रक्षाविसर्जन

Submitted by दिनेशG on 11 October, 2021 - 10:56

सप्टेंबर २०२०- गावच्या स्मशानभूमीत मी प्लास्टिक च्या टब मध्ये चितेची राख फावड्याने गोळा करत होतो. राख आणि उरलेल्या अस्थी गोळा करून समुद्रात थोड्या आतवर खांद्यावर वाहून नेऊन विसर्जित करायच्या होत्या. जन्मदात्यांना असा निरोप देणे सोपे नसते.
पहिला टब भरून खांद्यावर घेतला आणि पाण्याच्या दिशेने चालायला लागलो.

"सांभाळून चाल" पाठून चालणारा माझा चुलत चुलता म्हणाला.

माझ्या डोळ्यासमोर आठवड्याच्या बाजाराला निघालेल्या बाबांच्या सायकलच्या दांड्यावर पुढे बसलेला मी होतो. सायकल गावच्या नदीच्या पुलावरून जाताना मी हँडल चुकून जोरात हलवले. खरे तर आम्ही दोघे सायकल सहीत नदीत जायचो होतो पण बाबांनी प्रसंगावधान दाखवून पुलाच्या कडेने असलेल्या दगडांच्या दिशेने पुढचे चाक वळवून सायकल थांबविली. त्यानंतर बाबांसोबत सायकल वर बसण्याचा योग नाही आला!

चार पाच वेळा स्मशानभूमी ते समुद्र अशा फेऱ्या मारताना मनात खूप साऱ्या भावनांनी गर्दी केली होती. वाळूत चालताना पावले रुतत होती, खांद्यावरच्या भरल्या टब चे वजन आणि दुपारचे ऊन जाणवत नव्हते, पाणावलेल्या डोळ्यांना समुद्राच्या लाटा अंधुक दिसत होत्या. थोडे आत पाण्यात गेल्यावर पायाखालची वाळू खरोखरची सरकत होती. येणारी लाट परत फिरायला लागली की मी टब खाली करत होतो मग समुद्र त्या अंतिम अवशेषांना कवेत घेत होता.

अगदी लहान असताना मला जेवताना सुद्धा गोष्टी ऐकायला आवडत. गोष्ट ऐकवा मगच जेवेन हा हट्ट पूरा करताना आईच्या गोष्टी संपून गेल्या की मोर्चा बाबांकडे वळायचा. खूप दिवस पुराव्यात म्हणून रामायण, महाभारतातल्या गोष्टी ते मुद्दाम हळू हळू रंगवून आणि पुरवून सांगायचे. जायच्या आधी त्यांचे बोलणे जवळ जवळ बंद झाले होते. गेल्या सहा वर्षात बऱ्याच वेळेला त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली होती.

त्या दरम्यान शरीर दर दिवसाआड होणारे डायलिसिस सहन करत होते. दोन वर्षांपूर्वी बाथरूम मध्ये पडल्यावर एका पायाचे वरचे हाड फ्रॅक्चर झाल्यावर करायला लागलेल्या सर्जरी नंतर आता ते चालू फिरू लागले होते. पण यावेळी मात्र कानात सुरू झालेले इन्फेक्शन मेंदू पर्यंत पोहचल्याने प्रकृती खूप बिघडली. आठ दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून शिरेतून हेवी अँटिबायोटिक्स देऊन सुद्धा काही फरक पडला नाही. पुढचे आठ दिवस तीच ट्रीटमेंट घरून देण्यात आली तरी प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. या दरम्यान दिवसाआड डायलिसिस चालूच होते. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढत होते आणि बाबांना सर्वत्र असह्य वेदना होत होत्या. शेवटच्या काही दिवसात वेदनांमुळे कण्हणे आणि डोळ्यातले वाहणारे पाणी थांबले नव्हते. जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर डायबेटीस, हृदयरोग, किडनी, पाठीचे ऑपरेशन (Laminactomy), आत्ता आत्ता करावे लागले पायाचे ऑपरेशन या सारख्या असंख्य रोगांशी त्यांनी बऱ्यापैकी सामना केला होता.

समुद्रकिनारी असलेल्या स्मशानाचा वापर गावातल्या लोकांपुरता मर्यादित असल्याने अंत्यसंस्कार झाल्यावर स्मशानातील सारी रक्षा समुद्रात विसर्जित करणे ही त्या त्या कुटुंबाची जबाबदारी असते. समुद्रकिनारी राहणाऱ्या आम्हा लोकांचा समुद्र हा देवच. जन्मदात्याचे शेवटचे अवशेष मोठ्या विश्वासाने त्याच्या स्वाधीन करत , पुढल्या विधीसाठी लागणाऱ्या अस्थी घेऊन जड झालेली पाऊले घराच्या दिशेने वळली.

Group content visibility: 
Use group defaults

Prayers

_/\_

तुमच्या दु:खात सहभागी आहे. देव तुम्हाला आणी तुमच्या सर्व कुटुंबियांना यातुन सावरायची ताकद देवो. काळजी घ्या.

देव बाबांच्या आत्म्याला शांती देवो.

हे दुःख सहन करण्याची परमेश्वर आपणास शक्ती देवो.

_/\_