मांजर माझी लाडकी

Submitted by साधना on 29 November, 2009 - 09:19

मला लहानपणापासुन मांजरींचा भारी तिटकारा आहे. मांजर बघितली की लगेच तिला फुटबॉल समजुन एक लाथ घालावी अशी जबरदस्त इच्छा मनात जागृत होते. अर्थात असे कधी केले नाही, मांजर मला असे कधीच करु देणार नाही याची खात्री आहे मला.

माझ्या उलट माझ्या नव-याला आणि मुलीला मांजरांचा खुप लळा आहे. घरात मांजर पाळावी अशी मुलीची ब-याच दिवसांपासुनची इच्छा आहे, पण मी त्या इच्छेला कधीच खतपाणी घातले नाही.

माझी मांजरांबद्दल अशी अप्रिती असुनही गेले सहा महिने माझ्या घरात एक मांजर वावरतेय. साधारण दिडेक वर्षापुर्वी आमच्या शेजा-यांनी एक मांजरीचे पिल्लु पाळायला आणले. सुरवातीला लाडाच्या लाडुबाईसाठी दररोज मासे विकत घेतले गेले. कालांतराने त्यांच्या लक्षात आले की हा लाडाचा आयतोबा नुसताच मासे हादडतोय आणि बाकी वेळ झोपुन काढतोय. मग त्यांनी तिला घराबाहेर काढली. पण मांजर अशी थोडीच जाणार? ती आमच्या दोन घरांच्या आजुबाजुला घोटाळतच राहिली. तिला त्यात एक पिल्लुही झाले. पिल्लु थोडे मोठे झाल्यावर आई कुठेतरी गडपली आणि पिल्लाने परत शेजा-यांच्या घराचा आसरा घेतला. पण त्या घराबरोबरच ह्या नविन मांजरीला माझेही घर आवडायला लागले. मधुन मधुन माझ्या गच्चीत येऊन उन खाणे हा तिचा आवडता उद्योग झाला. आणि गेले सहा महिने तर माझी गच्ची हे तिचे मुख्य ठाणे झालेय. सक्काळी जाग येते ती तिच्या म्याव म्याव नेच. मी कित्येक वेळा काठी घेऊन तिच्या मागे लागलेय, पण ती अजिबात बधत नाही. गच्चीतुन घालवली की दारात येऊन बसते आणि दारातुन हुसकावली की परत गच्चीत. आणि वर तिला हुसकावुन लावते तेव्हा माझ्यावर गुरगुरतच घर सोडते ती. वळून वळून बघत राहते रागाने माझ्याकडे. जणु डोळ्यांनीच बोलते, 'कोण गं तु मला हाकलणारी?' मी घरात नसले की खुशाल सगळे घर फिरुन बघते. माझ्या नव-याची भारी फुस आहे तिला.

तर मंडळी, हे सगळे मांजरपुराण सांगण्याचे कारण म्हणजे काल घडलेली एक घटना. काल सकाळीच गावच्या एका शेजा-याचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळाली. ऑफिसातुन संध्याकाळी घरी गेले तर भाऊ शेजा-याच्या आठवणीत विमनस्कपणे बसलेला. मीही मग जीमला न जाता घरीच बसले. उगाच चाळा म्हणुन टीवी लावला आणि चॅनेल फिरवत दोघेही त्या शेजा-याबद्दल बोलत राहिलो. अचानक मला गच्चीतुन खुर्ची सरकावल्याचा आवाज आला. (माझ्या हॉलच्या समोरच मोठी गच्ची आहे.). गच्चीत कोण आहे असा विचार मनात येतोय तोच आमच्या मांजरीबाई दोन पायांवर नाचत असलेल्या दिसल्या. 'अरे वा, मांजर उंदिर पकडण्याच्या आपल्या परंपरागत व्यवसायाकडे वळलेली दिसतेय.' असा विचार करुन मी दुर्लक्ष केले तिकडे. दोन चार मिनिटांनी उंदराचा चींची असा आवाज आला. आता मात्र मी उठले. म्हटले, हा उंदिर मांजरापासुन जीव वाचवण्यासाठी घरात शिरला तर माझे वांधे होतील. तसे काही होण्याआधी गच्चीचे दार लावलेले बरे. म्हणुन बाहेर गेले तर मांजर एका कोप-यात बसलेली. लाईट लावुन पाहिले तर कोप-यात कुदळ व फावडे ठेवले होते त्यामागे उंदिर लपला होता, त्याची शेपुट फक्त बाहेर दिसत होती आणि मांजर त्या शेपटीकडे पाहात बसले होते.

