ग्रेस

Submitted by Priyadarshi Dravid on 7 October, 2021 - 02:30

Attached for your reading pleasure is an article from my Marathi eBook

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=280721062030&P...
ग्रेस

मुळात ग्रेस म्हणजे एक मोठे गारुड आहे. एखाद्या आरसे महालात गेल्यावर एकाच व्यक्तीच्या प्रतिमा वेगवेगळ्या कोनांतून दिसाव्यात की प्रत्येक प्रतिमेचा भिन्न भिन्न भास व्हावा, आपल्याच मनाला भुरळ पडावी की खरी प्रतिमा सुंदर की ती व्यक्ती? असेच काहीसे घडते पुष्कळदा. आठवणींना अंत नाही हेच खरे.

"मोस्ट ऑफ द टाइम्स आय एम फ्री बट नॉट आल्वेस अव्हेलेबल" ह्या त्यांच्या वाक्यावरून कुतूहल चाळवले गेले आणि एक सोळा वर्षांचा मुलगा त्या महान व्यक्तिमत्वाच्या गारुडात कायमचा मंत्रामुग्ध झाला, ती थोर व्यक्ती कवी ग्रेस आणि तो मुलगा मीच होतो की!
माझे वडील नारायण शास्त्री द्रविड १९५२ च्या सुमारास नागपूरला येऊन स्थायिक झाले आणि आम्ही हनुमान नगर मध्ये राहू लागलो. माझे वडील तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक. आमच्या शेजारी हिस्लॉप कॉलेजात मराठी शिकवणारे डॉ. वसंतराव वराडपांडे राहत. वसंतराव काकांच्या घरी पुष्कळ मराठी पुस्तके होती आणि आमच्या घरी पुस्तकांचे आगरच होते, खेरीज वेगवेगळी मराठी आणि हिंदी मासिके पण येत. पण सत्यकथा मासिक मला आवडायचे आणि त्याकाळी घरी कोणी सत्यकथा वाचत नसत. मी वाचनाच्या बाबतीत फार अधाशी होतो आणि काकांकडून मिळेल ते अंक वाचले आणि कथा आणि कवितांच्या गूढतेने मला वेधून टाकले. मी वाचनाच्या बाबतीत अत्यंत अधाशी होतो आणि जेवताना सुद्धा पुस्तक वाचायची सवय आम्हा सर्वांना होती.

आमच्या घरापासून चार पाच घरे ओलांडून कवी ग्रेस म्हणजे माणिक गोडघाटे राहत. ते मॉरिस कॉलेजमध्ये मराठी शिकवत. सत्यकथेत त्यांच्या कविता वाचल्याने त्यांच्याबद्दल किशोरवयात त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला आणि त्याच्या अलिप्त वागण्यामुळे कुतूहलही वाटायचे. त्यावेळी ते माणिक गोडघाटे नावाने प्रचलित होते. ग्रेस, मर्ढेकर याना दुर्बोधतेचे प्रतीक म्हटले गेले होते. मला मात्र ग्रेस यांचे प्रोज आणि कविता हिऱ्यासारखे चमकदार वाटत. कारण दरवेळी तीच कविता वाचली तरी प्रत्येक वेळी एक नवा अर्थ मनात साकार होई. माझा मित्र ग्रेस च्या घरासमोर राहत असल्याने त्यांची आणि माझी ओळख झाली आणि ती एक एखादी अद्भुत अनुभूती लाभली असे वाटले.

