संजीव गुरूनाईक - भाग - ४ - जान्हवी

Submitted by विजयश्रीनन्दन on 2 October, 2021 - 02:53

गुरूवार बिर्याणी आणि खिचडी. दुपारी व्हेज बिर्याणी आणि रात्री मुगाची खिचडी. नेव्ही चा मेनू कधी कोणी ठरवला माहित नाही. भारतात कोणत्याही नेव्हल युनिट किंवा शिप वर गेलं तरी मेनू तोच. थोडाफार फरक. पण मंगळवारी पूर्ण शाकाहारी, गुरूवारी बिर्याणी ठरलेलंच. मला पण तीच सवय जडलेली. सवयी लवकर सुटत नाहीत.

त्यात, एकटा जीव सदाशिव. कोण विचारणार नाही. बिर्याणी, वर साजूक तुपाची धार, सोबत लिंबाचं लोणचे आणि टॉमेटो सॉस, शेवटी दही साखर. मस्त मेनू.

फ्रेंच विण्डो मधून उफाळणार्या लाटा बघत ताव मारला. आजही लाटा बघत असताना शिप वर असल्यासारखं वाटतं.

भांडी धुतली. वेळेवर कामं उरकून घेतली तर बरं वाटतं. आता वामकुक्षी. अंथरूणात पडलो.‌ अजूनही चित्पावनी डोळे पाठ सोडत नव्हते. मनाची होडी भूतकाळात गेली.

जान्हवी ला साद दिली , ती मागे वळली आणि हसली. क्षणभर कळेना हसून बघतेय की बघून हसते. म्हणाली, "काय झाले गुरूनाईक?"

तीला माझं नाव माहित होतं!!!!
काय बोलावं सुचेना. "तुझे Geography चे नोट्स दे ना. मला तो विषय आधीपासूनच समजत नाही"

ती खळखळून हसली. तिच्या गुबगुबीत गालांवर खळी पडली. हसतच म्हणाली "अरे आपण सायन्स ला आहोत. आपल्याला भूगोल नाही आता. हवं तरं बायो चे नोट्स घे." मी तिच्या हातातून वही घ्यायला हात पुढे केला, आणि अर्रर्र्.......
लक्षात आलं मी तर बायो सोडलयं ....... ओशाळलो. पण आता उशीर झालेला.. घडायचं ते घडून गेलेलं....

ती हसतच होती.... ती मागे फिरली आणि निघून गेली...

दोन दिवस कॉलेज ला दांडी मारली. आई विचारायला लागली काय झालं, कशाची सुट्टी वगैरे वगैरे....

सायकल ला टांग मारली. कॉलेज गाठलं. सायकल स्टॅंड मध्ये ती पण होती. सोबत तिच्या मैत्रिणी, सगळ्या हसायला लागल्या. वर बघायची हिम्मत होईना. निमूटपणे मान खाली घालुन जाऊ लागलो.

गोड आवाज आला "गुरूनाईक" मागं वळून बघितलं तर जान्हवी. हाता पायांना कापरे भरले. चेहरा घामाने डबडबला. ती हसायला लागली. "अरे मी रागावले नाही. गुड मॉर्निंग म्हणतेय फक्त. पण तू खूपच भित्रा आहेस"

जीवात जीव आला.

दिवाळीच्या सुट्या येईपर्यंत ती गुरूनाईक वरून संजीव आणि मग संजू म्हणून बोलवायला लागली होती. पण माझी काही हिम्मत झाली नाही जान्हवी ला जानू म्हणायची.

मैत्री चांगली जमली. आणि त्या वयात तेवढही खूप होतं. कॅन्टीन मध्ये बसणं मला परवडत नव्हतं तिला आवडत नव्हतं. मधल्या ब्रेक मध्ये गप्पा मारायच्या. अकरावीच्या परिक्षा सुरू झाल्या.

तिचे वडील MSEB मध्ये इंजिनिअर होते. ती एकुलती मुलगी. तिच्या बाबांची ट्रान्स्फर आल्याचं कळलं. परिक्षेचा शेवटचा पेपर झाला. ती औरंगाबादला जाणार होती.

त्या काळात अख्ख्या गल्लीत एखाद्या घरात लॅंडलाईन फोन असायचा. मोबाईल, ई मेल कुठून येणार.

परिक्षेचा निकाल आला. टक्केवारी घसरलेली. घरच्यांना ते चालणारं नव्हतं बाबांनी संघाच्या चामडी लाल पट्ट्याचा दम भरला. आई गप्प होती. भाऊ खुदुखुदू हसत होता. बहीण आगीत तेल ओतत होती. लक्षात आलं. हे शौक आपल्याला झेपायचे नाहीत. आता यापुढे फक्त अभ्यास.

जान्हवी ची जानू व्हायच्या आधीच ती नगर सोडून गेली. पण मनात तशीच राहिली.

गालावर खळी पाडून हसत "वेडा रे संजू" म्हणणारी.

मोबाईल चा अलार्म वाजला. पाच वाजले होते. चहाचं आधण ठेवलं, दुधाच भांड घेऊन बाहेर आलो. ब्राऊनी लगेच आला. त्याची दुधाची वेळ झाली होती.

चहाचा मग घेऊन टेरेस वर आलो. सूर्य मावळतीला येत होता. आज सायकलींग कॅन्सल केलं. पंधरा वर्षांचा नियम आज मोडला गेला...
.
.
.
.
.
विजयश्रीनंदन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults