माझ्या आठवणीतील मायबोली - हर्पेन

Submitted by हर्पेन on 18 September, 2021 - 09:16

माझ्या अवलोकनात जाऊन बघता मी पंधरा वर्ष जुना सदस्य आहे असे दिसते. मला मायबोलीचे सदस्यत्व घेऊन वाचता वाचता पंधरा वर्षे झाली हे खरेच वाटत नाही. खरे सांगायचे तर मधेही मी मायबोलीवर कसा / कधी आलो अशा आशयाचा धागा आला त्यावेळी मला मी मायबोलीचे सदस्यत्व नक्की कधी घेतले ते नीटसे आठवतही नव्हते. आताही मुद्दाम उलटी मोजणी करत मागे गेलो असता असे जाणवले की मी मॉरिशस येथे असताना हे सदस्यत्व घेतले असावे. तिकडे फारा वर्षांपूर्वी ऊसाच्या शेतावर काम करायला म्हणून गेलेली आणि तिकडेच स्थायिक झालेली काही मराठी मंडळी आहेत त्यातली एक ज्योती नावाची आमच्या ऑफिसात हाऊसकिपर म्हणून कामाला होती. तिने मला रामाची मराठी आरती लिहून दे आणि अर्थही सांग म्हणून विचारणा केली होती. आरती पाठ होती पण अर्थ ... त्याबाबतीत माझा पहिल्याच 'उत्कट साधूनी शिळा सेतू बांधोनि' वाक्याला त्रिफळा उडाला होता.  बहुदा त्यावेळी मी नेटवर अर्थ शोधात असताना मायबोलीचा शोध लागला असावा. पण त्यावेळी जास्त रुळलो नाही. ऑफिसातून वैयक्तिक कामे / टंगळमंगळ न करायचे, तत्ववादी असण्याचे दिवस होते ते.  

त्यानंतर काही काळ काही ना काही कारणाने नोकऱ्या फटाफट  बदलाव्या लागल्या , गावं बदलावी लागली. त्यामुळे इकडे अधून मधून येत होतो पण चस्का म्हणतात तसा काही लागला नाही. अशातच कधीतरी  तुमचा पासवर्ड रिसेट करा की अशाच काही अर्थाची मला ई-मेल आली आणि . त्यावेळी मी पुण्यात परत आलो  होतो.  त्यासुमारास मायबोली चा फॉरमॅट देखील बदलला होता देवनागरीतून लिहिता यायला लागले होते आणि  मग त्यावेळी खऱ्या अर्थाने रुळलो. 

रुळलो म्हणतोय पण सुरुवातीला वाचनमात्रच होतो. अनेक वर्षे महाराष्ट्री नसल्याने माझे मराठी खालावले होते. कुठल्याश्या प्रतिसादात संधी
या शब्दाचे अनेकवचन संध्या केल्यावर कुठून कुठून येतात एकेक असे ऐकून घ्यावं लागलं होतं. तसेच टाईप करायचा वेग देखील कमी पडायचा.  एखाद्या कुठल्या चर्चेत प्रतिसाद लिहायचा तर सुयोग्य शब्द आठवून टाईप करेपर्यंत आपला मुद्दा दुसराच कोणीतरी लिहूनही गेलेला असायचा. स्वतंत्र लिखाण तर दूरचीच गोष्ट, प्रतिसादही नीट लिहिता यायचे नाहीत. अर्थात अजूनही फार फरक पडलाय असे नाही. पण असो. तर मुद्दा हा होता की मी वाचनमात्रच होतो.  खूप वाचलं त्यावेळी.  दादची गानभुली सिरीज सुरु होती, राफा, धुंद रवी ई. मंडळी हसवत होती; यो रॉक्स, रोमा यांचे दुर्ग भ्रमणावरचे लेख, जिप्स्याचे फोटो, नंदिनी, सुपरमॉम, विशाल कुलकर्णी, कचा, कौतुक यांच्या कथा, चिनूक्सचे त्याचे स्वत:चे अन्नम वै प्राणा व त्याने आणलेले इतरांचे इतरत्र पूर्व प्रकाशित लेख अशी जवळपास रोजच्या रोज मनोरंजनाची मेजवानीच असायची. वाचलेल्या पुस्तकांबद्दल, करत असलेल्या व्यायामाबद्दल, बघितलेल्या सिनेमांबद्दल, अक्षरवार्ता व इतरही अनेक धाग्यांवर लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आलेले खरेखुरे अनुभव आणि प्रांजळपणे मांडलेली मते / प्रतिसाद वाचूनही विचारांचा परीघ विस्तृत होत होता. 

