विविध धर्मात आढळणारी मुलांची एकसारखी नावे

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 October, 2021 - 17:55

आज शाहरूखच्या मुलाचा आर्यनचा व्हॉटस्सप ग्रूपवर विषय निघाला. ग्रूपवर एक आर्यन नावाचा मुलगाही आहे. अर्थात तो मराठी मुलगा आहे. त्याला शाहरूख बिलकुल आवडत नाही. किंबहुना जिथे त्याला शाहरूखवर टिका करायची संधी मिळते, ती तो सोडत नाही. आणि दरवेळी मी त्याला चिडवतो, लाज नाही वाटत, बाबांना असे बोलतोस Wink

तर सांगायची गंमत अशी की गौरी आणि शाहरूख या हिंदू-मुस्लिम दांपत्याने आपल्या मुलाचे नाव असे ठेवले आहे की ते कुठल्या धर्माचे म्हणावे चटकन कळत नाही. किंबहुना मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्याच जास्त जवळचे वाटते.

सलील! अस्सेच एक नाव. एक शालेय मित्र. अर्थात आमची शाळा राजा शिवाजी विद्यालय, मराठी माध्यम असल्याने तो मराठीच हे आम्हाला माहीत होते. तसेच सलीलचा अर्थ पाणी हे सुद्धा त्याच शाळेत शिकलो होतो. तरीही बाहेरचे लोकं जेव्हा त्याचे नाव ऐकायचे तेव्हा त्यांना तो मुस्लिमच वाटायचा. बहुधा सलीम, साहील, या साधारण तश्याच मुस्लिम नावांमुळे असेल. की सलील नावही असते मुस्लिमांत??

समीर! या नावाचे माझे लहानपणी चाळीत, शाळेत, क्लास वगैरे मध्ये मिळून टोटल पाच सहा मित्र होते. सारेच मराठी होते. पुढे दहावीला डोंगरावर अभ्यास करायला जायला लागलो तेव्हा समीर शेख नावाचा सातवा मित्र मिळाला. जो मुसलमान होता. तेव्हा मला पहिल्यांदा समजले की हे नाव मुसलमानांमध्येही असते आणि ते देखील बरेपैकी कॉमन असते. सलमानच्या एका चित्रपटात समजले की समीर म्हणजे हवां का झोंका. पण तो अर्थ नेमका कुठल्या भाषेत ते अजूनही माहीत नाही.

ईशा! नात्यातल्या एका भावाने मुलीचे नाव ईशा ठेवले. जवळपास पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात एकच गोंधळ. हे कुठले नाव? हे नाव आपल्यात नसते, हे तर मुस्लिमांत असते, वगैरे वगैरे. खरे खोटे अल्लाह जाणे. पण भावाने आणि वहिनींनी सांगितले की पार्वतीचे एक नाव आहे. खरे खोटे राम जाने. पुढे जाऊन समजले की धर्मेंद्र यांचीही एक ईशा देओल नावाची मुलगी आहे आणि घरातले वातावरण निवळले. पण त्याही पुढे जाऊन कोणीतरी सांगितले की धर्मेंद्र यांनीही दुसरे लग्न करायला ईस्लाम धर्म स्विकारलेला आणि वातावरण पुन्हा गोंधळले Happy

असो, तर अभिषेक नाईक! ऐकल्यासारखे वाटतेय नाव Happy ऋन्मेष या आयडीमागचे खरे नाव. ऑर्कुटवरची माझी सेक्युलर विचारसरणी आणि अमन की आशा ईमेजमुळे मला गंमतीने अबू शेख म्हटले जायचे. पण एकदा माझ्या अभिषेक नाईक या नावाला एक मुस्लिम महाविद्यालयच फसले होते.

तर गंमत अशी झाली होती, वीजेटीआयला डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेण्याआधी मी जवळचेच म्हणून आमच्या भायखळा येथील साबूसिद्धीकी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला गेलो होतो. तिथे मला मॅकेनिकलला अ‍ॅडमिशन हवे होते. जे माझे दहावीचे मार्क्स पाहता मिळायची शक्यता कमीच होती. कारण त्या कॉलेजला मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ७० ते ८० टक्के आरक्षण होते. पण तरीही ते तेथील कर्मचार्‍यांच्या चुकीने मला जवळपास मिळालेच होते. कारण माझ्या अभिषेक नावातील 'षेक' ला 'शेख' समजून आणि 'नाईक' हे आडनावही मुस्लिमांतही असल्याने माझा फॉर्म चुकून त्या आरक्षणाच्या टोपलीत गेला होता. अ‍ॅडमिशनही त्या लिस्टमधील मेरीटनुसार पक्के झालेले. फी भरणारच होतो. ते माझ्याच लक्षात आले की अरे आपल्याला मुस्लिम कोट्यात टाकत आहेत. पुढे काही गडबड होऊ नये या हिशोबाने मी ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून दिली. आणि माझे अ‍ॅडमिशन होता होता राहिले.
नंतर तिथले ऑफिस कर्मचारी येऊन माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही काही बोलला नसता आणि एकदा पैसे भरले असते तर तुमचे अ‍ॅडमिशन झाल्यातच जमा होते. पुन्हा फिरून आम्ही वा कोणी रद्द केले नसते. पण नशीबात ते नव्हतेच म्हणा. वा त्यापेक्षाही चांगले होते म्हणूया.. Happy

