा सव्य. सव्यसाचीन् हे अर्जुनाचे वैशिष्ट्य आहे. धनुर्विद्येत निपुण असलेला अर्जुन डाव्या हातानेही तितक्याच कौशल्याने धनुष्यबाण चालवू शकत असे. अर्जुन हा व्यावसायिक योध्दा होता. यापूर्वी त्याने अनेक युध्दे जिंकून दिली होती. त्यामुळे हे युध्दही त्याला अवघड नव्हते. त्याच्यासाठी हा डाव्या हाताचा मळ होता. त्याने फक्त कर्तृत्व भगवंताकडे देणे अपेक्षित होते. जेव्हा भगवंताच्या प्रेरणेने आपल्याकडून सत्कार्य घडते त्यावेळी आपण केवळ निमित्तमात्र असतो. सर्व कार्य कर्तृत्व हे भगवंताचे असते.

देह, मन, बुध्दी ही उपकरणे आहेत. मानवाला आपल्या उपकरणाची फक्त जाणीव आहे. पण स्वत:ची जाणीव नाही. म्हणून अर्जुनाने उपकरण म्हणूनच राहावे. भगवंत सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याचेच चालणार. त्याचे कार्य करण्यासाठी तो फक्त अर्जुनासारख्यांना हाताशी घेणार.

जेव्हा एखादा चित्रकार रंग, कॅनव्हास, ब्रश या साहित्यातून चित्रनिर्मिती करतो तेव्हा ते चित्र बरे आहे किंवा नाही हे ब्रश ठरवू शकेल का? ब्रश हे निव्वळ साधन आहे. चित्रकार अनेक ब्रशपैकी त्याला योग्य वाटेल तोच ब्रश हाती घेईल. त्याचप्रमाणे भगवंत हाही चित्रकार आहे. अर्जुनासारखेच आपणही या चित्रकाराचा योग्य ब्रश होणे अपेक्षित आहे. भगवंताने एखाद्याला त्याच्या कार्यासाठी घेणे हेच मोठे भाग्य आहे. कर्तृत्वाचा भाव आपल्या स्वत:कडे न घेता भगवंताकडे देऊन त्याच्याशी नेहमीच नम्र राहून त्याची इच्छा प्रमाण मानणे हेच आपले कर्तव्य. परंतु भगवंताची इच्छा कशी कळणार? आपल्या मनात काय आहे तेच आपल्याला माहित नसते. अनेकदा कर्म घडून गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्याला करायचे नेमके उलटेच होते. अशी परिस्थिती असताना भगवंताचे मनोगत कसे जाणावे?

प्राप्त परिस्थिती हे ईश्वराचे मनोगत आहे. त्याच्या मनात काय आहे हे परिस्थिती सांगते. परिस्थिती म्हणजेच प्रारब्ध!. परिस्थिती तुम्हाला सुचवित असते, परिस्थितीनुसार आतून प्रेरणा होते. या प्राप्त परिस्थितीला अर्जुनाने तोंड द्यावे अशी भगवंताची इच्छा आहे. त्याची भूमिका काय असावी हेही परिस्थितीच सांगते. भगवंताच्या इच्छेप्रमाणे जगणे म्हणजे मुरलीधराच्या ओठावरची बासरी होणे.

