माझ्या आठवणीतील मायबोली - हर्पेन

Submitted by हर्पेन on 18 September, 2021 - 09:16

माझ्या अवलोकनात जाऊन बघता मी पंधरा वर्ष जुना सदस्य आहे असे दिसते. मला मायबोलीचे सदस्यत्व घेऊन वाचता वाचता पंधरा वर्षे झाली हे खरेच वाटत नाही. खरे सांगायचे तर मधेही मी मायबोलीवर कसा / कधी आलो अशा आशयाचा धागा आला त्यावेळी मला मी मायबोलीचे सदस्यत्व नक्की कधी घेतले ते नीटसे आठवतही नव्हते. आताही मुद्दाम उलटी मोजणी करत मागे गेलो असता असे जाणवले की मी मॉरिशस येथे असताना हे सदस्यत्व घेतले असावे. तिकडे फारा वर्षांपूर्वी ऊसाच्या शेतावर काम करायला म्हणून गेलेली आणि तिकडेच स्थायिक झालेली काही मराठी मंडळी आहेत त्यातली एक ज्योती नावाची आमच्या ऑफिसात हाऊसकिपर म्हणून कामाला होती. तिने मला रामाची मराठी आरती लिहून दे आणि अर्थही सांग म्हणून विचारणा केली होती. आरती पाठ होती पण अर्थ ... त्याबाबतीत माझा पहिल्याच 'उत्कट साधूनी शिळा सेतू बांधोनि' वाक्याला त्रिफळा उडाला होता.  बहुदा त्यावेळी मी नेटवर अर्थ शोधात असताना मायबोलीचा शोध लागला असावा. पण त्यावेळी जास्त रुळलो नाही. ऑफिसातून वैयक्तिक कामे / टंगळमंगळ न करायचे, तत्ववादी असण्याचे दिवस होते ते.  

त्यानंतर काही काळ काही ना काही कारणाने नोकऱ्या फटाफट  बदलाव्या लागल्या , गावं बदलावी लागली. त्यामुळे इकडे अधून मधून येत होतो पण चस्का म्हणतात तसा काही लागला नाही. अशातच कधीतरी  तुमचा पासवर्ड रिसेट करा की अशाच काही अर्थाची मला ई-मेल आली आणि . त्यावेळी मी पुण्यात परत आलो  होतो.  त्यासुमारास मायबोली चा फॉरमॅट देखील बदलला होता देवनागरीतून लिहिता यायला लागले होते आणि  मग त्यावेळी खऱ्या अर्थाने रुळलो. 

रुळलो म्हणतोय पण सुरुवातीला वाचनमात्रच होतो. अनेक वर्षे महाराष्ट्री नसल्याने माझे मराठी खालावले होते. कुठल्याश्या प्रतिसादात संधी
या शब्दाचे अनेकवचन संध्या केल्यावर कुठून कुठून येतात एकेक असे ऐकून घ्यावं लागलं होतं. तसेच टाईप करायचा वेग देखील कमी पडायचा.  एखाद्या कुठल्या चर्चेत प्रतिसाद लिहायचा तर सुयोग्य शब्द आठवून टाईप करेपर्यंत आपला मुद्दा दुसराच कोणीतरी लिहूनही गेलेला असायचा. स्वतंत्र लिखाण तर दूरचीच गोष्ट, प्रतिसादही नीट लिहिता यायचे नाहीत. अर्थात अजूनही फार फरक पडलाय असे नाही. पण असो. तर मुद्दा हा होता की मी वाचनमात्रच होतो.  खूप वाचलं त्यावेळी.  दादची गानभुली सिरीज सुरु होती, राफा, धुंद रवी ई. मंडळी हसवत होती; यो रॉक्स, रोमा यांचे दुर्ग भ्रमणावरचे लेख, जिप्स्याचे फोटो, नंदिनी, सुपरमॉम, विशाल कुलकर्णी, कचा, कौतुक यांच्या कथा, चिनूक्सचे त्याचे स्वत:चे अन्नम वै प्राणा व त्याने आणलेले इतरांचे इतरत्र पूर्व प्रकाशित लेख अशी जवळपास रोजच्या रोज मनोरंजनाची मेजवानीच असायची. वाचलेल्या पुस्तकांबद्दल, करत असलेल्या व्यायामाबद्दल, बघितलेल्या सिनेमांबद्दल, अक्षरवार्ता व इतरही अनेक धाग्यांवर लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आलेले खरेखुरे अनुभव आणि प्रांजळपणे मांडलेली मते / प्रतिसाद वाचूनही विचारांचा परीघ विस्तृत होत होता. 

मी इथे सगळ्यात पहिला लेख टाकला होता तो तोरण्यावर बघितलेल्या इंद्रवज्र संदर्भात तो ही आधीच लिहिलेला होता तो इथे कॉपी केला.  त्यानंतर लिहायला सुरु केले ते माझ्या मेळघाटात जाऊन केलेल्या स्वयंसेवकगिरी बद्दल आणि मैत्री च्या उपक्रमांची ओळख करून देणारे लिखाण.  नाही म्हणता म्हणता चिनुक्सच्या आग्रही विंनतीला मान देऊन लेखन स्पर्धेत भीत भीत भाग घेतला आणि लोकप्रिय मान्यवर लेखकांच्या बरोबरीने भाग घेऊन बक्षीस मिळाले त्यावेळी खूप आनंद झाला. https://www.maayboli.com/node/44780 पण एकंदरीत लिहिणे हे माझ्याकरता अजूनही कष्टाचेच काम होय.
 
लेखनात अगदी नवीन असतानाही मला इकडे कायमच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले आहेत. इतरांच्या लिखाणावर दिलेले प्रतिसाद आवडले / आवडतात अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. टीका झाली असलीच तरी माझ्यात सुधारणा करायला हव्या अशा बाबींवरच.   

जाणवलेले बदल 
मायबोलीवर झालेल्या तांत्रिक बदलांव्यतिरिक्त जाणवणारा बदल  म्हणजे  जुन्या सकस लिहिणाऱ्या लेखकांचे इकडे लिहिणे बंद झालेच पण चांगले लिहिणारे नवीन लोक आले तरी ते फार थोडा काळ इकडे रमतात.

इथला सध्याचा सर्वसाधारण लोकव्यवहार जास्त प्रमाणावर (भाडीपाच्या कास्टिंग काऊच वर जसे म्हणतात आपले कॅज्युअल आहे तसा) सगळीकडेच कॅज्युअल झाला आहे. पूर्वी धागा विषयाशी असंबद्ध प्रतिसाद चुकून देखील लिहिले जाऊ नये म्हणून प्रयत्नशील असायचे लोक ते आता जवळपास  कुठल्याही धाग्यावर गप्पा सुरू करतात अगदी स्वतः धागालेखक सुद्धा त्यात सामील होतो. अजून गंमत म्हणजे मध्यंतरी 'असंबद्ध गप्पा' ह्या धाग्यावर अगदी सुसंबद्ध गप्पा मारल्या जात होत्या. 

झालेला बदल एकाच वाक्यात सांगायचा झाला तर म्हणता येईल मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे.  अधिक आधुनिक,  अधिक कालसुसंगत आणि अधिक लोकप्रिय पण जरा उथळ आणि सवंगही. 

अजून एक बदल लिहायचा राहीला तो म्हणजे पुर्वीसारखी मायबोलीवर जाहीर करून गटग होत नाहीत हल्ली. म्हणजे इथली माणसे आपापसात भेटतात पण अन्य मार्गाने संपर्क साधून. त्यामुळे ठराविक माणसेच भेटतात. नवीन मायबोलीकरांच्या प्रत्यक्ष आणि एकत्रित भेटी हळूहळू कमी झाल्यात आणि गेल्या दोन वर्षात तर कोरोना मुळे बंदच पडल्यात. परत एकदा एवेएठि भेटणे सुरु व्हावे अशी ईच्छा आहे.
   
आवडलेली  सोय 
इथल्या लेखाची लिंक फेसबुक  आणि व्हॉटस अ‍ॅपवर शेअर करता येते हे आवडतं. निवडक दहा कमी पडायचे त्यामुळे लेखकाचे चाहते बनता येतं ही सोय आवडली

माहितच नसलेली सोय
नीट वापरता येत नाही अशी असू शकेल पण माहीतच नाही अशी सोय बहुदा नसावी. काही वेळा तर नवीन सोय तपासून बघण्याकरता स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे.

