आजोळच्या आठवणी

Submitted by नानुअण्णा on 22 September, 2021 - 02:00

आजोळच्या आठवणी
खुप वर्षापुर्वीची गोष्ट, आम्ही तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात एका गावात रहात होतो. माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. आमचं आजोळ चौल आणि आईच माहेर अलिबागच्या कुशीतील वरसोली. वर्षांतून एकदा मे महिन्यात शाळेच्या सुट्टीत आम्ही सगळे आजोळी जात असु, आगगाडी, लाल एष्टी असा आमचा आठ एक तासाचा प्रवास असे किंवा व्हाया मुंबई असा. मुबंईत, किंवा डोंबिवलीत एक थांबा आत्या, काकांकडे आणि मग कधी भाऊच्या धक्क्या वरून लाँच अथवा लाल एष्टी. त्यावेळी एष्टी वाटेतील सगळ्या गावात थांबे. एस्टी खचा खच प्रवाशांनी भरलेली असे. सामान, टोपल्या, माश्यांचा वास..कंडक्टर आणि प्रवाशांचा कलकलाट. केसात फुल, चमकीचे गजरे माळलेल्या माळणी आणि कोळणी सुद्धा.यातील काही प्रवासी नेहमीचे असत ते आणि कंडक्टर गप्पा मारीत..पेण आणि पनवेल ही मोठी स्थानक होती, शिवाय बाजारपेठ..तेव्हा कुलाबा जिल्हा होता. एष्टी स्टँड मध्ये शिरली की आत शिरण्यासाठी माणस एसटी मागे धो धावत..आतुन उतरणाऱ्यांची आणि पुढच्या प्रवासाला जाणाऱ्यांची कसरत चाले..मे महिना लग्न सराईचे दिवस, सुट्ट्या व अलिबाग जिल्ह्याचे ठिकाण एष्टीला गर्दी असे.
एष्टी थांबली की विक्रेते खिडकीजवळ येऊन ओरडत असत, खोबऱ्याची व गुळाची प्लास्टिकच्या कागदात बांधलेली चिक्की ही तिथली स्पेशालिटी होती..पेणला एष्टीस्टँड बाहेर अनेक माळणी रस्त्याच्या कडेला ताजी भाजी विकण्यास बसत, हे दृश्य अगदी अलीकडच्या काळात सुद्धा बघायला मिळते.
पेण आलं की आई सांगे आता धरमतरच्या खाडीचा पूल येईल बघा, मग पुलावरून त्या पाण्यात डोलकाठी, वेगवेगळे झेंडे फडकत असलेली गलबत बघायला मिळत, फार मजा वाटे, अलिबाग जवळ आलं आता थोडा वेळ राहिला, याची खुण पटे, मग छोटी गाव लागत, वडखळ, पोयनाड, कार्ले खिंड, गावाची नावे पण किती छान. कार्ले खिंडीतील वळणावर पात्रुदेवीचं मंदिर आहे, तिथे यष्टीचा ड्रायव्हर तीचा वेग हळु करे बरेच प्रवाशी सुट्टी नाणी देवाला खिडकीतून टाकत, आम्ही पण टाकत असु. नाणी रस्स्यावर पडल्याचा खण खण आवाज येई. प्रथा आहे आजही, प्रवास सुखरूप पार पडू दे या साठी.