त्या काळात ग्रेस थोडे जास्त “अगेंस्ट द ग्रेन“ पण “लार्जर दॅन लाईफ “ म्हटल्याप्रमाणे व्यक्ती होते. काहींना ते विक्षिप्त वाटत. आणि तसे वाटणे साहजिकच होते. ते माझ्याशी हिंदी, इंग्रजीत बोलत असत. मी इंग्रजी माध्यमात शिकत होतो म्हणून मला इंग्रजीत बोलणे फार आवडायचे. आणि बोलता बोलता ग्रेस वेगवेगळे नवे शब्द वापरत. उदा मेलोंकोली सबलाईम, सटल, ओबटूस, इत्यादी . मग मी माझ्या वडिलांना अर्थ विचारत असे. ते पडले तत्त्वज्ञानी. ते म्हणाले,”मेलोंकोली" हे मेंटल डिप्रेशनच्या संदर्भात वापरतात. ग्रीक भाषेत, ”मेलाईना कोल किंवा ब्लॅक म्हणजे काळे पित्त. या शब्दापासून मेलोंकोली या शब्दाची उत्पत्ती झाली आहे.“ मग एके दिवशी मेलोंकोली च्या संदर्भात ग्रेस यांच्याशी बोललो. ग्रेस म्हणाले ते फारच गुंतागुंतीचे होते. ते म्हणाले: “एक सौंदर्याची भावना म्हणून उदासीनतेला महत्त्व देणे फार जरुरीचे आहे. कलाकृतींबद्दलच्या आमच्या भावना अस्वस्थता द्वारे व्यक्त होतात फार आणि महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातून सौंदर्यात्मक प्रतिक्रियेतही सामील असते.” त्यांच्या मताप्रमाणे कवी कविता लिहितो याचे कारण त्याला मनात काहीतरी, दुःख किंवा सुख आणि त्याच्यामधले सर्वकाही, या बद्धल एक विचित्र इंट्रोस्पेक्टिव हुरहुर. कुजबुज सदा सुरु असते आणि कवी ती तो मोजक्या शब्दात मांडतो.

ग्रेस माझ्याहून पंधरा वर्षांनी मोठे होते. पण मला तसे कधीच वाटले नाहीत, कारण त्यांनी मला एक मित्र किंबहुना बरोबरीनेच वागविले. जी ए कुलकर्णी त्यांचे जुने मित्र आणि समीक्षक होते, हे मला त्यांनी जेव्हा मला जीएंचे हिरवे रावे, रक्तचंदन वाचण्यास दिले, त्यावर ग्रेसना भेट दिल्याच्या उल्लेखावरून कळले. सत्यकथेतून त्यांच्या आलेल्या कवितांचा अर्थ मला जसा भावला तसा अभिप्राय मी त्यांना वेळोवेळी देत होतो. ग्रेस एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असत. विशेषतः थोडी घेतल्यानंतरच ते फक्त बोलत. मी माझ्या दोन तीन मित्रांबरोबर, ’निडोस‘ हॉटेल मध्ये शुक्रवारी किंवा शनिवारी मध्ये मध्ये भेटत असू. नागपुरी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसांत थंड बियर सोबत अघळपघळ शब्दांत कवितांचा आणि कथाकारांचा टोचत किंवा प्रेमळ वाद घालायचो. त्यात ह.ना.आपटे, अत्रे, गडकरी आणि मर्ढेकरही येत असत. एकदा जीएं बद्दल ग्रेस म्हणाले, ”अरे यार, हर एक कलाकार का एक अपना तरिका, नजराना या अंदाज होता है । तो उसे उसने जैसे पेश किया है, वो तसबीर देखो, पेश की गयी दास्तान सुनो और समझो, सिर्फ लब्ज नही!“ ग्रेस यांनी सांगितलेले "ताउम्र ग़ालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और मैं आइना साफ़ करता रहा," हे मला नेहमी लक्षात राहिले.

जीएंबद्दल ते म्हणाले,” सध्या मराठीत शॉर्ट स्टोरी लिहिणाऱ्या लेखकांच्या जी ए एकच एकमेव जिवंत लेखक आहेत. ते काही अचूक शब्दांत माणसाचे मन ग्रस्त, अस्वस्थ करून टाकतात. आणि वाचणारा एका क्षणांत एक वेगळ्या जगात प्रवेश करतो.“
त्यांच्यापेक्षा मी वयाने, ज्ञानाने, अनुभवाने आणि वैचारिक प्रगल्भतेनेही फार लहान होतो. पण ते मला नेहमीच, ’आप‘ म्हणून संबोधत असत आणि म्हणत, ”कैसे हो आप?“ या वाक्याने आमच्यात बोलण्याची सुरुवात होई. मग मी सुद्धा, ”क्या हाल है जनाब?“ म्हणत असे. त्यांच्या सहवासाने मी पण दोन चार कथा लिहिल्या आणि त्या ‘नागपूर तरुण भारत‘ मध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या.

नावाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गूढ लक्षात येत होते. बहुतेक म्हणूनच त्यांच्याशी बोलायलाही घाबरत किंवा टाळत असावेत, आणि तेही स्वतःच्या तंद्रीत कायम कवितेच्या विचारात असायचे . फक्त ओळखीचे हास्य करायचे.