मायबोलीनं काय दिलं
खूप काही दिलं. प्रत्यक्ष भेटींमधून आणि न भेटताही विस्तारीत कुटूंब बनलेले भरपूर मित्र मैत्रिणी.
'मैत्री' या स्वयंसेवी संस्थेची माहिती प्रसारित करायला हक्काचे व्यासपीठ. 
माबो चित्रपटांचे माध्यम प्रायोजक असताना प्रथमखेळसमयी उपलब्ध राहण्याची; त्यावेळी कलाकारांचे आणि इतर उपस्थित मान्यवरांचे  फोटो काढण्याचे संधी. 
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या संदर्भात चैत्राली आयडी सोबत उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याशी तसेच हर्षलसी आयडी सोबत अद्वैत दादरकर यांच्याशी  प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्याची / मुलाखत घेण्याची संधी.
माझ्या हौशी धावण्याचे चाहते 
मला लिहिण्याकरता प्रोत्साहन देणारे; मी बरे लिहितो अशी जाणीव करून देणारे चाहते 

मायबोलीला काय दिलं. 
तसं काही फार नाही. जे मिळाले त्या तुलनेत तर काहीच नाही. पण मायबोलीच्या गाभार्‍यात जे काही खुलभर दूध वाहले ते अगदी मनापासून आणि निर्भेळ. त्यात पाणी नव्हते अजिबात हे नक्की. 

गाजलेले लेखन 
प्रतिसाद संख्या हा एकच निकष ठेवला तर फार गाजले असे म्हणता येण्याजोगे लिखाण हातून झाले नाही. मी लिहिता येत नाही म्हणता म्हणता लूडबूड सगळीकडे केली. Proud आणि त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या आणि चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया मात्र जरूर मिळाल्या.   

माझ्यामते उल्लेखनीय
म्हणजे ललित लेख - इंद्रवज्र  https://www.maayboli.com/node/39123
वार्तांकनवजा लेखन मेळघाट मैत्री शाळा - एक झलक https://www.maayboli.com/node/45066
शतशब्द कथा - वैकुंठ https://www.maayboli.com/node/52786
कविता  - तो https://www.maayboli.com/node/57085
प्रकाशचित्रे - संहिता चित्रपटाच्या पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी घेतलेली प्रकाशचित्रे https://www.maayboli.com/node/45894
एक इतिहास घडत असताना जगात आधी केलेले वार्तांकन वजा लेखन डॉ. अमित समर्थ - अशक्य ते शक्य करिता सायास https://www.maayboli.com/node/66899
धावण्या संदर्भात लिहिलेले लिखाण धावणाआख्यान https://www.maayboli.com/node/49304 आणि खारदूंग ला चॅलेंज संदर्भात केलेले लिखाण  https://www.maayboli.com/node/64079
पदभ्रमण वर्णन - शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक https://www.maayboli.com/node/69326

त्यावरून आठवण झाली की मी लिहून इतरांना गांजण्यापेक्षा  मी लिहावे म्हणून मलाच गांजले गेले आहे इकडे https://www.maayboli.com/node/69227 :दिवे: घ्या.

पण त्यामुळे एकंदरीत आपण बरे लिहितो आणि लिहिलेले लोकांना आवडते असे जाणवले.
हे मायबोलीकरांचे प्रेमच होय.  

मायबोली सारखी अत्यंत सर्वसमावेशक वेबसाईट तयार करुन गेली २५ वर्षे यशस्वीरीत्या चालवल्याबद्दल माबोच्या संस्थापकांचे आणि सर्व  संबंधितांचे मनःपुर्वक आभार !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन, छान आढावा घेतलाय तुम्ही.
तुमचे लेख आवडीने वाचतोच पण तुमचे प्रतिसाद ही वाचनीय.असतात.

धन्यवाद Srd, आसा. , सामो, ललिता, कविन, अवल, बिपिनसांगळे, मामी, अन्जू, सुनिधी, जागू, दत्तात्रय साळुंके, मृ , ऋन्म्या, फा, पराग, ममो, किशोर मुंढे, चंद्रा, वावे, मानव, अश्विनी, अनू, मंजूताई, निरू.

पराग, कैलास-मानस चे वर्णन त्याच वेळी लिहायला हवे होते असे आता वाटते आहे.

अनू - हा प्रोफाईल फोटो लावल्यानंतर अनेक दिवसांनी पहिल्यांदाच त्याबद्दल कोणीतरी कॉमेंट केल्ये. धन्यवाद. मी स्वतःला पण कधी सिरियस्ली घेत नाही. तुम्ही माझे लिखाण पण फार सिरियसली घेऊ नका. सुधारणेला बराच वाव आहे.

