भीती – कुट्टीची गोष्ट - 5

Submitted by SharmilaR on 18 October, 2021 - 01:32

भीती – कुट्टीची गोष्ट - 5

घराचं फाटक उघडून कुट्टी आत शिरली तेव्हा अजुनही तिचे पाय थरथरत होते. रडू अगदी दाटून आलं होतं. ओठ घट्ट दाबून तिने तशीच हातातली फुलांची पिशवी खाली ठेवली. कपाटातून सुई - दोरा घेतला अन ती गणपतीसाठी हार करायला लागली.

हात भराभर चालवायला हवा होता. अजून तर गणपतीच्या मखराभोवती रांगोळी पण काढायची होती. सकाळचे साडे-सहा वाजायला आले होते. 'आत्ता शाळेत जाण्याची वेळ होईल.' ती मनात म्हणाली.

दरवर्षी गणपतीच्या दहा दिवसातलं हे कुट्टीचं ठरलेलं काम. अगदी गणपती आणायला बाबांबरोबर जाण्यापासून ते सुरु व्हायचं. आणि गणपतीची मूर्तीही तिच्याच पसंतीची यायची. कारण घरातल्या दोन्ही मोठ्या मुलांना घरातल्या गणपतीकडे बघायला अज्जीबातच वेळ नसायचा. त्यांचा गणपती म्हणजे कॉलनीतला सार्वजनिक गणपती. तिथलं काम मात्र ते दोघं मित्रांबरोबर महिनाभर आधीपासूनच सुरू करायचे. आधी सगळीकडे वर्गणी मागत फिरायचं .... मग ती समिती नेमणं ....... आणि समितीत कुणीही काहीही झालं, तरी सगळी कामं सगळ्यांनी करणं. सगळ्या मुलांनी मिळून स्वतः खपून स्टेज बनवणं .... लायटिंग.... डेकोरेशन ....रोजच्या आरत्या... प्रसाद, शिवाय रोजचे करमणुकीचे कार्यक्रम ठरवणं ......... एक ना हज्जार कामं. त्यामुळे गणपतीच्या दिवसातला त्यांचा घरचा वावर जेमतेमच. फक्त एक दिवस मात्र, दहा दिवसातल्या कुठल्यातरी एका दिवशी आईचा काही मुलांना जेवायला घालायचा नियम होता. तर त्या दिवशी मात्र दोघंही झाडून सगळ्या मित्रांसकट हजर असायचे.

एरवी घरातल्या कामांकडे कुट्टीचं लक्षच नसायचं. म्हणजे खरंतर वाचनाच्या नादात तिला ती दिसायचीच नाही. आणि कधी कधी तर दिसू नही उपयोग नव्हता. कारण कधीतरी ती उत्साहानं काहीतरी करायला जायची अन सगळ्यांच्या खडूस बोलण्याला बळी पडायची.

"अरे व्वा! आज काय कुट्टीबाई घर झाडतायत वाटत...."
"काय कुट्टीताई , आज सिंक जवळ तुम्ही?"....... म्हणजे हातात जे काय काम असेल त्यावर कॉमेंट.
"जरा जपून हो, आपले हात दुखतील. आणि कचरा राहायचा जिथल्या तिथे......"
"कामाकरता हात जरा भरभर चालवायला लागतात..... जरा ताईकडे बघा कसं काम करायचं ते...."

मग कुट्टीला अगदी राग - राग यायचा. खूप रडू पण यायचं. "म्हणजे मी करतेय जरा हळू..... पण करतेय न? माझं कुणाला कौतुकच नाही." तिला वाटायचं. मग नक्कोच करायला. अगदी मूडच जायचा काम करण्याचा. त्यापेक्षा एक कोपरा पकडून पुस्तकं वाचत बसणं कित्तीतरी चांगलं. करून देत बाकीच्यांना सगळं.

