कारपोरेटातली विंग्रजी

Submitted by मित्रहो on 12 October, 2021 - 09:59

मी मूलतः गाढव आहे, चुकुन मनुष्य योनीत आलो असे वाटते. गाढवपणा फक्त रक्तात नाही तर मांसल पेशींच्या रंध्रारंध्रापर्यंत पोहचलेला आहे. असे हे गाढव आयटीत चिकटले म्हणून त्याचा तेनालीराम होत नाही. माझ्या सोबतीची मंडळी सुद्धा गाढव असावीत असा माझा समज होता. आम्हा गाढवांमधे एक सुंदर, हुषार मुलगी होती. बऱ्याच मंडळींना त्या कारणाने आमचा हेवा वाटायचा. आम्ही लिनक्सवर काम करीत होतो. ती डिस्ट्रो, रेडहॅट, डेबियन अशा माझ्यासारख्या गाढवांना न समजनाऱ्या भाषेत बोलत होती. मला ती मुलगी जादुगार वाटत होती. काहीतरी टाईप करायची दोन सेकंदात सार गायब, परत काहीतरी टाईप करायची तर धडधड सारी अक्षरे वर जात होती. हळूहळू काळ लोटला थोडी समज आली तेंव्हा लक्षात आले की त्या बिचारीचे सुद्धा लिनक्सचे ज्ञान फार नव्हते. ती ls, more, clear अशा अगदी मूलभूत कमांड देऊन सारा चमत्कार करीत होती. मूळ समस्या होती अज्ञानाने तिच्या छोट्या कमांडला चमत्कार समजणारा माझा गाढवपणा. हे सारं सांगण्याचा खटाटोप याचसाठी कि कॉरपोरेट जगतात काही पोकळ, निरुपयोगी इंग्रजी शब्द ज्याला इंग्रजी भाषेत जार्गन म्हणतात, वापरुन काही मंडळी मीच ही कंपनी चालवतो असे बोंबलत फिरत असतात आणि माझ्यासारख्या गाढवांना ते खरे वाटत असते. अशा व्यक्तींचे बोलणे म्हणजे व्याकरणाला कोंबडं समजून त्याला उभे आडवे कापून बिर्याणीसोबत शिजवून वरुन मसाला म्हणून जार्गन पेरायची. बरीच वर्षे तरखडकर या मराठी माणसानेच इग्रजी व्याकरणाचे नियम लिहिलेत असे मला वाटत होते. आता वाटते ज्याने कुणी लिहिले असेल त्याला त्याच्या व्याकरणाचे असे घिंडवडे काढलेले बघून स्वतःची ओळख दाखवायची लाज वाटली असेल.

अशा प्रकारची कॉर्पोरेट इंग्रजी बोलण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते उत्तम कपडे, जार्गन आणि अतिआत्मविश्वास. बोलता बोलता काही सुचले नाही तर Whatever हा शब्द सुद्धा अशा आत्मविश्वासाने बोलायला हवा की ऐकनाऱ्याला वाटायला हवे याला पुढचे सुचत नाही ही त्याची नाही तर ऐकनाऱ्याची चुकी आहे. समोरचा कोणत्या विषयात किती गाढव आहे हे समजून जार्गन फेकता आले पाहिजे. कॉलेजमधून पास होऊन नुकतेच नोकरीला लागलेल्या पोरांसमोर Vision, Mission, Leadership फेकायचे परंतु कंपनीच्या सीईओला मात्र हे शिकवायचे नाही. तिथे Competitive advantage, Value Add, Core Competencies असे काही फेकायचे असते. पूर्वी मुंबईत बोस्टन नावाची संगणक प्रशिक्षण देणारी संस्था होती. आय़टी कंपन्या मुल निवडायची, त्या निवडलेल्या मुलांना ती संस्था प्रशिक्षण द्यायची. तेंव्हा बांद्रयाला अंड्रयूज कॉलेजच्या सभागृहात कॉरपोरेट जगतातील मंडळी येऊन जोरदार भाषण ठोकून जायचे. कॉलेजमधे एसी सभागृह हेच माझ्यासाठी नवीन होते आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बऱ्याचदा कांपुटर लॅबचा एसी बंद आहे म्हणून कांपुटरचे प्रॅक्टीकल होत नव्हते. त्या सभागृहात एका व्यक्तीने तो कसा गरीबीतून वर येऊन आज या पदावर पोहचला वगैरे सांगितले. त्याने Leadership, Accountability, Big Picture या शब्दांचा भडीमार करुन असे काही भाषण ठोकले की तो व्यक्ती कंपनी नाही तर भारतातली अख्खी आयटी इंडस्ट्री चालवतो असा माझा समज झाला. NASSCOM वगैरे कुछ नही सबकुछ ये ही बंदा है. माझा चुलत भाऊ त्याच कंपनीत कामाला होता. मी त्याच्याशी त्या व्यक्तीविषयी भक्तीभावाने बोललो तर तो मला म्हणाला

“फालतू माणूस आहे तो. त्याला कंपनीत कोणी विचारत नाही.”