असो, तर मला स्वतःलाही मुलाच्या वेळी असेच एखादे नाव ठेवायचे होते. जे हिंदूतही असावे आणि मुसलमानांमध्येही वा शीखांमध्येही. त्या नावावरून त्याचा धर्म चटकन कळू नये. एक नाव जवळपास फायनलही केले होते. कबीर ! ज्यावरून संत कबीरही आठवावेत आणि चक दे चा रुबाबदार शाहरूख, कबीर खानही डोळ्यासमोर यावा. पण नावांची चर्चा करताना बायकोच एकदा बेसावधपणे म्हणाली, की मला ते ऋन्मेष नावही छान वाटते. आणि मग मलाही तो मोह आवरला नाही.

अर्थात मुलीचे नाव ठेवताना यातले काहीही डोक्यात नव्हते. किंबहुना बारश्याचा दिवस, बारश्याची संध्याकाळ उजाडली आणि घरी जमलेल्या बायका पाळणा हलवायचा विधी करू लागल्या तरी नावाबाबत माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते. अखेर माझे वडीलच म्हणाले, की मुलगी परीसारखी दिसतेय तर तुर्तास परी नाव ठेवा. पुढे सावकाश विचार करून ठरवा आणि जे छानसे सुचेल ते रजिस्टर करून घ्या. परी आपले घरचे नाव राहील. पण त्यानंतर कसले काय. परी हे नाव बोलायला ईतके सुटसुटीत आणि गोड वाटू लागले, आणि त्या नावाशीच भावनिक नाते जोडले गेले, की उगाच कागदोपत्री दुसरे नाव ठेवायची गरजच काय असा विचार केला आणि तेच फायनल झाले.

पुढे जेव्हा मी तिला गार्डनमध्ये नेऊ लागलो तेव्हा परी हाक मारताच किमान चार मुली मागे वळून बघायच्या. कारण बहुतेक मुलींचे हे घरचे नाव असावे. पण आमच्या नाक्यावरच्या सुपरमार्केटमधील मुस्लिम दुकानदाराच्या याच वयाच्या भाचीचे खरेखुर्रे नाव होते. हे असे काही समजले की माझी बायको चिडायची, बघ किती कॉमन नाव ठेवलेस. हे तर मुस्लिमांमध्येही निघाले. पण फायदा हा व्हायचा की त्या मुस्लिम मामाकडून या भाचीलाही वरचेवर फ्री चॉकलेट मिळायचे Happy

तर तुमच्या माहीतीत अशी काही सर्वधर्मीय नावे असतील आणि त्यातून घडणारे काही किस्से असतीत तर जरूर शेअर करा. त्यातले एखादे नाव आवडलेच तर तिसर्‍या अपत्याच्या वेळी त्याचा विचार करू शकतोच Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमन वर्माला पहील्यांदा हम लोग मधे बघितलं होतं, अभिनव चतुर्वेदी आणि कामिया मलहोत्राच्या मधे येतो म्हणून जाम राग आलेला त्याचा, हाहाहा.

मी माझं वय ऑलरेडी लिहीलंय माबो वर मागे, हाहाहा.

मी शाळेत नववी, दहावीत असताना सुरु झालेलं हमलोग असं पुसटसं आठवतंय.

आमच्या घरी आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये सलिल, साहिल, निहाल आणि ईशा आहेत. मित्र मंडळी मध्ये मुस्लिम घरात एक सारंग आहे आणि ख्रिश्चन घरात सिद्धांत की सिद्धार्थ आहे.

नाव ठेवताना नाव आवडलं हा एकच क्रायटेरिया आम्ही बघितला. आमच्या लेकाचे नाव आयाम आहे आणि आडनाव नवऱ्याच्या गावावरून देपुरी लावलं. आयाम देपूरी ऐकलं की लोक आता विचारतात मुस्लिम नाव का म्हणून. काही जण म्हणतात हे अगदी शायर सारखं नाव आहे. पुतणी चे नाव मेहेर देपुरी आणि तिच्या भावाचे माहिर. त्यांना तर बरेच जण म्हणतात मुस्लिम नाव आहे म्हणून.