मी इथे सगळ्यात पहिला लेख टाकला होता तो तोरण्यावर बघितलेल्या इंद्रवज्र संदर्भात तो ही आधीच लिहिलेला होता तो इथे कॉपी केला.  त्यानंतर लिहायला सुरु केले ते माझ्या मेळघाटात जाऊन केलेल्या स्वयंसेवकगिरी बद्दल आणि मैत्री च्या उपक्रमांची ओळख करून देणारे लिखाण.  नाही म्हणता म्हणता चिनुक्सच्या आग्रही विंनतीला मान देऊन लेखन स्पर्धेत भीत भीत भाग घेतला आणि लोकप्रिय मान्यवर लेखकांच्या बरोबरीने भाग घेऊन बक्षीस मिळाले त्यावेळी खूप आनंद झाला. https://www.maayboli.com/node/44780 पण एकंदरीत लिहिणे हे माझ्याकरता अजूनही कष्टाचेच काम होय.
 
लेखनात अगदी नवीन असतानाही मला इकडे कायमच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले आहेत. इतरांच्या लिखाणावर दिलेले प्रतिसाद आवडले / आवडतात अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. टीका झाली असलीच तरी माझ्यात सुधारणा करायला हव्या अशा बाबींवरच.   

जाणवलेले बदल 
मायबोलीवर झालेल्या तांत्रिक बदलांव्यतिरिक्त जाणवणारा बदल  म्हणजे  जुन्या सकस लिहिणाऱ्या लेखकांचे इकडे लिहिणे बंद झालेच पण चांगले लिहिणारे नवीन लोक आले तरी ते फार थोडा काळ इकडे रमतात.

इथला सध्याचा सर्वसाधारण लोकव्यवहार जास्त प्रमाणावर (भाडीपाच्या कास्टिंग काऊच वर जसे म्हणतात आपले कॅज्युअल आहे तसा) सगळीकडेच कॅज्युअल झाला आहे. पूर्वी धागा विषयाशी असंबद्ध प्रतिसाद चुकून देखील लिहिले जाऊ नये म्हणून प्रयत्नशील असायचे लोक ते आता जवळपास  कुठल्याही धाग्यावर गप्पा सुरू करतात अगदी स्वतः धागालेखक सुद्धा त्यात सामील होतो. अजून गंमत म्हणजे मध्यंतरी 'असंबद्ध गप्पा' ह्या धाग्यावर अगदी सुसंबद्ध गप्पा मारल्या जात होत्या. 

झालेला बदल एकाच वाक्यात सांगायचा झाला तर म्हणता येईल मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे.  अधिक आधुनिक,  अधिक कालसुसंगत आणि अधिक लोकप्रिय पण जरा उथळ आणि सवंगही. 

अजून एक बदल लिहायचा राहीला तो म्हणजे पुर्वीसारखी मायबोलीवर जाहीर करून गटग होत नाहीत हल्ली. म्हणजे इथली माणसे आपापसात भेटतात पण अन्य मार्गाने संपर्क साधून. त्यामुळे ठराविक माणसेच भेटतात. नवीन मायबोलीकरांच्या प्रत्यक्ष आणि एकत्रित भेटी हळूहळू कमी झाल्यात आणि गेल्या दोन वर्षात तर कोरोना मुळे बंदच पडल्यात. परत एकदा एवेएठि भेटणे सुरु व्हावे अशी ईच्छा आहे.
   
आवडलेली  सोय 
इथल्या लेखाची लिंक फेसबुक  आणि व्हॉटस अ‍ॅपवर शेअर करता येते हे आवडतं. निवडक दहा कमी पडायचे त्यामुळे लेखकाचे चाहते बनता येतं ही सोय आवडली

माहितच नसलेली सोय
नीट वापरता येत नाही अशी असू शकेल पण माहीतच नाही अशी सोय बहुदा नसावी. काही वेळा तर नवीन सोय तपासून बघण्याकरता स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे.

मायबोलीनं काय दिलं
खूप काही दिलं. प्रत्यक्ष भेटींमधून आणि न भेटताही विस्तारीत कुटूंब बनलेले भरपूर मित्र मैत्रिणी.
'मैत्री' या स्वयंसेवी संस्थेची माहिती प्रसारित करायला हक्काचे व्यासपीठ. 
माबो चित्रपटांचे माध्यम प्रायोजक असताना प्रथमखेळसमयी उपलब्ध राहण्याची; त्यावेळी कलाकारांचे आणि इतर उपस्थित मान्यवरांचे  फोटो काढण्याचे संधी. 
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या संदर्भात चैत्राली आयडी सोबत उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याशी तसेच हर्षलसी आयडी सोबत अद्वैत दादरकर यांच्याशी  प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्याची / मुलाखत घेण्याची संधी.
माझ्या हौशी धावण्याचे चाहते 
मला लिहिण्याकरता प्रोत्साहन देणारे; मी बरे लिहितो अशी जाणीव करून देणारे चाहते 

मायबोलीला काय दिलं. 
तसं काही फार नाही. जे मिळाले त्या तुलनेत तर काहीच नाही. पण मायबोलीच्या गाभार्‍यात जे काही खुलभर दूध वाहले ते अगदी मनापासून आणि निर्भेळ. त्यात पाणी नव्हते अजिबात हे नक्की. 