अश्विनी ममो - माझ्या बाबतीत असे अनेकदा घडते की केलेल्या गोष्टी करताना / केल्यावरही मला त्यात इतरांना जितके वाटते तितके फार काही भारी वाटत नाही. चादर ट्रेक केल्यानंतरही मला अनेक लोक करतात तसा तो एक ट्रेक मी केला त्यात काय एवढं असंच झालेलें. मार्गीचा माझ्यावर अगदी लाभावीण प्रकारचा लोभ आहे. त्यानी माझे धागा काढून जाहीररित्या अवास्तव कौतुक केल्याबद्दल माझी जरा चीडचीडच झाली होती. पण त्या धाग्यावर इतक्या जणांनी आग्रहपुर्वक लिहिले लिही म्हणून लिहिले मग. पाल्हाळ लिहिता लिहिता चार भाग झाले.

रच्याकने तिकडे मार्गीच्या धाग्यावर ७८ प्रतिसाद आहेत. तितके चार पैकी एकाही भागावर नाहीयेत. Proud

कविन, सुनिधी - तळमळीचा कार्यकर्ता असलोच तर त्याचे एक प्रमुख कारण प्रत्यक्षात कधीही न भेटलेल्या माणसांकडून मैत्रीकरता जी
मदत मिळाली जो विश्वास दाखवला गेला त्याला पात्र ठरेल असेच वर्तन आपल्या हातून घडावे ही भावना होय. मायबोलीकरांनी नेहेमीच सगळ्या चांगल्या कामांना भरभरून मदत केली आहे. पाठिंबा दिला आहे. मला इतक्या वर्षांनंतरही हे जबरदस्त सुंदर आणि जगात चांगुलपणा टिकून आहे असे आश्वस्त करणारे वाटते.

मानव - माबोवरच्या लक्षात राहणार्‍या पहिल्या दोन व्यक्तींमधे मी आहे हे वाचून भारी वाटले.

वावे - त्या मभादि संयोजनात मी येण्याचे कारणच मुळी ते वर्ष गोनिदांची जन्म शताब्दी वर्ष असणे हे होते. गोनिदा म्हणजे आवडते व्यक्तीमत्त्व. आमच्या इथे भेटलेल्या समानधर्मी वाचकांच्या वाचनकट्ट्याची सुरुवातच मुळी त्यांच्या 'माचीवरला बुधा' ह्या पुस्तकाने झाली होती.

चंद्रा - लिखाण कसे वाटले ते जरूर कळवा.

किशोर ममो - नाव कसेही लिहिले तरी चालेल प्रतिसादामागची भावना महत्वाची.

फा आणि पराग - आठवतंय मला ते गटग. त्याच्या वृत्तांतामधे मी पण चार ओळी खरडल्या होत्या. फा त्याच वेळी तू दुबई वरून चॉकोलेटस आणली होतीस.

कविन - मी विसरूनच गेलो होतो तुला बंडाना दिल्याचे. आपण नचिच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी भेटलो होतो ना.

मामी - हल्ली कुठेही मिळतो तो प्रकार त्यावेळी नाविन्य होते.
इकडे पहा. https://www.amazon.in/Generic-Unisex-Head-Bandana-Multicolour/dp/B07G7CX...

ऋनम्या - तुझी ओळख माझ्यापाशी उघड केल्यानंतर इतरांना माहीत होईपर्यंतचे काही दिवस माझी अवस्था मोनिका आणि चँडलर बद्दल माहीत झालेल्या फ्रेंड्स मधल्या जोई सारखी झाली होती. Happy अर्थात मला वाटले होते की रीया आणि / किंवा साती यांना तू माझ्या आधी सांगीतले असणार म्हणून.

दत्तात्रय साळुंके - असाच लोभ असू द्या ही विनंती.

सामो - माझे बदला बद्दलचे एकाच वाक्यातले मत आवडले नाही ईट्स ओके. माझे माबोवरच्या बदला बद्दलचे एकाच वाक्यातले मत ज्यांना पटले असेही लोक आहेतच. आयेमेचो (IMHO) 'कॉफी विथ करण' हे मायबोलीचे अ‍ॅव्हरेज आहे. काही भाग अजून रॉन्देव्हू विथ सिमी सारखा आहे तर काही एआय्बी च्या रोस्ट प्रमाणेही झालाय. कालाय तस्मै: नमः|

मराठीत ही भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द नाहीत म्हणून इंग्रजीत...
People simply love and respect you...
खूप genuine व्यक्तिमत्व आहात तुम्ही !