कालांतराने मी जेंव्हा कॉरपोरेट जगतात स्थिरावलो तेंव्हा लक्षात आले की कंपनीच्या मिडिया प्रतिनिधीचा कंपनीच्या निर्णयप्रक्रियेत फारसा सहभाग नसतो. त्या व्यक्तीने केलेले भाषण माझ्यासाठी कॉरपोरेट इंग्रजीची पहिली ओळख होती. नंतर लक्षात आले की कॉरपोरेट विश्वात अंतर्गत संवादाचा डोलारा हा जार्गनवर उभारलेला असतो. Performance Appraisal मधे इतर गोष्टींसोबत मॅनेजर जार्गन काउंट सुद्धा मोजत असतील. मी जॉइन झाल्यावर एक दिवस Release नावाचा विधी होता. खरतर महिन्याला सत्यनारायण घालावा तशा या Release होत असतात परंतु घरात लग्न असल्यासारखे सारे आव आणतात. माझ्या टिम लीडने मला बोलावले.

“तुझा प्रोग्राम रेडी आहे?”

“क्रॅश होत आहे सेमीकोलन किंवा #ifdef चा घोळ असेल.” मी सहज उत्तर दिले.

“Do you know today is release deadline?” त्याने आवाज चढवून विचारले. फालतू सेमीकोलनसाठी हा इतका का भडकला हे न समजल्याने मी गप्प होतो. थोड्या वेळाने त्याने त्याच्या घरच कुणी गेल्यासारखा सुतकी चेहरा करुन टेबलवर डोके ठेवले. काही वेळ भयाण शांतता होती. Deadline मुळे मनुष्याची अवस्था Dead झाल्यासारखी होते याचा मी जिवंत अनुभव घेत होतो. तेंव्हा हे Deadline प्रकरण नवीन होते आता तर कामवाली बाई सुद्धा सांगते त्या बाईसाहेबांनी नऊ वाजताची deadline दिली आहे. काही वेळानंतर टिम लीड चिरनिद्रेतून बाहेर आला आणि मला म्हणाला

“You should know today is deadline.”

मला वाटत होते Release या शब्दानंतर Deadline ची गरज नाही today is release हे पुरेसे होते पण टिम लीडच्या बोलण्यावरुन समजले Release नसली तरी चालेल पण Deadline महत्वाची आहे. तो मला मोठ्या माणसांच्या मिटिंग मधे घेऊन गेला. तिथे आणखीन टिम लीड बसले होते. माझ्या टिमलीडने Process हा केमीकल इंजिनियरींगमधला शब्द वापरुन त्या क्रॅशचे खापर एका टुकार डॉक्युमेंटवर फोडले. मी आ वासून बघत होतो असे कोणते डाक्युमेंट असते हेच मला माहित नव्हते. Process या शब्दाचा वापर करुन आपल्या चुका दुसऱ्यावर ढकलण्याचे Innovation माझ्यासाठी नवीन होते. मला वाटले हे ऐकल्यावर मॅनेजर भडकेल पण त्याने Accountability या विषयावर भाषण द्यायला सुरवात केली. Accountability चा कॉमर्समधील Account किंवा बँकेतील Account शी सबंध नाही हे मला माहित होते परंतु Process शी काय संबंध असावा हा विचार मी करीत होतो. तेवढ्यात कुणीतरी मॅनेजरच्या अवघड जागेचे दुखणे असल्यासारखे Responsibility या प्रकरणाला हात घातला. मॅनेजर भडकला आणि मग Accountability विरुद्ध Responsibility या विषयावर घमासान चर्चा सुरु झाली. Leadership, Big Picture, Holistic view, Stakeholders, Buy in, Leverage असे कितीतरी शब्दबाँब माझ्या कानावर आदळत गेले. साधारण चाळीस मिनिटे चर्चा झाल्यानंतर मॅनेजर म्हणाला

“Can we find some creative ways?”