रोचक विषय आहे. दोन्हीमध्ये आढळणारी नावं जशी आहेत, तशी दोन्हीमध्ये न आढळणारी नावं पण ती ह्या दोनपैकी एकात असू शकतील अशी वाटतात, ती खालीलप्रमाणे:

गेंगिझ/चंगेझ खान - हा हिंदू किंवा मुस्लिम नव्हता. खान वरून अनेकांना तो मुस्लिम वाटतो.

कनिष्क - हा कुशाण राजा हिंदू किंवा मुस्लिम नव्हता, पण अनेकांना हिंदू वाटतो. (तशी हिंदू आणि बौद्ध धर्मियांत अनेक सामायिक नावे आहेत म्हणा! खुद्द सिद्धार्थ गौतमच आहे)

नावं भाषेत असतात ना? धर्मात नावं नसतात (अगदी देवांची/ धार्मिक नावं सोडली तर)
आता समीर मराठी/ हिंदी/गुजराथी/ उर्दुत/ अरेबिक भाषांत आहे म्हणून त्या भाषा बोलणारे लोकं ते नाव ठेवतात. त्यांचा धर्म आहे म्हणून नाही.
आता अमित हे नाव भारतीय वाटतं. पण मला कित्येकांनी तू इस्रायलचा आहेस का विचारले आहे, कारण ते हिब्रू मध्येही आहे. त्याचा अर्थ मित्र असा आहे. ते कुठल्यातरी बायबल वर्जन मध्येही आहे (म्हणे) आणि तिकडे मुलीचे नाव म्हणूनही वापरतात.

उदय

अनिता हे मुलीचे नाव मी भारतीय उपखंड, युरोप (बेल्जिम, नेदरलँड, हंगेरी), युनायटेड स्टेट्स (मिडवेस्ट) आणि कॅनडा (कॅनेडियन बडिल, एशियन आई) अश्या विविध देशात पाहिले आहे. अजून कुठले नाव इतक्या वेगवेगळ्या देशात ऐकले नाही.

>>
नावं भाषेत असतात ना? धर्मात नावं नसतात (अगदी देवांची/ धार्मिक नावं सोडली तर)
>>
नावं भाषातून येत असली तरी नाव ठेवताना ते त्या समाजात (पक्षी धर्मात प्रामुख्याने) वापरले जात असेल तर नवीन जन्माला आलेल्या मुलांना देण्याचे प्रमाण जास्त दिसते.
भारतात जॉर्ज, रिचर्ड, जॉन, नथानिअल, एलिझाबेथ अशी नावे असतात की ख्रिश्चनांच्यात. त्यांची मातृभाषा इंग्रजी असेल असे काही नाही. मी या नावाचा प्रत्येकी एक मनुष्य ओळखतो मिरजेत मिशन हॉस्पिटलमध्ये काम करणारा.

भारतात नावांचे जात्याधारीत वर्गीकरण सुद्धा होईल. उदा सिद्धार्थ आणि गौतम मी नावे महाराष्ट्रात गेल्या ३०-४० वर्षात प्रामुख्याने नवबौद्ध समाजात दिसतील तर सवर्णांच्या त्यांचा वापर कमी झालेला दिसेल.

भारतात नावांचे जात्याधारीत वर्गीकरण सुद्धा होईल. उदा सिद्धार्थ आणि गौतम मी नावे महाराष्ट्रात गेल्या ३०-४० वर्षात प्रामुख्याने नवबौद्ध समाजात दिसतील तर सवर्णांच्या त्यांचा वापर कमी झालेला दिसेल.
>>>>

आपल्याकडे महापुरुष ज्या समाजात जन्म घेतात त्या त्या समाजाने त्यांच्यावर पहिला हक्क सांगायची पद्धत आहे. यात काही गैर नाही. पण त्यामुळे ज्या समाजाला त्या महापुरुषाबद्दल विशेष आपुलकी आहे ते कौतुकाने त्या महापुरुषांचे नाव जुने असूनही आपल्या मुलांना ठेवतात. पण याचा अर्थ ईतर समाजातील लोकांना त्या महापुरुषाबद्दल आदर नाही असे नाही. फक्त ते मुद्दाम एखादे जुने नाव ठेवत नाहीत ईतकेच.

आपल्याकडे महापुरुष ज्या समाजात जन्म घेतात त्या त्या समाजाने त्यांच्यावर पहिला हक्क सांगायची पद्धत आहे. >>> इतरांनीही हक्क सांगितला तर बिघडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्विवाद सर्वांचे दैवत आहे. सावित्रीबाई फुलेंवर सर्वांनी हक्क सांगावा. कोण अडवेल असे वाटते का ?