स्वामी चिन्मयानंद मुरली आणि मुरलीधराबद्दल सांगतात. जड़ आणि चैतन्य हे दोन एकमेकांत बेमालूम मिसळलेले आहेत. देह, मन, बुध्दी हे जड आहेत. याच्यामध्ये चैतन्य कोठले आणि जड कोठले ते सांगता येत नाही. हात हलवला तर हलवणे हे त्या चैतन्याचे प्रतिक आहे. ते चैतन्य नसेल तर हा हात निर्जीव होईल. या दोघांमध्ये सुसंगती असली पाहिजे. स्वरमेळ (harmony) असला पाहिजे. आपल्याला देहच हालतोय बोलतोय असे वाटते पण तो निपचित पडला की आपण घाबरतो. ते दिव्य चैतन्य या जडदेहाशी प्राणरूपाने एकरूप झालेले आहे. तो मुरलीधर म्हणजेच दिव्य चैतन्य मुरलीमध्ये म्हणजेच देहामध्ये प्राण फुंकतो म्हणजे तो प्राणरूपाने व्यक्त होतो आणि तोच मुरलीतून जातो. तो मुरलीतून जाताच तिच्यातून स्वरनिर्मिती होते. या स्वरनिर्मितीसाठी खरंतर दोघांचीही आवश्यकता आहे. एकटा मुरलीधर मुरलीशिवाय काहीच करू शकत नाही आणि मुरलीही मुरालीधाराशिवाय अपूर्ण आहे. पण तरीही मुरलीधर महत्त्वाचा, बासऱ्या काय अनेक मिळू शकतील. अशावेळी टागोरांचे शब्द आठवतात.

O master poet, I have sat down at thy feet.
Only let me make my life simple and straight,
like a flute of reed for thee to fill with music.

टागोर विधात्यालाच महान कवी म्हणून संबोधतात आणि म्हणतात हे महान कवनवरा, माझं आयुष्य इतकं साधं सरळ असू देत की ते एखाद्या बासरीसारखं व्हावं आणि तीतून तू गाणं होऊन प्रकटावंस. (गीतांजली गीत ७)

मानवाला जर भगवंताच्या ओठावरील बासरी व्हायचे असेल तर ज्यातून संगीत निघणार आहे ते वाद्य म्हणजेच देहमनादि या उपाधि व्यवस्थित tune केलेल्या असल्या पाहिजेत. मुरलीप्रमाणेच स्वत:ला छिद्र पाडून घेण्याची तयारी असली पाहिजे. शुध्द चैतन्य आपल्या ठिकाणी बुध्दीमध्ये चिदाभासाच्या रूपाने आहे. प्राण फुंकणारा आणि प्राण तो भगवंत स्वत:च झाला आहे. बासरी वाजवणारा भगवंत स्वत:च प्राणरूपाने बासरीतून शिरला आणि संगीताच्या रूपाने प्रगट झाला. या संगीताला जीवनगाणे म्हणूया हवं तर. हे जीवनगाणे सुखांतिका किंवा शोकान्तिका काहीही असू शकेल. सुसंगती जर नसेल तर अनेकांचे जीवनगाणे हे रडगाणे होते. Life is a comedy for those who think, a tragedy for those who feel. – Jean Racine. जो विचार करतो त्याचे जीवनगाणे सुखांतिका होते. जो स्वत:च्या मनासारखा वागतो त्याचे जीवनगाणे हे शोकांतिका होते. जर आपले जीवनगाणे आनंदाचे असावे असे वाटत असेल तर प्रथम देह, मन, बुध्दी यांना tune up करावयास पाहिजे. देह, मन, बुध्दी या तीन तारा असलेले हे तंतू वाद्य आहे. याच्या तारा विशिष्ट तर्हेने तेवढ्याच ताणाव्या लागतात. स्वामिनी विमलानंदा म्हणतात तसं Not too tight not too loose but just right. मग हे तंतुवाद्य भगवंताच्या चरणाशी अर्पण करावयाचे. असे वाद्य सहाजिकच कुठल्याही कुशल वादकाला हाती घ्यावेसे वाटेल.

ब्रश सांगणार नाही की चित्रामध्ये मला कोणता रंग हवा. रंग चित्रकार ठरवितो त्याप्रमाणे मुरली सुध्दा मुरलीधराला सांगणार नाही की आज मालकंस राग वाजव. त्याला जे वाजवावेसे वाटेल तेच तो वाजवणार. त्याला जे गावेसे वाटेल तेच तो गाणार.

याचकडे आणखी व्यापक दृष्टीकोनातून पाहता येईल. या जगात अव्याहत एक विश्वसंगीत सुरु आहे. जग हा एक वाद्यवृंदच आहे. ज्याप्रमाणे वाद्यवृंदामध्ये सगळी वाद्ये मुख्य गायकाशी मिळते जुळते घेतात. त्याप्रमाणे इथेही साऱ्यांनी भगवंताशी मिळते जुळते घ्यायला हवे. पण भगवंताच्या या विश्वसंगीतामध्ये एक माणूस सोडला तर बाकी सर्व प्राणीमात्रं आणि निसर्ग यामध्ये सुसंवाद आहे. एक माणूस फक्त हे निसर्गसंगीत बेसूर करत असतो. प्रत्येकामध्ये कोणते गुण आहेत आणि ते बघून भगवंताने ज्याला त्याला एक एक वाद्य देऊ केले आहे. त्यामध्ये आपल्या वाटेला आलेले वाद्य शोधणे. मनाचा कल शोधणे (bent of mind) आणि त्याचा योग्य विकास करणे. मग ते मन भगवंताच्या संगीताशी जोडून स्वरमेळ साधणे, सुसंवाद साधणे यातच मानवीजीवनाची इतिकर्तव्यता आहे.

स्वामी चिन्मयानंद कठपुतली बाहुल्यांचे उदाहरण देतात. वेदान्ताम्ध्ये ब्रह्मदेवाला किंवा ईश्वराला सूत्रात्मा असे म्हटले आहे. रामदासस्वामी म्हणतात, “ईश्वरे मोठे सूत्र केले | जीवमात्र गुंतुनी गेले ||” किंवा मुक्ताई म्हणते, “विश्वपट ब्रह्म दोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||”

माणूस हा परमेश्वराच्या हातातील एक बाहुले असतो हे उघड सत्य आहे. पण हे स्वीकारण्यास आपण तयार नसतो. आपल्यातील अहम्, मम या भावना आपल्यामधील सर्व शक्तिमान ईश्वरास पूर्णत्वाने कार्य करू देण्यासाठी सहजपणे बाजूला होत नाहीत. आपल्या प्रत्येक कृतीचे आपण जर बारकाईने विश्लेषण केले तर आपल्याला असे दिसून येईल की आपला प्रत्यक्ष वाटा अगदीच अत्यल्प आहे. संकल्पशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, प्राणशक्ती इत्यादी सर्व शक्ती पुरविल्या गेल्या, आपल्याला कार्य करण्यासाठी कार्यक्षेत्र निर्माण केले गेले. “हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे” मग इतके सगळे उपलब्ध असताना आपण काहीतरी नवीन निर्माण केले आहे अशी प्रौढी मिरविण्यात काय अर्थ आहे? आपण फक्त निमित्तमात्र असतो. हाच फरक संत महात्मे आणि आपण यामध्ये आहे. संतांना अनेक सिध्दी प्राप्त असतात. आपण समोर गेलो की आपल्या भूतकाळात काय घडले आणि पुढे काय घडणार आहे हे ते स्पष्ट जाणतात. प्रत्येक वेळी जरी स्पष्ट बोलाले नाहीत तरी तशा सूचना ते देतच असतात. आपण त्यांना जर श्रेय द्यायला गेलो तर ते म्हणतात की अरे मी फक्त निमित्तमात्र आहे करता करविता तो भगवंत आहे. त्याच्याशी कृतज्ञ रहा. याच कारणे भगवंताने अर्जुनाला सांगितले की, “तू ऊठ! यश संपादन कर. शत्रूंना जिंकून संपन्न राज्याचा उपभोग घे. हे पूर्वीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना तू केवळ निमित्तमात्र हो.”

“मी या कौरवांना आधीच मारलेले आहे” म्हणजे काय? कुठलेही कर्म आधी मनाच्या स्तरावर घडते नंतर कृती घडते. एखादे कर्म पुण्य कर्म आहे की पाप कर्म आहे हे त्याच्या परिणामांवरून लक्षात येते. कर्म करून झाल्यांनतर त्याविषयी मनात सामाधानाची, आनंदाची भावना असेल तर ते कर्म पुण्यकर्म होते याच्याउलट जर मनामध्ये दु:खाची, पश्चात्तापाची भावना असेल तर ते पापकर्म होते.

आपले मन ही भगवंताची विभूती आहे. ‘इंद्रियाणां मनश्चास्मि| (१०/२२) इंद्रीयामध्ये मी मन आहे असे भगवंत म्हणतात. स्मृति ही सुध्दा भगवंताची विभूती आहे. (१०.३४) त्यामुळे आपण केलेल्या कर्माची आपल्याला सतत स्मृति असते. जर ते पुण्य कर्म असेल तर स्वर्ग आहे आणि पाप कर्म असेल तर नरक आहे. त्यामुळे स्वर्ग आणि नरक हे भौगोलिक प्रदेश नसून त्या मनाच्या अवस्था आहेत. पाप कर्माच्या स्मृती मानवाला सतत नरकयातनाच देत असतात. कौरवांनी आयुष्यभर दुष्कृत्य केल्यामुळे ते सर्व मनाने खचले होते. शरीराने फक्त जिवंत होते. ज्ञानेश्वर महाराज कौरवांना कुंभाराघरची निर्जीव बाहुली म्हणतात.

येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ । आतां कोल्हेरीचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥
हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥
तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा । म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥ (ज्ञानेश्वरी ११.४६६,६७,६८)

खरोखर चैतन्याची तडफ दाखवणारे जे सैन्य ते खरे सैन्य मी केव्हाच पूर्वी गिळून टाकले आहे. आता जे वीर उरलेले दिसतात ते कुंभाराच्या घरचे निर्जीव बाहुले आहेत. अरे कळसूत्री बाहुल्यांना तोलून धरून, सुस्थितीत ठेवून त्यांच्याकडून हावभाव व नाच करवणारी दोरी तुटली, म्हणजे जसा कोणीही धक्का दिला असता, ती खांबावरची बाहुली धडाधड कोसळून उलटीपालटी पडतात. तसा या सैन्याचा सर्व मांड उलटून पाडण्याला मुळीच वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना लवकर ऊठच आणि काहीतरी शहाणपणा दाखीव.

यापूर्वी अर्जुनाने कितीतरी कठीण प्रसंगांना धीराने तोंड दिले आहे. कितीतरी युध्दे सहज जिंकली आहेत तेव्हा

आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥
आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥(ज्ञानेश्वरी ११.४७०,७१)

सांप्रतचे कार्य तर त्याहूनही सोपे झाले आहे. आता या आयत्या मेलेल्या सैन्याचा तू बाह्यात्कारी धुव्वा उडव. आणि एकट्या अर्जुनाने शत्रूला हरवून विजय मिळवला अशी कीर्ती संपादन कर. शिवाय ही कीर्ती कोरडी नाही तर हिच्याबरोबर समस्त राज्यलक्ष्मीही हाती येणार आहे. तस्मात् (म्हणून) निमित्तमात्रं भवसव्यसाचिन्|

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा... फारच सुंदर निरुपण केलय!
नुकतीच ज्ञानेश्वरी वाचुन झाल्याने हे जास्त भावलं !

अजुन येउ द्या!

अतिशय सुंदर! हल्ली असं अभ्यासपूर्ण लिखाण फार कमी वाचायला मिळतं... पुढील लेखांच्या प्रतिक्षेत!

अतिशय सुंदर! हल्ली असं अभ्यासपूर्ण लिखाण फार कमी वाचायला मिळतं... पुढील लेखांच्या प्रतिक्षेत!>>>+1