आयटीत सुद्धा Creativity असते यांनी मी भारावून गेलो नाहीतर ज्यांना आयुष्यात वेगळं करता येत नाही अशी मंडळी आयटीत जाऊन नऊ ते पाचचा जॉब सकाळी नऊ ते रात्री दहापर्यत करतात असाच माझा समज होता. दीडतास वाया गेल्यावर मी जागेवर आलो परत एकदा कोड बघितला एका ठिकाणी सेमीकोलन द्यायचे राहून गेले होते. ती चूक दुरुस्त करताच सारे व्यवस्थित झाले. तेंव्हापासून माझी मिटिंग बाबत अशी समजूत झाली की मिटिंग म्हणजे आपल्याला कोणत्या विषयाचे ज्ञान असो वा नसो फक्त जार्गन फेकून आपल्यासोबत इतरांचा वेळ वाया घालवून स्तवःचे बौद्धिक मनोरंजन करुन घेण्याचे उत्तम साधन. मी अनावधानाने का असेना पण ज्या creative पद्धतीने विसरलेले सेमीकोलन आणि Accountability चा संबंध जोडण्याचे जे Innovation केले होते त्याबद्दल मला Employee of the month असा पुरस्कार मिळाला. इथेही सारा पोकळच कारभार होता मिळालं वगैरे काही नाही फक्त मोठ्या रंगीत फाँटमधे एचआरचे मेल आले.

अशा प्रकारे कॉरपोरेट इंग्रजी छाताडावर झेलून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी माझ्या हातून घडली. त्यावेळी बाहुबली यायचा होता परंतु भावना अमरेंद्र बाहुबलीच्या एंट्रीसारख्याच होत्या, मी अमरेंद्र बाहुबली, माझा टिम लीड शिवगामी Release च्या दिशेने जातोय आणि तो हत्ती म्हणजे कॉरपोरेट इंग्रजी. मात्र त्या बाहुबलीसारखा मी हत्तीवर विजय मिळवू शकलो नाही उलट आजही तो हत्ती मला सोंडेत धरुन पटकत असतो. मनासारखी पगारवाढ मिळाली नाही म्हणून मॅनेजरला सांगावे तर तो म्हणतो Look at the big Picture. त्याच्या ऑफिसमधे त्याच्या बायकोचे चित्र असते कसे बघनार तिकडे. किती जाड भिंगाचा चष्मा लावायचा म्हणजे big Picture माझ्या सारख्या तुच्छ प्राण्याच्या डोळ्यात मावू शकेल. काम मोठे आहे वेळ लागेल असे सांगितले तर सांगतात Focus on Low Hanging Fruit first. असे म्हटले तर मला लहानपणी दाजी पाटलाच्या वाडीतली खाली लटकलेली संत्री तोडली म्हणून अंगावर धावलेली डॉबरमॅन कुत्री आठवतात. तेंव्हापासून माझ्या मनात Low Hanging Fruit म्हणजे अंगावर धावनारी डॉबरमॅन कुत्री असे भयप्रद चित्र तयार झाले आहे. एकदा कुणीतरी कंपनीतल्या जेवण, चहा याबद्दल तक्रार करीत होतो तेव्हा एचआरने सांगितले We need to have holistic view on all Freebies. त्यानंतर कितीतरी दिवस मी हा holistic नावाचा कोण मनुष्य कंपनीत आहे ज्याचे मत प्रत्येक बाबतीत महत्वाचे असते याचा शोध घेत होतो.

Circle म्हणजे वर्तुळ त्यात मागे पुढे असे काही नसते तरी त्याला मागे ओढण्याचे काम कॉरपोरेटवाले Please Circle back म्हणून करीत असतात. आणखीन एक अति वापरातला शब्द म्हणजे Let’s take it Offline साऱ्या गोष्टी जर ऑफलाइनच करायच्या होत्या मिटिंग काय आमच्या शर्टाच्या बटन मोजायला बोलावली. Urgent असे म्हटले तर आपले मागासपण दिसेल म्हणून सर्वांना सर्व गोष्टी As of Yesterday हव्या असतात. मॅनेजर लोकांना NASA मधे जरी नेऊन बसविले तर तिथे जाऊन सुद्धा जाऊन सांगतील This is not Rocket Science. बहुतेक कॉरपोरेटमधील मंडळींचे चाकाच्या शोधाशी वाकडे असते Do not reinvent wheel. आता परत जर का कोणी चाकाचा शोध लावला ते काय चौकोनी असनार आहे. Deep dive करनाऱ्या मंडळींना अजिबात पोहता येत नाही हे सत्य आहे. फक्त Envelope का push करायचा इनलँड किंवा पोस्टकार्ड का push करायचे नाही हे कुणी सांगत नाही. कुणी I will touch base with you म्हटले की कोण कुणाच्या base ला touch करनार असा प्रश्न मला पडतो. नको त्या विधीला कागद वापरनाऱ्या इंग्रजांच्या या इंग्रजी भाषेत कुणी जेंव्हा Let’s be On Same Page म्हणतो तेंव्हा माझी कल्पनाशक्ती भटकायला लागते.