मी घरात येऊन दार लावायला लागले तर परत चींचीं आवाज आला. उंदराला आता नक्कीच मारले असेल म्हणुन परत बाहेर गेले आणि पाहते तो काय... उंदिर आणि मांजर एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालुन पाहताहेत.
majar.JPG

लगेच भावालाही बाहेरचे दृष्य पाहायला बोलावले. त्याने पाहिल्याबरोबर लगेच त्याला कॅमेरा आठवला. लगेच कॅमेरा काढून फोटो घेतले.

manjar.JPG

एक फिल्मही घेतली.
http://www.youtube.com/watch?v=gZp7omIY58E

दुर्दैवाने फिल्मची क्वालिटी अतिशय खराब आली. गच्चीत आधीच कमी शक्तीचा बल्ब लावला होता आणि त्यात मांजरीने उंदराशी खेळण्यासाठी काळोखा भाग निवडला. त्यामुळे अजुनच वाट लागली. युट्युबवरुन डाऊनलोड करुन पाहावी लागेल. कारण तशीच पाहिली तर काळोखाशिवाय काहीच दिसणार नाही.

तुम्ही जर विंडोज मिडिया प्लेअर वापरत असाल तर व्ह्यु-एन्हान्समेंट्-विडिओ सेटीग मध्ये जाऊन ब्राईटनेस आणि काँट्रास्ट अ‍ॅडजस्ट करा आणि पहा. काहितरी दिसेल Happy

मांजरीने शेवटी मेलेल्या उंदराला तोंडात पकडले आणि ती गच्चीवरुन खालच्या खिडकीवर उडी मारुन अंधारात गडप झाली. आज सकाळी उठले तर बाई परत हजर गच्चीत. आणि दरवाजा उघडल्यावर सरळ हक्काने आत येऊन बसली. चेह-यावर भाव - यांचे उंदिर मारायचे मी आणि साधे घरात बोलावुन दुध वगैरेही विचारत नाहीत. माणसे कसली माजलीत आजकाल!!!

मांजर तशी माझी नावडती, पण कालपासुन जरा ममत्व वाटायला लागले. असेच गच्चीतले उंदिर मारायला लागली तर मी दुधही देईन तिला प्यायला आणि वर म्हणेनही 'मांजर माझी लाडकी' Happy

गुलमोहर: 

हा हा हा..
माझ्याकडचं एक मांजर (छबू नावाचं) चिरमुरे आणि हरबरे खायला सोकावलेलं..
चिरमुर्‍यांच्या बाबतीत सोकावण्यापेक्षा - वेडं होणं हा वाकप्रचार जास्त योग्य ठरेल..
छबू असं "टराटरा फाडीन" अशा दृष्टीनं बघायची की आमची हिम्मतच व्हायची नाही तिच्यासमोर चिरमुरे खायची.. आजतागायत मला कळलेलं नाही की चिरमुर्‍यांमधे खून पाडण्याइतकं वेडं व्हावं असं काय आहे!
मी छबूला विचारायचा प्रयत्न केला.. तर ती रागानं "म्याआआअव" करून केकाटली.
बाब चिरमुर्‍यांची होती.. शेवटी मीच माघार घेतली.

छान Happy

मस्त.

नानबा सेम हिअर !! आमच्या कडे एका मांजरीला असेच वेड होते चुरमुर्‍यांचे. नुस्ता पिशवीचा चुरचुर आवाज जरी केला तरी ती जोराने म्यावत मागे लागायची ... Happy

हा हा हा हा...साधना मस्तच अगदी फोटो आणि विडियो सहीत हटके गोष्ट. पण आता मात्र तिला दत्तक घेऊन टाक

दत्तक घेऊन काय टाकू?? ती बया घरातच घुसुन बसलीय... दत्तक वगैरेची वाट पाहायची पद्धत नाहीये त्यांच्यात.. Happy

साधना, तिला नियमीत दूध/इ खाणे द्यायला सुरुवात केली तर ती उंदीर नक्कीच नाही मारणार. आहे ते चालुदेत Happy

माझी एक मांजर हर्शीजचे किसेस खायची. इथुन जाताना एक पॅक तिच्यासाठी वेगळा न्यायची मी. अजून एक होती ती मुरमुरे, पपई आणि सिताफळ खायची. तिला न देता खाल्ले तर रुसुन २ दिवस घरी यायची नाही. मांजरी आणि त्यांचे नखरे फार गोड असतात.