गाजलेले लेखन 
प्रतिसाद संख्या हा एकच निकष ठेवला तर फार गाजले असे म्हणता येण्याजोगे लिखाण हातून झाले नाही. मी लिहिता येत नाही म्हणता म्हणता लूडबूड सगळीकडे केली. Proud आणि त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या आणि चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया मात्र जरूर मिळाल्या.   

माझ्यामते उल्लेखनीय
म्हणजे ललित लेख - इंद्रवज्र  https://www.maayboli.com/node/39123
वार्तांकनवजा लेखन मेळघाट मैत्री शाळा - एक झलक https://www.maayboli.com/node/45066
शतशब्द कथा - वैकुंठ https://www.maayboli.com/node/52786
कविता  - तो https://www.maayboli.com/node/57085
प्रकाशचित्रे - संहिता चित्रपटाच्या पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी घेतलेली प्रकाशचित्रे https://www.maayboli.com/node/45894
एक इतिहास घडत असताना जगात आधी केलेले वार्तांकन वजा लेखन डॉ. अमित समर्थ - अशक्य ते शक्य करिता सायास https://www.maayboli.com/node/66899
धावण्या संदर्भात लिहिलेले लिखाण धावणाआख्यान https://www.maayboli.com/node/49304 आणि खारदूंग ला चॅलेंज संदर्भात केलेले लिखाण  https://www.maayboli.com/node/64079
पदभ्रमण वर्णन - शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक https://www.maayboli.com/node/69326

त्यावरून आठवण झाली की मी लिहून इतरांना गांजण्यापेक्षा  मी लिहावे म्हणून मलाच गांजले गेले आहे इकडे https://www.maayboli.com/node/69227 :दिवे: घ्या.

पण त्यामुळे एकंदरीत आपण बरे लिहितो आणि लिहिलेले लोकांना आवडते असे जाणवले.
हे मायबोलीकरांचे प्रेमच होय.  

मायबोली सारखी अत्यंत सर्वसमावेशक वेबसाईट तयार करुन गेली २५ वर्षे यशस्वीरीत्या चालवल्याबद्दल माबोच्या संस्थापकांचे आणि सर्व  संबंधितांचे मनःपुर्वक आभार !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे हरपेन. चददर ट्रेकची लेखमाला भारी होती. पळपळीबद्दल अजून लिही. शिवाय कैलास मानसचं प्रवास वर्णन बाकी आहे Happy

मस्त लिहिलंय.
प्रोफाइल फोटो बघून उलटीपालटी झालेय मी.
तुमचे लिखाण सिरीयसली वाचले जाते.

छान लिहिलेय हर्पेन !! चादर ट्रेक ची लेखमाला छानच होती . तोपर्यंत मला असे काही असते हे माहीतच नव्हते . वाचून वाटले होते , बापरे , काय काय करतात लोक ? तुमचे मैत्री चे लेख ही छान असतात .

छान लिहिलय, तुमच्या चादर ट्रेक च्या मालिकेने मी फारच प्रभावित झाले होते. खूप आवडली होती मालिका.

पण मायबोलीच्या गाभार्‍यात जे काही खुलभर दूध वाहले ते अगदी मनापासून आणि निर्भेळ. त्यात पाणी नव्हते अजिबात हे नक्की. >> आवडेश

सज्जन, प्रामाणिक मित्र आणि तळमळीचा कार्यकर्ता आहेस तू माझ्यालेखी

छान लिहिलंय.
मी माबोवर आलो आणि थोडा वाचू लागलो तेव्हा कुठल्याशा बाफवर चर्चा सुरू असताना पहिल्या दोन व्यक्ती लक्ष्यात राहिल्या त्या तुम्ही आणि फारएण्ड.

छानच लिहिलंयत!

मी माबोवर पहिला लेख लिहिला तो मभादि मध्ये, मला आवडलेले गोनीदांचे पुस्तक- दुर्गभ्रमणगाथा. लेख पहिल्यां दाच लिहिला असला तरी माबोवाचन भरपूर असल्यामुळे प्रतिसाद येतील की नाही, कसे येतील याची धास्ती होती. तेव्हा तुम्ही संयोजक होतात आणि पहिलाच प्रतिसाद (हर्पेन आयडीनेच) खूप छान दिला होतात. तेव्हा खूप मस्त वाटलं होतं.
नंतर २०१९ च्या मभादि संयोजनात तुमच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही छानच होता.