कॉरपोरेट इंग्रजीत फक्त शब्दच असतात असे नाही तर त्यात +, ++ याला सुद्धा अर्थ प्राप्त झाला आहे. हल्ली तर इमोजी सुद्धा आल्या आहेत. तुम्ही जर कुणाला इमेल करुन काही विचारले तर त्याचे उत्तर ९० टक्के वेळा + किंवा ++ हेच असते. एकदा मी माझ्या टिमलीडला प्रश्न विचारला. त्याने + असे करुन अमेरीकेतील माणसाला विचारले. बघता बघता तो प्रश्न + आणि ++ चा वापर करुन अमेरीका, फ्रांस, नेदरलॅड, परत अमेरीका मग भारत असा प्रवास करुन आला. शेवटी ज्या व्यक्तीने त्या प्रश्नाचे उत्तर दिले ती व्यक्ती माझ्या टिमलीडच्या बाजूलाच बसत होती. हा आहे +, ++ चा महिमा याने माणसे इतकी जवळ आली की आपल्या बाजूचा काय करतो हे माहित करायलाही आम्ही जगात भ्रमंती करुन येतो.

सुरवातीच्या काळात साधे मेलसुद्धा पाठवायच्या आधी मॅनेजर वाचायचा. काम करनारा एक आणि लक्ष ठेवनारे दहा असतात. त्याउलट तो जापानी व्यक्ती बेधडक मेल पाठवायचा Thank you for working hardly. माझ्या मॅनेजरला मेल एका विशिष्ट पद्धतीने लिहिलेलेच आवडत होते. जर मी लिहिले File is attached तर ते तो बदलून हमखास त्याचे Please find attach herewith असे लिहायचा. मला आजतागायत या वाक्यरचनेचा अर्थ कळाला नाही. herewith म्हणजे नक्की काय? तो इमेल म्हणजे काय अमेरीकेतल्या वॉलमॉर्टचे पार्किंग लॉट ज्यात ती फाईल शोधावी लागनार आहे. आपण जर एकेक मुद्दा मांडत लिहिले तर शेवटल्या मुद्दयाला तो हमखास लिहायचा last but not least. अरे बाबा मी मुद्दयांना नंबर दिले आहे तेंव्हा हा मुद्दा शेवटला आहे इतकी अक्कल त्या जपानी व्यक्तीला आहे. हा मुद्दा जर खरच एवढा महत्वाचा होता तर मग तो शेवटी का लिहायचा आधी का नाही.

कॉरपोरेट इंग्रजी संवादा मधला आणखीन एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे Abbreviation किंवा Short form. बऱ्याचदा याचा वापर नवीन माणसाला घाबरवून टाकण्यासाठी सुद्धा केला जातो. OOO, OOTO, ILT, LET आणि आताच्या WFH मुळे आलेले OOW या साऱ्याचा अर्थ लागता लागता घाम घाम फुटुन तुम्हालाही OOO NFW लिहायची पाळी येते. एकदा एकाने WAH असे लिहिले होते मी शहाणपणा करीत त्याला विचारले तुला WFH म्हणायचे आहे का तर तो म्हणाला मला Work at Home असे म्हणायचे आहे. त्या परदेशी गृहस्थाला त्याच्या घरी काम आहे याच्याशी माझा काय संबंध ? असे विचारले तर तो त्याचे उत्तर Just FYI असे देईल. IMO समजू शकतो पण IMHO कशाला हवे. याचे काय ते प्रामाणिक मत इतरांची काय पॉलिटिकल मत असतात का. BTW म्हणजे मूळ मुद्दयाला बगल देऊन उगाचच फाटे फोडण्याची मुजोर सूचना असते. KT म्हटले की मला कॉलेजमधली ATKT (आता तरी काढून टाक) आठवते. हे जगतमान्य शॉर्ट फॉर्म झाले परंतु प्रत्येक कंपनीत तिथले स्वतःचे वेगळे शॉर्ट फॉर्म असतात. हे सारे शॉर्ट फॅर्म जर ASAP शिकले नाही तर कॉरपोरेटमधे टिकाव लागने शक्य नाही.

