माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - वंदना

Submitted by वंदना on 24 September, 2021 - 15:15

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळे लिहिते झाले बघून मलाही छोटूंसं काहीतरी लिहिण्याची सुरसुरी आली. हे बकेट लिस्ट प्रकरण आपल्या मूड प्रमाणे एक्स्ट्रा स्मॉल ते एक्स्ट्रा लार्ज काहीही करता येईल म्हणून बकेटीत उडी घेतली आहे.

लहानपणी मी फारच अभ्यासू वगैरे समजली जायचे तेव्हा एक सुप्त इच्छा होती, एखाद्या विषयात नापास व्हायचं. ते स्वप्न इंजीनियरिंग ला पहिल्याच वर्षी, पहिल्या सेमिस्टरलाच अप्लाइड मेकॅनिक्स विषयात नापास होऊन पूर्ण झाले. बकेट लिस्ट आयटम वन चेक्ड.

लग्नासाठी स्थळं बघणं सुरू झालं तेव्हा मुलीबद्दलच्या अपेक्षांमध्ये गोरी, उजळ, सरळ नाक वगैरे वगैरे रूपाबद्दलच्या अपेक्षा वाचून मलाही स्थळांमध्ये काय बघावं याची कल्पना (अक्कल) आली. तर सरळ नाकाच्या गोऱ्यापान मुलाशी लग्न करायचं हे माझं पक्कं ठरलं. मी सावळी आणि भज्या नाकाची असल्यामुळे अरेंज्ड मॅरेज मध्ये हे अप्राप्य स्वप्न होतं. हे मी बोलले असते तर सगळ्यांनी हाणून पाडलं असतं. म्हणून मी कुठेही वाच्यता केली नाही. फक्त मनात पक्के ठरलेले. पण म्हणतात ना (काय कुणास ठाऊक) त्याप्रमाणे माझे नुसत्या गोर्या पान नव्हे तर लाल गोऱ्यापान, सरळ नाकाच्या मुलाशी लग्न झाले. त्याला फक्त हुशार स्मार्ट मुलीची (पक्षी आगाऊ) अपेक्षा होती. बकेट लिस्ट आईटम टू चेक्ड.

मला मराठवाड्याचा उन्हाळा अजिबात सहन व्हायचा नाही. थंड हवेच्या ठिकाणी कायमचे राहण्याचे माझे स्वप्न होते. अमेरिकेत येऊन मिशिगन सारख्या अतिथंड हवेच्या बर्फाळ राज्यात कायमचे राहायला आल्यामुळे बकेट लिस्ट आइटम ३ चेक्ड.

लहानपणी, तरुणपणी मी कधीही काहीही कलात्मक काम/ कलाकुसर केली नव्हती. माझ्या बोटांमध्ये ती क्षमता आहे याचीच मला खात्री नव्हती. पण आपल्या हातूनही काहीतरी कलात्मक निर्मावं अशी इच्छा होती. मायबोलीवरील अवलच्या ऑनलाइन क्लासमध्ये शिकून माझ्या बोटांतून चक्क क्रोशाचे काही मास्टरपीसेस (माझ्या महत्वाच्या मते) जन्माला आले. बकेट लिस्ट आइटम फोर चेक्ड.

इथल्या काही लेखांमध्ये आणि प्रतिसादांमध्ये नोकरीतून फायर होऊन रिटायर होऊन जायची इच्छा वाचली तेव्हा मनात गुदगुल्या झाल्या. कारण तुमचा बकेट लिस्ट आइटम मी माझ्या बादलीत टाकू शकते. डिसेंबर मध्ये कंपनीवाइड ले-ऑफ्स मध्ये माझी वर्णी लागली आणि तगड्या सेवेरंस पॅकेज सह मी एक वर्षासाठी तरी नक्कीच रिटायर झालेय.
पण माझी बादलीतली इच्छा होती कधीही उठायचं, दिवसभर किंवा वाटेल तितका वेळ शून्यात बघत राहायचं( माईंड यू शून्यात! पुस्तकात किंवा टीव्हीत नव्हे), कधीही झोपायचं. ही इच्छा मात्र या दुसऱ्यांच्या उधार घेतलेल्या बकेट लिस्ट आयटम मुळे पूर्ण झाली. बकेट लिस्ट आइटम 5 चेक्ड.