आपण नचिच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी भेटलो होतो ना.>> हो बरोबर. त्यावेळची भेट फार घाई गडबडीत झाली होती, एकदा सवडीने भेटूया. तो बंडाना वापरत्येस हे वाचून छान वाटले.

खूप genuine व्यक्तिमत्व आहात तुम्ही ! >>>>
पशुपत- आवडले माझ्याबद्दलचे शब्द. This is exactly how I would like people to remember me.

अजून एक बदल वर लिहायचा राहीलाय तो म्हणजे पुर्वीसारखी मायबोलीवर जाहीर करून गटग होत नाहीत हल्ली. म्हणजे इथली माणसे आपापसात भेटतात पण अन्य मार्गाने संपर्क साधून. त्यामुळे ठराविक माणसेच भेटतात. नवीन मायबोलीकरांच्या प्रत्यक्ष आणि एकत्रित भेटी हळूहळू कमी झाल्यात आणि गेल्या दोन वर्षात तर कोरोना मुळे बंदच पडल्यात. परत एकदा एवेएठि भेटणे सुरु व्हावे अशी ईच्छा आहे.

@हर्पेने, आवर्जुन माझ्या मताची दखल घेतल्याबद्दल खरच आभार.
>>>>>>>>हे मायबोलीचे अ‍ॅव्हरेज आहे. काही भाग अजून रॉन्देव्हू विथ सिमी सारखा आहे
हे मात्र खूप आवडले.

हर्पेन, छान आढावा घेतलाय तुम्ही.
तुमचे लेख आवडीने वाचतोच पण तुमचे प्रतिसाद ही वाचनीय.असतात.>>>> +१११ मी पण हेच म्हणीन

हर्पेन - मस्त लेख लिहीला आहेस... एकदम मनापासुन लिहिला आहेस हे जाणवत आहे

तुझी इमेज म्हणजे सहज पळता पळता (पायी अथवा सायकलवरून) हातासरशी अनेक सामाजिक कार्य करू शकणारा माणूस अशी आहे. >> १००% सहमत...

तुला भेटायचा योग एकदाच आला आहे... प्रभात रोडवर तु सकाळ सकाळ १६ किमी पळायची सुरुवात करत असताना... मीही खूप बढाया मारलेल्या तुझ्याबरोबर ८-१० किमी पळेन अश्या पण त्या सकाळी नुसती भेट घेउनच पळ काढलेला मी Happy

नक्की भेटु लवकरच परत ..

मस्त हर्पेन. आधी वाचलेला पण प्रतिक्रिया द्यायची राहिलेली.
तुझी प्रतिमा वर अनेकांनी लिहिली आहे तशीच आहे मनात. शार्प सेन्स ऑफ ह्युमर हे एक अ‍ॅड कर आणखी. Happy

प्रामाणिक लेखन...!!
तुमच्या सेवाभावी कार्याचे नेहमीच कौतुक वाटते.

पूर्वीसारखी मायबोलीवर जाहीर करून गटग होत नाहीत हल्ली.

>>> अगदी! मलाही आज तेच आठवलं होतं. इथे गटगचा धागा निघायचा, मग तिथे पब्लिकचा टी.पी., कोण कोण येणार हे तिथे यादीत दिसायचं, गटग झाल्यावर एकेकाच्या वृ.पोस्टी - मजा यायची ते सगळं वाचायला. गटगला न जाताही जाऊन आल्याचा फील यायचा.

गटगला न जाताही जाऊन आल्याचा फील यायचा.>> +१
मी जेव्हा गटग होणार्‍या शहरात रहात होतो तेव्हा माबोवर फार न्हवतो आणि दूरगावी गेल्यावर माबोवर येऊ लागलो तेव्हा ह्या टीपी/ वृत्तांतं वाचुन फारच मस्त वाटायचं. अशी जाहिर गटग चालू झाली पाहिजेत.

धन्यवाद धनुडी, रुपाली
मंदार, वाचून कळव लिखाण कसं काय वाटलं ते
आदित्य, तू सुट्टीवर पुण्यात आला असताना भल्या सकाळी सहा वाजता मला भेटायला आला होतास हे आणि खारदुंग ला करता वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन मी कधीच विसरणार नाही
अमित, शार्प सेन्स ऑफ ह्युमर बद्दल विशेष धन्यवाद
लले, गटगला न जाता ही जाऊन आल्याचा फील वगैरे ला अगदी अगदी, आपणच आयोजित करूया एक गटग आता
अमित कधी येतोयस भारतात, तेव्हाही भेटूया.