हळूहळू मला या कॉरपोरेट इंग्रजी भाषेतील काही वाक्यप्रचाराचा अर्थ कळायला लागला. त्यातले Key takeaways तुम्हाला सांगतो म्हणजे Going forward तुम्ही त्याचा खरा अर्थ समजून वागू शकाल. मॅनेजरने Look at Big Picture म्हटले तर इकडे तिकडे बघायची गरज नाही तुम्ही प्रमोशन किंवा पगारवाढ किंवा जे काही मागत असाल ते मिळणार नाही असे समाजायचे. कुणी तुम्हाला अडचणीत टाकनारा प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यायचे असे Piecemeal fashion मधे विचार करुन भागनार नाही आपल्याला Holistically विचार करायला हवा. थोडक्यात काय फालतू प्रश्न विचारु नको. Back to drawing board म्हणजे पुढे फार मोठा काळ मला आता त्रास देऊ नको. असो साराच Secret sauce (याचा अर्थ यापलीकडे मला येत नाही) तुम्हाला मी सांगत बसत नाही तुम्ही तुमचा शोधा आणि अर्थ लावा. प्रत्येकाला समजलेला कॉरपोरेट इंग्रजीच्या अर्थाचा इंग्रजी भाषेषी काही संबंध नाही तर तो अर्थ तुम्हाला आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतो. कितीही नाकारले तरी कॉरपोरेट इंग्रजीमधे जार्गनचा वापर कमी होत नाही तर उलट नवीन जार्गन येतच राहतात. तुम्ही ते वापरा किंवा नको वापरा त्याच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेउन वागणे अधिक उचित ठरते.

P.S. (कॉरपोरेट म्हटले की हे आलेच)

एका पुस्तकात चर्चिलच्या भाषणाचे कॉरपोरेट वर्जन वाचले होते आता ते आठवत नाही पण मी माझ्यापरीने ते लिहायचा प्रयत्न केला.

दुसऱ्या महायुद्धात चर्चिलचे हे भाषण अत्यंत महत्वाचे होते असे मानले जाते

we shall fight in France,
we shall fight on the seas and oceans,
we shall fight with growing confidence and growing strength in the air, we shall defend our Island, whatever the cost may be,
we shall fight on the beaches,
we shall fight on the landing grounds,
we shall fight in the fields and in the streets,
we shall fight in the hills;
we shall never surrender,

याच परिस्थितीत जर कुणी कॉरपोरेटवाला असता तर त्याने कदाचित असे भाषण ठोकले असते.

I understand Germans are bombing us all around please look at the big picture. We had multiple deep dive sessions with friendly nations. We got buy ins from them. This will definitely provide us a competitive edge. We are taking holistic view of situation on the ground, soon we will initiate combating process in France. We will be fully invested in running our attack campaign with all bells and whistles. We will invest in strategic measures to fight on seas and oceans. We will invest in creating robust and integrated combating framework to fight in island, beaches, field, hills and ground. We will move towards achieving our goals.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आयटीत सुद्धा Creativity असते यांनी मी भारावून गेलो नाहीतर ज्यांना आयुष्यात वेगळं करता येत नाही अशी मंडळी आयटीत जाऊन नऊ ते पाचचा जॉब सकाळी नऊ ते रात्री दहापर्यत करतात असाच माझा समज होता.
Biggrin
इथेही सारा पोकळच कारभार होता मिळालं वगैरे काही नाही फक्त मोठ्या रंगीत फाँटमधे एचआरचे मेल आले.
Proud

धन्यवाद maitreyee ,अभि_नव, मानव पृथ्वीकर, अमितव, च्रप्स.
@अभि_नव ड्रायव्हींग लायसेंन्स आवडले.

Whatever हा शब्द सुद्धा अशा आत्मविश्वासाने बोलायला हवा की ऐकनाऱ्याला वाटायला हवे याला पुढचे सुचत नाही ही त्याची नाही तर ऐकनाऱ्याची चुकी आहे >>> Lol हा अनुभव वरचेवर येतो एकीकडून म्हणून ती डोळ्यासमोर येऊन चटकन हसायला आले..
भारी लिहिलेय.. आयटीत तर नाही पण कॉर्पोरेटमधील घरोघरी.. रिलेट झाले सारे

सुंदर लेख...
Release च्या आधी‌ debugging नाही झाले‌. कॉमा मिसला तेव्हा Happy
SDLC, Reverse engineering, Testing (Big bang, Unit वगैरे ), Sign off.