तर आता या काही अपूर्ण बकेट लिस्ट इच्छा.
मला कधीची एक मॅरेथॉन धावायची आहे. आता पन्नाशी आली. फार उशीर करून चालणार नाही. या एक-दोन वर्षात धावून टाकते. मॅरेथॉन माझ्यासाठी बकेट लिस्ट आइटम असण्याचं कारण म्हणजे मी स्प्रिंट रनर आहे. मॅरेथॉन साठी लागणारा संयम जिद्द आणि वेळ हे सगळं कम्फर्ट झोन ताणून मला करावे लागणार.

नवरा बघताना मी गृहकृत्यदक्ष अपेक्षा त्याच्या रूपापुढे विसरूनच गेले होते. तर आता मला नवऱ्याला बेसिक भारतीय स्वयंपाक शिकवून स्वतंत्र करायचे आहे म्हणजे मला कधीकधी परतंत्र होता येईल. सुरुवात दमदार झाली आहे, माझं चढलेलं डोकं उतरवणारा फक्कड चहा आता त्याला येतो. बकेट लिस्ट आइटम क्वार्टर चेक्ड?

थंड हवेच्या ठिकाणी कायमचे राहण्याचे स्वप्न बघताना थंड हवेच्या रेंजची मला अजिबात कल्पना नव्हती. आता त्या स्वप्नाची दुरुस्ती करण्यासाठी आणखीन एक स्वप्नं लिस्टमध्ये घालावे लागले. प्रत्येक हिवाळ्यात दोन महिने तरी उष्ण हवेच्या प्रदेशात राहायला जायचे.

मला एक महिना तरी मुलीच्या खोलीत पडलेला पसारा/ कचरा पाहूनही ( हो, नाहीतर तिच्या खोलीत न जाण्याचा ऑप्शन तिने मला दिलेलाच आहे) त्याबद्दल चकार शब्द न काढता मुलीशी खर्याखुर्या अत्यंत प्रेमाने वागायचे आहे.

मला एक दिवस तरी पूर्वीच्या कोणत्याही दुःखद, त्रासदायक आठवणी न काढता राहायचं आहे.

मला एक तास तरी पूर्वीच्या कोणत्याही सुखद किंवा दुःखद आठवणी न काढता घालवायचा आहे.

मला एक मिनिट तरी पूर्वीच्या कोणत्याही सुखद किंवा दुःखद आठवणी न काढता आणि पुढची कोणतीही सुखद किंवा दुःखद स्वप्नं न करता राहायचं आहे.

ते काय हल्ली लिव्हिंग इन द मोमेंट म्हणतात तसं.
पण तो मोमेंट येईपर्यंत बादली भरत राहणारच.

अवांतर नाही पण मायबोलीवर कधीतरी काही(ही) तरी लिहायची पण एक बकेट लिस्ट इच्छा होती. गणेशोत्सवात सर्वचजण सर्वांशीच प्रेमानेच वागताहेत हे पाहूनच ती आज पूर्ण केली. Happy बाप्पा मोरया.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिले आहेस वंदना. मजा आली वाचायला.
उष्ण हवेच्या प्रदेशात रहायचं तर लवकर ये इकडे. थंडीत मस्त हवा असते.

अमितव, साहिल शहा, हर्पेन, सी‌ धन्यवाद.
अस्मिता थँक्यू गं शुभेच्छांबद्दलही.
देवकी मंजू ताई, मनीमोहोर, मृणाली धन्यवाद.
मी_अनु , तुला वाचून प्रतिक्रिया द्यावीशी वाटली हे फार मस्त, थँक्यू.
अवल, मला क्रोशा आधीच येत होतं हे म्हणणं म्हणजे तुझ्यातल्या गुरुचा विनय! थँक्यू गं.
कविन, तुझ्या प्रतिसादने आणखी लिहायला हुरूप आला. धन्यवाद.
rr38, धनुडी, एस, मानव, किल्ली खूप आभार. किल्ली,‌औरंगाबाद गं. Happy
SharmilaR, अतरंगी, जि खूप आभार. जिज्ञासा, मस्त वाटले, मॅरेथॉन साठी १ उत्सुक वाचक तयार. आता वाट पहा! हलके घे हो. आता खरंच धावणारच.
अतरंगी, किशोर मुंढे, भक्ती, वाले, पराग, मीरा, गीता, निरू, फारेण्ड, मामी, सुनिधी धन्यवाद.
वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

Pages