पण गणपतीच्या दिवसातली गोष्टं वेगळी होती. जी काम करण्याची ताईला अज्जिब्बात आवड नव्हती आणि आईला वेळ नसायचा, नेमकी तिच काम कुट्टीला छान जमायची. एरवी शाळेकरता रोज पहाटे उठायचा कुट्टीला कंटाळा यायचा. पण या दिवसात मात्र रोजच्यापेक्षाही तासभर लवकर उठून आंघोळ वैगेरे सगळं भराभर आटपून ती पहाटेच कुठं कुठं फुलं आणायला जायची. मग छान हार करायचा, तोही रोज वेगवेगळ्या प्रकारचा. कधी पांढऱ्याशुभ्र फुलांमध्ये हिरवीगार पानं अन मधोमध जास्वदींचं टप्पोरं फुल, तर कधी हाराला छानसं लोंबत पदक. मग मखराभोवती छान रांगोळी काढायची. ती पण रोज वेगवेगळी. रांगोळीत छान रंग भरायचे. आणि मगच शाळेला जायचं. हे सगळं करतांना तिला छान छान गाणी म्हणावीशी वाटायची. कसा अगदी वेगळाच उत्साह वाटायचा तिला. आज सकाळी बाहेर कोण भेटलं, काल गणपतीच्या कार्यक्रमात काय मज्जा झाली हे पण सांगून व्हायचं. या दिवसात घरात भरपूर कौतुकही वाट्याला यायचं.

"रोज पहाटे न कंटाळता उठते हं !"
"रांगोळी बघा कशी छान काढली......"
"हार करावा तर कुट्टीनेच......"
कुट्टीच्या अंगावर मग मूठभर मांस चढायचं. आता तर छान गोल गोल लाडू पण वळता येत होते तिला.

या वर्षी एक बरं झालं होतं. बाबांनी त्यांच्या एका मित्राला सांगून ठेवलं होतं फुलांकरता. त्यामुळे आता रोज फुलांकरता इकडे - तिकडे फिरावं लागत नव्हतं तिला. रोज त्या काकांच्या बगिच्यातलीच फुलं तोडायला जायचं. दहा मिनिटांच्या अंतरावर त्यांचं घर होतं.

आज पण कुट्टी रोजच्यासारखी पहाटे फुलं आणायला गेली होती. तिला लांबूनच दिसलं, काकू बगिच्यात फ़ुलं तोडत होत्या. रोज त्यांच्या बरोबर गप्पा मारता मारता ती फुलं तोंडायची. आज माझ्या आधी त्यांनी सुरवात केलेली दिसतेय, कुट्टीनं मनात विचार केला. त्यांच्याकडे बघतच कुट्टीने फाटकाची कडी काढली. आणि अचानक .... अचानक , काही कळायच्या आत आतल्या कुत्र्याने कुट्टीच्या अंगावर झेप घेतली. भीतीने जोरजोरात किंचाळत कुट्टी पळायला लागली. अरे - अरे......करत काकूही कुत्र्याच्या मागे धावल्या. पण त्यांनी आवरायच्या आत कुत्र्याने कुट्टीचा स्कर्ट दातात पकडला. तिला मांडीला पण दात लागल्याचं जाणवलं. भीतीने ती अक्षरशः कापत होती. आणि रडूही फुटत होतं .

काकुंकडनं आज कुट्टी यायच्या वेळी त्यांचा मोती बांधायचाच राहिला होता. त्यांनी तिला जवळ घेऊन पायरीवर बसवलं. प्यायला पाणी दिलं. तोवर घरातून कुणीतरी येऊन मोतीला आत नेऊन बांधलं. काकू कुट्टीची जखम बघायला लागल्या. किंचितसा दात लागला होता.
"अग , घाबरू नकोस. तू रोज येतेस न, म्हणून तो लाडाने तुझ्याकडे आला होता. मोती चावला नाहीय. शिवाय त्याला इंजेकशन्स दिलेली असतात. त्याचा चावा बाधत नाही." काकूंनी समजूत काढली.

कुट्टीचं रडणं कमी झालं. पण थरथर तशीच होती. तरी ती तशीच फुलं तोडायला उठली. पण काकूंनी आज त्यांनी स्वतः तोडलेली सगळी फुलं कुट्टीला देऊन टाकली.

घरी जातांना कुट्टीचे हातपाय कापत होते अन रडूही आत दाटलेलं होतं. आता घरी आई आपल्यालाच रागावणार , तिला भीती वाटली. म्हणेल,
"बावळटच आहेस. असं कसं आवाज न देता फाटक उघडलं? तिथे कुत्रा आहे हे तुला नव्हतं माहित? रोज जातेस न तिथे? कि तिथेही तुझ्या पुस्तकांच्या नादात असतेस? आणि घाबरून पळाली कशाला? तू पळाली नसती, तर मोती तुझ्या मागे नसता आला. एवढंही तुला कळत नाही?"
आई काय - काय बोलेल याचा विचार करून भीती आणखी - आणखी वाढत चालली होती. मग बाबा पण काहीतरी बोलतील. मग आई आणखी चिडेल... मला तिथे का पाठवलं म्हणून.......आता त्या चावलेल्या कुत्र्यापेक्षा आईचीच जास्त भीती वाटायला लागली. त्यापेक्षा घरी काही सांगायलाच नको. जखम स्कर्ट च्या वरती आहे. नाही सांगितलं तर कुणाला कळणार पण नाही.

घरातलं तिचं रोजचं काम करतांना कुट्टीनं ओठ अगदी घट्ट मिटून घेतले. गप्प राहून थरथरत्या हातांनी रांगोळी पण काढली. रोजच्या सारखी शिळी पोळी दुधात कुस्करली अन आज ती कशीबशी संपवली. दफ्तर खांद्यावर अडकवलं अन भरल्या डोळ्यांनी ती दाराकडे वळली.
"काय गं ? आज काय झालं? काही बोलली नाहीस? बरं वाटत नाही का ?" मागून आईचा आवाज आला तशी कुट्टी दारातच थांबली. अजूनही तोंड गच्चं बंद होतं अन श्वास कोंडल्यासारखा झाला होता.

आईनं जवळ घेतलं मात्र, इतका वेळ दाटून ठेवलेलं रडणं एकदम बाहेर पडलं. स्फुंदून - स्फुंदून रडतांना तिला काही बोलताच येईना. तोपर्यंत आंघोळ करून बाबाही तिथे आले होते. हळू - हळू सगळं घरच तिच्याभोवती गोळा झालं.
"मला......मला .... कुत्रा चावला ......." कसेबसे कुट्टीच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"क्काय?.....कुठे......अगं ...." सगळे एकदमच विचारायला लागले. आता कुट्टीचा रडण्याचा भर ओसरत आला होता. हुंदके देत - देत तिने सगळं सांगितलं. कुत्र्याचा चावा दाखवला.
"कशी बावळट मुलगी आहे. आल्यावर लगेच सांगायचं नाही का?" आईनं जवळ घेत म्हंटल.
"आता घरीच थांब. लगेच डॉक्टरकडे जायला लागेल. पाळीव असला म्हणून काय झालं? कुत्रा आहे तो..... " बाबा म्हणाले.
"काय मुलगी आहे? विचारलं नसतं तर बोलली पण नसती. वरून आपला हार-बीर पण केला. " आईनं जखम नीट पुसली.

त्यादिवशी तर कुट्टी घरीच राहिली, पण पुढचे तीन दिवस पण इंजेक्शन करता शाळेला बुट्टी मारायला मिळाली. घरच्या सगळ्यांचे पुढचे बरेच दिवस आल्या - गेल्याला कुट्टीची कुत्रा-चावा कथा ऐकवण्यात गेले.
कुट्टीच्या वाट्याला लाडच लाड आले.

***********************

Group content visibility: 
Use group defaults

कुट्टी मोठी झाली वाटतं.
तिच्या शाळेला गणपतीची सुट्टी नाही का?

(आता त्या चावलेल्या कुत्र्यापेक्षा आईचीच जास्त भीती वाटायला लागली)
हे वाचून गलबललं.

छान लिहिताय.

आता त्या चावलेल्या कुत्र्यापेक्षा आईचीच जास्त भीती वाटायला लागली)
हे वाचून गलबललं.>> +१

आवडली हीपण गोष्ट!

धन्यवाद.
तिच्या शाळेला गणपतीची सुट्टी नाही का?>> शाळेला सुट्टी फक्त गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीची. कुट्टीच्या घरी गणपती पूर्ण दहा दिवस.

छान गोष्ट!
>>आता त्या चावलेल्या कुत्र्यापेक्षा आईचीच जास्त भीती वाटायला लागली)
हे वाचून गलबललं.>> +१

कुट्टी माझी लाडकीच आहे. >>
थॅंक्स, कुट्टीला लाडकं म्हणल्याबद्दलच.
कुट्टी ही निम्न मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे. तिच्या आयुष्यात फारसं काही घडत नाही. पण ती खूप संवेदनशील मुलगी आहे . प्रत्येक गोष्टीचा अति विचार करते.

कुट्टीची हीसुद्धा गोष्ट आवडली. कुट्टी माझी लाडकीच आहे. Happy>>> हो माझी पण. तिला कुट्टी म्हणतात हे पण आवडतं. कुट्टी चं नाव बघितलं कि उडी मारून वाचली गोष्ट!