हर्पेन, मस्त लिहिलयस. तू लिहिता येत नाही म्हणणं म्हणजे अतिच विनय की!
तू ते बहुपयोगी कापडी प्रकरण मला पण दिलं होतस. भरपूर वापरलं मी. आता खराब पण झालय.

तुमचे कार्य, ट्रेक, लिखाण सर्वच वाखाणण्याजोगे असते.
Happy

अगदी मोजक्या माबोकरांना प्रत्यक्ष भेटले आहे.
तुमचे presesnce of mind आणि sense of humar भारी आहे हे जाणवलं.
आपल्या मभादि टीम गटग च्या वेळेस सर्वांना भेटून खूप छान वाटले होते.

छान झालाय लेख Happy प्रश्नच नाही

हर्पेन, छान आठवणी! मैत्री या स्वयंसेवी संस्थेच्या आणि इतर अनेक चांगले सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या वतीने तुम्ही मायबोलीवर वेळोवेळी जी माहिती पोस्ट करत असता ते मला फार प्रेरणादायी वाटते. You act as a liaison between the NGO and the society. हा रोल फार महत्त्वाचा असतो आणि तो तुम्ही गेली अनेक वर्षं उत्तम रीतीने निभावत आहात.
तुमची चद्दर ट्रेक ची मालिका वाचायची राहिली आहे हे एकदम लक्षात आलं. आता वाचेन नक्की!
अजून एक छान गोष्ट म्हणजे कोणत्याही नवीन सदस्याच्या लेखावर तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया देता. हे तुमचे gesture कौतुकास्पद आहे.

हर्पेन, खूप छान आढावा घेतलाय. आवडलेच. तुमच्या चाहत्यांची संख्या एकाने वाढली बरं का Happy संयोजकांच्या शब्दानुसार

Happy छान लिहीले आहे.
... हा भैय्या, कुछ बात तो थी अ.ग. मे... One flew over the cuckoo's nest..

धन्यवाद किल्ली , पुण्यात आलीस की परत एकदा भेटू

You act as a liaison between the NGO and the society. आणि नवीन सदस्याच्या लेखावर तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया देता. >>>

ह्या दोन सुक्ष्म निरिक्षणांबद्दल खास धन्यवाद जि.
मी देखील स्वतः ला कार्यकर्ता पेक्षा सेतू मानतो. अनेक चांगल्या स्वयंसेवी संस्थांना मदतीची गरज असते. अनेकांना काही विशिष्ट काम करणार्‍या संस्थांनाच मदत करायची असते आणि ती मदत सुयोग्य ठिकाणी पोहोचावी अशी रास्त अपेक्षा असते मी त्या दोघांमधे पूल बनण्याचा प्रयत्न करतो.
नवीन सदस्याच्या लिखाणावर मी प्रतिसाद आवर्जून देण्याचे कारण म्हणजे माझ्याकरता लिहिणे ही सहजसाध्य बाब नाही. मला लिहायला फार कष्ट पडतात. त्यामुळे ज्यांनी नव्याने लिखाण सुरु केले असेल त्यांची निदान दखल तरी घेतली जावी, त्यांनी लिहिते रहावे हाच होय. आपल्या मायबोलीकरता इतके तरी जरूर करता यायला हवे.

तुमच्या चाहत्यांची संख्या एकाने वाढली बरं का Happy संयोजकांच्या शब्दानुसार
धन्यवाद वंदना पण लिखाण वाचलेत का, आवडते आहे का ? आवडले तर जरूर कळवा.

सी धन्यवाद आणि One flew over the cuckoo's nest.. म्हणजे मराठीत काय ते सांगूनच टाक.

One flew over the cuckoo's nest.. हा एक गाजलेला जुना सिनेमा आहे. वेड्यांच्या इस्पितळात एका वेड्याला शेवटी त्याच्या सामर्थ्याची जाणीव होते अशा काहीशा आशयाचा. असंबद्ध वर सुसंबद्ध व अन्यत्र मायबोलीवर असंबद्ध चालू असणे ह्याला ती उपमा लागू पडेल असे वाटले म्हणून लिहीले.

Pages