इतरांनीही हक्क सांगितला तर बिघडत नाही. >>>> सांगितला तरी बिघडत नाही, न सांगितला तरी बिघडत नाही. यात वादाचे असे काही नाही. काही गोष्टी स्वाभाविकपणे घडतात. वेळ दिलात तर स्वतंत्र धागा काढू शकतो. ईथे हे मूळ विषयाला धरून नसल्याने जास्त सविस्तर लिहिले नाही. त्यामुळे उगाच लिहिलेल्या चार शब्दातून कोणी चौदा अर्थ काढायला नको Happy

अनिता हे मुलीचे नाव मी भारतीय उपखंड, युरोप (बेल्जिम, नेदरलँड, हंगेरी), युनायटेड स्टेट्स (मिडवेस्ट) आणि कॅनडा (कॅनेडियन बडिल, एशियन आई) अश्या विविध देशात पाहिले आहे. अजून कुठले नाव इतक्या वेगवेगळ्या देशात ऐकले नाही.
>>>>>>>>>

आमच्याकडे आहेत दोन अनिता एकाच डिपार्टमेंटमध्ये, आणि एकच जॉब प्रोफाईल असलेल्या. फक्त एक आपली मराठी मुलगी आहे जी आमच्या ऑफिसला बसते. तर एक फिनिश मुलगी आहे जी फिनलँडला बसते. त्यामुळे नेहमी मोठ्ठा गोंधळ उडतो Happy

जॉर्ज, रिचर्ड, जॉन, नथानिअल, एलिझाबेथ >> ही बिबलिकल/ ख्रिश्चन संतांची नावं आहेत. ती नॉन ख्रिश्चन मुद्दाम नाही ठेवणार. पण रायन, रायली, कीअन, बेला, काएल ही इंग्रजी साऊंडिंग नावं कॅनडात हिंदू मुलांची बरेचदा ऐकली आहेत.
अर्थात धर्माचा/ जातीचा मुद्दा मान्य आहेच.

कियारा, करीया ही नावे आठ दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे लोकप्रिय होती. गरिमा, करीमा ही नावे साधारण सारखी वाटतात. तसेच सुजा, शुजा ह्या नावांचे.

अनिता हे मुलीचे नाव मी भारतीय उपखंड, युरोप (बेल्जिम, नेदरलँड, हंगेरी), युनायटेड स्टेट्स (मिडवेस्ट) आणि कॅनडा (कॅनेडियन बडिल, एशियन आई) अश्या विविध देशात पाहिले आहे. अजून कुठले नाव इतक्या वेगवेगळ्या देशात ऐकले नाही. >>

मोनिका

वनिता हे आपल्याकडे आणि स्पॅनिश स्पीकींग देशात असतं.
ते Juanita असं स्पेल करतात.
तसंच मुळचं रशियन अनुष्का आपण आता चांगलच आपलंसं केलेय.
हीना व चांदनी चित्रपट आल्यावर ही नावं पण भारतात सर्वधर्मीय लोकात बोकाळली होती.

हीरा.

नाही संस्कृतमध्ये वनिता म्हणजे स्त्री. दुसय्रा नावाचा उद्गम माहित नाही.

आजकाल साहिर पण जोर धरतंय. बहुतेक धुम२ पासून.

फाळणीपूर्व काळात पंजाबी लोकांमध्ये हिंदू, शिख व मुस्लिम लोकांमध्ये इक्बाल, फकिर ही नावं फेमस होती.

स्पेलिंगवरून स्पॅनिश उच्चार 'हुआनीता' असा वाटतोय, वनिता नाही. Janet ह्या इंग्रजी नावाची ती स्पॅनिश आवृत्ती असावी. कुठलं नाव मूळ आहे, माहीत नाही.

सानिया हे नाव पण हिंदू, मुस्लिम दोघांत ऐकले आहे.
शिवाय सान्या हे नाव ख्रिश्चन लोकांत मुलीचे आणि मराठी लोकांत मुलाचे (साने आडनाव असलेल्या माणसाला सान्या म्हणून हाक मारतात असे) पाहिले आहे.

स्पेलिंगवरून स्पॅनिश उच्चार 'हुआनीता' असा वाटतोय, वनिता नाही
>>>
माझ्या एका गोवन ख्रिश्चन मैत्रिणीचं होतं. बर्याच जणांना काय उच्चार करावा समजायचे नाही. तेव्हा तिनेच सांगितलेलं वनिता उच्चार आहे. गुगलून बघितलं आत्ता तर तर तोच आहे उच्चार.

Pages