आदी थोडेफार यायला‌ हवे होते का?

धन्यवाद प्राजक्ता कागदे , सीमंतिनी, ऋन्मेऽऽष , राधिका , दत्तात्रय साळुंके, हरचंद पालव, aashu29
@ दत्तात्रय साळुंके SDLC तेंव्हा तितके माहिती नव्हते. दोन तीन अनुभव एकत्र करुन तो किस्सा लिहलाय.
माझा एक टिमलीड खरच काही क्षुललक जरी चुक झाली तरी डोक धरुन खाली मान टाकून बसायचा. अशा ध्यानमुद्रेत तो साधारणतः पाच ते दहा मिनिटे असायचा. सुरवातीला मी तिथेच उभा राहत होतो. नुसते उभे राहून कंटाळा यायला लागला. मग मी सरळ माझ्या जागेवर येऊन बसत होतो. त्याचे ध्यान संपले की तो फोन करायचा तू जागेवर का गेला. मी उत्तर देत होतो उभे राहून काय करनार होतो.

तेंव्हापासून माझ्या मनात Low Hanging Fruit म्हणजे अंगावर धावनारी डॉबरमॅन कुत्री असे भयप्रद चित्र तयार झाले आहे. >> Happy
बाकिही छान मस्त लिहिलय.

तुमच्या IT त Think out of the box, असल काही नसत वाटत. Happy

<<<<त्याचे ध्यान संपले की तो फोन करायचा तू जागेवर का गेला. मी उत्तर देत होतो उभे राहून काय करनार होतो.>>>>
Happy

मजा आली.
आमच्या ऑफिस मध्ये आले आहेत एक कॅप्टन त्यांची स्वतःची ॲब्रिव्हेशनस आहेत.( Aaop : always available on phone. )आणि सगळ्यांनाच इनिशीयल्सनेच हाका मारणार. तोपर्यंत आमच्या ऑफिस मध्ये असं वातावरण नव्हतं. समजतच नाही नक्की कोणाला बोलवताएत?

धन्यवाद अदित्य सिंग, एला, विक्रमसिंह , धनुडी
@ दत्तात्रय साळुंके आज गंमतीने लिहित असलो तरी त्या विचित्र माणसामुळे तो भयंकर टेन्शनचा काळ होता.
@विक्रमसिंह आयटीत Think out of the box घासून गुळगुळीत झाल्यामुळे असेल नवीन काहीतरी शोध सुरु आहेत तोपर्यंत Creative Ways वगैरे चालवून घ्यावे लागतात.

धन्यवाद अरुण, जिज्ञासा, साधना
@अरुण अजून तितके Agile झालो नाही. त्यामुळे Scrum , Story असे काहीतरी फक्त ऐकून आहे. हे कशाशी खातात काही कल्पना नाही

कोरपरेट विनोद हा सुद्धा प्रकार आहे.
यात सिनियर (वयाने) बॉस लोक त्यांनी नुकतेच वाचलेले विनोद हे खरेच नवीन असून आपल्या पिअर्स, ज्युनिअर्सनी ते वाचले असण्याची सुतराम शक्यता नाही असे मानुन ते वाचलेले विनोदी किस्से आपल्या सोबत खरेच घडलेय असे मिटिंग मध्ये ठोकून देतात. उदा. leave application jokes जे आपण हॉस्टेल मध्ये ऐकून हसलो असतो ते हे महाभाग दहा पंधरा वर्षांनी, दोन वर्षांपूर्वी माझ्या आधीच्या कंपनीत घडलेला किस्सा म्हणुन सांगत असतात.

कॉर्पोरेट जार्गन हा सतत अपडेट करत रहाण्याचा प्रकार आहे. पूर्वी ज्याला 'एक्स्पर्ट' म्हणायचे, ते हळू हळू 'सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट' झाले (जणू काही नुसत्या एक्स्पर्ट मुळे कळलं नसतं की ते त्या विषयातले तज्ञ आहेत) आणि आता ते 'थॉट लीडर्स' झाले आहेत.

धन्यवाद फेरफटका
उद्या त्या थॉट लीडर्स' चे काय होतील माहित नाही.

@मानव पृथ्वीकर बॉसचे जोक्स आणि कोट्सला दाद द्यावीच लागते.

Pages