मांजर बघितली की लगेच तिला फुटबॉल समजुन एक लाथ घालावी अशी जबरदस्त इच्छा मनात जागृत होते.>>>>> Lol तुझी 'मांजर तिटकारा' लेव्हल माझ्यापेक्षाही वरची आहे तर.
पण ती मांजर नी उंदीर डोळ्यात डोळे घालून का बघत होते? ती त्याला हिप्नोटाईझ करत होती का? Wink

>>सायो आणि साधना, यु आर ऑन माय लिस्ट

सायो आणि साधना सावधान पुढच्या वेळेस मांजर समोर आले तर चेक करा कि तिच्या पायात काचेचा बुट तर नाहिये ना.... Wink Light 1

मांजर बघितली की लगेच तिला फुटबॉल समजुन एक लाथ घालावी अशी जबरदस्त इच्छा मनात जागृत होते.>>>>> अगदी साधना, माझीच ईच्छा लिहिली आहेस. आमच्या सोसायटीत पण खुप मांजर आहेत. आमच्या किचनमध्ये पण एक दरवाजा आहे अंगणात जायला, मी सकाळी दरवाजा उघडला की लगेच घुसखोरी करतात. मग मी ओरडते चला बाहेर म्हणुन. अगदिच पायात घुटमळायला लागली तर एक हलकेच लाथ बसतेच त्यांना.

पण माझ्या सा.बाई आणि माझा नवरा किचन मध्ये आलेकी लगेच त्यांच्या पायात घुटमळायला सुरवात होते. माझा नवरा तर स्वतः जे खात असेल ते त्यांना खायला घालतो पण ती सगळी मांजरे फक्त दुध आणि मासेच खातात. काल तर खजुर घालु का विचारत होता. Happy

मांजर बघितली की लगेच तिला फुटबॉल समजुन एक लाथ घालावी अशी जबरदस्त इच्छा मनात जागृत होते.>>>>> मेरेको भी. मला तर कुत्रे पण आवडत नाहीत.. Happy

समस्त स्त्रियाच्या मनात एका स्रिला लाथाडण्याची इच्छा ऐकुन बर नाही वाटल. कोणीतरी बोक्याचे नाव घ्यायला हवे होते.

या या बायांनो, आणि आता हाणा ह्या बोक्याला... आयताच स्वतःहुन हातात आलाय

मला तर कुत्रे पण आवडत नाहीत..
मलाही आधी अज्जिबात आवडत नव्हते, पण मुलीच्या हट्टापाई एक आणला आणि प्रेमात पडले माझ्या बंटीच्या... पुढे शेजा-यांच्या हट्टामुळे त्याला गावी सोडुन यावे लागले Sad

मांजर आवडत नाही?????????????????

तुम्ही मांजराचे इतके छान फोटो टाकले आहेत, म्हणून तुमचा गुन्हा माफ!!!

कोणीतरी विडिओ पण पहा हो.. तो पहायचा तर कटकट खुप आहे,मला मान्य आहे.. पण तरी पाहाच.. मांजर उंदराला कसे खेळवते ते पाहा एकदा.. Happy

मधे कुढे वाचण्यात आलेले कि.............सर्कस मधे मांजर वापरन्यात येत नाही........त्यांना ट्रेनिंग देता येत नाही.......ते आपल्या मर्जी चे मालक असतात.......

खरे आहे का ????????/

हा लेख लिहिल्यानंतरच्या काळात बरेच घडले.. ही मांजर यथावकाश मोठी झाली. तिने आधी दोन पिल्ले माझ्या घरात आणली.. मी त्यांना मासळीबाजारात सोडुन आले. त्यानंतर काही काळाने बयेने चार पिल्ले घातली. मग मात्र मला पिल्लांसकट आईलाही मासळीबाजारात सोडणे भाग पडले. सध्या घरी एकही मांजर नाही आणि नवीन कोणी येऊ नये याची मी काळजी घेते.