एकदा बोलत बोलत त्यांनी मला ग्रेस नावाचे गुपित सांगितले, माझ्या त्यावेळच्या वयाला वाटले होते की ग्रेस त्यांच्या मुलीचे, पत्नीचे व कदाचित मैत्रिणीचे असावे, मी असे त्यांना सांगताच ते खो खो करून हसले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की, “इनग्रीड बर्गमन ह्या हॉलिवूडच्या अभिनेत्रीचा ‘ इन ऑफ द सिक्सथ हॅपिनेस ‘ ह्या चित्रपटात तिच्या बद्दल ‘ शी इज इन ग्रेस ‘ हे वाक्य होते, त्यावरून मला ग्रेस हा शब्दाची जणू मोहिनीच पडली अन मी कवी म्हणून तेच नाव घेतले कायमस्वरूपी. तुला काय वाटले माझ्या या नावावरून पुण्या मुंबईचे लोक कायकाय म्हणत असावेत? काही म्हणतात गोडघाटे ख्रिश्चन झाले असावे. पण मला काय त्याचे?“ असा त्यांचा निडर स्वभावही कळलं नि ‘ग्रेस‘ या नावाचे रहस्य पण. ग्रेस या केवळ नावानेच माझ्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि मला प्रतिभेचा साक्षात्कार झाला“ असे ग्रेस म्हणाले होते.
मला अगदी जवळच्या मित्राप्रमाणे ते वागवत असत. मला वाटते की मी सत्यकथेचे अंक त्यांचे कडून आणि प्रा. डॉ.वसंतराव वराडपांडे यांचेकडून आणून वाचत असे, म्हणूनही कदाचित ते मला मित्र समजत असावेत. आणि दुसरे म्हणजे मी ज्या किशोर वयांत होतो, त्यात ते मला पाहत असावेत, माझी कुतुहलता, चौकसपणा, माझी पौगंडावस्था त्यांना त्यांच्या आयुष्याशी मिळती जुळती वाटली असावी. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील बालपणीच्या कित्येक गोष्टी मला सांगितल्या होत्या आणि त्या उमेदीच्या काळात त्यांनी किती दुःख सहन करावे लागले हे सुद्धा सांगितले होते.
आई गेल्याचे दुःख ग्रेसनी जसे प्रगट केले आहे ते शब्द अंतःकरणात बाणां सारखे शिरतात आणि अर्थ जागृत करतात.

"ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता."
एक मात्र खरे की अशा वयातल्या काही गोष्टी मी फक्त त्यांच्यापाशी मनमोकळेपणाने कित्येकदा बोललो होतो. एकदा आम्ही दोघे मॅटीनी शो ‘गॉन विथ द विंड साठी चक्क कॉलेजला दांडी मारून गेलो होतो. आता ह्यातील थ्रिल तर सर्वानीच कधीतरी तारुण्यात अनुभवले असेल. दुर्बोध, अगम्य असे त्यांच्या कवितेतील शब्द असले तरी तुमच्या डोळ्यांभोवती, मनाभोवती झिम्मा खेळत राहतील. मला आवडणारी ग्रेस कविता गाणे "भय इथले संपत नाही"

"भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
भय इथले संपत नाही, ते झरे चंद्र सजणांचे,
ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते तो बोल मंद, हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
भय इथले संपत नाही स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दुःख कुणाचे?
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही"
"भय इथले संपत नाही" कविता वाचून झपाटल्यासारखे वाटत राहते आणि शब्दांचे कंगोरे एखाद्या लोलकाच्या सप्तरंगात आपल्याला फिरवून आणतात.
१९७७ साली पुणे विद्यापीठात रिसर्च स्कॉलर म्हणून मी प्रवेश घेतला. नागपूर सोडण्यापूर्वी दोन दिवस आधी मी ग्रेसना मुद्दामहून भेटलो. अर्थात ‘निडोस ‘ मध्ये. ‘स्कॉच ऑन द रॉक्स‘ आले. नेहमी प्रमाणे टेस्ट न घेता ग्रेसने ‘बॉटम अप‘ चा संदेश दिला. आणि मला एक थैली दिली. त्यांत त्यांची, ‘राजपुत्र आणि डार्लिंग' आणि नुकतेच प्रेसमधून आलेले ‘चंद्रमाधवीचे प्रदेश‘ हे दोन काव्य संग्रह होते.
हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हा चांदणी रात्र बहरात आली होती. स्कूटरवर बसून सिगारेटचा एक झुरका घेत माझ्या, ”आर यु ओके सर टू गो?“ ह्या प्रश्नाला ते महणाले, ”आय वाझ ओके ऑल द टाईम, इट्स यु थिंक आय एम नॉट ओके.“ यावर आम्ही दोघे खळाळून हसलो. आणि मग त्यांनी मला एक कडकडून घट्ट मिठी मारली आणि आम्ही निरोप घेतला. तो शेवटचाच निरोप होता. मग मी परदेशांत आल्यावर आमचा संपर्क तुटला. पण त्यांनी दिलेली पुस्तके आणि त्यांच्या आठवणी घेऊन जगभर हिंडलो नोकरीनिमित्त ! त्यांच्या कविता पुन्हापुन्हा वाचल्या आणि ते जुने दिवस अन तो आनंद पुन्हापुन्हा कितीदा अनुभवत होतो.

गायिका लता मंगेशकर यांनी त्यांचे वर्णन 'फादर फिगर' आणि मंगेशकर कुटुंबातील मित्र म्हणून केले. “मी भाग्यवान आहे की, त्यांनी लिहिलेलं भय इथले संपत नाही हे गाणे मी गायले आहे. तरीही, त्याने कोणत्याही भीतीशिवाय कर्करोगाचा सामना केला, परंतु आज तो आपल्याला सोडून गेला.”
ग्रेस यांना “महान कवी” असे संबोधून कवी नामदेव ढसाळ म्हणाले की, महाराष्ट्रही साहित्यिक अलौकिकतेचे खरे मूल्य ओळखण्यात अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन म्हणाले, "कवी ग्रेस हे मराठी साहित्य आणि कवितेच्या जगात एक सुंदर स्वप्न होते."
प्रा.सरदेशमुखांनी ग्रेस यांच्या बद्दल लिहिलेले शब्द, ”धुक्यातले स्वप्नभास, अनिवार्य उदासी, व्रतस्थ एकाकीपणा, दुःखाचे,मरणाचे अतूट स्मरण“ आजही आठवतो आहे .
“Truly great friends are hard to find , difficult to leave and impossible to forget .”
त्यांची मला आवडणारी कविता, जी एक भेट म्हणून सदैव स्मरणात घर करून बसलेली.
"ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग
शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ
आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग
सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा
तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिलंय.
तुम्ही लिहिलेले इतर लिखाणही वाचायला आवडेल

तुम्ही भाग्यवान. तुमच्या तरुण वयात तुम्हांला ग्रेसच्या तरल मनातली गूढ भाषिते ऐकायला मिळाली.
गूढाचा सहवास गहन असतो, बनवतो.
सुंदर लेख.

सुरेख लेख!

तुम्ही भाग्यवान. तुमच्या तरुण वयात तुम्हांला ग्रेसच्या तरल मनातली गूढ भाषिते ऐकायला मिळाली.>>>> +१.

सुंदर लेख.
तुम्ही खरंच भाग्यवान अशा माणसाचा सहवास लाभला. ग्रेस च्या कविता गायला अवघड आहे तरी त्यांना अतिसुंदर चाली लावल्यात.

अप्रतिम लेख.
ग्रेस यांच्या कविता कधीच पहिल्या वाचनात समजल्या नाहीत, तरीही त्या समजे पर्यंत वाचण्याचा कंटाळा येत नाही.
जेव्हा एखादी कविता आपल्याला समजली असे वाटते आणि आपण पुन्हा एकदा ती वाचतो त्यावेळेस त्याच कवितेतील आणखी एखादा वेगळा भाव जाणवतो.

हृद्य आठवणी, आपण ओंजळ उघडी ठेवली आणि त्यांनी मुक्त मनाने तुम्हाला आपलेसे करून घेतले...
सुंदर लेख

वा , खरंच तुम्ही भाग्यवान! तुम्हाला ग्रेस यांचा सहवास आणि मैत्री लाभली.
ग्रेस यांच्या कविता कधीच पहिल्या वाचनात समजल्या नाहीत,>>> हो ना आणि जरा गुढते कडे झुकणाऱ्या.