तिथुन झाडीतून समुद्राचं पहिलं दर्शन होई..आलं एकदाच गाव अस वाटे, समुद्राचं, विमानांचं, बोटींच मला फार आकर्षण वाटे. ह्या गोष्टीं आम्हाला वर्षानंतर दृष्टीस पडत. यथावकाश एष्टी अलिबाग स्टँड मध्ये शिरे, आम्ही असंख्य सामान, पिशव्या घेऊन उतरत असू. मग टांगा ठरवण्याचा कार्यक्रम असे. तेव्हा रिक्षा नव्हत्या. सगळं सामान ठेऊन पुढे एक व मागे दोन मोठी माणसं व त्यात उरलेल्या जागेत आम्ही कोंबून बसत असू. अलिबागपासून वरसोली अंदाजे दीड किलोमीटर असावे. टांगा अतिशय हळू चाले, सायकल चालवणारे सुद्धा पुढे जात असा टांग्याचा वेग असे. एक लयबध्द आवाज आणि तालात टांगा डुलत डुलत चाले.
पाहुणे आले अस सगळ्या गावाला समझें. रस्त्यात ओळखीची मंडळी आई वडिलांना हाक मारत. भाई, अण्णा कसे आहात? आईला बेबी म्हणून हाक मारत.
रामनाथ जवळ रस्त्यात एक भात गिरणी लागे, तिथे भाताच्या तुसाचे ढीग लागलेले असत.
अशी आमची वरात मामाच्या वाडीच्या, घराच्या तोंडाशी येऊन थांबे. तिथुन घरापर्यंत जाण्यास एक छोटी गल्ली वजा रस्ता आहे. तोपर्यंत मामी, मामा आम्हाला नेण्यास येत असत. आम्ही पडवीतून घरात जात असू. घर लाल कौलांचं, घरात अंधार असे, आणि एका काचेच्या कौलातून प्रकाशाचा कवडसा पडलेला असे.
मोठ्या माणसांची ख्याती खुशाली, विचारपूस सुरू होत.
विहिरीचं पाणी चव वेगळीच वाटे, नळ पोहोचले नव्हते गावात. चहा, किंवा कोकमचे सरबत, ती चव आणि रंग न विसरता येण्यासारखा.
मामाच घर, खुप मोठ अंगण, बाजूला तुळशी वृंदावन, समोर चिक्कूच झाड..चिंचेची दोन झाड. मागे पण ओसरी त्याला लागून छोटस स्वयंपाकघर घरात एक स्वतंत्र देवघर आणि मग वाडीत विहीर व तिथेच न्हाणीघर व बाजूला विजेचा पंपाच् घर.
विहिरीवर पाणी काढण्यासाठी छोटा रहाट बाजुला पाणी साठवून ठेवायची टाकी. आम्ही या टाकीच्या थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबत असु. मामा वाडीच शिंपण करताना झाडांच्या आळ्यामधील पाण्यात नाचत असू.
नारळी पोफळीची वाडी, घरामागे फणस, आंब्याची झाड, एक आंबा आकाराने छोटा पण अनेक घोस लागत फांदीवर, चव व रंग अप्रतिम.. हा पिकला की देठाजवल नारंगी होई व इतर भाग पिवळा, गोंडस दिसे.
दुसरा विहरीजवळचा आंबा मोठा व चव आंबट गोड अननसासारखी. अनेक फुलझाड, बकुळीच एक मोठं झाड त्या खाली पडलेला बकुळ फुलांचा सडा.
नारळामध्ये एक मोहाचा नारळ हा प्रकार असे, अजूनही असेल, त्याच्या शहाळ्याचे पाणी अतिशय गोड असे.
आम्ही विहिरीवर धावत असु, आई ओरडे, काही उद्योग करू नये म्हणून. उदाहरणार्थ विहिरीत साबणाची वडी पाडणे, स्लीपर पाडणें, डोकावून कासव दिसत का? मासे दिसतात का? विहिरीत काय पडलंय? अनेक प्रकार.
किती आठवणी. हा आनंद शोध पुढे महिनाभर चाले..
क्रमश:
सचिन वर्तक (९९२२५३४५५५)