हर्पेन,
तुम्ही जे जाणवलेले बदल नोंदवले आहेत त्याच्याशी शतश: सहमत !
तुमचे बरेचसे लेखन वाचले आहे. लिंक दिलीत ते छान केलेत. राहून गेलेलं पटकन वाचता येईल.

मस्त मनोगत हरपेन (मोबाईल कीबोर्ड वरून तुमचे नाव लिहिताना खूपच अडचणी येत आहेत). छान आठवणी सांगितल्या आहेत.

मस्त रे! इंद्रवज्रावरचा लेख आठवला! तुझ्या सामाजिक कामाबद्दल कायमच टोटल रिस्पेक्ट आहे. त्याबद्दलची माहितीसुद्धा चांगली आहे. एकूण तुझी इमेज माझ्या डोक्यात भरपूर काही चांगली कामे करणारा व अधूनमधून इथे लिहीणारा अशी आहे Happy आम्ही बरेचसे एक्झॅक्टली उलटे करतो Wink

एकदा गंधर्व जीटीजीला तू कसलेतरी बहुउद्देशीय कापड आणून त्याबद्दल माहिती दिली होतीस असे मीच लिहीलेल्या वृ मधे मी परवा वाचले. त्याबद्दल काही आठवते का? Happy

(मानव - थँक्स!)

एकदा गंधर्व जीटीजीला तू कसलेतरी बहुउद्देशीय कापड आणून त्याबद्दल माहिती दिली होतीस असे मीच लिहीलेल्या वृ मधे मी परवा वाचले >>>> Lol तू होतास त्या गटगला ? हरपेननि पूर्ण डेमोच दिला होता त्या कापडाचा Proud

कसलेतरी बहुउद्देशीय कापड आणून त्याबद्दल माहिती दिली होतीस >> बंधाना की काय? मला त्याने बंधाना भेट देऊन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरता येत याच प्रात्यक्षिक दाखवल होतं. अजूनही वापरते मी ते

छान लिहिले आहे
तुम्ही माबोचे मिसो आहात Wink
बहुधा ऋन्मेष आयडीच्या जन्मानंतर मायबोलीवरची आपण पहिलीच व्यक्ती ज्यांच्याशी मी फोनवर बोललो.

खूप प्रांजळ आढावा तुमच्या स्वभावाला साजेसा.
तुमचे इतर लिखाण " चद्दर ट्रेक, मैत्री, तो" आदी वाचले हे सगळं खूप निखळ आणि या आढाव्या सारखंच अतिशय आतून आलंय. "मैत्री" तर तुम्ही मेळघाटात, माबोवर आणि इतरत्रही निभावत आहात.
तुमच्याशी फोन वरुन बोललोय तेव्हा हक्काचं मैत्र मिळाल्याचा आनंद झाला.
अजून खूप लिहा खूप समाजसेवा करा.

खूप छान लेख आणि योग्य निरीक्षणं नोंदवली आहेस. तुझी इमेज म्हणजे सहज पळता पळता (पायी अथवा सायकलवरून) हातासरशी अनेक सामाजिक कार्य करू शकणारा माणूस अशी आहे.

बहुऊद्देशीय कापडाबद्दल भयंकर उत्सुकता लागलीये.

हर्पेन

खूपच छान ! मस्त आहे आठवणींचा प्रवास . तुमचे समतोल विचार वाचायला नेहमीच आवडतात .

झालेला बदल एकाच वाक्यात सांगायचा झाला तर म्हणता येईल मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे. अधिक आधुनिक, अधिक कालसुसंगत आणि अधिक लोकप्रिय पण जरा उथळ आणि सवंगही. +१

वा मस्त लिहिलस Happy
तुझ्यासारखच स्वच्छ सरळ आनंदी!
》एकाच वाक्यात सांगायचा झाला तर म्हणता येईल मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे.《 हे लैचचच आवडलं Wink

एकाच वाक्यात सांगायचा झाला तर म्हणता येईल मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे.《 हे लैचचच आवडलं Wink>> हो हो अवल, हे वाक्य मलाही आवडलं आहे Proud

मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे. >>>

Lol हे आवडलं (आणि पटलं!)

>>>>>>>मायबोली आधी rendezvous with simi garewal शो होती ती आता koffee with karan झाली आहे.
हा शेरा, हे मत आवडले नाही. कारण सिमीचा शो फार क्लासी होता. करणचा एकदाच पाहीलेला & इट वॉज फार क्राय फ्रॉम बीइन्ग क्लासी.

Pages