लेख आवडला.
(Video मात्र दिसू शकला नाही.)

मांजराबद्दल अनेकांना का तिटकारा असतो हे गूढ मला अजून तरी उलगडलेलं नाही. कदाचित ’लबाड’ ’चोर’ ’आपमतलबी’ अशा विशेषणांनी मांजराला आजवर अलंकृत केलं गेल्यामुळे असेल.
आमच्या घरात कुत्रे होते. खूप लळा लागला होता. ते जग सोडून गेले तेव्हा दु:ख आवरणं कठीण गेलं.
तरीदेखील मला मात्र मांजर, त्याच्या स्मार्ट हालचाली आणि विशेषत: मांजराच्या पिल्लांमधला
गोडवा मनाला मोहवतो. मांजर पाळणं हे कुत्रा पाळण्यापेक्षा सुलभ असतं असा अनुभव (ऐकीव) आहे.
तळमजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहणार्‍यांकडे, स्वतंत्र बंगल्यात किंवा घरात मांजरं पाळलेली पाहिली आहेत. मांजरं स्वत:मध्ये जास्त रंगलेली असतात. कुत्र्यांप्रमाणे माणसात गुंतुन राहणं हे त्यांच्या स्वभावात फारसं नसल्याने, त्यांना एकदा खायला प्यायला घातलं की त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यावं लागत नाही. तळमजल्यावर राहणार्‍या माझ्या एका नातेवाईकांकडे अनेक वर्ष एका बोक्याचं नियमितपणे येणं जाणं असायचं. दिवसा बराच वेळ तो घरात असायचा. कधी खिडकी जवळच्या कट्ट्यावर बसलेला किंवा सोफ्यावर मस्तपैकी झोपलेला दिसायचा. रात्री मात्र हे बोकेमहाशय कायम Outdoor duty वर असायचे.

"आई, या फॉर्ममधे 'घरात पाळीव असण्याबद्दल मुलाचं/मुलीचं मत' असा कॉलम नाहिये...पण मी खाली लिहू का, की मुलीला कुत्रा/मांजर इ. ची आवड नाही..."

लग्न ठरताना भरायच्या अनेक फॉर्म्समधे पण ही अट घालावीशी वाटत होती मला. त्यातही मांजर एकवेळ ठीकेय, कुत्रा मुळीच नको होता.

लहानपणी सवय होती मांजराची, पण काहीतरी कारण होउन आजीला टीबी झाला तेव्हा डॉ. नी मांजर घरात ठेऊ नका असा सल्ला दिला. (टीबी मांजरामुळे झाला नाही. पण पुढे धोका नको म्हणून ही काळजी.)
मग सवय गेली ती गेलीच! नवरा अधून मधून म्हणतो मांजर/कुत्रा आणायचा म्हणून. पण साबा, साबु आणि मी एका पार्टीत आहोत. Happy त्यामुळे त्याचं काही चालत नाही.
पुर्वी सेकंड शिफ्ट वगैरे करून आला की म्हणे दाराशी एक भाटी (मांजरी. कोकणात भाटी म्हणतात) बसून असे, तिला घरात घेऊन यायचा, मग जेवण झालं की अंगणात तिच्याशी १०-१५ मिनिटं खेळायचा आणि मग झोपायचा. साबांनी कधी तिला घरात नव्हती घेतली. अगदीच वाटलं तर ती नसताना बागेतल्या ताटलीत दूध घालून येत.

नवरा अधून मधून म्हणतो मांजर/कुत्रा आणायचा म्हणून. >>> कुठे फेडाल हे पांग , सगळ्या स्त्रिया अशाच असतात एककल्ली , नेहमी स्वत:च घोडं पुढ दामटवत असतात, जरा नवर्‍यालापण त्याच्या मनाप्रमाणे वागु द्या. सदानकदा आपलाच तोरा कशाला मिरवावा ?

सेम पिंच्..साधना.. ..मांजर..(आणी तत्सम पेट्स) नो नो!!!!!! Happy
खरच त्या फोटोत ,मांजर उंदराला हिप्नोटाईझ करतीये असं वाटलं ..

Pages