Group content visibility: 
Use group defaults

रस्त्यात एक भात गिरणी लागे, तिथे भाताच्या तुसाचे ढीग लागलेले असत, ही अजून पर्यंत शाबुत होती.>>>
कधी पाहिल्याची आठवत नाही...

अलिबागपासून वरसोली अंदाजे दीड किलोमीटर>>>>
माझं ८ किलोमीटर.. Happy

बहुतेक आताची वस्तुस्थिती, परिस्थिती मला माहीत नाही, मी हे जे लिहिलं आहे ते १९८० च्या आसपासच आहे.
कुणीतरी वाकृळकर नावाच्या माणसाच्या मालकीची लक्ष्मी राईस मिल असे नाव असलेली रामनाथ रस्त्यावर होती.
त्याची पड झड झालेली इमारत अजून शाबूत असावी. धन्यवाद .

मस्त वर्णन.
तुमचं आजोळ वरसोल अलिबाग पासून दीड किमीवर . आमचं घर अलिबाग नगरपालिकेपासून दीड पावलावर Lol Lol Lol

अलिबागच्या असंख्य आठवणी आज हा लेख वाचल्यावर मनात आल्या. दिवस मस्त गेला. त्याबद्दल धन्यवाद.

हेमा ताई तू ही अलिबागकर का??? >> हो अनिष्का, मी प्रॉपर अलिबाग , आमचं मूळ गाव नाही ते वडीलांच्या नोकरी निमित्ताने होतो तिथे. पण माझं लहानपण सगळं अलिबागला गेल्याने मला माझं गाव अलिबाग च वाटत.

छान लिहिलंय.. आवडलं..
अलिबाग, चौल, रेवदंडा, अक्षी ह्या ठिकाणी अगणित वेळा जाणं झालेलं आहे, त्यामुळे लेख विशेष जवळचा वाटला.

​धन्यवाद, सर्वांचे
@ अनिष्का ताई, मयूर बेकरीच्या पण फार आठवणी आहेत. तेथील नानकटाई सारखी फुलांचा आकार असलेली बिस्कीट मिळत असायची.
ती त्यांची खासियत होती. अजूनही असेल. विद्याताई पाटील यांच्याशी आमच्या मामा कुटुंबाशी चांगली ओळख आहे.
मी ही त्यांच्या घरी गेलेलो आहे. अलिबागला गेलो कि मयूर बेकरीला जाणे हमखास असे.

आवडले लिखाण

पुभाप्र म्हणजेच पुढील भागाच्या प्रतिक्षेत

मस्त नॉस्टॅल्जिया दिलात!!!
आमचं गाव बहिरोळे. कार्ले खिंडीत शिरून, कनकेश्वर च्या पायथ्याशी.
पार्तू देवीला जावून आमचे वडील नारळ फोडीत.
तिथली शांतता आणि सुखद गारवा अजून आठवतो आहे.
वडखळ ला थांबून आम्ही बटाटेवडा खात असू.सोबत लसणाची तिखट चटणी मिळे.
पुढे कार्ले खिंडीजवळ येण्यापूर्वी samsung यांचे icecream सोड्याचे फार जुने दुकान आहे. तिथे त्यांच्याकडेच बनवलेला सोडा मिळे. पूर्वी तो तिकडेच प्यावा लागे. ते पार्सल देत नसत.बरीच वर्ष त्यांनी रेसिपी secret ठेवली होती. आता ते खूप वेगवेगळे flavors बाटली मध्ये भरून सुद्धा देतात.

बितके आंबट गोड आंबे आमच्या गावी सुध्दा मिळत. उन्हाळ्यात अक्षरशः त्यांचा सडा पडलेला असे. कोणाच्याही शेतात जाऊन बिनधास्त उचलले तरी कोणी ओरडत नसे.
किहीम बिच, अलिबाग बीच, बिर्ला मंदिर, वगैरे आमची ठरलेली ठिकाणे होती.
तुमचा लेख वाचून सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
मनापासून आभार.
पुलेशू.

मांडवा, रेवस, वडखळ, वरसोली, झिराड, थळ वायशेत, चौल, आवास, सासवणे.........
अलिबागच्या दोन टॉकीज महेश आणी मेघा.
कोरड्या मच्छीसाठी पोयनाड, जवळचं बांधण वगैरे वगैरे
धोकवड्याचा कोणी आहे कां ????

अलिबागच्या दोन टॉकीज महेश आणी मेघा. >> महेश आणि मेघा यांच्या आधी एक ओपन एअर थिएटर होत , पावसाळ्यात बंद असायचं एरव्ही फक्त एक शो होत असे. छोटा जवान, सतीच वाण हे मराठी आणि साथी, shagird हे हिंदी सिनेमे आठवतात.
सिद्धेशवर कला मंदिर नाटकाचं ओपन एअर थिएटर .

मस्त लिहीलयं.

मी देशावरची, पण अलीबागला एक दिवसाची ट्रिप झाली तरी फार आवडले अलीबाग. एक रात्र मुक्काम ठोकायचा विचार आहे पुढे.

या धाग्यावर अजून अलीबाग व कोकण संयुक्त क्विन जागुबाई उरणकर हिचे आगमन कसे झाले नाही बुवा? Uhoh Light 1 Happy